Thursday, July 3, 2025
Homeसाहित्यकविता मनातल्या.....

कविता मनातल्या…..

कमीत कमी मजकुरात लयबद्ध शैलीत कविता खूप मोठा आशय व्यक्त करीत असते. जगभरच्या साहित्यात कवितेला मानाचं स्थान आहे. शालेय जीवनापासून आपण कविता वाचतो, अभ्यासतो. काही जण कविताही करायला लागतात.
वाचलेल्या, ऐकलेल्या काही कविता सतत आपल्या मनात रुंजी घालत असतात.
अशाच मनातल्या कविता सांगणार आहेत, त्यावर रसग्रहणात्मक लिहिणार आहेत डॉ गौरी जोशी-कंसारा.

अल्प परिचय
डॉ. गौरी जोशी-कंसारा अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये आयुर्वेद तज्ञ असून योग प्रशिक्षक आहेत. ह्या क्षेत्राचा त्यांचा पंधरा वर्षांहून अधिक अनुभव असून नाडीपरीक्षा आणि आयुर्वेदिक जीवन पद्धतीबद्दल तेथील लोकांमध्ये जागृती यावी यासाठी ह्या शास्त्राचा त्या प्रचार आणि प्रसार करत असतात.

डॉ गौरी यांनी विविध नाटकात काम केले आहे. त्या स्वतः कथक नृत्यांगना आहेत. विविध स्पर्धांच्या तयारीच्या निमित्त्याने जी वाचनाची आवड निर्माण झाली त्यात त्यांना सर्वाधिक गोडी वाटली ती, कविता या साहित्यप्रकाराची.

डॉ गौरी या ‘मुक्तरंग‘ नावाने कवितांचे फेसबुक पेज चालवतात. ‘ऋतुपर्ण‘ मासिकात त्यांच्या कविता प्रसिध्द झाल्या आहेत.
आपल्या न्युजस्टोरीटुडे वेबपोर्टलवर त्यांचं “भावलेल्या शांता शेळके” हे रसग्रहण प्रसिद्ध झाले असून त्याला रसिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. आपल्या विनंतीवरून त्या नियमितपणे मनातल्या कविता वर रसग्रहण करणार आहेत. रसग्रहणानंतर त्या स्वतःची कविताही सादर करणार आहेत.
आजचं रसग्रहण आहे,
ग्रेसफुल ग्रेस !
तर स्वागत करू या, डॉ. गौरी जोशी कंसारा यांचं 💐
– देवेंद्र भुजबळ
संपादक

ग्रेसफुल ग्रेस !
ओसाडांतील बाभूळ बसते
विकल उरांतिल काटा काढीत
चोचीमधली उलवित चिवचिव
युगायुगांचे खुळे मनोगत !

कवी ग्रेस यांच्या ह्या ओळी. ह्या ओळी आज गुणगुणत होते आणि सहजच त्यांच्याबद्दल मनात विचारमाला सुरू झाली. आजवर जे आणि जसे कवी ग्रेस आणि त्यांच्या कविता मला उमगल्या ते मांडण्याचा हा बाळबोध प्रयत्न……

कवीवर्य मर्ढेकरांनंतर आणखी एक माणिक नवकाव्याच्या क्षितिजी चमकू लागले आणि ‘माझी कविता हे माझे स्वगत आहे, ती स्वभावतः अवतरते. तिला श्रोत्यांच्या असण्याची किंवा त्यांचे असणे गृहीत धरण्याची गरज नाही.’ या आशयाचे विधान करणारे आत्ममग्न व्यक्तीमत्व, कवी ग्रेस मराठी साहित्य सृष्टीस लाभले.

