Wednesday, February 5, 2025
Homeयशकथा"प्रतिभा"ला वय नसतं !

“प्रतिभा”ला वय नसतं !

शीर्षक वाचताच जाणकार, शुध्दलेखन प्रेमी मंडळी लगेच म्हणतील की, व्याकरण दृष्ट्या “प्रतिभे”ला वय नसतं !” असं शीर्षक हवं म्हणून. अर्थात व्याकरणदृष्ट्या ते तसेच असायला हवे हे मलाही मान्य आहे. पण एखादी कथा, कादंबरी, पौराणिक, ऐतिहासिक प्रसंग या वर आधारित सिनेमा बनविताना लेखक,दिग्दर्शक जसे “सिनेमॅटिक लिबर्टी” घेतात, त्या धर्तीवर मी व्याकरणदृष्ट्या स्वातंत्र्य घेतले आहे, त्याचे कारण ही यश कथा एका प्रतिभासंपन्न प्रतिभा वर आहे म्हणून. असो.
   
तर आजच्या यश कथेची नायिका आहे, प्रा. प्रतिभा सराफ आणि तिचा वाढदिवस आहे. पण कितवा म्हणून विचारू नका, कारण “प्रतिभा”ला वय नसतं !” आता माझं म्हणणं तुम्हाला खरं वाटायचे असेल तर तुम्ही प्रतिभा सराफ यू ट्यूब चॅनल ला भेट द्या आणि अतिशय अल्लड, अवखळ आवाज ऐका म्हणजे मग तुमची खात्री पटेल.

तर अशा या प्रतिभेची आणि आमची, म्हणजे मी आणि माझी पत्नी अलका, अशी आमची पहिली भेट उरळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रमात २० वर्षांपूर्वी झाली होती. शेजारी शेजारी कॉटेज असल्यामुळे आठ दहा दिवस रोज भेटणे, बोलणे होत असे. पुढे खूप वर्षे उलटली पण आमचा काही संपर्क राहिला नाही आणि अचानक चार पाच वर्षांपूर्वी एका साहित्यिक कार्यक्रमात आमची भेट झाली आणि पाहिल्या पाहिल्या लगेच ओळख पटली. दरम्यान सोशल मीडिया चे प्रस्थ वाढल्यामुळे तर समक्ष भेटी जरी होत राहिल्या नाहीत तरी संपर्क नियमित होत राहिला आहे. त्यातून चार वर्षांपूर्वी ‘न्यूज स्टोरी टुडे’ वेब पोर्टल सुरू केल्यावर तर प्रतिभा चा “आम्ही चेंबुरकर” हा लेख आपल्या पोर्टल वर प्रसिद्ध झाला. तसेच तिच्या विषयक काही बातम्याही प्रसिद्ध होत राहिल्या.

एकदा आमच्या बोलण्यात आले की, आपण काही मित्र मंडळी मिळून अंदमान निकोबार द्वीपसमूहाला भेट देऊ या का ? आणि मला तर तिथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे “माझी जन्मभेट” हे चरित्र वाचल्यापासून तिथे जायची फार इच्छा होती पण काही ना काही कारणांनी ती फलद्रूप होत नव्हती. पण यावेळी मात्र प्रतिभातील नेतृत्व गुणांनी सर्व गोष्टी छान पैकी जुळून आल्यात आणि आमची आठ नऊ दिवसांची अंदमान सफर खरोखरीच अविस्मरणीय ठरली. ती का अविस्मरणीय ठरली, हे जिज्ञासूंना समजून घ्यायचे असेल तर त्यांनी या पोर्टलवर प्रतिभा लिहीत असलेली “अंदमानची सफर” ही लेख माला अवश्य वाचावी.

आता प्रतिभा खरोखरच प्रतिभा संपन्न का आहे, तर हे पहा.. तिच्या कविता, कथा, अन्य लेखन वाचून त्यात नावापुढे प्रा. लावलेले असल्यामुळे ती बऱ्याच जणांना / जणींना मराठीची प्राध्यापक वाटते. पण प्रत्यक्षात ती मराठी ची नाही तर “भौतिकशास्र” अतिशय किचकट (अर्थात माझ्यासाठी) विषयाची प्राध्यापक राहिली आहे. आता राहिली आहे, असे म्हणण्याचे कारण म्हणजे भरपूर पगार देणारी ही नोकरी तिने मनाप्रमाणे जगता यावे म्हणून खुशाल सोडून दिली. कोणत्याही शहाण्या, व्यावहारिक माणसाला हा निव्वळ वेडेपणा वाटेल पण इथेच तर प्रतिभाचे वेगळेपण दिसून येते. कारण असे मनाप्रमाणे जगायला फार मोठी हिम्मत, धाडस लागते आणि ते तिच्यात असल्यामुळेच नोकरीच्या बंधनातून ती मोकळी होऊन आता मनमोकळ्या भराऱ्या घेऊ शकत आहे. देश विदेशात फिरतेय.

