Friday, December 27, 2024
Homeलेखआरशात पाहू जरा …

आरशात पाहू जरा …

प्रतिमा उरी धरूनी मी प्रितीगीत गाते .. लताबाईंचं एक अप्रतिम गाणं. त्यातली प्रेयसी आपल्या प्रियकराची प्रतिमा उराशी कवटाळून गीत गात असते. तुम्हाला वाटेल या गीताचा काय संबंध पण पहा ना आपण जवळपास सर्वचजण स्वतःची एक प्रतिमा तयार करत असतो आणि तीच कवटाळट राहतो. म्हणूनच हे गीत मला संयुक्तीक वाटतं.
सकाळी उठताक्षणी आपण आन्हीकं उरकता उरकता स्वतःला न्याहाळत असतो.कदाचित् तेव्हा बहुदा आपण खरे असतो. आरपार असतो. ही आरशातली एक प्रतिमा असते. आरशातली प्रतिमा हळुहळु मनात प्रवेशते तेव्हा ती वेगळी होते. थोडी जजमेंटल होते. ती प्रतिमा कदाचित् आपल्याशी संवाद करत राहते. काय चांगलं काय वाईट याचा सतत आढावा घेत राहते. ही प्रतिमा न खूप खूप मागचं काही साठवून ठेवते. आरशातल्या सारखी निखळ असतेच अस नाही. पण कधी कधी मात्र ही प्रतिमा फसते आणि फार फार आभासी होते. आपल्याच दुनियेत हरवते. वास्तवाचं भान विसरते. ह्या प्रतिमेला खरतर चागल्या विचारांची, चागल्या वाचनाची फार फार गरज असते.

कधी ती स्वतःवरच चिडते तर कधी उदासवाणी बसून राहते. बाहेरच्या जगातल तिला काय खुपेल सांगता येत नाही. पण ना ही नेहमी बाह्यांगी गप्प असते आतल्या आत मात्र बडबडत राहते.
हीची बाह्य बाजू मात्र एकदम उलट असू शकते.सुरवातीला म्हटलं तस ही खास प्रयत्नपुर्वक बनविली जाते. मग ती करताना गरजेप्रमाणे सारे आयाम बदलतात. बाह्यजगात काय खपतं याचा खूप विचार केला जातो. त्याचं मनन चिंतन करून मग तशी हीची निर्मिती होते. आतली प्रतिमा कशी का असेना ? बाहेर मात्र सगळं अत्यंत गोड असतं. तसही सेल्फी घेऊन घेऊन लोक खोट हसायलाही शिकलेत. ही प्रतिमा न एखाद्या होलोग्राफीक इमेज सारखी वाटते. हात लावायला गेलं तर काहीच मिळू नये अशी कृत्रीम. बर पुन्हा कोणत्या कंपूत काय प्रतिमा आहे हे लक्षात ठेवणं अवघडच काम आहे पण करतात बुवा मॅनेज.

सोशल मिडीआ मुळे आजकाल सर्वजण इतक्या भिन्न गटात वावरत असतात. क्वचितच काही गोष्टी या गटांमधे सारख्या असू पण शकतील पण सहसा प्रत्येकजण जसा समूह तशी आपली भुमिका ? ठेवताना दिसतात. भिन्न प्रवृत्तीच्या गटांमधे असण खरतर स्वतःच्या प्रगतीच्या दृष्टीनं, विकासाच्या दृष्टीनं चांगलच आहे. तुमचं विश्व जेव्हढ रूंदावाल तितक खचितच उत्तम. या साऱ्यामधे मात्र आपल्या आतल्या प्रतिमेशी आपण किती प्रामाणिक राहतोय याकडे मात्र पाहणं गरजेच आहे.
कधी ही बाह्य प्रतिमा, खास निर्माण केलेली असते. कधी सामाजिक जाणीवेची , कघी राजकारणी, कधी जनतेच्या कैवाराची, कधी रूढीप्रिय, अमुक एका तत्वाला धरून वगैरे. अगदी कधी कधी एखाद्या गटात शिरकाव व्हावा म्हणूनही खास ठोकताळे ठरवून तयार केलेली. जणू मुर्तिकाराने एखादा फोटो पाहून मुर्ती घडवावी तशी !

