झाकीर, न तुम्ही गेले
तुम्ही तबल्यावरतीच बसले..
दुःखात बुडाला डग्गा,
जाहला पोरका तबला
उस्ताद निघोनी गेले,
शिव-डमरू दुःखी झाला
जाहली आज निश्चेष्ट,
थरथरती तबला पटले
पखवाज, मृदंग न् ढोल,
कोणीच न काही बोले
झपताल एकटा कुढतो
नि:शब्द बैसला त्रीताल
एकताल मंथन करतो
जाहला क्रूर का हा काल?
लय बिघडुन गेली लयिची
कायदे, बंदिशी रडती
स्वर सात- तेही की कष्टी
झाकीर निघाले वरती
श्रुतिपटले अमुची तुम्ही,
सोडली करुन समृद्ध
कानात गुंजते अजुनी
ते तबला वादन शुद्ध
श्रुति धन्य जाहल्या अमुच्या
तबला तुमचा ऐकोनी
लाभले सौख्य नयनांही
ते हसरे मुख पाहोनी
तबल्यावर बोटे तुमची
थिरकती गतीने जेव्हा
भासे जणु नर्तन करितो
नटराज साजिरा तेव्हा!
बाळबोध हसरे वदन
कधि लचकत मुरडुनी मान
बघणे तुम्हि इकडे तिकडे
अम्ही जाणे हरपुनि भान
तबल्याच्या तालावरती
भाळी अन् मानेवरती
ते कुरळ केश बागडती
रागिण्या मुखे जणु स्त्रवती
संगीत जोडते आत्मा,
परमात्म्याशी- कुणि वदते
ऐकून तुम्हाला झाकीर,
नाते हे आम्हा पटते
संगीत बुजवते सीमा
धर्माच्या अन देशांच्या
तुम्हि मूर्तस्वरूप हो याचे
संदेह मनी ना अमुच्या
ध्वनि सृष्टीमधला पहिला
तांडवकाली डमरूचा
त्या रुद्रासमोर जेव्हा
झुकतो जव माथा तुमचा
चौदा विद्यांचा अधिपती
ओंकार स्वरुप गजवदन
त्यापुढे उभे तुम्हि जेव्हा
भक्तीने कर जोडून
धर्मा-धर्माचे भेद
जाहती वितळुनी पुरते
येते भारत मातेला
अन् आनंदाचे भरते!
पंजाब घराणे तुमचे
जाहले धन्य की आज
उस्तादांवरती, साऱ्या
दुनियेला आहे नाज
झाकीर न तुम्ही गेले
तुम्ही तबल्यावरतिच बसले
झाकीर, न तुम्ही गेले
हृदयातचि अमुच्या बसले
ओंकाराचा का होतो
कधि लय या विश्वामधुनी?
तो सूर्य कधी का जातो
कायमचा अपुल्यामधुनी?
वाहतील जोवरि वारे
उगवतील जोवरि तारे
जोवरी विश्व हे आहे
तोवरी नाम तव आहे!
झाकीर न तुम्ही गेले
तुम्हि तबल्यावरतिच बसले
झाकीर, न तुम्ही गेले
हृदयातचि अमुच्या बसले !!
— रचना : कवि सुमंत.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800
अप्रतिम लाजवाब