“बालविवाह प्रतिबंध”
मागील काही दिवसांपूर्वी एक बालविवाह आमच्या प्रयत्नांनी थांबवण्यात आला आणि त्यातील बालविवाह सारख्या कुप्रथांना बळी पडण्या पासून वाचवण्यात आलेली बालिका आमच्या कडे काळजी व संरक्षण हेतू प्रस्तुत झाली. ही बालिका वस्ती भागातील अतिशय हलाखीची आर्थिक परिस्थिती असणाऱ्या विखुरलेल्या कुटुंबातील होती. तिची आई ती अगदी तान्ही असताना वारलेली, वडील दुसऱ्या स्त्री सोबत राहणारे, अनेक आजारांनी ग्रस्त आणि व्यसनाधीन आहेत. एक म्हातारी आजी आहे. अश्या परिस्थितीत बालीकेची पाचव्या वर्गात शाळा सुटली होती. बालिकेला देखील गुटका, तंबाखू आणि अनेक व्यसन असल्याचं कळून आलं आणि तिला फिट्स देखील येत असल्या कारणाने तिला या सगळ्यातून काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. पण बालिकेस हे सगळं तिच्या मदतीसाठी सुरू हे कळत नव्हतं. ती घरी जाण्यासाठी खूप आकड तांडव करत होती. घरची माणसं पण अज्ञानामुळे काहीही समजून घेण्यास तयार नव्हती आणि एकाएकी तिचे अनेक नातेवाईक आमच्या काळजी संरक्षण प्रयत्नांना विरोध करू लागले.
जे लोकं तिची काळजी घेऊ शकले नाही, तिचा बालविवाह लावणार होते तेच आता तिच्यावर आपला अधिकार दाखवू लागले. अश्या परिस्थितीत हतबल झाल्यासारखं वाटू लागलं. बालिकेचे समुपदेशन सुरूच होते. ती घरी जाण्यासाठी हट्ट करू लागली होती. रोज नवीन करतब करत होती. कधी चक्कर आल्याचा बहाणा, तर कधी पोटदुखी. ती अस्वस्थ झाली होती. तिचं व्यसन तिला स्वस्थ बसु देईना. तिला काही उपक्रमात रमविंण्याचा प्रयत्न संस्थेकडून सुरू होता. हळूहळू ती थोडी स्थिर झाली. काही उपक्रम तिला आवडू लागले. ती वस्ती, तिथली अस्वच्छता, सतत होणारी भांडणे आणि करावे लागणारे कष्ट या पासून तिची सुटका झाली होती हे तिच्या लक्षात येऊ लागलं. काही दिवसांनी ती समिती पुढे आली तेंव्हा शांत बसली. आवाजातील कर्कशपणा कमी झाला होता. खरं तिला आता घरी जायचं नव्हत असं तिच्या बोलण्यातून जाणवलं. नेमक्या कोणत्या उपक्रमात ती रमते आहे हे समजून घेण्याचा मी प्रयत्न केला. तिला गोष्टी ऐकायला आणि सांगायला देखील आवडत होत्या असं ती म्हणाली. तिचा समुपदेशन अहवाल वाचल्या नंतर कळलं की ती तिच्या आई वडिलांबाबत खूप गोष्टी इतर बालीकांना सांगत असते. वास्तवता ही होती की तिची आई ती अगदी तान्ही असताना वारली होती आणि वडिलांनी दुसरं लग्न केल्यामुळे ते कधीच तिला भेटले नाही आणि ती आजी सोबत राहत असे. अर्थात तिला गोष्टी स्वरूपात ते आयुष्य जगायचं होते आणि त्याला जिवंत करण्यासाठी ती इतर बालकांची मदत घेत होती. तिची ती पोकळी त्या गोष्टींनी भरत होती. तिला आता संस्थेत राहू वाटत होत.
तिचं लग्न ज्या व्यक्तीशी ठरलं होत तो अठ्ठाविस वर्षाचा होता. पण ती संस्थेच्या सोशल वर्कर ला म्हणाली होती तो चांगला आहे. त्याची कोणती गोष्ट तिला आवडली असं विचारल्यास ती म्हणाली होती की, तो तिच्याशी बोलतो तेव्हां तिच्या डोक्यावर हात ठेवतो. पण त्या व्यक्तीबाबत अशी माहिती होती की तो दारूच्या दुकानात काम करतो आणि त्याला दारूचे व्यसन आहे. पण समजून घेण्याची गोष्ट म्हणजे बालिका त्या व्यक्तीमध्ये वडील प्रतिमा शोधण्याचा प्रयत्न करत असावी. लग्न आणि त्या सोबत येणारी जवाबदारी याची कसलीही तिला माहिती किंवा जाणीव नव्हती तरी ती केवळ तिच्या मनातील वडील प्रतिमा मिळवण्यासाठी त्या लग्नाला तयार झाली होती.
बाल मन आणि त्याच्या विविध निरागस गरजा याचा करवा तेवढा अभ्यास थोडा आहे. पालकांची, शिक्षकांची कार्यशाळा घेताना तसेच पोलिसांचे सेशन घेताना मी कायम सांगते की good आणि bad टच सांगण्या पेक्षा safe आणि unsafe टच बालकांना समजावून सांगायला हवा. कारण बालकांना good वाटणारा टच पण unsafe असू शकतो. त्याची सुरुवात बालकाला good वाटू शकते. बालकांना हे कळणं खूप आवश्यक आहे.
बाल विवाह या विषयावर मी पुढचा आणखी एक लेख लिहिणार आहे त्यात, या बाबत काही खूप सूक्ष्म आणि सहज लक्षात न येणाऱ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करू या. कायद्याच्या समाजाच्या आणि बिंदूस्थानी असणाऱ्या बालकाच्या हितासाठी असणारे मुद्दे यावर चर्चा करू या.
क्रमशः
— लेखन : डॉ राणी खेडीकर.
अध्यक्ष, बाल कल्याण समिती, पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800