डॉ संभाजी खराट
माझे मित्र, सहकारी, निवृत्त माहिती उपसंचालक, आपल्या वेब पोर्टलचे लेखक, डॉ संभाजी खराट यांचे नुकतेच कर्क रोगाने निधन झाले. ते गेले काही महिने ते कर्करोगावर उपचार घेत होते. ते गेले आणि अनेक आठवणी मनात दाटून आल्या.
मराठवाडा विद्यापीठातून मी १९८८-८९ साली पत्रकारितेतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करीत होतो. तर त्याच वर्षी ते पदवी अभ्यासक्रम करीत होते. त्यामुळे आमची तेव्हापासून ओळख होती. त्यावेळी मी दूरदर्शन मध्ये होतो. तर ते पत्रकारिता करीत होते. पुढे मी दूरदर्शन सोडून १९९१ साली माहिती खात्यात रुजू झालो. तर ते ही बहुधा १९९७/९८ च्या सुमारास माहिती खात्यात रुजू झाले.
मंत्रालयातील वृत्त शाखेत, पुढे कोकण भवन मध्ये आणि पुन्हा मंत्रालयात आम्ही एकत्र काम केलं. सरकारी नोकरी लागली म्हणून त्यातच ते कधी रममाण झाले नाहीत. सत्यशोधकी विचारांची कास त्यांनी कधी सोडली नाही.
त्यामुळे एक अधिकारी इतकेच त्यांचे व्यक्तिमत्व सीमित नव्हते तर ते कार्यकर्ता अधिकारी म्हणून समतेच्या चळवळीत सतत सक्रिय राहिले. अनेक संशोधन पूर्ण पुस्तके त्यांनी लिहिली. तसेच शक्य असेल त्या त्या वेळी ते व्याख्याने देखील देत.
वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी यामध्ये कितीही नाही म्हटले तरी एक अंतर असते. आम्हा दोघांमध्येही ते तसे होते. पण
आपापल्या व्यक्तिमत्वामुळे दोघांनाही ऑफिसच्या पदा व्यतिरिक्त एकमेकांविषयी आदर होता आणि तो सदैव कायम राहिला.
माझ्या निवृत्तीनंतर, माझ्या मुलीने मला न्यूज स्टोरी टुडे हे वेब पोर्टल सुरू करून दिले. त्यासाठी कसे कामकाज करायचे हे ही शिकविले. त्यामुळे माझा वेळ सत्कारणी लागू लागला. पुढे संभाजीराव माहिती उपसंचालक म्हणून दीडेक वर्षांपूर्वी निवृत्त झाले आणि ते ही अधून मधून या वेब पोर्टल साठी लिहू लागले. त्यामुळे आमचा पुन्हा नियमित संपर्क, विचार विनिमय सुरू झाला.
१८ एप्रिल ला माझ्या पत्नीचा साठावा वाढदिवस होता. तेव्हा त्यांनाही सपत्नीक आमंत्रित केले होते. ते दोघे आलेही होते. पण फार वेळ त्यांना बसवेना, म्हणून ते मला सांगून कार्यक्रम पूर्ण होण्याआधीच निघून गेले. टवटवीत, भरदार व्यक्तीमत्व लाभलेल्या संभाजीरावांकडे बघवत नव्हते, इतके ते खंगुन गेले होते. तरी त्यांची उमेद त्यांनी हरवू दिली नव्हती. आपण कॅन्सर मधून पूर्ण बरे होऊ, असा त्यांचा आशावाद होता आणि त्यांच्या या आशावादामुळेच ते नक्कीच पूर्ववत होतील, अशी आशा वाटत होती. फोन वर बोलताना ही ते सहजपणे बोलत असत तेव्हा मी त्यांना माझ्या मिसेस ने कॅन्सर वर कशी यशस्वीरीत्या मात केली, हे सांगून धीर देत असे. मध्येच त्यांना मी, वहिनींना घेऊन कुठे तरी हवापालट करून या म्हणून सुचविले होते. कारण कॅन्सर पेशंट बरोबर त्याच्या परिवारावर, विशेषत: जोडीदारावर किती ताण येत असतो, त्या अनुभवातून गेलो होतो. त्यामुळे जोडीदाराला सुध्दा विश्रांतीची, बदलाची खूप गरज असते, हे लक्षात आले होते. पण बहुधा काही कारणांनी ते कुठे जाऊ शकले नसावेत. माझी पत्नी अलका च्या सकारात्मक विचारांनी ती यशस्वीरीत्या कॅन्सर वर मात करू शकली. त्यामुळे त्यांचेही आशावादी बोलणे, राहणे यामुळे ते ही कॅन्सर वर नक्कीच मात करतील, असा मला विश्वास वाटत होता.
गेल्याच महिन्यात त्यांचा फोन आला होता. न्यूज स्टोरी टुडे वेब पोर्टल तर्फे आयोजित निसर्गोपचार शिबिरासाठी ते, त्यांचे आणि पत्नीचेही नाव नोंदवणार होते. पण त्यांच्या तब्येतीची कल्पना असल्याने मीच त्यांना सुचवले की, डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय परस्पर निर्णय घेऊ नका. डॉक्टर सांगतील तसे करा आणि तसेच झाले. डॉक्टरने त्यांना घर सोडून जाऊ नका, असा सल्ला दिला आणि अतिशय व्यथित होऊन आपण या शिबिरासाठी येऊ शकत नाही, असे त्यांनी कळविले. आणि साठीही पूर्ण व्हायच्या आतच त्यांचे निधन झाले.
संभाजीराव किती लोकप्रिय होते, याचे गमक म्हणजे उरळी कांचन येथे आयोजित करण्यात आलेल्या निसर्गोपचार शिबिरात ते गेले त्याच दिवशी, आमचा शिबिराचा पहिलाच दिवस होता म्हणून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नंतर माहिती व जनसंपर्क महसंचालनालय आणि शिवाजी विद्यापीठातही त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या निधनानंतर आमच्या DGIPR, BAMU या व्हॉट्स ॲप ग्रूप्स वर तसेच फेसबुकवर त्यांच्या मित्र मंडळींनी इतके भर भरून लिहिले आहे, की त्याचे संकलन केले तरी एक पुस्तक होईल.
“शासकीय सेवा ही समाजसेवेचे माध्यम आहे” हे ओळखून सतत कार्यरत राहिलेले संभाजीराव यांचे निधन म्हणजे मला माझी व्यक्तिगत हानी झाली, असे वाटते. असो. त्यांच्या परिवाराच्या दुःखात न्यूज स्टोरी टुडे चा सर्व परिवार सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो.
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800
डाॅ. संभाजी खराट हे नाव अनेक वेळा, अनेक साहित्यिक समूहांमध्ये वाचनात आले होते, पण प्रत्यक्षात काहीच परिचय नसल्याने त्या नावामागचा इतिहास समजण्याचे भाग्य मात्र आज त्यांच्या निधनानंतर लाभले. इतका हुषार, हरहुन्नरी, सेवाभावी साहित्यिक असा अकाली निधन पावल्याची खंत जाणवते आहे. तुमच्या बरोबरच आम्ही सुद्धा एक सहृदय मित्र गमावला, ह्याचे दु:ख नक्कीच वाटत राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🌹
डॉ. संभाजी खराट साहेबांचे अकाली जाणे चटका लावून जाणारे आहे.कार्यालयीन कामात त्यांच्या सहवासात राहता आले. त्यांनी त्यांची बरीच पुस्तके भेट म्हणून दिली. कोरोना काळावर त्यांनी कादंबरीही लिहिली. माहितीचा अधिकार यावर देखील अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले. ते गायक संगीतकार होते हे अलिकडेच त्यांची यूट्युबवरील क्लिप आठवण म्हणून शेअर केली तेव्हा कळले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली