जयंत, म्हणजे “गप्पागोष्टी फेम” जयंत ओक हा आज चक्क ७५ वर्षांचा झाला. खरंच वाटत नाही ना ? इतका जयंत हा सदा बहार असतो. जयंत च्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
या निमित्ताने मी माझी आणि जयंत ची मैत्री आठवू लागलो. आम्ही एकमेकांच्या संपर्कात आलो, ते दूरदर्शन मध्ये मराठी चित्रपट विभागात एकत्र काम करताना. या विभागाचे काम असायचे ते म्हणजे दर शनिवारी प्रसारित करण्यात येणारा मराठी चित्रपट पूर्णपणे तपासून तो प्रसारण योग्य असल्याचे निश्चित करणे तसेच दर मंगळवारी प्रसारित होणाऱ्या “चित्रगीत” या मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमासाठी गाणी निवडणे, ती ऐकणे, तपासणे, संबधित निर्मात्यांचे पेमेंट देणे अशी कामे एकत्र करीत असू.
खरं म्हणजे जयंत १९७५ पासुन दूरदर्शन केंद्रात आकाशानंद यांचा सहायक म्हणून काम करायला लागला. त्या वेळी तो अभिनय, संगीत, संगितकार. ऊत्तम तालवाद्य वाजविणे यात पारंगत होता. त्यामुळे जयंतला लता मंगेशकर, आशा भोसले, सुधीर फडके, गुलाम अली, वसंतराव देशपांडे, जितेंद्र अभिषेकी अशा सर्व थोर कलाकारांना साथ करायला मिळाली.
पण दुर्दैवाने हरहुन्नरी जयंत पदवीधर नव्हता. त्यामुळे दूरदर्शन च्या सेवेत तो कायम होऊ शकत नव्हता. त्यामुळे जयंत चे कलागुण पाहून मी त्याला सांगत असे की, तू पदवीधर नाहीस, त्यामुळे सेवा नियमांनुसार तू दूरदर्शन मध्ये कधीच कायम होऊ शकणार नाहीस. त्यामुळें एक तर तू पदवीधर हो किंवा स्वतंत्र एकपात्री प्रयोग सुरू कर. कदाचित जयंतच्या मनात
स्वतःचा कार्यक्रम सुरू करण्याचे घोळत असावे. म्हणून १९९२ मध्ये जयंत ने दूरदर्शन सोडून “गप्पागोष्टी” हा स्वतःचा एकपात्री कार्यक्रम सादर करायला सुरुवात केली.
अर्थात या कार्यक्रमापूर्वी दूरदर्शन वर प्रसारित होणाऱ्या “आमची माती, आमची माणसं” या कार्यक्रमांतर्गत “गप्पागोष्टी” मालिकेत जयंत ची बन्याबापू ही व्यक्तिरेखा चांगलीच लोकप्रिय झाली होती. त्यामुळे त्याने त्याचा एकपात्री कार्यक्रम “गप्पागोष्टी” याच नावाने सुरू केला.
बोलता बोलता गेल्या ३२ वर्षात या कार्यक्रमाचे भारत भर तसेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, दुबई, शारजा अबुधाबी, दोहा कतार असे मिळून आता पर्यंत १९०० कार्यक्रम झाले आहेत. जयंत चा ११०१ वा प्रयोग अमेरिकेतील न्यू जर्सी इथे झाला. निखळ, निर्भेळ मनोरंजनाचा, २ तासांचा हा कार्यक्रम प्रेक्षकांना खूप भावतो. म्हणूनच त्याचे अजूनही प्रयोग होत असतात.
जयंत हा अक्षरशः जन्मजात मुंबईकर आहे. मुंबईतील मराठी माणसाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या गिरगांव मध्ये ३० नोव्हेंबर १९४९ रोजी जयंत चा जन्म झाला. शालेय शिक्षण झाल्यानंतर त्याने देवधर म्यूझिक क्लास मध्ये रितसर संगीत शिक्षण घेतले. अखिल गांधर्व महाविद्यालयाची संगीताची मध्यमा परीक्षा तो प्रथम वर्गात उत्तीर्ण झाला आहे. त्याचे गुरू शाम गोगटे होत. पोलिडोर कंपनीची नमो ओंकार ही लांब तबकडी संगितकार जयंत ओक म्हणून प्रसिद्ध आहे. सद्गुरू ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्यामुळे आपले जीवनच बदलले. नामस्मरणाचा ध्यास लागला, असे जयंत प्रांजळपणे कबूल करतो.
आजवरच्या जयंत च्या सर्व संघर्षमय वाटचालीत अत्यंत धीराने साथ देणारी पत्नी नेमकी याच वर्षात त्याला सोडून देवाघरी गेली. त्यामुळे जयंत, पत्रकार असलेली मुलगी भक्ती, मुलगा जयेश, भाऊ, त्याचा परिवार असे कुणी जयंत ची पंचाहत्तरवी साजरी करण्याच्या मनःस्थितीत नाही. असो.
अशा या आमच्या गुणी कलाकार मित्रास सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खुपच छान माहिती मिळाली.
श्री. जयंत ओक यांच्या विषयी खुप सारे काही समजले, वाचून खुप छान वाटले,त्यांना 75 वर्षा निमित्त वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. व सप्रेम नमस्कार..
जयंत ओक ह्या हरहुन्नरी कलाकाराविषयी इतकी सविस्तर माहिती वाचून आनंद झाला. त्यांना ७५व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि सप्रेम नमस्कार. 🙏💐
जयंत सर, आपल्या पत्नीचे निधन ही कितीही दु:खद घटना असली, तरीही त्याला तुमच्या कलाप्रवासातला अडसर बनून देऊ नका, उलट पत्नीची इच्छा समजून तुमचा जीवनप्रवाह पुढे चालत राहू देत. तुमचे पुढचे आयुष्य सोपे आणि सुखद करण्याचा तोच मार्ग आहे. जीवेत् शरदः शतम्! 🙏💐
जयंत ओक या आडनाव बंधूंची ओळख आपल्या लेखातून होते आहे. काही महिन्याच्या फरकाने आम्ही दोघांनी पाऊणशे वयमान साजरे केले.
या निमित्ताने त्यांचा मो क्र मिळेल का?
आदरणीय
संपादक भुजबळ साहेब
आपणा जवळ नौकरीचा अनुभव खजिना आहे.आणि आपण आपल्या मित्रांनसाठी उतम, चांगला सल्ला देत आला आहात.असे मी आपल्या परिचय लेखातून नेहमी वाचतो .
आपले मनापासून अभिनंदन व शुभेच्छा!
गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव.