कलाकार, संगीतप्रेमी, ग्राहक यांचा वर्षानुवर्षे विश्वास संपादन करत मुंबईतील “हरिभाऊ विश्वनाथ” ही संस्था गेली १०० वर्षे अखंड संगीत सेवा करत आहे.
हिंदी, मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज गायक, संगीतकार, कलाकार या संस्थेशी जोडल्या गेले आहेत. अशा या गौरवशाली संस्थेचा शतक महोत्सवी सोहळा येत्या ५ जानेवारी २०२५ रोजी यशवंत नाट्यगृह माटुंगा, मुंबई येथे सायंकाळी ५:३० वाजता होत असून संगीत प्रेमींनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन या संस्थेचे सर्वेसर्वा तिन्ही दिवाणे बंधू आणि त्यांच्या परिवाराने एका संयुक्त पत्रकार परिषदेद्वारे केले आहे.
हरिभाऊ विश्वनाथ ही संस्था, वाद्य निर्मिती आणि विक्रीशी संबंधित असल्यामुळे शतक महोत्सवी सोहळा वाद्यांच्याच अद्वितीय सादरीकरणाने, अतिशय अभिंनव पद्धतीने साजरा होणार आहे.
या सोहळ्यास सुप्रसिद्ध संगीतकार सर्वश्री अशोक पत्की आणि कौशल इनामदार प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. तर प्रसिद्ध संतूर वादक श्री राहुल शर्मा यांचे संतूर वादन रसिकांना अनुभवता येईल. त्यांना श्री ओजस अधिया तबलासाथ करतील.
या सोहळ्यात सुप्रसिद्ध वादक श्री आदित्य ओक आणि श्री सत्यजित प्रभू यांची हार्मोनियम जुगलबंदी संगीत प्रेमींना अनुभवता येईल. त्यांना ढोलकीसाथ सुप्रसिद्ध वादक श्री अनिल करंजवकर तर तबलासाथ देणार आहेत सुप्रसिद्ध वादक श्री प्रसाद पाध्ये. त्याचसोबत सारेगम फेम श्री निलेश परब आणि श्री कृष्णा मुसळे यांची ढोलकी जुगलबंदी असे सादरीकरण रसिकांचा संगीतानुभव नक्कीच समृद्ध करेल.
या कार्यक्रमाला मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक सुप्रसिद्ध गायक, संगीतकार यांची उपस्थिती लाभणार आहे, अशी माहितीही या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी हरिभाऊ विश्वनाथ संस्थेच्या दादर, प्रभादेवी आणि गिरगाव येथील दुकानांमध्ये ठेवण्यात आलेल्या जरी संपल्या असल्या तरी, सभागृहात जागा उपलब्ध असल्यास ऐनवेळी येणाऱ्या रसिकांनाही प्रवेश देण्यात येईल, असे या संस्थेच्या संचालिका सौ पद्मा दिवाणे यांनी सांगितले.
अल्प परिचय : सर्व प्रकारची वाद्ये उपलब्ध असणारे मुंबईतील हरिभाऊ विश्वनाथ ग्रुप हे खात्रीशीर नाव आहे. संस्थेच्या मुंबईत दादर, प्रभादेवी आणि गिरगाव या ठिकाणी शाखा आहेत.
काही महिन्यांपूर्वी दादर शाखा बंद करण्यात येत असून तेथील सर्व वाद्ये ग्राहकांना स्वस्तात मिळतील, अशी अफवा पसरवल्या गेली होती. प्रत्यक्षात तसे काही नसल्याचे संस्थेने त्याच वेळी स्पष्ट केले होते. या अफवेने भरपूर मनस्ताप झाला तरी पण एक प्रकारे संस्थेची प्रसिद्धी ही खूप झाली, असे एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.
सातत्याने गुणवत्तापूर्ण वाद्य निर्मिती करीत असल्याने देशातील बहुतेक सर्व आघाडीचे वादक, संगीतकार वर्षानुवर्षे या संस्थेशी जोडल्या गेले आहेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देश, विदेशात संस्थेचे ग्राहक पसरले असून बदलत्या तंत्रज्ञानामुळे संस्थेच्या वाद्यांची मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पद्धतीने विक्री होत असते. दिवाणे परिवारातील तिसरी पिढी या संस्थेच्या कामात लक्ष घालू लागल्यामुळे ती व्यवसाय वाढीसाठी नवनवीन, अभिनव कल्पना राबवित आहे.
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800