Wednesday, December 18, 2024
Homeसाहित्यमहापुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर

महापुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर

आज सहा डिसेंबर, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन. आज दादरच्या चैत्यभूमीवर लाखोंच्या संख्येने जनसमुदाय तिथे येत असतो. अशा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ महापुरुषाविषयी जाणून घेऊ या लेखातून.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन.
संपादक

ऐतिहासिक थोरवी थोरवीचे निकष कालमानानुसार बदलतात. ती वर्तमानाची गरज आहे. आपण एखाद्यास मोठे मानतो. का आणि कसे मोठे मानतो या पेक्षाही असे वाटते की त्या माणसाच्या कामाने सामाजिक मूल्यांवर समतेवर आणि न्यायनीतीवर कसा प्रकाश टाकला यावर त्या व्यक्तीचे मोठेपण अवलंबून असते. उदाहरण म्हणून आपणांसमोर महात्मा फुले यांच्या विषयी एक प्रसंग सांगतो. महात्मा फुले यांना सामाजिक समतेच्या लढ्यातील आणि सत्यशोधकांच्या विचारधारेतील अग्रगण्य व्यक्तिमत्व मानतात. मित्रहो त्यांच्या निधनाची बातमीही अगदी पुण्यातील केसरी किंवा सुधारक नावाच्या वर्तमानपत्रांनी छापली नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

विशेष म्हणजे ज्या केसरीने ती छापली नव्हती त्या वर्तमानपत्राच्या संपादकांना अर्थात लोकमान्य टिळक यांचा एका प्रसंगांमध्ये फुले यांनी दहा हजार रुपये भरून जामीन दिला होता आपल्याला दोन्ही गोष्टी आणि प्रत्येक महापुरुषांच्या मर्यादा व तत्त्व प्रणाली माहीत असायला हव्यात. गौतम बुद्ध, कबीर, महात्मा फुले या सर्व विचारधारेला एकत्र करून कृतिशील असे विचारवंत होण्याची शक्ती ज्या व्यक्तीं मध्ये होती त्यांचे नाव आहे बाबासाहेब आंबेडकर.
त्यांच्याविषयी झालेले लेखन त्यांनी केलेले लेखन हा साहित्याचा आवाका ज्याला आपण व्यक्त चरित्र साहित्य असा शब्दप्रयोग करू इतका मोठा आहे की त्यामुळे हे व्यक्तिमत्व जणू चिमटीमध्ये न येणारा पारा होय असे म्हणावे लागेल.

ज्यांनी बाबासाहेब आणि बुद्ध वाचले त्यांचा रागाचा पारा कधीच वर चढणार नाही ते शांत संयम आणि समताधिष्ठित विचार करून पुढे चालतील. अशा महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी आपल्याकडे फार नाचून करण्याची आणि डीजे लावून करण्याची सवय आहे.
ही कृती करत असताना त्या महापुरुषांना काय वाटेल त्यांची जयंती त्यांचे साहित्य वाचून व्हावे की त्यांच्या जयंतीला नाचून व्हावे जरा आपण अंतर्मुख होणे गरजेचे आहे. किमान आपल्या घरात त्या व्यक्तिमत्त्वाच्या विषयी आणि व्यक्तिमत्वाने लिहिलेले ग्रंथ काही पुस्तके आपल्या संग्रही असणे गरजेचे आहे. तरच आपल्याला त्या व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती होऊ शकेल.

प्राचीन ते आधुनिक भारताचे इतिहास लेखन धर्मचिंतन अर्थशास्त्रज्ञ कुटुंब नियोजनाचा आग्रह दलित चळवळीचे कायदेतज्ञ, पुरोगामी नेते, निर्भीड विचारवंत, पत्रकारितेचे स्तंभ राज्यघटनेचे शिल्पकार, शेतीतज्ञ, जलतज्ञ वास्तुविशारक, संगीत तज्ञ, संत साहित्याचे जाणकार आणि प्राध्यापक व विद्यार्थी शिक्षक कसा असावा याची जाण करून देणारे व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब.
कृतिशील शिक्षण तज्ञ विचारवंत प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्म अभ्यास करणारे हे ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून आपण बाबासाहेबांचा जीवन आणि वारसा समजावून घेताना तसेच जागतिक दृष्टिकोनातून आंबेडकर समजावून घेताना आपणच स्वतः अंतर्मुख झाले पाहिजे की आपल्याला अजून किती वाचन केले पाहिजे.

मनुष्य प्राणी नाहीसे होतात पण त्यांचें इतिहास तसेच टिकून राहतात.
बाबासाहेब अर्थशास्त्रातील तज्ञ स्तंभलेखक संपादक नामावंत घटना तज्ञ क्रांतिकारक विचारवंत म्हणून गणले जातात. समाज सुधारक प्रखर राष्ट्रवादी हे मुद्दे त्यांच्या बाबतीत आपण अजिबात विसरता कामा नये. बाबासाहेब हे मानवतावादाचा आवाज आणि लोकशाहीचे प्रचारक. ते आधुनिक भारताचे समर्थ सल्लागार शिल्पकार शिक्षण तज्ञ होते. एक महान देशभक्त आणि विश्वकोशिय अध्ययनाचा दृष्टा म्हणून बाबासाहेबांना समजून घेण्याचे आपण ठरविले पाहिजे.
विविध विषयांचा गाढा अभ्यास करणारे ते विचारवंत असले तरी त्यांच्या बाबतीतही काही स्थलकालाच्या मर्यादा होत्या त्या त्यांनी झुगारून देऊन आयुष्यभर वैचारिकतेचे मूलगामी चिंतन केले म्हणून त्यांना बहुश्रुत आणि बहुआयामी व्यक्तिमत्व या शब्दांनी वर्णन करणे आवश्यक आहे. अर्थात हे दोन्ही शब्द कमी पडत आहेत याची मला जाणीव आहे.

घरामध्ये वडिलांनी आपल्या मुलाने अभ्यास करावा एवढ्याच आग्रह न धरता स्वतः ग्रंथ घेऊन मुलाच्या शेजारी बसावे. ग्रंथ खरेदीसाठी पैसे नसतील तर त्यासाठी वाटेल ते चांगले काम करावे आणि पैसा उभारावा ग्रंथ खरेदी करावेत. बाबासाहेबांचे वडील प्रसंगी दागिने गहाण ठेवून बाबासाहेबांना ग्रंथ आणून देत.
दिवसा गल्लीमध्ये गडबड असे म्हणून रात्री उशिरा सगळे जग झोपलेले असताना बाबासाहेबांचे वडील त्यांना उठवत आणि अभ्यासाला बसवत.
आज कोणता बाप असे करतो जरा विचार करून पहा बापाच्या भूमिकेत जाऊन आणि केले तरी कोणता मुलगा मुलगी ते ऐकतात. जरा आपणच आपले अंतर्गत बहिर्गत परीक्षण करावे.
माध्यमिक महाविद्यालयीन आणि विद्यापीठ शिक्षण पूर्ण करून बाबासाहेबांनी 1913 मध्ये बी ए ची पदवी मिळवली. त्यांचे वाचन प्रचंड होते.

कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयांमध्ये एम.ए. आणि पीएचडी ही पदवी प्राप्त केली एम ए या वर्गासाठी जो प्रबंध सादर केला त्याचे नाव आहे प्राचीन भारताचा व्यापार भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा एक ऐतिहासिक प्रथमकरणात्मक अध्ययन या विषयावरील त्यांचा प्रबंध 1924 मध्ये इव्होलेशन ऑफ प्रवीण्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या नावाने प्रकाशित झाला.
कोणताही देश कितीही प्रगत झाला मात्र त्या देशात एखाद्या वर्गावर अन्याय चालू असणे असे होत असेल तर ही बाब त्या देशाला लांछनास्पद आहे.

