“तात्या“
मंगेश मुंबईचा एका मोठा कपडा व्यापारी. आज त्याची होलसेल डीलरसोबत महत्वाची मिटिंग होती. म्हणून मंगेश त्याच्या गाडीने मीटिंगला चालला होता. अचानक तो गाडी थांबवून खाली उतरला. कोणीतरी खूप जीवाभावचे दिसल्यावर जसा आनंद होतो तसा काहीसा भाव त्याच्या चेहऱ्यावर होता. मंगेश गर्दीतून वाट काढीत एका वयस्कर व्यक्तीजवळ येवून थांबला आणि म्हणाला, “तात्या, ओळखलत का मला ? असं म्हणत त्याने वाकून नमस्कार केला. त्या वयस्कर व्यक्तीने आश्चर्याने पण मृदू भाषेत विचारले, “कोण तुम्ही ? माफ करा हं मला… हल्ली वयोमानानुसार जरा कमी आठवते. “अहो, तात्या मी मंगेश.. तुमचा मंग्या. खेड गावच्या सुमीचा मुलगा.. ( सुमी म्हणजे सुमन मंगेशची आई )… हे ऐकताच तात्यांनी मंगेशला घट्ट मिठी मारली, “कुठे गेला होतास तू पोरा ? किती शोध घेतला तुझा…” असं म्हणत अश्रूची वाट मोकळी केली. तात्यांनी थरथरत्या हाताने मंगेशच्या चेहऱ्यावर हात फिरवला आणि पुन्हा मिठी मारली. दोघांच्याही चेहऱ्यावर विलक्षण आनंद दिसत होता. डोळ्यातून आनंदाश्रुंच्या धारा वाहत होत्या. दोघांनाही खूप काही बोलायचे होते, खूप सांगायचं पण तोंडातून शब्द फुटत नव्हते.
मंगेशला तात्याच्या डोळ्यात खूप प्रश्न दिसत होते. त्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यास तात्या फार उत्सुक होते. पण तिथली गर्दी लक्षात घेता मंगेश तात्यांना त्याच्या गाडीजवळ घेवून गेला आणि तात्यांना सहपरिवार आपल्या बंगल्यावर रात्रीच्या जेवणाचं निमंत्रण दिल. काहीतरी खूप मोठं गवसल्याचे समाधान मंगेशच्या चेहऱ्यावर दिसत होते. मंगेशने मीटिंग रद्द करत थेट स्वतः च घर गाठलं. घरी येताच जोरजोरात आपल्या सहचारिणीला म्हणजेच मीराला आवाज देत म्हणाला, “मीरा… अगं मीरा… कुठे आहे तु ? पटकन ये… आज रात्री आपल्याकडे खूप खूप खास पाहुणे येणार आहेत. जेवण अगदी सांग्रसंगीत झालं पाहिजे. घरातील सगळ्या नोकरांनाही सांग, जेवण छान बनवायला. स्वयंपाक घरात कधीही लक्ष न देणाऱ्या मंगेशला अचानक काय झाले हे मीरा कळत नव्हते. तिने जरा गोंधळलेल्या स्वरात विचारलं, “अरे.. पण असे कोण खास पाहुणे येणार आहे ते तर सांग” ? अगं, तात्या येत आहेत आपल्याकडे सहपरिवार!!” असं म्हणत मीराचा हात हातात घेत त्याने एक गिरकी घेतली. मंगेशने तात्या भेटल्याची सर्व हकीकत मीराला सांगितली. ते ऐकतच मीरालाही खूप आनंद झाला. “अरे वाह !! तात्या येणार ! मला तर काय करू आणि काय नाही असं झालं आहे. ते आपल्याकडे पहिल्यांदाच येणार आहे. एव्हाना आमची देखील ही पहिलीच भेट आहे. मी तात्यांना आवडेल ना रे ?”
असं मीरा काळजीच्याच स्वरात म्हणाली. मीराला मंगेशच्या भूतकाळाची पूर्ण कल्पना होती. मंगेशच्या जीवनातील तात्यांचे स्थान तिला माहिती होते. तिलाही तात्याचा खूप आदर होता. म्हणून आनंदाने ती तशीच तडक स्वयंपाक घराकडे निघाली. मंगेश थोडावेळ सोफ्यावर विसावला. त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होतं. डोळे बंद करताच मंगेश भूतकाळात रमाला.
खेड… एक छोटसं टुमदार गाव. पर्वतांच्या कुशीत वसलेलं. निसर्गाचा वरदहस्त असलेलं, ५०० लोकांची वस्ती असलेल , सुख संपन्न गाव. इथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय शेती.
मंगेश.. हुशार, मनमिळाऊ सगळ्याच्या मदतीला पुढे… तसा स्वभावाने शांत..पण कोणावरही अन्याय होताना पाहणे त्याला सहन होत नसे. त्याचा राग अनावर होत असे. मंगेशच्या घरची परिस्थिती हलाखीची. मंगेशला वडील नसल्यामुळे सुमन (मंगेशची आई) एकटीच शेतमजुरी करून मंगेशचा सांभाळ करीत असे.
तात्या…कांही दिवसांपूर्वीच खेड गावात दरोगापदी बदली होवून आले होते. तात्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे कमी कालावधीत ते अख्ख्या गावाचे तात्या झाले. त्यांची पत्नी रमा म्हणजे सगळ्यांची माई. तात्या, माई आणि त्याचा ६ महिन्याचा मुलगा रघु असं त्यांचं सुखी कुटुंब गावात वास्तव्यास आलं. गावातील बरीच शुल्लक भांडणे किंवा समस्या तात्या पोलिस स्टेशनपर्यंत न जाऊ देता बाहेरच सामंजस्यपणे सोडवित असत. प्रत्येकाला एक संधी मिळालीच पाहिजे, असा त्यांचा प्रयत्न असे. वेळप्रसंगी ते पॉलिसी हिसका दाखवायलाही मागे पुढे बघत नसत. बऱ्याच अट्टल गुन्हेगारांना त्यांनी वठणीवर आणले होते.
गावात तात्यांच्या शब्दाला खूप मान होता. गावातील बरेच श्रीमंत लोक देखील वेळप्रसंगी तात्यांचा सल्ला घेत. तात्यांचे “एक गाव – एक कुटुंब” धोरण होते. त्यांच्या घराची दारे सगळ्यासाठी २४ तास उघडी असायची. त्यामुळे तात्यांकडे सतत लोकांची ये- जा असे.
माई पण सगळ्यांचे आदरातिथ्य अगदी मनोभावे करत असत. मंगेश माईंचा खूप लाडका होता. शाळा सुटली की मंगेशचा मोर्चा तात्यांच्या घरी वळायचा. मंगेशला पाहून रघुला खूप आनंद व्हायचा. दिवस रात्र मंगेश तात्यांकडेच असायचा. जणू कांही तो तात्या आणि माईंचा जणू दत्तक पुत्रच होता.
तात्या मंगेशला मंग्या म्हणून हाक मारीत. तात्या नेहमी मंगेशला म्हणत, “अरे, मंग्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना रागावर नियंत्रण ठेवायला शिक !!” पण तात्यांना मनातून त्याचा हा स्वभाव खुप आवडायचा. परंतु भितीपण वाटायची.
पाटील….गावातल्या श्रीमंत व्यक्तींपैकी एक. त्याचा मुलगा खूप उनाड आणि वडिलांच्या अतिप्रेमाने वाया गेलेला. गावातील बऱ्याच मुलींची तो नेहमी छेड काढत असे.या विषयी गावकऱ्यांनी खूपदा पाटलांकडे तक्रार केली होती. पण पाटील याकडे दुर्लक्ष करत. पाटील तसा स्वभावाने चांगला माणूस असला तरी मुलावर त्याचं आंधळं प्रेम होत. तो त्याच्या अनेक चुकांवर पांघरून घालत असे. मुलाच्या केसालाही धक्का लागल्यास पाटील समोरच्यांला शिक्षा दिल्याखेरीस शांत होत नसे. अश्या प्रसंगी तो तात्याचे देखील ऐकत नसे.
एक दिवस, पाटलाच्या या उनाड मुलाने मंगेशच्या मानलेल्या बहिणीची छेड काढली. हे पाहताच मंगेशने पाटलाच्या मुलाला आपल्या बहिणीची माफी मागयला लावली. पण पैशांचा माज दाखवत त्या उनाड मुलाने मंगेशशीच हुज्जत घातली.शेवटी त्या शाब्दिक भांडणाचे रूपांतर मारपिटीत झाले. यात पाटलाच्या मुलाला बराच मार लागला. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली.
बातमी पाटलापर्यतही पोचली. रागात चितवलेला पाटील “मंग्याला खूप मारणार” हे तात्याला ज्ञात होते. घटनेत मंगेश निर्दोष असला तरी मुलावरच्या वेड्या प्रेमापायी पाटलाला सत्य दिसणे अशक्य होतं . म्हणून तात्यानेच मंगेशला कांही पैसे देवून चुपचाप पुण्याच्या बसमध्ये बसवून “मंग्या मी सांगेस्तोवर परत येऊ नको” असे बजावले. तात्यांनी त्यांच्या पुण्याच्या मित्राला फोन करून झालेल्या घटनेबद्दल कळवले आणि मंगेशला स्टेशनवरून घेवून स्वतः कडे ठेवण्यास सांगितले.
आबासाहेब… तात्यांचे जिवलग मित्र . सर्वजण त्यांना “आबा” म्हणत. आबांचे पुण्यामध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह होते. सांगितल्याप्रमाणे आबांनी मंगेशला स्टेशनवरून उतरवून घेवून वसतिगृहात आणले आणि तात्यांना फोन करून मंगेशची खुशाली कळवली. इकडे मंगेशच्या आईला त्याच्या काळजीने पार वेड लागायची वेळ आली होती . तात्याकडून मंगेश ठीक असल्याचे कळल्यावर जरा ती शांत झाली. तरी पण अवघ्या १४ वर्षाचे पोर आईविना कसं राहील, या विचाराने तिच्या जीवाला घोर लागला होता.
घटनेला कांही दिवस लोटूनही पाटलाचा राग शांत झाला नव्हता. “एवडसं पोर माझ्या हातावर तुरी देऊन कसं निसटलं” हा विचार त्याच्या अहंकाराला सतत बोचत होता. म्हणून तात्याने मंगेशला तिकडेच राहून आपलं पुढील शिक्षण पूर्ण करण्यास सांगितले. तात्या मंगेशला मनीऑर्डर पाठवित होते. सगळं सुरळीत चालू होत. पण दोन वर्षानंतर अचानक आबांचे निधन झाल्याने वसतिगृह बंद पडले आणि इकडे तात्यांची बदली झाली. या दरम्यान मंगेश आणि तात्यांमधील संपर्क तुटला. वसतिगृह बंद झाल्याने सगळी मुलं आपापल्या घरी गेली. मंगेश पण आपल्या गावी परत आला. मंगेशचा विरह सहन न झाल्याने आई दगावल्याचे गावकऱ्यांकडून कळले. आता पाटलाचाही राग शांत झाला होता. परंतु आई, तात्या, माईविना मंगेशचे मन गावात रमत नव्हते. कुठे जावे, काय करावे कळत नव्हते.
असाच एक दिवस मंगेश गावाच्या वेशीवर विचारमग्न बसला होता. तेवढ्यात एका शेठजीची नजर मंगेशवर पडली. हे शेठजी.. मुंबईत एका कपडा दुकानाचे मालक. खूप दिलदार माणूस. पण एका अपघातात बायको आणि मुलाचा मृत्यू झाल्याने एकटे पडले होते. मंगेशला पाहताक्षणीच शेठजीला तो आपलासा वाटला. मंगेशकडून त्याची सर्व हकीकत ऐकल्यावर शेठजीनी त्याला आपल्यासोबत मुंबईला चलण्याबाबत विचारणा केली. मंगेशने पण मागचा पुढचा विचार न करता लगेच होकार दिला.
मुंबईत येताच शेठजीने मंगेशला दुकानात नोकर म्हणून ठेवले. मंगेश हुशार व मनमिळाऊ असल्याने त्याने भराभरा सगळ्या गोष्टी आत्मसात केल्याने शेठजी त्याचे चाहते बनले.
काही वर्षांनी वय झाल्याने शेठजीने सर्व कारभार मंगेशच्या हाती सोपवला. मंगेशनेही या संधीचं सोनं करत एका दुकानाचे दहा दुकान केलेत आणि मुंबईच्या कपडा व्यापारात स्वतःचे स्थान निर्माण केलं. मग बंगला, गाडी, लग्न, मुलं अशी त्याची प्रगती झाली. काही दिवसांपूर्वीच शेठजीचे निधन झाल्याने मंगेशच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली. पण ही सगळी प्रगती शेठजींनी आपल्या डोळ्याने पाहिल्याचं त्याला समाधान होते. अशातच आज परत तात्या भेटल्याने ही पोकळी भरून निघाल्याचा त्याला आनंद झाला होता.
तेवढ्यात डोअरबेलच्या आवाजाने मंगेश भानावर आला. दार उघडताच तात्या, माई, रघु, रघुची बायको आणि त्याची मुलं उभी होती. मंगेश आणि मीरानी सगळ्यांचे स्वागत करत आत बोलावले. माईंनी मंगेशला जवळ घेत अश्रूंची वाट मोकळी केली. मंगेश ची प्रगती पाहून तात्यांनाही भरून आलं होतं. सगळीकडे नुसता आनंदउत्सव होता. सगळ्यांची जेवण झाली आणि निरोपची वेळ आली. सगळ्यांचं अंतःकरण जड झाले होते. तेव्हा मंगेश तात्यांना बिलगून म्हणाला, “तात्या झालेल्या प्रकरणात माझं काय चुकलं होत” ? माझं गाव सुटलं, आई गेली, तुमच्या प्रेमाला मुकलो.! यावर तात्या मंगेशचे डोळे पुसत म्हणाले, ” पोरा, तु त्या प्रकरणात निर्दोष होता. फक्त तुझा अनावर झालेला राग तुला नडला. पण आज तु सुखी, समृद्ध, समाधानी आहे. एक दार बंद झालं की देव दुसरे दार उघडतो. आयुष्यात कांही तरी सुटणार, कांही तरी मिळणार. जे सुटले त्यासाठी रडण्यापेक्षा जे आहे त्यात समाधान मानावं. संधी प्रत्येकाला मिळत असते फक्त त्याचं सोनं करता आलं पाहिजे !!” असं म्हणत तात्यांनी सहपरिवार मंगेशचा निरोप घेतला.
— लेखन : सौ. आश्लेषा गान. सातारा
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800