प्रत्येक गोष्टीचे काही फायदे असतात तसेच काही तोटे असतात. हीच बाब समाज माध्यमांना लागू आहे. या माध्यमाच्या फायद्याबरोबर अनेक तोट्यांपैकी एक तोटा म्हणजे आर्थिक, भावनिक, सामाजिक, धार्मिक अशा विविध प्रकारचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडू लागले आहेत.
महाराष्ट्र शासनाने ,प्रत्येक पोलिस ठाण्यात सायबर सेल सुरू केले आहेत. नुकतेच नवी मुंबईत पोलिसांना अद्ययावत प्रशिक्षण मिळावे या हेतूने मोठे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. भारत सरकारचे पहिले तज्ञ १०० सायबर कमांडो लवकरच कार्यरत होणार आहेत. असे असले तरी मुळात गुन्हेच घडू नयेत, आपली कुठल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी आपण अतिशय सावध राहिले पाहिजे.
आपण सावध राहिले पाहिजे, म्हणजे नेमके काय करायचे किंवा करू नये, हे आज पासून या लेखमालेद्वारे सांगणार आहेत, सायबर स्नेही, महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचानलयात जिल्हा माहिती अधिकारी असलेले श्री प्रशांत दैठणकर.
श्री प्रशांत दैठणकर हे सायबर गुन्ह्यांचा पहिल्यापासून अभ्यास करीत असून त्यांचा सायबर कायद्याचा अभ्यासक्रम सुरूच आहे. आज पर्यंत त्यांनी या विषयीच्या ५ कार्यशाळा केल्या आहेत. यापूर्वी त्यांचे काही लेख आपल्या पोर्टल वर प्रसिद्ध झाले आहेत. अत्यंत महत्वाच्या विषयावर ते आपल्या पोर्टल साठी लिहिणार असल्याने त्यांचे मनःपूर्वक आभार. त्यांच्या लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा.
– संपादक
डिजिटल अरेस्ट.. कर नाही तर डर का ?
आज मोबाईल आपल्या शरीराचं एक अंग आहे असं सर्व जण वागतात. यात आपल्याकडे झालेल्या दळणवळण क्रांतीमुळे आता 4-G आणि 5-G तंत्राने सर्वांचे मोबाईल आता इंटरनेट वापरण्यास सक्षम झाले आहेत. डिजिटल इंडियाची झपाट्याने वाटचाल होताना आपणास दिसत आहे. इंटरनेट अर्थात सायबर द्वारे होणाऱ्या गुन्ह्याचे प्रमाणही सोबत वाढत आहे.
जुन्या काळात फसवणूक करण्याचे जे प्रकार होते ते आजही सुरू असून त्यात आता नव्याची भर पडली आहे असेच म्हणता येईल. या सर्वांवर उपाय म्हणजे कोणतेही तंत्रज्ञान वापरताना त्याची पूर्ण माहिती आपण करून घेतली पाहिजे आणि त्या माहितीची जर खात्री नसेल तर त्याबाबत इतरांना विचारायला पाहिजे.
आपण डिजिटल व्यवहार करताना यूपीआय चा वापर करतो. यात अधिक सुरक्षितता असावी यासाठी वन टाइम पासवर्ड अर्थात ओटीपी (OTP) ची सुरुवात त्यासाठी करण्यात आली आहे.
अनेकांना तुमचा पासवर्ड द्या असे फोन येतात. असा पासवर्ड किंवा ओटीपी कोणतीही बँक मागत नाही याची आपणास माहिती हवी.
आणखी होणारा फसवणुकीचा मोठा प्रकार म्हणजे तुमचे कार्ड ‘ब्लॉक’ झाले आहे ते सुरू करण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा यात आपण कार्ड खरंच ब्लॉक झालं किंवा नाही याची खातरजमा करण्यापूर्वीच कृती करतो. जे कार्ड ‘ब्लॉक’ झालय म्हणून संदेश आला त्यावर एखादा व्यवहार केल्यावरच कळेल की येणारा फोन चुकीचा होता. आपण लिंक डाऊनलोड करताच आपली सर्व बँकेची माहिती समोरील व्यक्ती काढून घेते आणि आपले आर्थिक नुकसान होते.
हल्ली एक नव्याने समोर आलेला यातनादायक असा फसवणुकीचा प्रकार म्हणजे ‘डिजिटल अरेस्ट’ अर्थात इंटरनेट द्वारे अटक करण्याचा प्रकार होय. यामध्ये व्यक्तीचे आर्थिक नुकसान तर होतेच पण सोबतच मानसिक, कौटुंबिक, सामाजिक छळ देखील होतो.
याबाबत समाज माध्यमांवर मला आलेला अनुभव मी शेअर करीत असून तो पुढे देत आहे .
अचानक फोनची बेल वाजली आणि मी फोन उचलला. पलीकडून करड्या आवाजात अमुक अमुक नंबर तुमचा आहे का ? अशी विचारणा झाली. तुमचे आधार कार्ड वापरून मुंबईमध्ये एक सिम कार्ड वापरत आहे आणि त्यावरील मोबाईल द्वारे अनेक महिलांना अश्लील छायाचित्रे व व्हिडिओ पाठवले आहेत अशी तक्रार आमच्या पोलीस ठाण्याला प्राप्त झाली आहे.. अर्थात समोरील व्यक्ती हिंदीतून बोलत होती म्हणून मला वाटलं, मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांनी मराठीत बोलायला हवे ! मी त्याला तसे मराठीत बोला असे सांगितल्यानंतर मै राजेश कुमार हू और मेरा तबादला दिल्ली से मुंबई मे कुछ हप्ते हुआ है और मै यहा के पोलीस स्टेशन का इन्चार्ज हू, असे त्याने सांगितले. मला एव्हाना शंका होतीच ती आता खात्रीत बदलली की हा खोटा कॉल आहे. तरी पलीकडच्या बाजूने तुमच्या विरुद्ध गुन्हा आहे व तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात येत आहे, तुम्ही व्हिडिओ कॉल ला उत्तर द्या असे सांगण्यात आले. पुढे काय होणार हे माझ्या एव्हाना लक्षात आले होते. त्यामुळे मी त्याला सरळ सांगितले जर मी मुंबईत गेल्या दीड वर्षात आलोच नाही तर मुंबईतील एखाद्या मोबाईल विक्रेत्याने सिम कार्ड माझ्या आधार कार्ड आधारे दिले कसे ? याबाबत आपण लोकल पोलीस ठाण्याला कळवा. मी त्या पोलीस ठाण्यात जाऊन त्या अधिकाऱ्यांना भेटतो असे म्हणाल्यावर पलीकडून अधिकच जोराने व्हिडिओ कॉल लगाओ… व्हिडिओ कॉल लगाओ असे जोरात सांगणे सुरू झाले.
दरम्यानच्या काळात त्या भामट्याने सांगितलेला नंबर मी दुसऱ्या मोबाईलवर ट्रेस केला. तसेच संपूर्ण कॉलची रेकॉर्डिंग देखील दुसऱ्या मोबाईल द्वारे व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवली व त्याला स्पष्ट बजावले ‘नौटंकी बंद करो’ असे म्हटल्यावर पलीकडून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत फोन कट करण्यात आला. त्यानंतर दहा मिनिटांनी मी त्या क्रमांकावर फोन लावला त्यावेळी तो फोन कार्यरत नाही असे उत्तर मला मिळाले. त्याने माझ्या आधार कार्ड वर जो नंबर वापरात आला, तो एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याकडे होता हे देखील माझ्या वैयक्तिक तपासात लक्षात आले. परंतु अशाप्रकारे अनेकांना फसवले जात आहे. मुळात आपणास फोन आल्यावर आपण त्यातील सत्यता आपल्या दिनचर्येशी लावून शोधावी. समोरची व्यक्ती दरडावणीच्या सुरात जे आरोप करीत आहे ते कृत्य आपण खरोखरच केले का ? हे स्वतःला विचारावे. समोरच्याने आपली माहिती याच सायबरच्या महाजालातून काढलेली असते आणि त्याला साधन बनवून मासे गिरवायला बसतो त्याप्रमाणे गळ टाकलेला असतो (मासे गिरवणे हा कोकणी शब्द आहे) आपण मासा म्हणून गळाला लागल्याचे जाणवल्यावर तो आपले ‘हातखंडे’ दाखवत पैसे उकळण्याचा प्रयत्न करतो. प्रथम लक्षात ठेवा अशी कोणतीही ‘डिजिटल अरेस्ट’ कायद्यात नाही आणि दुसरं म्हणजे ‘कर नाही तर डर कशाला ?’
कोणत्याही गुन्ह्यात प्रत्यक्ष घरी जाऊन ताब्यात घेतले जाते ते देखील स्थानिक पोलिसांच्या मदतीने. याबाबत पहिले आपल्या नजीकच्या पोलीस ठाण्यात कळविले जाते. असा फोन आल्यावर आपण पोलीस ठाण्यात याची खातरजमा करू शकता.
आपण आपले आधारकार्ड अनेक ठिकाणी दाखवतो. तसेच त्याची प्रत देखील अनेकदा देतो. अशा माहिती द्वारे तुमच्याबाबत इंटरनेटवर माहिती काढता येते. त्यामुळे याबाबत आपण कुठे याचा वापर केला, याची नोंद ठेवल्यास असे फोन खोटे आहेत, हे कळण्यास वेळ लागत नाही.
आपली चूक आपल्याला माहिती असते मात्र घाबरून गेल्याने अनेकदा समोरची व्यक्ती त्याचा गैरफायदा घेते आणि त्यात त्यांचे प्राविण्य असल्याने लोकांची हमखास फसवणूक होते. अशा प्रकारचा फोन आपणास आला तर लक्षात ठेवा आपण सायबर पोलिसांच्या 1930 या टोल फ्री क्रमांकावर सूचना द्या. पोलीस अटके संदर्भात व्हॉट्सअप किंवा इतर माध्यमातून डिजिटल अरेस्टसाठी व्हिडिओ कॉल करत नाहीत हे लक्षात घ्या व इतरांनाही सांगा. आपण सुरक्षित राहण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रत्येक बाबीची खात्री केल्याखेरीज कृती न करणे सावध रहा सुरक्षित रहा.
क्रमशः
— लेखन : प्रशांत विजया अनंत दैठणकर. जिल्हा माहिती अधिकारी, बीड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800