प्रतिभाने भौतिकशास्त्र शिकवता शिकवता मात्र एक नाही (काव्यसंग्रह) २००३, मातीत पूर्णत्वानं रुजण्यापूर्वी…(काव्यसंग्रह) २०१०, दुःख माझे कोवळे (गझलसंग्रह) २०१२,  माझा कुणीतरी (ललित लेखसंग्रह) २०१४,  सलग पाच दिवस (कथासंग्रह) २०१४, कादंबरी जगताना (कादंबरी) २०१७,  सहजसंवाद (व्यक्तिचित्रणे) २०१८, मिठू मिठू… (बालकथासंग्रह) २०२१, उमलावे आतुनीच… (कवितासंग्रह) २०२१, आनंद (बालएकांकिका) २०२२, बेस्ट उपक्रमाची अमृतमहोत्सवी कथा (संकीर्ण) २०२२ अनाकलनीय (कथासंग्रह) २०२३ आणि प्रतिभारंग (ललितगद्य) २०२४ इतकी पुस्तके आतापर्यंत लिहिली आहेत.

तर प्रतिभाला प्राप्त झालेले पुरस्कारांची यादी पुढील प्रमाणे आहे.
* मुंबई मराठी साहित्य संघाचा ‘आश्वासक साहित्यिक पुरस्कार’

* मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचा ‘वृत्तपत्र लेखन विशेष उल्लेखनीय पुरस्कार’

* ‘मराठी साहित्य वार्ता’ कडून समग्र साहित्य लेखन कार्यासाठी ‘संत चोखामोळा काव्य गौरव पुरस्कार’

* ‘यमुनाई मातृवंदन पुरस्कार’ समग्र साहित्य लेखनासाठी ‘इंडो- रशियन फेस्टिवल’ कार्यक्रमांतर्गत जस्न- इ- रिझवी’ हा समग्र साहित्यासाठी पुरस्कार
* ‘उर्मी काव्य पुरस्कार’ समग्र कविता लेखनासाठी

* एकता कल्चरल अकादमी (रजि) यांच्यातर्फे समग्र कविता लेखनासाठी ‘ पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार’

विशेष म्हणजे प्रतिभाच्या सगळ्याच पुस्तकांना पुरस्कार मिळालेत.
काही पुरस्कार असे :
* ‘मातीत पूर्णत्वाने रुजण्यासाठी’ला ‘लळित साहित्य पुरस्कार (महाराष्ट्र), आशीर्वाद पुरस्कार इ.’सलग पाच दिवस’ला ‘साद बहुउद्देशीय संस्था, (अकोला), काव्यप्रतिभा बहुउद्देशीय संस्था (लासलगाव)

* ‘सहजसंवाद’ ला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार, ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, ‘दुःख माझे कोवळे’ ला ‘आरती प्रभू स्मृती पुरस्कार’

* ‘उमलावे आतुनीच…’ इचलकरंजी वाचनालयाचा राज्यस्तरीय पुरस्कार, सृजनप्रतिभा 2022, ‘मिठू मिठू…’ ला साहित्य प्रेमी भगिनी मंडळ (पुणे), मराठा मंदिर (मुंबई) असे जवळपास  ६० पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत.

