असं म्हणतात आयुष्यात एक खिडकी बंद होते, तेव्हा दुसरी खिडकी आपोआप उघडत असते. किती खरं आहे हे !दूरदर्शनची संचालिका होण्याची संधी हातांतून गेली होती. मनाला नकळत नैराश्याने ग्रासलं होतं. पण नैराश्याच्या भोवऱ्यात अडकण्यासाठी वेळच नव्हता. ‘अनोळखी पाऊलवाटा’ हे पहिलवहिलं सदर सुरू झालं होतं. त्यांत पूर्णपणे गुंतून गेले होते. कारण प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेच्या आंत पुढच्या महिन्याचा लेख संपादकांच्या हाती पडेल याची काळजी घ्यावी लागत होती. त्यांत तो लेख पोस्टाने पाठवण्याचे दोन-तीन दिवस लक्षांत घेऊन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या काही दिवसांत लेख रवाना करण्याचं काम करावं लागे. त्यामुळे पुढील मुलाखतींचे विषय आणि व्यक्ती शोधणे यात उरलेला एक महिना मी पूर्णपणे अडकून जात असे.
मुद्रित माध्यमातील या सदरामुळे सदर लेखनाच्या मागण्या आणि अपेक्षा प्रथमच ध्यानांत येत होत्या. सर्वप्रथम संपादकांची अपेक्षा असते की वेळेवर लेख हातांत यावा ! कारण छपाईचे पुढील काम अथवा लेखावरील संस्करण यासाठी त्यांना पुरेसा वेळ हवा असतो. त्यामुळे लेखकांवर वेळ पाळण्यासाठी संपादकांचा अदृश्य दबाव असतो. त्यानंतर वाचकांच्या अपेक्षांचा विचार! सदर लेखनामुळे वाचकांशी एक अप्रत्यक्ष बांधिलकी निर्माण होते. ही बांधिलकी लेखकाला जीव तोडून जपावी लागते. इतकी की त्याच्यापुढे सर्वच कामं अथवा अडचणी दुय्यम ठरतात. प्राधान्य केवळ सदर लेखनालाच ! कारण वाचक त्या सदरांत गुंतून जातात. पुढील लेखाची वाट पाहू लागतात. वाचकांना त्या लेखाची, त्यातल्या विषयाची, मजकुराची, लेखकाच्या शैलीची संवय लागते. सदर लेखनामुळे एकीकडे लेखक स्वतःला सिद्ध करत साहित्य जगतात स्थिरावत असतो. तर दुसरीकडे वाचकांच्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी झटत असतो. सदर लेखनातील सातत्य राखण्याचं फार मोठ आव्हान प्रत्येक लेखकाला पेलावं लागतं. ते आव्हान पेलताना कार्यबाहुल्यामुळे हाताशी असणारा अपुरा वेळ, काही अपरिहार्य कामांची तातडीची निकड, बिघडलेली मनस्थिती, इतकच नव्हे तर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती यांचा जराही विचार न करता प्रथम प्राधान्य सदर लेखनालाच द्यावं लागतं. सदर लेखनाची डेडलाईन पाळताना आपणच डेड होतोय की काय असं वाटतं असा एक गंमतीचा सूर लेखकाच्या मनात नेहमीच उमटत असतो. पण त्यामुळेच दैनंदिन व्यवहार सुरू असताना अहोरात्र सदर लेखनाचा विचार लेखकाच्या मनांत घोळत असतो. त्यात “अनोळखी पाऊलवाटा” हे मुलाखतींचं सदर! त्यामुळे वेगवेगळे नवे व्यवसाय, त्या व्यवसायात प्रथमच पाय टाकणाऱ्या आणि यशस्वीपणे त्या अनोळखी क्षेत्रांत आगे कूच करणाऱ्या धडाडीच्या स्त्रिया यांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांना गाठणं आणि बोलकं करणं या अग्नीदिव्यातून दर महिन्याला जावं लागत असे. हे करत असताना या सुरुवातीच्या काळांत आपातत: एक संवय मनाला लागून गेली. चौकस नजरेने आजूबाजूला घडणाऱ्या घटना टिपायच्या. डोळ्यांनी पाहिलेल्या प्रत्येक गोष्टींचा अंत: चक्षुंनी अन्वयार्थ लावायचा. प्रत्येकाच्या बोलण्याकडे सजगपणे लक्ष द्यायचं. इतकंच नव्हे तर रेल्वे, बसच्या प्रवासातसुद्धा कान उघडे ठेवून आजूबाजूच्या गप्पा व चर्चा ऐकायच्या. यातून अनेकदा नवीन विषय सापडतात. हवी ती माणसं मिळत जातात. मात्र त्यासाठी लागतं उत्कट झपाटलेपण! दिवस-रात्र मनाच्या तळाशी चालणारे त्या गोष्टीचेच विचार! या अदृश्य विचारांचं प्रकटीकरण दृश्य घटनांमध्ये होऊन अनेकदा असाध्य गोष्टी साध्य होतात. होऊ शकतात. हे असं झपाटलेपण, ही passion पुढचा मार्ग दाखवत जाते.
“अनोळखी पाऊलवाटा” सदराच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. नीला पंडितांच्या मुलाखतीनंतर आता पुढे कोण ?
एक दिवस वर्तमानपत्र वाचत असताना एका जाहिरातीवर नजर गेली. “सुनहरी यादे” या वाद्य वृंदाचा एक हजारावा प्रयोग! आकाशवाणीने गाण्यांची आवड मनांत रुजवली होती. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी इतका छान गाण्यांचा कार्यक्रम ऐकून वर्षाची सुंदर सुरुवात करावी असा बेत आंखला.
मुंबईतील चढती तापती दुपार! षण्मुखानंदच वातानुकुलीत प्रचंड प्रेक्षागार उत्साही प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं! घड्याळाचा कांटा तीन वर झुकू लागला, तसतशी प्रेक्षकांची अस्वस्थता, कोलाहल वाढत गेला. प्रेक्षकांतून शिट्ट्या आणि आरडाओरडा यांचा गदारोळ सुरू झाला आणि काही क्षणांतच मखमली पडद्याआडून खणखणीत शब्द आले “सुस्वागतम”!
“सुनहरी यादे”च्या हजाराव्या प्रयोगाची प्रेक्षकांसाठी स्वागतपर अनाउन्समेंट झाली आणि पाहता पाहता ते हजारो प्रेक्षकांनी तुडुंब भरून ओसंडलेलं प्रेक्षागार शांत शांत झालं. कोलाहलाची कुजबूज झाली. अखेर तीही थंड झाली. “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु” संपलं आणि संथ सूर निनादले. “अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम”
त्या सुरांची मोहिनीच अशी जबरदस्त होती की त्यांची कार्यक्रमावरील पकड क्षणभरासाठी सुद्धा नंतर ढिली झाली नाही. त्या सुरांसोबत मखमली पडदा हळूहळू सरकत गेला. स्टेजवर मनोरम डेकोरेशन केलेलं होतं. छतावर दीप्तीमान झुंबर झुलत होतं. स्टेजच्या दोहो बाजूंना रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा हेलकावत होत्या. मधोमध एक हजाराचा भव्य आकडा झगमगत होता. बाजूला मोठा दीप प्रज्वलित केलेला होता. त्याच्या पाठीमागे सुंदर रंगीबेरंगी गुढी उभारलेली ! पाठीमागील पडद्यावर गणपतीचे सुंदर चित्र! वातावरण अस्सल मराठमोळं होतं. प्रेक्षक त्या सुरेख सजावटीचे नेत्रसुख अनुभवात असतानाच “अल्ला तेरो नाम” च्या सुरांनी वातावरणाला एक वेगळाच मंगल स्पर्श लाभला. ईश्वर प्रार्थनेनंतर प्रमिला दातारांनी आपल्या संपूर्ण संचासह रंगमंचावर सुहास्यमुद्रेने प्रवेश केला. टाळ्यांचा कडकडाट झाला आणि नंतर जुन्या नव्या लोकप्रिय गीतांची बहार उडाली.९९९ प्रयोगांचा अनुभव गाठीशी असलेल्या प्रमिलाताई प्रसन्न आत्मविश्वासाने स्टेजवर वावरत होत्या. एका मागून एक गाणी सादर करत होत्या. कधी संथ सूरावटीतील तर कधी उडत्या चालीतील तर काही लावणी थाटातील! त्यांची तृप्त पण काहीशी शांत मूर्ती भिंगरीसारखी स्टेजवर फिरत होती. त्यांचं ते उत्साही वावरणं इतर कलाकारांना चैतन्याची संजीवनी प्रदान करीत होतं. प्रेक्षकांच्या अधून मधून फर्माईशी झडत होत्या. पण आपल्या ध्येयधोरणांशी सुसंगत गाणी गाताना प्रेक्षकांना काबूत ठेवण्याचं त्यांचं कसब वाखाणण्याजोग होतं. कार्यक्रमाच्या मध्यंतरात सी.