Wednesday, December 31, 2025
Homeबातम्यासरप्राईज देणारेच झाले सरप्राईज !

सरप्राईज देणारेच झाले सरप्राईज !

वाढदिवस तुमचा… आनंद सर्वांचा… या उपक्रमांतर्गत सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्याचा अभिनव उपक्रम नित्यनियमाने प्रभात ट्रस्ट या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून राबविला जातो. परंतु नुकताच एक वाढदिवस काहीसा विशेष ठरला.

वाढदिवसानिमित्त सरप्राईज देण्यासाठी जगातील पहिले सौर ऊर्जेवर आधारित फिरते नेत्रालय कर्जत येथील छोट्याशा वस्तीवर पोहोचले होते. सागर मोहिते व मोहसीन जमादार यांनी नेहमीप्रमाणे नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटपाची धुरा सांभाळली. आज नेत्रसेवेबरोबर वृक्षारोपणही करण्याचा आमचा मानस होता. यासाठी मधुकर वारभुवन सर, जीवन निकम, प्रकाश डुडम, अमित कदम, विकास चव्हाण इत्यादी सहकार्‍यांसह आम्ही सज्ज होतो.

सरप्राईज देण्यासाठी Birthday boy  येण्यापूर्वी वृक्षारोपण सुरू करण्याचा आमचा मानस होता. यासाठी ओक वनौषधी केंद्र व शंकर पवार, ऐरोली आणि जोशी मॅडम, नेरूळ यांनी स्वतः बनवलेली रोपटी घेऊन सकाळी नऊ वाजता आम्ही श्रद्धा प्रकल्पात पोहोचलो.

परंतु, आमच्या गाड्यांबरोबरच एक रुग्णवाहिका प्रकल्पामध्ये दाखल झाली. आम्हा सर्वांना वाटले, नवीन मनोरुग्ण दाखल होण्यासाठी आला असावा. आम्ही सर्वजण त्या रुग्णवाहिकेकडे उत्सुकतेने पाहत होतो. सरप्राईज देण्यासाठी गेलेल्या आमच्या टीमला ते दृश्य पाहून धक्काच बसला. रस्त्यावरील मनोरुग्णांचे उपचार व पुनर्भेट यासाठी गेली पंचवीस वर्ष काम करणारे रॅमन मॅगसेसे विजेते डॉ. भरत वटवानी सर स्वतः आमच्या पुढ्यात प्रकट झाले होते. सरप्राईज देणाऱ्यालाच सरप्राईज मिळाले होते.

हसतमुखाने सर्वांचे स्वागत करतानाच सर्वप्रथम अल्पोपहार घेण्याचा आग्रह केला. नाश्ता करत असताना मराठी गृहिणींच्या तिखट कांदा पोहे बनविण्याच्या विषयावर खुमासदार शैलीत चर्चा केली. यावेळी पाठीच्या दुखण्यामुळे कारमध्ये बसून प्रवास करणे शक्य नसल्याने रुग्णवाहिकेत झोपून प्रवास केल्याचे सरांनी स्पष्ट केले. रूग्णसेवेला खंड पडू नये यासाठी डॉक्‍टरांनी प्रत्यक्ष कृतीतून दिलेला वस्तुपाठ आम्हा तरुण पिढीसाठी मोठी ऊर्जा देणारा आहे.

स्वतःच्या वेदना विसरून त्यांनी वृक्षारोपण उपक्रमांमध्ये सहभाग घेताना सरांनी विचारले “कितने पेड़ लगाने वाले हैं..?” उत्तरादाखल आम्ही सांगितले “आपका कितना बर्थडे है उतने पेड़ लगाने वाले हैं..!” यावर सरांनी हसून प्रतिक्रिया दिली. म्हणाले, इसका मतलब आपने 63 प्लांटेशन का संकल्प किया है..! आप लोग अगर इतना अच्छा काम करोगे तो मुझे 75 तो क्रॉस करना पड़ेगा….यावर आम्ही उत्तर दिले… “हमें तो सौ प्लांटेशन करने हैं”. पुन्हा एकदा आमच्या उत्तराला दिलखुलास दाद देताना डॉक्टर म्हणाले..तो फिर मुझे व्हील चेअरमें ही लाना पड़ेगा ! सर्वत्र एकच हास्यकल्लोळ झाला..

रुग्णवाहिकेतून जवळपास शंभर किलोमीटरचा प्रवास केल्यानंतरही डॉक्टरांनी प्रकल्पामध्ये भरती असणाऱ्या 108 रुग्णांची तपासणी केली. स्वतःच्या वेदना लपवून इतरांच्या वेदनेला संवेदना देणाऱ्या कर्मयोग्याला मानाचा मुजरा.

खऱ्या अर्थाने फादर्स डेच्या दिवशी आम्हाला सेवा कार्यातील “बाप माणूस” भेटला… यानिमित्ताने मनोरुग्णांच्या सेवेसाठी डॉक्टरांना उदंड आयुष्य लाभू दे हीच शुभेच्छा देऊयात..!

पुन्हा एकदा डॉ. भरत वटवानी सर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवस..

– लेखन : डॉ. प्रशांत भा. थोरात, नेत्रतज्ञ
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. डाॅ.भरत वटवानी सरांना वाढदिवसाच्या कोटी कोटी अगणित हादीॅक हादीॅक हादीॅक शुभेच्छा 💐💐💐💐
    व त्यांच्या कायॅ ला तर मनापासून शतशः प्रणाम.
    खरंच खुप छान कायॅ व लेख हि खुप छान. 🙏

  2. स्वतःच्या वेदना लपवून इतरांच्या वेदनेला फुंकर घालणाऱ्या कर्मयोग्याला मानाचा मुजरा. रॅमन मॅगसेसे विजेते डॉ. भरत वटवानी सर यांना दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना 🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अलका वढावकर ठाणे on माझी जडणघडण : ७८
पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”