डॉ अंजुषा अनिल पाटील, एम.ए, बी.एड, पी.एच.डी.
या ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वर्तकनगर शाळेत मुख्याध्यापिका आहेत…
– संपादक
सध्याच्या कोरोनाच्या नकारात्मक वातावरणामध्ये आपण सर्वजण वावरत आहोत. त्यामुळे साहजिकच मनावर नकळत ताण येतो. त्या ताणतणावांना दूर ठेवून आजुबाजुचे वातावरण तणावविरहित करून मनाची प्रसन्नता टिकवून ठेवणे हे प्रत्येकासमोरचे मोठे आव्हान आहे.
जगात दोन गोष्टी पाहायला मिळतात.
१) विचार न करता कृती करणे.
२) कृती केल्यावर विचार करत बसणे. अर्थातच त्यामुळे ताणतणाव वाढतात. त्यासाठी कोणतेही काम करताना पूर्ण विचार करून कृती केली पाहिजे. कृती करून झाल्यावर फक्त पश्चातापच पदरी पडतो व नकारात्मकतेने आपण पूर्णपणे घेरले जातो. पेला अर्धा भरला आहे कि अर्धा रिकामा आहे हे आपण जर पेला अर्धा भरला आहे असं मानल, तर ती सकारात्मकता होय.
या जगात कोणतीही गोष्ट माणसाला परिपूर्ण मिळणार नाही. तसेच कोणतीही गोष्ट वाईट नाही आणि संपूर्ण चांगली आहे असं नाही. प्रत्येकाचा अनुभव वेगळा. देवाने माणसाला ज्ञानेंद्रिये, कर्मेन्द्रिये, मन व बुद्धी दिली आहे. त्याच्या जोरावर प्रयास करून आदर्श जीवन जगण्यासाठी सकारात्मकतेचा खूप मोठा फायदा होऊ शकतो.
जीवनात प्रत्येकाच्या वाट्याला सुखदुःख, चढउतार व निराशाजनक प्रसंग येतात. पण जोपर्यंत ते प्रसंग आपल्या दाराशी येत नाहीत तोपर्यंत आपल्याला त्याचं काही वाटत नाही. कारण परदुःख शितल असते. असे प्रसंग कोणावरही येऊ नयेत म्हणून सकारात्मक दृष्टीकोनाचा विचार करून वागलो तर सर्व चांगलेच घडेल.
आपल्या जीवनात घडून गेलेल्या वाईट घटना आठवून भूतकाळात रमू नये. त्यापेक्षा वर्तमानकाळ समाधात घालवून आनंदी राहावे. आपल्या जीवनात एखादी घटना घडली कि जगात आपणच सर्वात जास्त दुःखी कष्टी आहोत असं मनाला वाटून जाते. जसे विचार तशी कृती घडते.
समर्थ रामदास म्हणतात “जगी सर्व सुखी असा कोण आहे ? विचारे मना तूचि शोधुनि पाहे l मना त्वाचि रे पूर्वसंचित केले l तयासारिखे भोगणे प्राप्त झाले l
आपल्याहीपेक्षा दुःखी माणसं जगात आहेत. पूर्व प्रारब्धाप्रमाणे प्रत्येक माणसाला सुख किंवा दुःख प्राप्त होते. हा विचार मनाला पटला की, मग मनातून नकारात्मक विचार कमी होतात व सकारात्मक विचार येतात. पुढचं आयुष्य सुखकारक होते. हे सर्व मनाचे खेळ आहेत त्यासाठी मनाला बुद्धीचे कोंदण घालून सकारात्क दृष्टिकोन ठेवल्यास आसपासचे वातावरण आनंदी व प्रसन्न होईल.
“काॕफीचा कप” असा मजकूर माझ्या वाचनात आला होता. एक माणूस काॕफी पित बसलेला असतो. मागून एक मित्र येऊन पाठीवर थाप मारून जातो. त्यामुळे कपातली काॕफी खाली सांडते. कपातली काॕफी का सांडली ? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे का ? त्या माणसाने धक्का दिला म्हणून काॕफी सांडली. अजून काय ? पण तसे नाही. तुमच्या कपामध्ये काॕफी होती म्हणून काॕफी सांडली. त्यात जर चहा किंवा दुध असते तर काॕफी सांडली असती का ?… नाही न ?…म्हणून ते उत्तर चुकीचे होते. माझ्या कपात काॕफी होती म्हणून काॕफी सांडली असे उत्तर यायला हवे होते.
म्हणजेच या प्रसंगाची आयुष्यातील सकारात्मकतेशी सांगड घातली तर त्याचे मर्म कळते. जेव्हा आयुष्य अशा काही घटनांनी आपल्याला हलवतं तेव्हा जे आपल्या मनात असतं त्याप्रमाणे आपली प्रतिक्रिया बाहेर येते. तेव्हा आपल्या मनाला विचारायला हवे…बाबा, काय आहे रे तुझ्या कपात ?
आनंद, कृतज्ञता, शांती, प्रेम, नम्रता ? कि क्रोध, कटुता, द्वेष, असूया, कठोर शब्द… ? एकदा हे आपल्याला समजलं कि नकारात्मक विचाराला धक्का लागेल व सकारात्मक विचारच आत व बाहेर वास्तव्य करतील. ज्यायोगे आपलं आयुष्य समृद्ध होईल !
सकारात्मक विचार मनात येण्यासाठी भक्ती, प्रार्थना, एखादा श्लोक किंवा ग्रंथाचे वाचन करून मनाचे सामर्थ्य वाढवावे. स्वतःवर प्रेम करावे. म्हणजे मनाचे सौंदर्य आतून बाहेर येईल. प्रयत्न करत राहा यश नक्की येईल. प्रयास करून मन खंबीर ठेवावे. त्यामुळे मन व्यस्त राहते व मनात कायम सकारात्मक विचार येत राहतात व आपण प्रत्येक कामात यशस्वी होऊ शकतो.
– लेखन : डॉ. अंजुषा पाटील.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण आपलं आयुष्य नक्कीच सुसह्य करू शकतो. खुपच प्रेरणादायी लेख.
डॉ. अंजूषा पाटील यांना खुप खुप धन्यवाद.
तणाव रहीत जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार ठेऊनच जीवन जगले पाहिजे. मनात सकारात्मक विचार आणण्यासाठी qलेखिका डॉ. अंजुषा पाटील यांनी उत्तम उपाय सांगितले आहेत त्याबद्दल त्यांचे आभार 🙏