रामचंद्र, राज बब्बर प्रकाश मेहरा वगैरे सिनेजगतातील कलावंतांकडून वाद्य वृंदातील कलाकारांना मानचिन्ह देण्यांत आली. उपस्थितांची गौरवपर भाषणं झाली. सगळं कसं ठरीव ठशाचं होतं. पण नंतर एका साध्याशाच प्रसंगाने सगळ्या समारंभाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. प्रमिला ताईंच्या सासूबाईंचं सहकार्य त्यांच्या पाठीशी सदैव असे. अनपेक्षितपणे स्टेजवर त्यांच्या आईच्या हातून सासूबाईंचा जाहीर सत्कार केला गेला आणि औपचारिक समारंभाला एका घरगुती सोहळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. नुकतच त्यांच्या वाद्य वृंदातील एका कलाकाराचे देहावसान झाले होते. त्याच्या पत्नीलाही रंगमंचावर मानाने बसवून मदतीचा पहिला हप्ता तिला सुपूर्द करण्यात आला. आपल्या कलाकारांचेच नव्हे तर रसिकांचेही ऋण मानणाऱ्या प्रमिलाताईंनी प्रेक्षकांना ‘सुनहरी यादे”ची स्मृतिचिन्ह वाटली. त्या क्षणी कदाचित त्यांचं वेगळेपण माझ्या मनाला स्पर्शून गेलं असावं. त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी गप्पागोष्टी करण्याची उर्मी मनांत दाटून आली. “सुनहरी यादे”च्या कार्यक्रमातून बाहेर पडले तेव्हा माहेर मधील “अनोळखी पाऊलवाटा” सदराची पुढची मुलाखत पक्की झाली होती. पहिल्या महिला ऑर्केस्ट्रियन प्रमिला दातार! त्यांच्या कार्यक्रमाच्या जाहिराती मध्ये त्यांचा फोन नंबर होताच. फोन केल्यावर त्यांनी आपल्या कार्यक्रमांच्या आणि दौऱ्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून एक दिवस माझ्यासाठी नक्की केला. चेंबूरला त्यांच्या राहत्या घरी शनिवारी दुपारी तीनची वेळ मुलाखतीसाठी ठरली. शनिवार सकाळपासून मला उत्कंठा लागून राहिली होती. मनात वारंवार एक शंका उद्भवत होती. ५० फुटांवरून स्टेजवरील झगमगाटातात उठून दिसणारं त्यांचं लखलखतं व्यक्तिमत्व पाच फुटांवरून प्रत्यक्ष भेटल्यावर झाकोळलेलं भासलं तर?
शनिवारी दुपारी एक वाजता ऑफिस सुटणार होतं. पण नेमकं अर्जंट काम उपस्थित झालं आणि मी कार्यालयातच अडकले. प्रमिला दातार यांना दिलेली वेळ गाठण्यासाठी मनाची नुसती घालमेल चालू होती. माझं वारंवार घड्याळाकडे लक्ष जात होतं. मी हातांतल्या अर्जंट फाईल्स निपटत होते, एवढ्यात ऑफिसच्या फोनवर मला कॉल आला. पलीकडून मधाळ स्वरांत खुद्द प्रमिला दातार बोलत होत्या. “माधुरी तू निघाली आहेस का? नाही ना? मग थांब.आत्ताच माझं फ्लोरा फाउंटन इथलं काम संपल आहे. मी पंधरा मिनिटात तुला न्यायला तुझ्या ऑफिसकडे येते. आपण एकत्र घरी जाऊया. म्हणजे तुला माझा पत्ता शोधायला नको.”
मघाशी मनांत उपस्थित झालेल्या शंकेला चोख उत्तर मिळालं होतं. प्रमिलाताईंचं स्टेजवरील वावरणं जेवढं मनोरम होतं तेवढाच किंबहुना थोडा अधिकच त्यांचा निकट सहवास लोभावून टाकणारा होता. त्यांनी आदरातिथ्य तर चांगलं केलंच. पण अतिशय मनमोकळी मुलाखत सुद्धा दिली. मी खुश झाले.
प्रमिला दातारांची मुलाखत संपवून घरी परतले. तर घरी एक पोस्टकार्ड येऊन पडलं होतं. तीच लफ्फेदार सही—– सु. मुळगावकर! आता आणखी काय पुढे वाढून ठेवलय? झाला तेवढा अपमान पुरेसा नाही का झाला? मनांत विचार येत होते. पण “मानापमान” चा नाट्य प्रयोग करण्याइतकं वय आणि मान दोन्हीही मोठं नव्हतं. तेव्हा मी अनिच्छेनेच दूरदर्शनला जाऊन सुहासिनी मुळगावकरांना भेटण्याचा विचार पक्का केला.
दुपारची वेळ. सुहासिनीबाई कामात गर्क होत्या. मला पाहून त्यांनी मान वर केली आणि त्या प्रसन्न हंसल्या. मी त्यांच्यासमोर बसले. त्यांनी थेट विषयाला हात घातला. त्या म्हणाल्या, “मी पुढच्या महिन्यापासून “नवलाई” ही मालिका “सुंदर माझं घर” मध्ये सुरू करतेय. या मालिकेतील एक मुलाखत दर महिना तुला घ्यायची आहे. मी तुला विषय सांगत जाईन. त्यावर आपण चर्चा करू. त्यानुसार तू त्या विषयाची तयारी कर.”
आता आश्चर्याने थक्क होण्याची पाळी माझी होती. सुहासिनी बाईंनी मला “नवलाई” या कार्यक्रम मालिकेची संकल्पना विस्ताराने समजावली. या कार्यक्रमामधून संचालिका म्हणून माझ्याकडून त्यांच्या कोणत्या अपेक्षा आहेत तेही त्यांनी सांगितलं . मी अवघ चित्त एकवटून त्यांचं बोलणं ऐकत होते.आत्मसात करत होते. मात्र त्याचवेळी माझ्या मनातलं प्रश्नचिन्ह मोठं मोठं होत मला जणू काही गिळंकृत करू पाहत होतं. चर्चा संपली. मी जायला उठले. उभी राहिले आणि न रहावून तोंडातून प्रश्न सटकला, “बाई गेल्या वेळी तुम्ही माझ्यावर खूप रागावला होता. मी स्पॉन्सर्ड पत्रं पाठवली. महाराष्ट्र टाइम्स मध्ये परीक्षण छापून आणलं असंही म्हणाला होतात. मग आज——” माझं वाक्य अर्धवट तोडत सुहासिनीबाई म्हणाल्या,” होय. मला तेव्हा खरंच असं वाटलं होतं की या दोन्ही गोष्टी तू केल्यात. पण तू माझ्या नजरेला नजर भिडवलीस. तुझे डोळे स्वच्छ होते! त्या क्षणी मला माझी चूक उमगली आणि मी ठरवलं की “नवलाई”ची मालिका सुरू करेन तेव्हा सर्वात प्रथम मी तुला बोलावून घेईन !”
सुहासिनी बाईंचं बोलणं ऐकून मी थक्क झाले. वयाने, ज्ञानाने, अनुभवाने माझ्यापेक्षा सर्वच दृष्टीने श्रेष्ठ आणि ज्येष्ठ असणाऱ्या सुहासिनीबाई ! त्यांना माझ्यासारख्या नवख्या मुलीला असं कन्फेशन देण्याची काय गरज होती? माझं समाधान करण्यासाठी आपल्या वागण्याचं त्या कसही समर्थन करू शकत होत्या. काहीही सांगू शकत होत्या. तरीही त्यांनी माझ्यापाशी प्रांजळपणे चुकीची कबुली दिली होती. सुहासिनी मुळगावकरांची थोरवी अधोरेखित करणाराच हा प्रसंग होता! सुहासिनी बाई अनुभवी होत्या. ज्ञानी होत्या. कलाकार म्हणूनही त्या थोर होत्या. पण शिस्तीच्या कठोर कवचातलं त्यांचं उमदं “माणूसपण” अधिक कोमल होतं. ऋजू होतं. त्या सौंदर्याच्या उपासक होत्या. पण हे सौंदर्य केवळ त्यांच्या दिसण्यात नव्हतं. विचारांमध्ये होतं. आचरणामध्ये होतं.
मला स्वतःला या प्रसंगाने एक गोष्ट शिकवली. कोणत्याही व्यक्तीची एखादी कृती म्हणजे ती संपूर्ण व्यक्ती किंवा तिचं व्यक्तिमत्व नसतं. म्हणूनच एखाद्याच्या छोट्याशा कृतीने अथवा क्षूल्लक प्रसंगाने पूर्वग्रह निर्माण करून न घेता, त्या व्यक्तीची ती कृती एखाद्या तात्कालीक कारणाची दृश्य अभिव्यक्ती असू शकते हे समजून घ्यायला हवं. काळाच्या कसोटीवर अशी कृती तपासली तर अत्यंत वेगळा निष्कर्ष निघू शकतो. त्या व्यक्तीच्या संपूर्ण व्यक्तीमत्वाला वेगळा आयाम लाभू शकतो हे नेहमीच ध्यानांत घ्यायला हवं. सुहासिनीबाईंसोबत झालेल्या या प्रसंगाने हा एक खूप मोठा धडा मला शिकवला.
क्रमशः
— लेखन : माधुरी ताम्हणे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800