जे पाहिले असता नेत्र सुखावतात, मन आनंदित होते, चेतना जाग्या होतात, उत्साहवर्धन होते, तेव्हाच ती वस्तू किंवा परिस्थिती आपल्याला सुंदर दिसते किंवा त्यातील सौंदर्य आपल्याला जाणवते.
विधात्याने सृष्टी निर्माण केली. रस, रंग, रूप, गंधाने भरलेली ही सृष्टी ! एखाद्या शांत वाहणाऱ्या तलावाकाठी बसावे आणि पाण्यात विहार करणाऱ्या पांढऱ्या शुभ्र बदकाच्या जोडीला पाहून मन प्रफुल्लित व्हावे, काठावर फुललेली विविध रंगी तृणपुष्पे पहावी, पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात तलावातील चमचमणारे पाणी आणि त्यात उगवलेली राजीव कमळे पाहून आल्हादित व्हावे. सृष्टीच्या या सौंदर्याने आपण जीवनातील आनंद लुटावा.
देठाला असंख्य काटे असून सुद्धा फुलांचा राजा गुलाब कसा अगदी दिमाखात फुललेला असतो आणि परिसर सुगंधित करतो. त्याला त्याच्या देठावरील टोचणाऱ्या काट्यांची तिळमात्र तमा नसते. पाण्याकाठी चिखलात कमळे उगवतात, परंतु त्या चिखलाची कमळाला कुठे फिकीर आहे ? कमळाच्या सौंदर्याला चिखलामुळे जराही बाधा आलेली नसते. चंदनाच्या झाडाला विखारी सापांचा विळखा असला तरी ते त्याचा सुगंध वाटण्याचे काम सोडत नाही. चराचरातील सौंदर्य नेमके शोधणे आणि त्याचा उपभोग घेत जगणे हा प्रत्येकाच्या भिन्न प्रकृतीचा भाग आहे मात्र. कुणास हिरव्या रंगात अधिक सौंदर्य भासेल, तर कुणाला पिवळा रंग सुंदर वाटेल. प्रत्येकाची दृष्टी वेगळी, डोळ्यावरील चष्म्याच्या काचांचा रंग वेगळा.
ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेच आहे,
“का कमलकंदा आणि दर्दुरी
नांदणूक एकेची घरी
परागु सेवीजे भ्रमरी
जवळीला चिखलुची उरे”
भ्रमर आणि बेडूक एकाच ठिकाणी राहतात परंतु भुंगा कमळातील पराग सेवन करतो आणि बेडकाला मात्र कमलपुष्पाखालील चिखलच प्रिय वाटतो. तो त्या चिखलातच राहणे पसंत करतो.
माणसांचेही तसेच आहे. कित्येकांना आनंददायी गोष्टी दिसत नाहीत, ते दुःखद गोष्टींनाच कवटाळून बसतात आणि जीवनाचा आनंद उपभोगता येत नाही म्हणून स्वतःच्या नशिबाला दोष देत रडत राहतात.
जगात नानाविध प्रकारची असंख्य माणसे आहेत. कोणी गोरे, कोणी काळे, सावळे, उंच, बुटके, तरतरीत तर कोणी अगदीच बावळे, कोणी धिप्पाड तर कोणी कृष देह- यष्टिचे. एकासारखा दुसरा नाही, परंतु प्रत्येकात स्वतःचे असे काहीतरी सुंदर व्यक्तिमत्व असते. त्यातील नेमके सौंदर्य टिपणे हे ज्याचे त्याचे काम आहे. काही चेहरे पाहताक्षणीच मनाला भुरळ पडते, तर काहींच्या अंतरिक सौंदर्याच्या अनुभवाने त्या व्यक्तींविषयी आदर भाव निर्माण होतो.
सौंदर्य कुठे नाही ? कणाकणात, अणूरेणूत सौंदर्य भरलेले आहे, फक्त नजर हवी.
आपण एखाद्या संगीत सभेला गेलो, की गायकाच्या किंवा गायिकेच्या गोड गळ्यातून निघालेले सुंदर सूर सोबत घेऊनच घरी जातो. सतारीच्या मंजूळ सुरांची मोहिनी आपल्यावर पडलेली असते. या ठिकाणी मला पु. ल. देशपांडे यांच्या तुझे आहे तुज- पाशी या नाटकातील काकाजी या जीवनातील सौंदर्याचा खरा आनंद घेणार्या पात्राची विशेष आठवण येते. एखाद्या गोष्टीतील सौंदर्याचा कसा आस्वाद घ्यायचा याविषयीचा त्यांचा नाटकातील हा संवाद लक्षणीय आहे. ते श्याम या पात्राला सांगत आहेत, “या इथे अशी मैफल जमली होती. रोशन गात होती पुरिया. ऐकायला इनेगिने पाच-दहा लोक. तुझे आजोबा होते पखवाजावर, अरे, नाना पानश्यांचे शागीर्द ते. एवढ्यात पॅलेस वरून महाराजांचा निरोप आला, ‘बाईंना बोलावले आहे’. बाई घुसली होती पुरीयाच्या घनदाट जंगलात. धुंद धुंद झाली होती सुरांच्या मस्तीने. हुकूम ऐकताच ताडकन उठली आणि म्हणाली, ‘ महाराजांना म्हणावं, गाणं ऐकायचं असेल तर इथे बापू भैया देवासकरांच्या कोठीवर यावं, इथं उभा केलाय मी पुरिया. ताजमहाल बघायला आग्र्याला जावं लागतं, तुमच्या दाराशी नाचत येतात ते मोहरमचे कागदी डोले.’ “सुरातील अस्सल सौंदर्य अनुभवायचे असेल तर कान उघडे ठेवून त्या सुरांपर्यंत पोहोचण्याची माणसाची ताकद हवी.
प्रदर्शनातील एखाद्या चित्राकडे आपली नजर खिळून राहते, ती त्याच्यातील सौंदर्यामुळेच !
प्रतापगड, सिंहगड, शनिवार वाडा यासारख्या ऐतिहासिक वास्तु, अजंठा, वेरूळ सारखी लेणी व शिल्पे, कोनार्क मीनाक्षी, सोमनाथ सारखी प्राचीन मंदिरे या मानवनिर्मित वास्तूंमध्ये सुद्धा ओतप्रोत सौंदर्य भरलेले आहे, हे ज्याला सौंदर्यदृष्टी आहे त्यालाच कळेल.
जीवनावर भाष्य करताना मदर टेरेसा ने म्हटले आहे, “Life is Beautiful, admire it.”
एकूणच जीवन अतिशय सुरेख आहे, त्याच्या सौंदर्याची दखल घ्या. पाण्यात पोहणाऱ्या एखादे बदकाचे पिल्लू पुढे मोठे होऊन डौलदार राजहंस होणार आहे हे फारच थोड्या नजरा ओळखू शकतात.
— लेखन : अरुणा मुल्हेरकर. मिशिगन, अमेरिका
— संपादक : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ.☎️ 9869484800
सौंदर्य सर्वत्र भरलेले आहे फक्त नजर हवी
अरुणा ताईंचा लेख म्हणजे अप्रतिम सौंदर्याची ओवी
ताई आपल्या लेखातली प्रत्येक ओळ
वाटते पुन्हा पुन्हा वाचत राहावी
गुलाब कमळ भुंगा काकाजी रोशन राजहंस
ही उदाहरणं मनात प्रत्येकाने रसिकतेने भरून घ्यावी
अप्रतिम लेख ताई स्वर्ग जणू आनंदाचा!!!
राजेंद्र वाणी
दहिसर मुंबई
सकारात्मक पेक्षा नकारात्मक मानवामध्ये दिसते पण अरुणा मुल्हेरकर ताईंनी सौंदर्य जळी- स्थळी आहे.हे लेखातून खूप मस्त सांगितले आहे.
संपादक भुजबळ साहेबांनी
उतम लेख संपादित केला आहे.
दोघांनचे अभिनंदन
गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव महाराष्ट्र
८७८८३३४८८२
अरुणाताईंचा लेख अप्रतिम. माणसाला सौंदर्यदृष्टी असली की सगळं जीवन कसं सुंदर दिसायला लागतं हे अरुणाताईंनी या अनवट ललित लेखात तरलपणे मांडलं आहे.दाद दिलीच पाहिजे असा हा लेख.
आभारी आहे.
खूप दिवस झाले,आपण काही लेखन पाठविले नाही ! तरी वेळ मिळाला की अवश्य लिहा,अवश्य पाठवा.
खूप छान आणि अत्यंत स्फूर्तीदायक लेख आहे. बर्याच दिवसांनी एक सकारात्मक लेख वाचल्यामुळे दिवसाची सुरूवात उत्साहात सुरू झाली.