जीवनाचे तत्त्वज्ञान साध्या सोप्या भाषेत,सहज पटणारी उदाहरणे समजावून सांगणाऱ्या थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा आज स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने त्यांना वाहिलेली ही शब्द सुमनांजली. बहिणाबाईना विनम्र अभिवादन.
– संपादन
बहिणाबाईचा जन्म
झाला असोदे गावात
तिसाव्या वर्षीच आले
वैधव्य तिच्या जीवनात..१
न डगमगता एकटीने
निभावली जबाबदारी
जगण्याचे सोपे तत्वज्ञान
आत्मसात केले संसारी..२
श्रेष्ठ सिध्दहस्त कवयित्री
बहिणाबाई होती निरक्षर
निसर्गदत्त अशा प्रतिभेने
कविता तिच्या अजरामर..३
कृषीवल संस्कृतीत राबणारी
शेतीमातीशी तिची जवळीक
उस्फुर्त कवितेचा झरा वाहे
ना कोणाबद्दल आगळीक..४
सहज सुंदर कविता तिच्या
ऐकण्या,गाण्या किती मधुर
मानवी जीवनाचा अर्थ सांगती
रचना तिच्या अति सुंदर..५
दैववादा पेक्षा प्रयत्नवाद
श्रेष्ठ असे हा तिचा समज
साऱ्या रचना केल्या मुखोद्गत
लेखणीची ना भासे गरज..६
बहिणाबाईंच्या कविता
मराठीतील अनमोल ठेवा
आस्वाद घेता तयांचा
गवसतो साहित्याचा मेवा..७
— रचना : डॉ दक्षा पंडित. दादर, मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800