1946 मध्ये त्यांचा प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचा ग्रंथ प्रकाशित झाला.
अर्थशास्त्र विषयाचा अभ्यास करणाऱ्या आणि पैशाशी निगडित व्यापार करणाऱ्या लोकांनी तो ग्रंथ जरूर वाचावा.
आंतरविद्या शाखीय अभ्यास कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे बाबासाहेब.
मुंबईतील एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यावर पहिला तास घेण्याच्या पूर्वी वर्गात जे शिकवायचे आहे त्याविषयी बाबासाहेबांनी 13 वेळा टिपणे काढली आणि मग त्यांना समाधान वाटले की आता या टिपण्यांच्या आधाराने मी वर्गात चांगले शिकू शकेल.
या वर्गातील किस्सा किंवा प्रसंग जब्बार पटेल यांनी चित्रित केलेल्या सिनेमांमध्ये खूप छान दर्शविला आहे.
अर्थात सिनेमा हा सिनेमा मनोरंजनावर आधारित असतो वस्तुस्थितीवर आधारित असला तरी तो वस्तूस्थिती पासून बराच दूर असतो.

त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिला. खरे तर तो आपण बारकाईने वाचला पाहिजे.
बहिष्कृत भारत मूकनायक जनता या मधून त्यांचे विचार वाचल्यावर ते किती पुरोगामी आणि समाजाचा किती अंतरंगातून विचार करणारे होते हे आपल्या लक्षात येईल.
आपण बोलावे कसे तत्पूर्वी अभ्यास कसा करावा हे स्पष्टपणे मांडताना आंबेडकर दिसतात.
सूक्ष्म अभ्यास आणि वाचनावर त्यांचा भर होता.
बाबासाहेबांच्या विषयी अनेक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. 1946 मध्ये कराची येथून तानाजी खरावतेकर यांनी डॉ.आंबेडकर हा चरित्र ग्रंथ प्रकाशित केला.
हा बाबासाहेब विषयी लिहिलेला पहिला ग्रंथ.
1948 मध्ये म श्री दीक्षित यांनी बाबासाहेबांचे चरित्र लेखन केले.
1947 मध्ये नवयुग या साप्ताहिकाने बाबासाहेबांचा विशेष अंक काढला.
बाबासाहेबांचे अधिक आणि संपूर्ण साहित्य वाचणे जरी जमले नाही तर अर्थात वाचले पाहिजे तर वर नमूद केलेले हे तीन अंक जरूर वाचावेत.

वाचन व्यासंग हे त्यांचे खरे मित्र.
आयुष्यभर त्यांनी केलेल्या सामाजिक लढाईची दिशा त्यांच्या जगप्रसिद्ध अशा घोषणा म्हणजे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या विचार करायला लावणारे आहेत. भारतीय समाज व्यवस्था आणि समाज व्यवस्थेतील विविध विसंगती याचे योग्य आकलन करण्यात आपण कमी पडलो आहोत असे आपल्या लक्षात येईल. भारतीय समाज रचनेचा सर्व अंगोपंगांचा अत्यंत सूक्ष्म विचार बाबासाहेबांनी केला होता. आगामी काळात भारताला कोणत्या दिशेने घेऊन जायचे आहे त्याचा नेमका आराखडा कोणता हा विचार त्यांच्या लेखनामध्ये गांभीर्यपूर्वक मांडलेला दिसतो.
स्री पुरुष समानता. शासकीय नोकरी दोघांनाही समान पगार.
समान हक्क रजा वगैरे वगैरे.
आज किती महिलांना माहित आहे की म्हणजे ज्या नोकरी करतात त्यांना आपल्याला मिळणारा पगार प्रसुती पूर्व रजा आणि प्रसुती नंतरची मुलाच्या संगोपनाची रजा महिलांना दिली जावी तीही पगारी रजा असावी हे बाबासाहेबांनी सुचविले आहे.