फेसबूकसारख्या ठिकाणी चक्कर मारली तर आयुष्य असावं तर असं ! असच वाटावं. म्हणजे प्रत्येकाने आपल्या दुःखाचा पाढा वाचावा अस म्हणणं नाही पण जो आभास निर्माण होतो त्यात तथ्य असावं इतकच! घरात एकमेकाचं तोंड न पाहणारे नवरा बायको तिथे मात्र अनेक जन्मांचे सोबती असतात ही गम्मत आहे. पण हे का घडत असावं ?
आपल्याच प्रतिमेला लोक घाबरतात का ? की जसे आहोत तसे दाखवण्याची लाज वाटते ? की हा एक मानसिक विरंगुळा आहे ?
खोलवर विचार केला तर जे आहे ते न दाखवता, त्याच्याशी प्रामाणिक न राहता सततच्या अशा बेगडी वागण्याने नकळत अतर्गत तणाव वाढत असेल का ?
वरवर पाहता समजा एखाद्याला काही तणाव जाणवत नसेल तरी स्वतःच स्वतःशी द्वंद्व चालत असेल का ? तणाव निर्मित अनेक आजार आजकाल बळावत आहेत.

या सर्वाचं मुळ कुठेतरी या आपल्या स्वतःशीच असलेल्या झगड्यात तर नसेल ना ? मुळात आपण जर आपल्याशी आपल्या तत्वांशी प्रामाणिक राहीलो तर असा ताण निर्माण व्हायची शक्यता कमी आहे. सुखी जीवनासाठी जितका तणाव कमी तितके उत्तमच ! मान्य आहे की समाजात अनेक प्रकारचे लोक राहतात पण म्हणून दरवेळी स्वतःच्या तत्वांना मुरड घालायची काही गरज नाही. अगदीच वादाचा मुद्दा निर्माण होत असेल तर सामोपचाराचा वापर करावा हे उत्तम.
श्रीपाद श्रीवल्लभ म्हणतात तशी मानवाला त्रिकरण शुद्धीची आवश्यक्ता आहे. जसा विचार कराल तसेच वाणीतून आणि कृतीतून यावे ही अपेक्षा आहे. आजकालच्या जमान्यात हे वाचून सर्वांना घाम तरी फुटेल किंवा मग आत्मचिंतन तरी सुरू होईल. मुळात आपण माणूस आहोत, चुकणारच केव्हा केव्हा हे ध्यानात ठेवलं तर कदाचित् यावर मनन करता येईल. एका रात्रीत नाही जमलं तरी त्या दृष्टीनी पावलं मात्र नक्कीच टाकता येतील.

कुठलाही हेतू शुद्ध असेल तर परमेश्वर सहाय्य करतोच. मनातल्या द्वद्वाचा विचार केला तर आपलं वर्तन जितकं शुद्ध होईल तितकं शांत वाटेल. आतल्या प्रतिमेच आणि बाह्यात्कारी प्रतिमेच एकरूपत्व झाल तर काय ? सोन्याहून पिवळच. मग प्रत्येक कृती करताना विचार केला जाईल.
मुल्य कोणती, कशी जपावी यावर मंथन चालू होईल.
एक निष्कपट मन, माणूस आणि समाज निर्मितीही होईल.
याने कदाचित् शांतताप्रिय समाज घडायला मदत होईल.
शेवटी काय सर्वे भवन्तु सुखिनाः सर्वे सन्तु निरामयाः हेच आपल्याला साध्य करायचय.

शिल्पा कुलकर्णी

— लेखन : शिल्पा कुलकर्णी. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. लेख आरसपानी, निखळ, मनाचा वेध घेणारा आहे. या मनाबद्दल लिहू, वाचू तेवढं कमीच आहे.
    तुमचा लेख स्वतःबद्दलचा विचार करायला लावणारा आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !
आनंद प्रभाकर महाजन. on शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित
सौ.मृदुलाराजे on असे होते साने गुरुजी
अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण – २९