“शरद पवार साहेब”
आज, १२ डिसेंबर. शरद पवार साहेबांचा वाढदिवस. पवार साहेबांनी मुख्यमंत्री,केंद्रीय मंत्रीपद, अशी विविध पदे उपभोगली आहेत. दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी साहेबांनी पवार साहेबांना नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य केले होते.कारण त्यांच्या पदरी लातूर भूकंपात काम केल्याचा अनुभव होता. गुजरातमधील भुज सारख्या भूकंपाच्या वेळी देखील त्यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.
पवार साहेब आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे अध्यक्ष होते. त्याचबरोबर त्यांनी भारतीय कबड्डीला देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवले. प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायक मंदिराचा संपूर्ण कायापालट पवार साहेबांनी केला. पूर्वीचे मंदिर लहान व साधे होते. पवार साहेबांचे सर्व राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांशी चांगले व सलोख्याचे संबंध आहेत, हे आम्ही स्वतः बघितले आहे. क्रिकेटर सुनील गावस्कर असो किंवा इतरही अनेक लोक पवार साहेबांच्या बंगल्यावर नेहमी कामासाठी येत असत. सी.के. नायडू पुरस्कार त्यांच्यावेळी झाला. त्यावेळी भारतातील आजी माजी सर्व क्रिकेट कॅप्टन हजर होते.
महाराष्ट्र भूषण पुरस्कारापासून मोठमोठे कार्यक्रम पवार साहेबांच्या कारकीर्द सुरू झाले. माजी पंतप्रधान चंद्रशेखर, जॉर्ज फर्नांडिस, फारुख अब्दुल्ला, मोहन धारिया, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व असे असंख्य मित्र त्यांनी राजकारणात जपले. पवार साहेबांच्या एकसष्ठीला माजी पंतप्रधान कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी मुद्दामून आले होते. दिलीप कुमार यांना पवार साहेब नेहमी युसुफभाई म्हणून बोलताना मी ऐकले आहे.
मुंबईतील बॉम्बस्फोट असो आणखीन कुठल्याही घटना असो भूकंप असो अशावेळी पवार साहेब दिवस-रात्र काम करत. बॉम्बस्फोट झाल्यानंतर शेअर बाजार दुस-या दिवशी सकाळी सुरू झाला. सगळ्यांना आश्चर्य वाटले. त्यावेळी आम्ही सर्वजण रात्रभर सीएमच्या ड्युटीवर होतो. त्या वेळचे पंतप्रधान श्री नरसिंहराव यांनाही शेअर बाजार दुसऱ्या दिवशी सुरू झाल्याचे कौतुक केले होते. सगळ्या व्यापारांना त्याची काळजी होती. मुंबई आर्थिक घडामोडींचे आंतरराष्ट्रीय शहर असल्यामुळे सर्व व्यवहार दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सुरू झाले. पवार साहेबांचा वाढदिवस बरेचदा नागपूर अधिवेशनाच्या सुमारास येत असे. अपना उत्सव, फ्रेंच फेस्टिवल असे विविध समारंभ पवार साहेबांच्या सुमारास मुंबईत झाले. नेहरू सेंटर येथे देखील पंतप्रधान राजीव गांधी असताना मुंबईतील सर्व कलाकार, उद्योगपती, विविध क्षेत्रातील मान्यवर या सगळ्यांचा एकत्र कार्यक्रम झाला होता. मराठी जागतिक परिषद पवार साहेबांच्या वेळेपासून सुरू झाली.
राजकारणाबरोबरच क्रीडा क्षेत्र, कला, नाटक, सिनेमा या व अशा अनेक क्षेत्रातील लोक पवार साहेबांना भेटायला मंत्रालयात, वर्षा बंगला येथे येत असत. अजून बर्याच आठवणी आहेत परंतु आता कधी कधी चटकन लक्षात येत नाही. शासकीय फोटोग्राफर म्हणून विविध मुख्यमंत्र्यांबरोबर काम करताना खूप समाधान मिळते आणि त्याचे कारण सुद्धा आमच्या मागे असणाऱ्या आमच्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांचं पाठबळ आणि त्याचप्रमाणे हे सर्व पक्षातील पुढारी देखील आम्हाला समजून घेत. आम्ही दिवस-रात्र ड्युटी करतोय बघून त्यांना आमच्या पब्लिसिटी विभागातील कर्मचाऱ्यांविषयी देखील आपुलकी होत होती.
पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
— लेखन : गिरीश देशमुख. निवृत्त छायाचित्रकार,मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800