Wednesday, December 31, 2025
Homeसाहित्यओठावरचं गाणं....

ओठावरचं गाणं….

नमस्कार 🙏 “ओठावरचं गाणं” या सदरात सर्व रसिकांचं मन:पूर्वक स्वागत. आजचं ओठावरचं गाणं आहे कवि ना.घ. देशपांडे यांचं.

“अंतरीच्या गूढ गर्भी एकदा जे वाटले, ते प्रेम आता आटले”, “घर दिव्यात मंद तरी”, तुझ्याचसाठी कितीदा”,  “नदीकिनारी नदीकिनारी”, बकुळफुला कधीची तुला”, “मन पिसाट माझे अडले रे”, “रानारानात गेली बाई शीळ”, अशी सुंदर सुंदर गाण्यांची महिरप रसिकांभोवती मांडणा-या कवि ना. घ. देशपांडे यांचं आजचं गाणं आहे-

डाव मांडून भांडून मोडू नको
डाव मोडू नको”
ना घ देशपांडे यांनी लिहिलेली “डाव मांडून भांडून मोडू नको” ही कविता म्हणजे भांडण केलेल्या प्रियतमेची, प्रियकराने केलेली मनधरणी आहे. म्हणून तर “डाव मोडू नको, डाव मोडू नको” अशी पुन्हा पुन्हा तो तिची विनवणी करतोय.
आणिले तू तुझे, सर्व मी आणिले
सर्व काही मनासारखे जाहले
तूच सारे तुझे दूर ओढू नको
डाव मोडू नको
आपण दोघेही लहानपणापासून एकमेकांना ओळखतो आहोत. भातुकलीचा खेळ असू दे नाहीतर संसाराचा सारीपाट असू दे, कितीही भांडलो तरी दोघांनीही नेहमीच एकमेकांना सुख आणि समाधान कसं मिळेल याचाच विचार केला आहे ना आणि म्हणूनच आत्तापर्यंत सगळं काही आपल्या मनासारखं होत गेलं. “तूच सारे तुझे दूर ओढू नको” असं असतानाही तू अशी स्वार्थीपणाने वागू नकोस आणि हा संसाराचा डाव क्षुल्लक कारणावरून मोडू नकोस.
सोडले मी तुझ्याभोवती सर्व गे
चंद्रज्योती रसाचे रूपेरी फुगे
फुंकरीने फुगा हाय फोडू नको
माझी प्रियतमा, माझी अर्धांगिनी नेहमी आनंदी रहावी, हसतमुख असावी म्हणून मी प्रत्येक वेळी तुझ्यासाठी रूपेरी सुखाच्या पायघड्या अंथरल्या. “फुंकरीने फुगा हाय फोडू नको” तुझ् या क्रोधाच्या एका फुंकरीने हा सुखाचा फुगा फुटून तरी जाईल किंवा हातातून निसटून तरी जाईल.
गोकुळीचा सखा तूच केले मला
कौतुकाने मला हार तू घातला
हार हासून, घालून तोडू नको
कारण जेंव्हा जेंव्हा आपण भेटलो तेंव्हा तेंव्हा “मी राधेच्या आतुर नजरेतून माझ्या कृष्णाची वाट पहात आहे” असं तू सतत बोलत रहायचीस ना. आपला संसार सुखाचा व्हावा यासाठी तर तुझ्या प्रेमाचा हार माझ्या गळ्यात घातलास ना. मग त्या प्रेमाच्या हाराला आणि संसाररूपी डावाला दृष्ट लावून तो तोडू नकोस ना तू !
काढले मी तुझे, नाव तू देखिले
आणि माझे पुढे नाव तू रेखिले
तूच वाचून, लाजून खोडू नको
डाव मोडू नको
सखे, हे बघ तुझ्याशी बोलता बोलता मी वाळूमध्ये तुझं नाव लिहिलं आणि तुझ्याही नकळत तुझ्या सुवाच्य अक्षरात तू तुझ्या नावापुढे माझंही नाव लिहिलंस त्यातूनच आपला संसार रूपी डाव नक्की रंगणार याची मला खात्री आहे तेंव्हा आता “मला बाई लाज वाटते” असं म्हणत ते नावही खोडू नको आणि सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर रंगणारा हा संसाररुपी डाव तर मुळीच मोडू नको.

संगीतकार राम फाटक यांनी पहाडी रागात बांधलेलं ना.घ. देशपांडे यांचं हे गाणं सुधीर फडके यांच्या आवाजात ऐकताना भान विसरायला लावतं एवढं नक्की !

विकास मधुसूदन भावे

– लेखन : विकास मधुसूदन भावे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

13 COMMENTS

  1. ओठावरल्या गाण्याचा भावार्थ सुंदर शब्दात उलगडला आहे ! खूप छान !! 👌👌👍💐

  2. डाव मांडून भांडून मोडु नकोचे रसग्रहण उत्तम जमले आहे

  3. सुंदर रसग्रहण ! आता हे गाणं ऐकताना शब्दांकडे जास्त लक्ष दिलं जाईल.👍👍

  4. ऐकलेल्या गाण्यांचे सजग रसग्रहण रंजनासोबत सूर, शब्द अन् भाव यांचे सुटून गेलेले काही कंगोरे देखील अधोरेखित करतं.

    महत्त्वाच्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा !

  5. आजचे गाणे जुनेअसले तरीही कायम ओठावर असलेले.या गाण्याचे भाव आपल्या रसग्रहणातून खूपच छान उमटलेत.
    विशेषत: शेवटच्या कडव्यातले.
    खूपच छान.

  6. हे गाणं खुपदा ऐकले आहे. पण पुर्ण भावार्थ समजल्या नंतर हे गाणं मनाला जास्त भावले.
    असेच इतरही गाणी, कवितांचा भावार्थ समजवत रहा.

  7. कवितेचे रसग्रहण आवडले. अशी अनेक गाणी ओठावर असतात पण त्याचे गीतकार लोकांना माहीत नसतात. देवेंद्र भुजबळ व आपण चालू केलेल्या या सदरामुळे हे शक्य झाले आहे. धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अलका वढावकर ठाणे on माझी जडणघडण : ७८
पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”