बघता बघता २ वर्षे झाली, कवयित्री सौ वर्षा भाबळ यांचा “जीवनप्रवास” प्रकाशित होऊन ! वर्षाताईंनी सहज म्हणून न्यूज स्टोरी टुडे पोर्टल वर बालपणीच्या आठवणी लिहिण्यास सुरुवात केली आणि बोलता बोलता, जमेल तसे लिहित गेल्या, एकूण ४५ भाग लिहिले की !
वर्षाताई जात्याच प्रतिभावंत असल्यामुळे त्यांना पुस्तकाची कल्पना सुचली आणि त्यांनी ती अलकाला सांगितली. अलकाने मला सांगितली. मी तिला सांगितले की, मला माहित असलेल्या काही प्रकाशकांची नावे आणि त्यांचे नंबर देतो, ते त्यांना दे. पण वर्षाताईंचे म्हणणे पडले की, त्या कुणालाच ओळखत नाही त्यामुळे मी त्यांच्याशी कशी बोलू ? त्यांनी अलकानेच पुस्तक प्रकाशित करावे, म्हणून आग्रह धरला. अलकाने माझ्या कडे तगादा लावला.
माहिती खात्यातील नोकरीमुळे मी लोकराज्य मासिक आणि अन्य प्रकाशनांचा अडीच वर्षे संपादक होतो. तसेच २७/२८ वर्षांपूर्वी ४ महिने प्रकाशन शाखेतील कामाचा अनुभव होता. कोकण विभागाचा माहिती उपसंचालक असताना काही प्रकाशने प्रसिद्ध केली होती.
पण या सर्व प्रकाशनाच्या कामात त्यावेळी सोबत सर्व सरकारी यंत्रणा होती. प्रत्यक्ष पैश्यांचे व्यवहार करावे लागत नसत कारण सर्व संबधित व्यक्ती खात्यातीलच असत, सर्व छपाई मुंबई किंवा नागपूर येथील शासकीय मुद्रणालयातून होत असे. वेळ प्रसंगी खाजगी मुद्रणालयातून जरी छपाई करून घ्यावी लागत असे, तरी ते व्यवहार पाहण्यासाठी लेखा शाखा असे. इतके सर्व असूनही प्रकाशनाचे काम अतिशय जिकिरीचे असते. या बरोबरच पुस्तक मजकुराच्या, आशयाच्या दृष्टीने पूर्णपणे निर्दोष असणे फार आवश्यक असते. कारण मी म्हणतो तसे पुस्तक हे शाश्वत माध्यम आहे. वृत्तपत्रातील मजकुराचे आयुष्य एका दिवसाचे तर आकाशवाणी, दूरदर्शन वरील कार्यक्रमांचे आयुष्य त्या त्या वेळेपुरते असते, तरीही सर्व मजकूर, आशय तपासून घेत रहावा लागतो. आशय देशविरोधी,समाजाच्या भावना दुखावणारा नाही ना ? वगैरे अनेक बाबी, तसेच शुध्द लेखनाची खूप खबरदारी घ्यावी लागते. परत ही एकदाच करायची बाब नसते तर प्रत्येक नव्या मजकुरासाठी हे सर्व सोपस्कार करावे लागत असतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन,सरकारी नोकरीतून सही सलामत निवृत्त झाल्यावर मी पुन्हा या भानगडीत पडू इच्छित नव्हतो. म्हणून काही काळ टाळाटाळ करत राहिलो.
पण शेवटी बायको पुढे भल्याभल्यांचे चालत नाही, तर तिथे माझ्या सारख्या गरीब नवऱ्याचे काय चालणार ? त्यात अलका चा स्वभाव एकदम जिद्दी ! एकदा करायचे ठरविले की ते ती करणारच.. मी फार काही प्रतिसाद देत नाही, असे पाहून ती स्वतःच एका प्रिंटर कडे जाऊन बसायला लागली आणि त्याच्या मदतीने पुस्तक काढायचा प्रयत्न करू लागली. न राहवून मी ही हळू हळू, लक्ष देता देता त्या कामात गुंतत गेलो आणि दोन महिन्यांच्या प्रयत्नांनी शेवटी “जीवनप्रवास” हे न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स चे पहिले साहित्य पुष्प २ वर्षांपूर्वी मायबाप वाचकांच्या पुढे अर्पण करण्यात आले.
पुढे पोर्टलच्या लेखिका, निवृत्त पोलिस उपअधीक्षक सौ सुनीता नाशिककर, ज्यांची “मी, पोलीस अधिकारी” ही लेख माला, नंतर सौ रश्मी हेडे यांनी लिहिलेल्या आणि पोर्टल वर प्रसिद्ध झालेल्या ३६ यश कथा या “समाजभूषण २” या नावाने पुस्तक रुपात अवतरल्या.
पोर्टल चे एक सिध्दहस्त लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचे निवृत्त सह सचिव श्री राजाराम जाधव यांचे आत्मकथन पर “अजिंक्यवीर”, वडिलांच्या इच्छा आकांक्षावर लिहिलेले “अंधाऱयात्रीचे स्वप्न” वैचारिक लेख असलेले” हुंदके , सामाजिक वेदनेचे” ,”चंद्रकला ” कादंबरी अशी चार पुस्तके प्रकाशित झाली. तर कवयित्री सौ पौर्णिमा शेंडे यांचा
” पौर्णिमानंद” हा कविता संग्रह प्रकाशित झाला.
मग मी विचार केला,आता आपली पुस्तके आपणच का प्रकाशित करू नयेत ? इतरांच्या आशेवर कशाला वाट पहात बसायचे ? म्हणून ५० अधिकाऱ्यांच्या यश कथा असलेले, ” आम्ही अधिकारी झालो” हे पुस्तक,”करिअरच्या नव्या दिशा” या पुस्तकाची दुसरी आवृत्ती,पुन्हा एका महिन्यातच “आम्ही अधिकारी झालो” ची दुसरी आवृत्ती,
पोर्टलच्या आणखी एक लेखिका ,केमन आयलंडस निवासी शिल्पा तगलपल्लेवार गंपावार यांचे,”मी शिल्पा… चंद्रपूर ते
केमन आयलंडस ” हे आत्मचरित्र आणि आता नुकतेच दूरदर्शन चे निवृत्त संचालक श्री चंद्रकांत बर्वे यांचे विविध मान्यवर व्यक्तींच्या गुणदोषांवर परखडपणे लिहिलेले “सत्तरीतील सेल्फी ” अशी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
“मी, पोलीस अधिकारी” आणि “आम्ही अधिकारी झालो” या २ पुस्तकांचे लोकार्पण तत्कालीन राज्यपाल श्री रमेश बैस यांच्या हस्ते मुंबईतील राजभवनात संपन्न झाले. तर “आम्ही अधिकारी झालो” चे प्रकाशन जपान मधील जगप्रसिद्ध बुलेट ट्रेन मध्ये झाले. “हुंदके, सामाजिक वेदनेचे” प्रकाशन यवतमाळचे पालकमंत्री श्री संजय राठोड यांच्या हस्ते यवतमाळ येथे, “समाजभूषण २ “चे प्रकाशन पुणे महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्री हेमंत रासने यांच्या हस्ते पुणे येथे, तर “चंद्रकला” कादंबरी चे प्रकाशन निवृत्त न्यायाधीश यांच्या हस्ते नेपाळ मध्ये, “मी शिल्पा …” चे लोकार्पण नागपूर येथे केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्याहस्ते तर प्रकाशन ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा डॉ रवींद्र शोभणे, पटकथा लेखक-दिग्दर्शक श्री प्रदीप दिक्षित यांच्या हस्ते झाले.
“आम्ही अधिकारी झालो” या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन, या पुस्तकातील एक कथा नायिका, लातूर जिल्ह्याच्या विद्यमान जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या व जेष्ठ पत्रकार श्री जयप्रकाश दगडे यांच्या हस्ते लातूर येथे झाले. कवयित्री सौ पौर्णिमा शेंडे यांचा कविता संग्रह, “पौर्णिमानंद” चे प्रकाशन कवी सतीश सोलंकुरकर, सौ पौर्णिमा शेंडे यांचे बालमित्र डॉ अविनाश सुपे यांच्या हस्ते मुंबईतच आणि पहिल्याच “जीवनप्रवास” पुस्तकाचे प्रकाशन सौ वर्षा भाबळ यांचे पती श्री महेंद्र भाबळ हे क्रिकेट प्रेमी असल्याने चक्क वडाळा येथील क्रिकेट मैदानावर, समीक्षक प्रा अविनाश कोल्हे, जेष्ठ पत्रकार श्री नंदकुमार रोपळेकर यांच्या हस्ते झाले.
तर श्री चंद्रकांत बर्वे यांच्या “सत्तरीतील सेल्फी” चे प्रकाशन सुप्रसिद्ध निवेदक श्री सुधीर गाडगीळ, निसर्गोपचार आश्रमाचे वैद्यकीय संचालक डॉ अभिषेक देविकर, प्राध्यापिका – समीक्षक आशी नाईक यांच्या हस्ते उरळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रमात नुकतेच झाले.
एकंदरीतच न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स ची पुस्तके अभिनवरित्या देश, विदेशात तेथील रसिक वाचक यांच्या साक्षीने होत आली आहेत, याचा खूप आनंद वाटतो.
आधी मी गंमतीने म्हणायचो, “आम्ही लेखक घडवितो…”. असे ही वाटायचे की ही आपली टॅग लाईन असावी, पण आता विचार केला की लक्षात येते, आम्ही लेखकांना घडविले नाही, तर लेखकच आम्हाला संपादक, प्रकशिका म्हणून घडवीत आले आहेत !
आमचाच आमच्यावर विश्वास नसताना, आमच्यावर विश्वास ठेऊन, नसलेला विश्वास निर्माण करणाऱ्या या सर्व लेखक, लेखिकांचे, सर्व पुस्तकांचे प्रकाशन करणाऱ्या मान्यवरांचे, मुद्रकांचे आणि महत्वाचे म्हणजे मायबाप वाचकांचे मनःपूर्वक आभार. आपल्या सर्वांचा लोभ असाच कायम असू द्या, ही नम्र विनंती.
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
आपल्या दिलखुलास प्रतिसादाबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. असाच लोभ कायम असू द्या.
लेख चांगला आहे. पण त्यात मुद्रणाचे खर्च, पुस्तकाचे मार्केटिंग कसे केले. अभिप्राय इतर अडचणी यावर अधिक माहिती हवी होती. त्याचा नवीन लेखक प्रकाशक यांना उपयोग होईल म्हणून या लेखाचा दुसरा भाग पण लिहावा
संपादक भुजबळ साहेब व मॅडम आपण जे साहित्यिक घडविण्यात व पुस्तक प्रकाशित करण्यास मनापासून मदत करत आहात ते वाघण्याजोगे आहे.
अभिनंदन व शुभेच्छा
गोविंद पाटील सर जळगाव.
देवेंद्र सर आणि अलका मॅडम, तुमच्यामध्ये एक जादुई करिश्मा आहे, जो लेखक आणि वाचकांना आपलेसे करतो आणि एकमेकांच्या इतके जवळ आणतो, की प्रत्येक लेखकाचा खास चाहता वाचकवर्ग बनून जातो, जो आपल्या आवडत्या लेखकाच्या पुस्तक प्रकाशनाकडे डोळे लावून बसलेला असतो, आणि असे लोकप्रिय लेखक जेव्हा तुमच्यामुळेच नावारूपास येतात, तेव्हा तुमच्यावरचा अदम्य विश्वास आणि कार्य सफलतेची हमी घेऊन तुमच्याच हातून पुस्तक प्रकाशित व्हावे, ह्याची आस धरून बसतात! म्हणजे हा प्रवास “पाऊस, पाणी, ढग ” असा एकमेकांमध्ये गुंतत चाललेला सुंदर त्रिरंगी प्रवास आहे. त्यामध्ये लेखकांइतकेच तुमचे यश आणि मेहनत कामी लागलेले आहे, म्हणूनच लेखकांना हे यश प्राप्त होत आहे. त्यामुळेच ह्या प्रत्येक लेखकाच्या बरोबरीने, किंवा त्यापेक्षाही अधिक महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या तुम्हा पतीपत्नीचे हार्दिक अभिनंदन. तुम्हाला सर्वांनाच मनःपूर्वक शुभेच्छा. 🙏💐