शिक्षण घेण्यासाठी वय महत्त्वाचे नसते तर आवड आणि सवड या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात.
आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी रंगकाम करण्यासाठी ब्रश आणि रंग हाताशी धरले. संगीताचे ज्ञान प्राप्त करताना उत्तम प्रतीचे गिटार देखील ते वाजवायला शिकले.
स्वतःच्या घराचा आराखडा स्वतःच बनविला आणि ते वास्तु विशारद बनले.
सर्वसामान्यांच्या बरोबर एकत्र बसून चहा व जेवण घेण्यात त्यांना काही कमीपणा वाटत नसे.
मी कोणत्या पदावर आहे यापेक्षा मी कसा आहे आणि ते पद यशस्वी करण्यासाठी मी किती काम करेल असा विचार त्यांचा होता.
2024 सालच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाचा जाहीरनामा असा नव्हता की आम्ही लोकसंख्या नियंत्रणावर काम करू.
स्वातंत्र्यपूर्व काळात बाबासाहेबांनी लोकसंख्या नियंत्रणाचा विचार मांडला होता आचरणामध्ये आणण्यासाठी कष्ट घेतले होते.
तो आपल्याला आजही समजत नाही रवींद्रनाथ टागोर यांनी बुद्ध धर्माचे पुनरआगमन नावाची कविता लिहिली आहे.
या कवितेत त्यांनी बाबासाहेबांच्या कार्याचे महत्त्व विशद केले आहे.

राज्यघटनेचे शिल्पकार या एकाच मुद्द्यावर बाबासाहेबांची थोरवी केवळ या एकाच उपलब्धी पुरती मर्यादित मानू नये.
कारण सर्वच बाबतीत त्यांनी सारखीच असामान्य अशी कामगिरी केली. त्यांचा जन्म कुठे झाला त्यांनी काय सहन केलं ते काय झाले याचा विचार केला तर त्यांच्या जीवनाचा इतक्या प्राथमिक परिचयाने सुद्धा आपण आश्चर्यचकित होतो. दुर्दैवाची गोष्ट ही की भावी पिढ्यांना अजून आंबेडकरांसमत्व लक्षात आलेलं नाही असं अनेकांना वाटतं.
कादंबरीकार अरुंधती रॉयल लिहितात.
आंबेडकरांच्या बाबतीत इतिहास निर्दयी राहिला आहे आधी त्यांना दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला आणि नंतर त्यांचं गौरवीकरण करण्यात आलं. इतिहासाने त्यांचा अस्पृश्यांचा नेता विलग वस्त्यांचा राजा बनवले आंबेडकरांचे लेखन लपवण्यात आले त्यांची मूलगामी बुद्धिमत्ता बाजूला सारण्यात आली.

त्यांच्या राजकीय आणि आर्थिक दृष्टिकोनाशी आपल्याला संवाद साधता येत नाही आपली ती पात्रता नाही ही वास्तविकता आपण स्वीकारायला हवी. त्यांना केवळ दलितांचे थोर मुक्तिदाते या भूमिकेपुरते मर्यादित ठेवता कामा नये. त्याचप्रमाणे कोणत्याही चिकित्सेपलीकडील संत म्हणून त्यांचे गौरविकरण करून चालणार नाही . तर त्यांच्या जीवनाला व कल्पनांना एक संघपणे त्यांच्या लेखनाच्या व भाषणाच्या संकलित ग्रंथांची पृष्ठ संख्या साडे सतरा हजार एवढी आहे. ती वाचायला हवी त्यावर चर्चा व्हायला हवी ती वाचल्यावर आपल्या हे लक्षात येते की कृतिशीलता व राजकारण भारताच्या सार्वजनिक जाणीव यावर पडलेल्या त्यांच्या असामान्य प्रभावातील यश आणि अपयश. अहो यांची चर्चा आपण केली आहे का या कल्पनांचा जा उत्कट्रेने पाठपुरावा करायला हवा तो केला नाही.

संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या शब्दात…
तुका म्हणे
पहा शब्दाची हा देव
शब्दाची गौरव पूजा करू
संत तुकाराम महाराजांच्या साहित्याचा संपूर्ण अभ्यास केलेल्या बाबासाहेबांनी शब्दसृष्टी समृद्ध करण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. आंबेडकरांना त्यांच्या लोकांची प्रतिष्ठा आणि स्वाभिमान टिकण्याची क्षमता ही अत्यंत महत्त्वाची वाटत होती या जगात स्वाभिमानाने जगायला शिका असे बाबासाहेबांनी तरुण दलित वर्गाला सांगितले होते आणि ते त्यांनी स्वतः जीवनभर पाळले.
बाबासाहेब म्हणतात व्यक्ती हेच साध्य आहे. व्यक्तीची वाढ व तिच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास हे समाजाचे ध्येय आणि उद्दिष्ट असते. समाज व्यक्ती पेक्षा श्रेष्ठ नाही आणि व्यक्तीच्या प्रगतीसाठी गरजेचे असेल तरच तिने समाजासमोर गौण स्थान मान्य करावे. समाजातील सदस्यांच्या सहजीवनाच्या शर्ती स्वातंत्र्य समता सहभाव या तत्त्वांवर आधारलेल्या असायला हव्यात.

बाबासाहेब हे नाव आज सर्वात जास्त आदरणीय भारतीयांच्या नामावलीत घेतले जाते. आणि देशभरातील त्यांच्या पुतळ्यांची संख्या न मोजता येईल एवढी आहे.
आधुनिक काळातील सर्वात थोर भारतीय ठरविण्यासाठी अलीकडे एक कलचाचणी घेण्यात आली त्यात दोन कोटींपेक्षा अधिक लोकांनी आपली मते नोंदविली त्याच बाबासाहेबांना सर्वात जास्त मते मिळाली.
सर्वसामान्यांच्या अधिकाराची पाठ राखण करणारी राज्यघटना बाबासाहेबांनी लिहिली.
आपल्या प्रत्येकाच्या संग्रही आणि वाचनात ती घरात आहे का जरा तपासून पहा.
सामाजिक न्यायाच्या आधुनिक संकल्पना बाबासाहेबांनी स्वीकारल्या होत्या त्यांनी युक्त असलेले संविधान बाबासाहेबांनी अस्तित्वात आणले. स्वतःच्या बुद्धिमत्तेचा बळ आणि लेखणीची ताकद यांच्या साह्याने प्राचीन भारतीय संस्कृती आणि सभ्यतेला आधुनिक युगामध्ये आणून ठेवणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब.
बाबासाहेबांचे असे आणि अशा प्रकारचे अनेक पैलू आहेत.
उत्तम पिता उत्तम पती
सहकारी विचारवंत कुटुंब वत्सल व्यक्तिमत्व.
अशा कितीतरी गोष्टी त्यांच्याविषयी सांगता येतील शब्द कमी पडतील त्याविषयी माझे….
त्यांच्या पत्नी फार शिक्षित नसल्या तरी एखाद्या शिक्षित माणसा पेक्षाही उच्च विचार करणाऱ्या रमाबाई.
यांच्या विषयी मी आगामी काळात स्वतंत्र ग्रंथ लिहिणार आहे

आज सहा डिसेंबर या निमित्ताने बाबासाहेबांना भावपूर्ण आदरांजली.

— लेखन : प्रा डॉ लहू गायकवाड.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. छान! माननीय महान बाबासाहेब आंबेडकर यांची चतुरस्त्र विचारसरणी ह्या छोट्या लेखात उत्तमरित्या वर्णीली आहे. हा लेख ह्या वर्षीचा महानिर्वाण दिनानिमित्त मानवंदना म्हणण्यास हरकत नाही. 🙏.

  2. अतिशय सुंदर अभ्यासपूर्ण लेख लिहून त्या महामानवाला आदरांजली अर्पण केली आहेत. विनम्र अभिवादन 🙏🌹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Purnima anand shende on निसर्गोपचार : ३
Manisha Shekhar Tamhane on निसर्गोपचार : ३