शैक्षणिक, साहित्यिक कामगिरी सोबत प्रतिभाने साहित्य क्षेत्रातील भूषविलेली पदे अशी आहेत : –
— मुंबई मराठी साहित्य संघाची नियामक मंडळ सदस्य,
— अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ माजी सदस्य,
— महाराष्ट्रातील अनेक संस्थांमध्ये अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, सूत्रसंचालन
— आंतरशालेय, आंतरमहाविद्यालयीन विज्ञान, काव्यस्पर्धा वगैरेचे आयोजन व परीक्षक
— लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा, अनेक संस्थांच्या काव्य, निबंध, कथा आणि ग्रंथपुरस्कारासाठी परीक्षक
— विविध विषयांवर व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्रे, कार्यशाळा वगैरेमधे सहभाग  
या शिवाय तिचे साहित्यविषयक उपक्रमही भरपूर असून  ते पुढे दिले आहेत.
— ‘मनस्पर्शी साहित्य संमेलन’, ‘शब्दवेल साहित्य संमेलन’ इत्यादी साहित्य संमेलनामध्ये ‘संमेलनाध्यक्ष’
— कोमसाप’, ‘ महिला साहित्य संमेलन’,  ‘साहित्य अकादेमी’, ‘अंकुर साहित्य संघ महाराष्ट्र’  ‘मुंबई शहर ग्रंथोत्सव २०१८’, ‘साहित्य संघ’, तसेच अनेक शाळा, महाविद्यालय, आकाशवाणी, दूरदर्शनवर आणि अनेक संस्थांमध्ये मिळून ५०० च्या वर कार्यक्रमातून सहभाग
— अ.भा.सा. संमेलनात अनेकदा सहभाग.  
— ९७ व्या अ.भा.सा. संमेलनात ‘गझलकट्टा नियोजक’ ‘मी प्रतिभा माझी प्रतिभा’ हा स्वरचित कविता आणि गझलवर वर आधारित एक तासाचा कार्यक्रम  ज्याचे आत्तापर्यंत तीनशेच्या वर प्रयोग झाले.
— YouTube channel: Pratibha Saraph, आणि इतर चॅनेलवर मिळून २०० च्या वर व्हिडिओ प्रसिद्ध.
— प्रहार वर्तमानपत्रात ‘प्रतिभारंग’ सदर चालू आहे l. त्या आधी सामना, तरुण भारत, नवशक्ती या वर्तमानपत्रातून आणि मैत्रीण, भटकंती इत्यादी मासिकातून सदरलेखन केले.
— लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ अशी काही वर्तमानपत्रे आणि हंस, दीपावली, रत्नागिरी एक्सप्रेस, प्रतिभा, ज्येष्ठ पर्व, मराठवाडा, कोकण नाव, झपूर्झा, दर्याचा राजा, रुची, रणांगण, गीत, साहित्य मंदिर, सृजनसंवाद, गंधाली, सामना, तरुण भारत, वसंत, अक्षर संवेदन इत्यादीतून लेखन.
— शंभरच्या वर पुस्तकांना प्रस्तावना, ब्लर्ब
— मॅजेस्टिकच्या ललित या अंकात ‘दृष्टिक्षेप’ सदर चालू

प्रतिभाला मिळालेले आणखी काही सन्मान म्हणजे,
— मराठी विज्ञान परिषद विज्ञान परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण
— महात्मा गांधी सेवा मंदिर व्यसन व नशाबंदी कार्यक्रम सहभाग
— विविध क्रीडा स्पर्धांमध्ये प्रथम द्वितीय तृतीय पुरस्काराचे ‘सर्टिफिकेट ऑफ मेरिट’
— शिक्षक दिनानिमित्त अनेक कार्यक्रम व सन्मान
— डॉ विजया वाड यांच्या ‘बालकोशा’त कथा- कवितांचा समावेश आणि ‘खाद्यकोशा’त पदार्थांचा समावेश
— संपदा ज्ञानदीप मंडळाचा कवितेसाठी गौरव
— विजय क्रीडा सेवा मंडळाचा शासन मान्यता लाभलेला सामाजिक — शैक्षणिक -सांस्कृतिक- क्रीडा क्षेत्रासाठीचा ‘जनश्री’ पुरस्कार
— निसर्गोपचार महाविद्यालयाचा उत्कृष्ट निबंध पुरस्कार
— मुंबई नागरिक समितीचा दर्जेदार काव्य लेखन पुरस्कार
— एकता कल्चरल अकादमी (महाराष्ट्र) चा कथा आणि कवितेसाठी पुरस्कार
— शब्दोत्सव कोल्हापूरचा काव्यलेखनासाठी पुरस्कार *साहित्य दरवळ मंचचा काव्य लेखन प्रथम पुरस्कार
— गाढ अंधार होता होता या नाटकाचे वाचन ‘शिवाजी मंदिर’, ‘साहित्य संघ’ इ. झाले
— ‘बेस्ट’च्या नाट्य स्पर्धेमध्ये ‘नाती’ या कथेवर आधारित नाटकाला लेखनाचे दुसरे पारितोषिक
— जवळजवळ वीस वर्षे ३० पेक्षा जास्त दिवाळी अंकात (हंस, दीपावली, कविता-रती,  किस्त्रीम इ. कथा- कविता- लेख- मुलाखतींचा समावेश