‘संध्याकाळच्या कविता ‘, ‘ चंद्रमाधवीचे प्रदेश ‘, ‘ राजपुत्र आणि डार्लिंग ‘,’ सांध्यपर्वातील वैष्णवी ‘, ‘ सांजभयाच्या साजणी ‘ असे पाच कवितासंग्रह आणि सात ललितलेख संग्रह असा ठेवा कवी ग्रेसांनी मराठी शब्दसृष्टीस बहाल केला.
प्रतीक-प्रतिमा हे त्यांच्या शैलीचे वैशिष्ठ्य मानले जाते. निसर्गातल्या सजीव आणि निर्जीव अश्या क्षितीज, मेघ, झाडे, डोंगर, पक्षी अश्या कित्तेक घटकांचा त्यांनी आपल्या कवितेत प्रतिमा म्हणून उपयोग केला आहे पण म्हणून त्याची समीकरणं मात्र बांधता येत नाहीत. त्यांचे अर्थ प्रत्येक कवितेत वेगळे असू शकतात, ते त्या कवितेच्या संदर्भाप्रमाणे बदलत जातात आणि निर्जीव वस्तूंना खरोखर सजीवत्व प्राप्त व्हावे इतकी त्या उपमांची ताकद असते. त्यांच्या भावव्याकूळ आणि आशयगर्भ रचनांना दर्दी रसिकांची अमाप दाद मिळाली. अतिशय वेल्हाळ शब्द, त्याला असलेली गेयता, त्यात खोल दडलेला एक महान विचार आणि एक व्याकूळ मन असं त्यांच्या कवितेचं स्वरूप सांगता येईल.

ग्रेस यांच्या कवितेला समीक्षकांनी, चाहत्यांनी, पूजकांनी ‘गतिमान, नादमय, संमोहक, डौलदार’ अशी अनेक विशेषणे बहाल केली आहेत. तर त्याच शैलीस ‘गूढ, दुर्बोध, अनाकलनीय’ असे समजणारेही अनेक वाचक आहेत.

मला स्वतःला कवी ग्रेसांची कविता म्हणजे एक रूपगर्विता नायिका वाटते. अतिशय हळवी पण सहज साध्य न होणारी. तिच्या प्रियकराला सर्वस्व विसरून तिच्या प्रेमात पडावं लागतं. कवी ग्रेसांची कविता म्हणजे जशी एखादी कमल कलिका. रूप, रंग, गंधवती, अत्यंत मोहक, कोमल पण पाकळी न् पाकळी घट्ट मिटून बसलेली. भ्रमराप्रमाणे तिच्या आकंठ प्रेमात पडावं लागतं, तिची आळवणी करीत तिच्या अधिक अधिक जवळ जावं लागतं. मग ती हळूवार एकेक पाकळी उलगडते, तेही तिला हवी तेवढीच.

रसग्रहण करण्याची इच्छा असेल तर आयुष्यभर ‘तिच्या’ प्रेमात आणि प्रतीक्षेत रहावं लागेल !
कवीवर्य ग्रेस, आपण आशयगर्भ रचनांचे सर्जनकार आहात. आजची माझी कविता आपल्या चरणी अर्पण. आपल्याला दिसलेले क्षितिज आणि मेघ कधी अशांत, कधी स्निग्ध, कधी परके आणि कधी दिशावेगळे होते. मला दिसलेला ‘मेघ’ दाखवण्याचा आणि त्याच्या सरी झेलण्याचा हा एक छोटा प्रयत्न !

मेघ
क्षितीज रेख जमवी दिव्य मेघ माला
जे जिंकून आसमंत जाती त्या पदाला,
एक मेघ तेथे तुजसाठी स्थावर;
जागवील जो तव अंतरी पावसाला.

धग केवढी मंडली सोसली ती
अवखळता जलाची पुरी आटली ती,
पोळून सारे जीवन रूप हरले;
दरवळ दिगंतात मग पोचली ती.

कृष्णली वादळे मेघचर्या जरी
निर्धारी गरजत्या सुवर्ण किनारी,
तमाची कशाची फिकीर तयांना;
उपसल्या लढण्यास वीज तलवारी.

विश्वात स्थान उत्तुंग लाभे मग
शिर उंचावून कौतुके पाहते जग,
तसा दाटे मेघास गहिवर वारसा;
रुजवण्यास अंकुर होई व्याकूळ मग.

तुझा कोणता ते ओळखू पाहा तू
मेरुसम दृढ त्या मार्गी रहा तू,
बरसेल अशी मग कृपावृष्टी त्याची;
मेघ होवूनी दिव्य क्षितीजी वहा तू !

– लेखन : डॉ गौरी जोशी-कंसारा, न्यू जर्सी, अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. +91 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments