चोराच्याच हातात चावी …..
सोशल मीडिया हे तंत्रज्ञान आहे आणि कोणत्याही तंत्राच्या जशा जमेच्या बाजू असतात तशा उणिवाच्या बाजूही असतात. आपण त्या जाणून घेतल्याशिवाय त्याचा वापर करणं आपल्यालाच अडचणीत आणू शकतो याची जाणीव सर्वांना असायला हवी. वाहनाला सुरक्षेच्या कारणासाठी ब्रेक असतात आणि त्याचाच वापर करून आपण गतिमान प्रवास करू शकतो त्याच प्रकारे त्याच्या सर्व बाजू आपण तपासायला पाहिजेत.
सायबर गुन्हेगारीत वाढ होण्यासोबत इतर प्रकारचे गुन्हे वाढण्याच कारण देखील इंटरनेट बाबत पूर्ण ज्ञान नसणं हे आहे. या माध्यमातून आपण कळत नकळत गुन्हेगारीला आमंत्रण तर देत नाही ना ? याबाबत सर्वांनीच विचार करावा.
माहितीचा महापूर आणण्यासोबत या माध्यमाने आपल्याला वाचक वर्ग निर्माण करता येतो म्हणून अनेक जण लिहिते झाले परंतु त्या माध्यमाचा गैरवापर करणारे देखील यात सामील झाले आहेत याची जाणीव ठेवूनच सर्वांनी कृती करावी.
सध्याची रिल्सची क्रेझ आहे ती तर चक्क चोरांना आमंत्रण ठरतेय. “सहकुटुंब गोवा सहलीवर” असं म्हणत टाकलेली रील असो की ‘सहकुटुंब तीर्थयात्रेवर’ अशी रील या रिअलटाईम शेअरिंगने चोरांना कळतं की, आपलं घर मोकळं आहे. तीर्थयात्रा आपण करतो पण चोर मात्र प्रसाद तुमच्या घरातून चोरी करून मिळवतात अशा घटना हल्ली वाढल्या आहेत.
आपण उत्साहाच्या भरात Real time व्हिडिओ माहिती शेअर करण्याबाबत अतिशय गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. सहल संपल्यानंतर सहलीचे फोटो आपल्याला माध्यमावर टाकता येतात. ज्याला Quality time म्हणतो असा वेळ कुटुंबासोबत घालवावा, यात कुटुंबाला मिळणारा आनंद महत्त्वाचा आहे.
हल्ली चौकोनी किंवा त्रिकोणी कुटुंब आहेत आणि बहुतेक घरात सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे एकमेकांना वेळ देणे शक्य होत नाही या पार्श्वभूमीवर आपण या बाबीचा विचार करण्याची गरज आहे.
यातून आपण वाढलेल्या गुन्हेगारीला ज्यात चोरी- घरफोडी अशांचा समावेश अशांचे कारण देखील ‘सायबरवेड’ हेच आहे.
अनेक बाबतीत घडणारा आणखी एक गुन्हयाचा प्रकार म्हणजे ‘तुमचीच चोरी’ वाचायला जरा वेगळं वाटलं तरी हे सत्य आहे. आपल्या प्रोफाइलची हुबेहुब प्रतिकृती करून प्रोफाइल नव्याने सादर होते आणि आपण अडचणीत आहोत, पैशाची गरज आहे असे संदेश मित्र व नातेवाईकांना जातात. यातून अनेक प्रकारे लुटले जाते. एका वरिष्ठ आय.ए.एस अधिकाऱ्याबाबत हा प्रकार 3 वेळा घडल्याचे मी स्वतः बघितले आहे.
सायबर सुरक्षित गोपनीयता आणि शेअरिंग बाबतची काळजी यासाठीच महत्त्वाची असते. ‘बडे धोके है इस राह में’ हे कायम लक्षात ठेवा. तुम्ही सुरक्षा बाळगली नाही तर त्याचा तोटा तुम्हालाच होणार आहे याची जाणीव ठेवून काम करा व शक्यतो Real time व्हिडिओ टाळा.
क्रमशः
— लेखन : प्रशांत विजया अनंत दैठणकर. बीड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800