प्रतिभा इतक्याच कामगिरीवर थांबली नसून ती तिच्या
— निवडक गझलांची ध्वनिमुद्रिका (संगीतकार यशवंत देव),
— सहजसंवाद असाही…  (व्यक्तिचित्रण) या आगामी
— उपक्रमांमध्ये सध्या व्यस्त आहे.

प्रतिभाचे उल्लेखनीय कार्य म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात तिच्या कवितेचा समावेश करण्यात आला असून तिचा गझल प्रबंधासाठी  अभ्यास चालू आहे.

अशी ही स्वतः सतत कार्यमग्न राहणारी, इतरांनाही प्रेरणा देणारी, वेळ प्रसंगी एखाद्या लहान मुलीप्रमाणे लहान होऊन खेळणारी, बागडणारी प्रतिभा पाहून आम्ही आमच्या अंदमान दौऱ्यात गमतीने  तिला “चुलबुल प्रतिभा” अशी उपमा दिली. प्रतिभेची प्रतिभा दाखवणारी पुढील व्हिडिओ लिंक आपल्याला नक्कीच आवडेल.

अशा या प्रतिभेला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

7 COMMENTS

  1. प्रतिभा मॅडम
    खरोखर फुलांची राणी
    किती छान दर्शन घडवलं
    फुलांचं, किलबिल पाखरांचं
    थेट नेदरलँडस् मधुनी
    खूप आनंद झाला व्हिडिओ पाहुनी
    चौफेर कर्तृत्वाचा सुंदर लेख वाचुनी
    अगदी स्पेशल झाला वाढदिवस
    प्रा प्रतिभा सराफ मॅडमचा
    न्यूज स्टोरी टुडे मधुनी
    अंदमान फेम चुलबुल प्रतिभा
    वाढवते माय मराठीची शोभा
    भौतिक शास्त्राच्या प्राध्यापिकेने
    उजळती मराठी साहित्याची प्रभा
    हार्दिक अभिनंदनासह मॅडम आपणास
    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
    Happy Birthday Tai
    राजेंद्र वाणी मुंबई

  2. खूप छान लेख खरोखर प्रतिभा अशीच आहे लहानात लहान होणारी कॉलेजच्या तरुण मुलांना मैत्रीण होऊन शिकवणारी वयस्कर मोठ्या माणसाची ही दिलखुलास गप्पा मारणारी खरोखर अशा प्रतिभाला वय नसतच खरोखर ग्रेट आहे प्रतिभा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खूप मोठी हो यशाच्या शिखरावर उंच उंच भरारी घे

  3. प्रतिभा यांच्या उत्साही आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे छान शब्दचित्र तुम्ही रेखाटले आहे. धन्यवाद

  4. देवेंद्रजी, आपण इतकं भरभरून माझ्याविषयी लिहिलंत. माझा आजचा वाढदिवसाचा दिवस सोन्याचा झाला.
    मनापासून धन्यवाद

    प्रतिभाजींचे अनोखे दर्शन घडविणारा लेख आवडला. खरे आहे ..अशा उत्फुल्ल सदैव टवटवीत राहणाऱ्या व्यक्तींना वय नसतेच मुळी.. त्यांचे अंदमान वरील लेख मी वाचलेच आहेत ..आमच्या तर्फे ही अभिनंदन आणि शुभेच्छा.
    – स्वाती वर्तक, मुंबई.
    ******
    देवेंद्र, अल्लड फुलपाखरा प्रमाणे साहित्य क्षेत्रातल्या प्रत्येक फांदीवरच्या उमललेल्या फुलावर मुक्त बागडणाऱ्या प्रतिभाताईला आगामी वर्षांसाठी मनापासून शुभेच्छा
    प्रकाश पळशीकर ,पुणे.
    ०३ डिसेंबर २०२४
    ******
    वाचकांचेही मनापासून आभार
    प्रतिभा सराफ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी