शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असलेल्या कै. सौ. मंगला मदन फडणीस ह्यांचा ३१ वा स्मृतिदिन नुकताच, म्हणजे दिनांक २९ नोव्हेंबर, २०२४ रोजी झाला. त्यांच्या स्मृतींचा बकुळ गंध जपण्यासाठी, त्यांच्या या स्मृतिदिनी ज्या “स्मृती-गंध” समूहाची स्थापना करण्यात आली आहे, त्या स्मृती-गंध समूहाचाही सहावा वर्धापनदिन ! ह्या दोन्ही दिनांचे औचित्य साधून “स्मृती-गंध” समूहाचा आणि मुख्य म्हणजे त्या स्मृतिपटलामागे राहूनही अनेक महिलांना प्रेरणा देणाऱ्या एका तेजस्वी, करारी व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देत आहे, आईचा वसा पुढे चालवत असलेली त्यांची लेक, सौ मृदुला राजे.
कै.सौ.मंगला मदन फडणीस यांना विनम्र अभिवादन.
– संपादक
विमल मंगला मुदिता मुग्धा
वत्सल, स्नेहल, स्वभाव-स्निग्धा ।
झुंजार वृत्ती तव , हरवी प्रारब्धा
कर्तव्यनिष्ठ तू , तू स्वयम् सिद्धा ॥
असे जिचे वर्णन करता येईल अशी कर्तृत्ववान महिला म्हणजे माझी आई ,कै. सौ. मंगला मदन फडणीस होय !
२० जून, १९२६ , रोजी कल्याण येथील सुप्रसिद्ध वकील (कै.) बाळकृष्ण त्र्यंबक सुळे आणि (कै.) सौ. सुमित्राबाई सुळे ह्या दाम्पत्याच्या संपन्न कुटुंबात जन्माला आलेली माझी आई, विवाहानंतर ‘सौ. मंगला मदन फडणीस’ ह्या नावाने ओळखल्या जाऊ लागली.
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241205-WA0008.jpg)
माझी आई ही तल्लख बुद्धीमत्तेची व तडफदार स्वभावाची होती. शैक्षणिक वारसा जपणाऱ्या, स्वातंत्र्यपूर्व काळातही स्त्री शिक्षणाचे महत्त्व जाणणा-या, मुलगा – मुलगी भेद न मानणाऱ्या सुसंस्कृत कुटुंबातील ती ज्येष्ठ कन्या ! लेकीला पदवीधर करण्याची इच्छा असूनही आणि कल्याण सारख्या सुसंस्कृत शहरात राहात असूनही, त्या काळात घराजवळ महाविद्यालयीन शिक्षणाची सोय नसल्यामुळे, आजोबांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. परंतु आई सुद्धा घरात बसून राहाणारी नव्हतीच ! सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ ताराबाई मोडक ह्यांनी दादर येथे चालू केलेल्या ‘माॅन्टेसरी शिक्षण अभ्यासक्रमा’त दाखल होऊन, तिने शालेय शिक्षणानंतर सर्वप्रथम ‘माॅन्टेसरी टीचर्स ट्रेनिंग कोर्स’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्या काळाला अनुसरून वयाच्या २२ व्या वर्षी आईचा आणि बाबा श्री. मदन फडणीस ह्यांचा विवाह करून देण्यात आला.
आईची सख्खी आत्या सौ.सरस्वतीबाई फडणीस ह्यांचा ज्येष्ठ पुत्र श्री. मदन ह्यांच्याबरोबर दिनांक १६ मे, १९४८ रोजी विवाहबद्ध झालेल्या तिने ‘सौ.मंगला मदन फडणीस’ ह्या नावाने संसारात पदार्पण केले. माझे बाबा जरी शासकीय नोकरी करत होते, तरी नुकत्याच संपुष्टात आलेल्या ब्रिटीश राजवटीविरुद्धच्या लढ्यात सहभागी झाल्याने ते तरुण स्वातंत्र्यसैनिक, देशातील राजकीय आणि सामाजिक वातावरणात संतुष्ट नव्हते. कामगार चळवळीत प्रत्यक्ष उतरून त्यांच्या हितासाठी शासनाविरुद्ध लढा देणारे माझे तरुण, होतकरू बाबा सरकारी नोकरीत स्थिरावणे शक्यच नव्हते.
कामगार पुढारी आणि तेव्हा नवोदित वकील असलेल्या बाबांना संसारात अर्थसहाय्य करण्यासाठी आईने नोकरी करण्याचा राजमार्ग खुला होता, परंतु तिने वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी, आपण शिक्षण घेतलेल्या माॅन्टेसरी टीचर्स ट्रेनिंग कोर्सच्या आधारावर ठाणे येथे दिनांक १० जून, १९४९ रोजी ठाणे शहरातील पहिली माॅन्टेसरी शाळा “बाल विकास मंदिर” ची स्थापन केली.
खारकर आळीतील “ठाणे ग्रंथ संग्रहालय” ह्या इमारतीच्या एका भागात, अवघ्या ५० विद्यार्थ्यांना घेऊन प्रारंभ झालेली ही संस्था पुढे अतिशय नावारुपाला आली. ज्या काळात पाच-सहा वर्षांच्या लहान मुलांनाही शाळेत पाठविण्याबाबत पालक फारसे जागरूक नसत, त्या काळात आईने अगदी अडीच तीन वर्षांच्या बालकांसाठी शाळा सुरू करून ठाण्यात बालशिक्षणाचा पाया रचला. इतक्या लहान बालकांसाठी ह्यापूर्वी ठाण्यात शाळाच नव्हती. पण आईने मोठे धाडस दाखवत, अशक्यप्राय गोष्ट शक्य करुन शिक्षण क्षेत्रात दिमाखदार पाऊल टाकले आणि ठाणे शहर व जिल्ह्यामध्ये लहान बालकांच्या विकासाचा पाया घातला.
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241205-WA0007-1024x768.jpg)
पुढे आईने ह्या शिक्षण संस्थेचा आणि स्वतःच्याही व्यक्तिमत्वाचा विकास करत स्वतः प्रायमरी टीचर्स ट्रेनिंग कोर्स, सेकंडरी टीचर्स ट्रेनिंग कोर्स, बी.ए., बी.टी. ह्या त्याकाळातील शिक्षण क्षेत्रातील उच्च पदव्या, पदविका, प्राप्त करून घेतल्या आणि शाळाही माॅन्टेसरी वरून प्राथमिक, माध्यमिक, अशी वाढवत नेली. नाममात्र शुल्क आकारून विद्यादानाचे महान कार्य तिने आयुष्याच्या अखेरपर्यंत केले व हजारो विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचे ज्ञानदीप उजळले. अनंत अडचणींवर मात करत, तिने अथक प्रयत्नांच्या जोरावर “बाल विकास मंदिर” ही शाळा प्रसिद्धीच्या झोतात आणली. ठाणे शहरात एकूण पाच ठिकाणी या शाळेचे वर्ग भरवले जात असत. त्यामुळे दरवर्षी शेकडो मुले शैक्षणिक व सांस्कृतिक प्रगती साधत होती.
वैशिष्ट्यपूर्ण बाब अशी की ‘बालविकास मंदिर’मध्ये शिक्षकांपासून शिपाई पदापर्यंत सर्व स्त्री कर्मचारीच होत्या आणि कार्यकारी मंडळातही सर्व स्त्रीयाच होत्या. ख-या अर्थाने बालकांच्या विकासासाठी आणि महिलांच्या उन्नतीसाठी स्थापन केलेल्या ह्या संस्थेने शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात अनेक उपक्रम राबवले; आणि त्यांच्या माध्यमातून बालकांच्या बरोबरच, महिलांना सुद्धा प्रगतीचा मार्ग दाखवला.
शाळेचा दर्जा उत्तम राखणाऱ्या कार्यकुशल संचालिका आणि एक आदर्श शिक्षिका म्हणून आईची ख्याती आणि कीर्ती ठाणे आणि आसपासच्या भागात पसरू लागली.
तत्कालीन केंद्रीय मंत्री श्री. सी.डी. देशमुख, सुप्रसिध्द शैक्षणिक कार्यकर्त्या अनुताई वाघ ह्यांच्यासारख्या अनेक नामवंतांनी ‘बालविकास मंदिर’ला भेट देऊन कौतुक केले. ठाणे जिल्हा शिक्षण समिती, ठाणे नगरपालिका शिक्षण समिती सारख्या शासकीय शैक्षणिक आघाड्यांवर सरकार नियुक्त सदस्य म्हणून तिने अनेक वर्षे कार्य केले आणि ठाण्यातील विविध शिक्षण संस्थांबरोबर हितसंबंध जुळवून, ठाणे परिसरातील विद्यार्थ्यांना हितकारक असे अनेक प्रकल्प राबवले.
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241205-WA0005.jpg)
शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही कार्यरत राहून आईने महिला विकासाच्या दृष्टीने मोठेच कार्य केले. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी “बालक-पालक योजना”, गरोदर महिलांसाठी सकस अन्नदान योजना, अल्प उत्पन्न गटातील महिलांसाठी राष्ट्रीय बचत योजना वगैरे विविध प्रकल्प आपल्या संस्थेच्या माध्यमातून राबवत असतानाच, ती ठाणे शहरातील अनेक नामवंत महिला संघटनांशी संलग्न होत गेली आणि सचिव, उपाध्यक्ष, अध्यक्ष अशा पदांवर कार्य करत तिने त्या संघटनांचीही प्रगती साधली. ऑल इंडिया विमेन्स काॅन्फरन्स ह्या भारतीय पातळीवरच्या जगप्रसिद्ध महिला संस्थेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्य विभागाची अध्यक्ष ह्या सन्माननीय पदावर आईची नियुक्ती करण्यात आली होती आणि अखेरपर्यंत तिने हे पद भुषविले. ह्याच बरोबर शासकीय गौरव असलेल्या “स्पेशल एक्झिक्युटीव्ह मॅजिस्ट्रेट” (SEM) ह्या सरकारमान्य पदावर तिची महाराष्ट्र शासनातर्फे नियुक्ती करण्यात आली होती. हे पदही तिने जीवन अखेरपर्यंत भूषविले.
माझ्या बाबांनी स्वतःला कामगार चळवळीत झोकून दिले होते. कामगारांचे वकील ह्या नात्याने त्यांना कामगार संघटनांच्या केसेस लढवताना सतत बाहेरगावी जावे लागत असे. त्यामुळे संसारातही सर्व आघाड्या आईलाच सांभाळाव्या लागत. सासर-माहेरचा मोठा एकत्र परिवार जोडून ठेवत तिने संसारातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि सासु सासरे, दिर नणंदा ह्यांच्या बरोबरच आम्हा तिघी बहिणींना सांभाळून संसार फुलवला.
अखेरपर्यंत कार्यमग्न राहून ठाणे जिल्ह्यात स्वतःचे खास स्थान निर्माण केलेल्या माझ्या आईला दिनांक २९ नोव्हेंबर, १९९३ रोजी देवाज्ञा झाली आणि तिचे कार्य अधुरे राहिले.
आईच्या पंचवीसाव्या स्मृती दिनाच्या निमित्ताने तिच्या जीवनपथातील ‘काटे आणि फुले’ ह्यांचे समर्पक वर्णन करणारे तिचे जीवन-चरित्र “मंगल-दीप” ह्या नावाने मी मराठीत लिहिले तर माझी मुलगी, कु. प्राची हिने ते इंग्लिश भाषेत लिहून प्रकाशीत केले आहे.
आईचे कार्य पुढे चालवत ठेवण्यासाठी काळाची पावले ओळखून मी आणि माझ्या कुटुंबियांनी तिच्या २५ व्या स्मृतीदिनाला, म्हणजेच दिनांक २९ नोव्हेंबर, २०१८ रोजी “स्मृती-गंध” समूहाची स्थापना केली आहे. “शिक्षक आणि इतर महिलांच्या विकासासाठी” कार्यरत असलेला हा समूह आम्ही, म्हणजे मी व प्राची संचालिका ह्या नात्याने, इतर कुटुंबियांच्या सहकार्याने चालवत आहेत.
ह्या वर्षी समूहाच्या स्थापनेला सहा वर्षे पूर्ण झाली. विशेष म्हणजे कोरोना काळातही हा समूह ऑनलाईन पद्धतीने चालवला जात होता. ह्या समूहामध्ये महिलांना साहित्यिक, सांस्कृतिक, कलात्मक उपक्रमांच्या माध्यमातून स्वतःचे व्यक्तिमत्व विकसित करण्याची संधी मिळते आहे. जमशेदपूर इथे कधी गणेशोत्सव, नवरात्री उत्सव, दिवाळी सारखे सणवार साजरे केले जातात. तर कधी “श्रावण-गौर”, “लतिका-कलिका”, “नवदुर्गा ” वगैरे व्यक्तिमत्व विकासाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. “कवयित्री शांताबाई शेळके जन्मशताब्दी उत्सव”, श्रावण-सरी, “मीच गौरी – मीच दुर्गा ही लेखन स्पर्धा” आणि “कथा-लेखन स्पर्धा” वगैरे साहित्यिक उपक्रम आयोजित करून लेखिकांच्या लेखणीला प्रेरणा दिली जाते . “प्रज्ञा” ह्या मासिक वैचारिक उपक्रमाद्वारे महिलांना वैचारिक लेखन करण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले जाते. “भावली ती कविता…” ह्या उपक्रमातून सदस्य महिला प्रत्येक महिन्यात वेगवेगळ्या विषयांवरील कवितांचे अभ्यासपूर्ण रसग्रहण करतात आणि नामांकित साहित्यिक त्या लेखांचे परीक्षण करून मार्गदर्शन करत असतात. समूहातील सदस्य महिला आपल्या चित्रकला, रांगोळ्या, भरतकाम, विणकाम, पाककला, घराच्या सजावटीचे दर्शन, गीत-गायन, नृत्य वा एकपात्री नाट्यदर्शन वगैरे कलांचेही आविष्कार घडवतात आणि एकमेकींना भरभरून प्रतिसाद देत, जीवनाचा आनंद लुटतात. संपूर्ण महाराष्ट्रात, एवढेच नव्हे, तर बृहन्महाराष्ट्रात आणि परदेशातही वास्तव्य करणा-या सदस्य सख्यांची एकूण संख्या चारशे पेक्षा अधिक आहे, आणि “स्मृती-गंध फेसबुक समूह” ह्या माध्यमातून त्या सर्व एकमेकींबरोबर खेळीमेळीने जोडल्या गेल्या आहेत.
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241205-WA0004.jpg)
प्राची ने प्रत्येक महिन्यात घेतलेले नाविन्यपूर्ण उपक्रम आणि त्यांना साजेशी अतिशय सुंदर, स्वनिर्मित डिजिटल प्रमाणपत्रे व सन्मानपत्रे हे ह्या समूहाचे एक प्रमुख आकर्षण आहे. आपल्याला मिळालेली आकर्षक सन्मानपत्रे ह्या सदस्य सख्या खूप कौतुकाने सोशल मिडियावरील आपापल्या अकाऊंट्स वर आनंदाने मिरवत असतात. आईच्या स्मृती प्रित्यर्थ चालवत असलेल्या ह्या समूहामध्ये महिलांना नि:शुल्क सदस्यत्व देण्यात येते आणि “महिलांचा विकास… एकच ध्यास!” ह्या ध्येयाने प्रेरित होऊन सर्व महिलांना प्रगतीची सुवर्णसंधी देण्यात येत असते.
मागच्या वर्षीच पाचव्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने समूहातील ३५ सदस्य सख्यांच्या एकूण ७० कवितांचा “श्रावण-सरी… बरसात काव्य सरींची…” हा संकलित काव्य संग्रह शाॅपिजन प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आला आणि सर्व सहभागी सख्यांना समूहातर्फे भेट स्वरूप देण्यात आला. अलीकडेच एप्रिल, २०२४ मध्ये समूहातील एक सदस्य सौ.माधवी वैद्य ह्यांनी स्मृती-गंध समूहामध्ये केलेल्या सर्व प्रकारच्या लेखनाचे संकलन करून “शब्द-माधवी” हे त्यांचे पुस्तक तयार केले. पण त्याचे प्रकाशन होण्यापूर्वीच दुर्दैवाने माधवी ताईंचे निधन झाले. त्यामुळे ते पुस्तक स्मृती-गंध समूहातर्फे प्रकाशित करण्यात येऊन ह्या दिवंगत सदस्य सखीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शाॅपिजन संस्थेच्या माध्यमातून सदस्य लेखिकांच्या लेखनाचे संकलन करून पुढेही अनेक पुस्तके प्रकाशित करण्याचा मनोदय आहे आणि लवकरच असे काही प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात येतील.
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241205-WA0006.jpg)
स्मृती-गंध समूहाची ही सहा वर्षांची वाटचाल यशस्वी होण्यासाठी मी आणि माझ्या बहिणी, सौ.प्रतिमा बावकर आणि सौ सोनल साटेलकर, आणि त्यांचे सर्व कुटुंबीय, तसेच पुतणी सौ. आरती दळवी ह्यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. समूहाचे हितचिंतक असलेले अनेक साहित्यिक, खास करून सौ. स्वाती शृंगारपुरे, श्री. अजित महाडकर, सौ. प्रमोदिनी देशमुख, सौ. वैजयंती गुप्ते, सौ. प्राची गडकरी, सौ.सुषमा देशपांडे, श्री. विजय फडणीस, अशा सर्वांचा सक्रिय पाठिंबा हा समूहाचा आधारस्तंभ आहे.
समूहाच्या स्थापनेपासून आजपर्यंत समूहाच्या प्रत्येक कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होऊन समूह बहरत ठेवणाऱ्या सौ.प्राची तोडणकर, सौ. प्राजक्ता मुरमट्टी, प्रा. वैभवी माने, सौ. विशाखा माने, सौ.वैभवी गावडे, सौ. सुनिता अनभुले ह्यांच्या बरोबरच सौ.मनीषा जोशी, नयना शृंगारपुरे, सौ.नंदा लोंढे, नीला पाटणकर, सरला वानखेडे, सरोज भिडे वगैरे सर्व सदस्य सख्यांचा स्मृती-गंध समूहात गौरवास्पद सहभाग लाभत असतो. समूहात नव्याने जोडल्या गेलेल्या अनेक उत्साही व हौशी सदस्य ह्या समूहाची शान आहेत. इथे जागेअभावी चारशेहून अधिक सर्व सख्यांचा नामोल्लेख करणे शक्य होणार नाही, परंतु समूहातील प्रत्येक सदस्य सखीला स्मृती-गंध समूह मानाचा मुजरा करत आहे.
अशा ह्या आनंद सोहळ्याच्या निमित्ताने ह्या संस्थेचा प्रेरणास्रोत असलेल्या आणि आनंद गाभा असलेल्या, समूहाची सर्वेसर्वा असलेल्या आईला सर्व सदस्य सख्यांच्या वतीने विनम्र अभिवादन !
आम्हा सर्वांना तिचे आशिर्वाद लाभू देत.सर्वांना त्या मंगलमय मातेचे मूर्तिमंत तिज घडविले देवाने पुण्-प्रतीक मानवतेचे
विद्येची ती बनून देवता, भासते स्वरूप जणू साक्षरतेचे तिच्या प्रसादें होऊन पावन सोने होई स्मृती-गंध समूहाचे…
— लेखन : सौ मृदुला राजे. जमशेदपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
तुमच्या आईला व त्यांच्या कार्याला शतशः प्रणाम.