थोर विनोदी लेखक, अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी, सर्वांचे लाडके पु.ल.देशपांडे, यांचा कालनिर्णय च्या जानेवारी १९८० अंकात प्रसिद्ध झालेला लेख, तो आज सुध्दा ताजा, टवटवीत असल्याने पुढे देत आहे. कालनिर्णय चे मनःपूर्वक आभार. सर्व लेखक, कवी, वाचक, हितचिंतक यांना नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
– संपादक
नव्या वर्षाचे आपण हसतमुखाने स्वागत करू या, अर्थात दाढ वगैरे दुखत नसेल तर. साध्या मुखाचे हसतमुख करण्यात ती एक अडचण असते. ते एक असो. नव्या वर्षाचा पहिला दिवस हा नवे संकल्प सोडायचा दिवस असतो.
या बाबतीत पुरुषवर्गाचा उत्साह दांडगा. नव्या वर्षाच्या प्रथम दिवशी पुरुषांच्या उत्साहाने स्त्रियांनी काही नवा संकल्प सोडल्याचे आमच्या ऐकिवात नाही. ‘‘आहेत त्या साडया फाटून गेल्याशिवाय नवीन घेणार नाही’’ अशा नमुन्याचा किंवा ‘सिगरेट सोडली’ या चालीवर ‘पावडर सोडली’ ह्या थाटाचा संपूर्ण इहवादी संकल्प १ जानेवारीचा मुहूर्त साधून सोडलेली स्त्री आमच्या पाहण्यात नाही. आलीच तर तिला आम्ही कडकडून भेटायला तयार आहो. (हा केवळ भाषाविलास☺️)
पुरुष मंडळींना मात्र असले- म्हणजे साडी फाटेपर्यंत नवीन घेण्याचे नव्हे-सिगरेट सोडण्याचे, स्वखर्चाने दारू न पिण्याचे वगैरे संकल्प सोडल्याशिवाय १ जानेवारी हा दिन साजरा झाल्यासारखे किंवा नव्या वर्षाचे आपण यथायोग्य स्वागत केल्यासारखे वाटत नाही.
१ जानेवारीपासून सिगरेट ओढायची नाही हा मात्र बराच लोकप्रिय संकल्प आहे. मात्र त्याला २ जानेवारीपासूनच फाटे फुटतात.
पहिला फाटा : पाकीट घ्यायचं नाही. एकेक सुटी सिगरेट घ्यायची.
दुसरा फाटा : अर्धी-अर्धी ओढायची.
तिसरा फाटा : दुसऱ्या कोणी दिली तरच ओढायची.
चौथा फाटा : रात्री नऊच्या पुढे ओढायची नाही.
पाचवा फाटा : फक्त जेवणानंतर ओढायची.
सहावा फाटा : चहा व जेवणानंतर.
सातवा फाटा : रात्री ९ ऐवजी दहाच्या पुढे ओढायची नाही.
आठवा फाटा : इंपोर्टेड सिगरेटमधला टोबॅको प्युअर असल्यामुळे ते पाकीटच्या पाकीट ओढले तरी “नो हार्म ईज फॉजड,” इत्यादि इत्यादि.
थोडक्यात, सिगरेट सोडण्याचा संकल्प सोडण्याचा आणि मोडण्याचा प्रकार, केवळ विरह वेदनेची हौस भागवायला स्वपत्नीला आग्रहाने आपणच माहेरी पाठवून आठव्या दिवशी तिला परत आणायला जाण्यासारखा आहे. सिगरेट सोडून परत ओढण्याचा आनंद हा विरहानंतरच्या मीलनासारखा आहे. त्या आनंदाची गोडी अधुऱ्या मंडळींना कळणार नाही. (हो, बरं आठवलं, धूम्रपानाची तारीफ करताना शासकीय विधिलिखिताला अनुसरुन ‘‘धूम्रपान आरोग्यास विघातक आहे’’ हेही लिहितो. ते वाक्य न लिहिणे अवैध म्हणजे बेकायदा आहे. आपण बेकायदेशीरपणा म्हणजे अवैधव्य याला फार भिऊन वागतो.) तर काय सांगत होतो ? सिगरेट सोडण्याचा संकल्प मोडण्यातली मजा.
‘सिगरेट सोडणे’ ह्याप्रमाणे १ जानेवारीपासून नित्यनेमाने डायरी लिहिणे, पहाटे उठून मैदानात फिरायला जाणे, गच्चीवर फेऱ्या घालणे- अंगणात फेऱ्या घालणे, घरातल्या घरात फेऱ्या घालणे – योगासने करणे – जागच्या जागी धावणे, हे देखील सुप्रसिद्ध संकल्प आहेत. आम्ही तर ५-६ वर्षांनी आलटूनपालटून हे संकल्प नव्या उमेदीने सोडीत आलो आहो. त्यातला आमचा डायरी लिहिण्याचा संकल्प कृष्णपक्षातल्या चंद्राप्रमाणे कलेकलेने क्षीण होत गेल्याची साक्ष जुन्या डायऱ्या पाहताना पटते. पण डायरीचे एक आहे की, ती भेट म्हणून मिळवण्यातच खरी मजा असते. हिशेबाची डायरी ही रोजनिशी झाली. भेट म्हणून मिळालेल्या आणि ‘‘…… अहाहा ! आज पहाटे उठताना शेजारच्या रेडियोवरुन दत्त दिगंबर दैवत माझे ऐकल्यावर आज गुरुवार हे ध्यानात आले. उद्याचा दिवस गेला की परवा सेकंड सॅटरडे…’’ अशा प्रकारचा काव्यमय मजकूर असलेल्या डायरीला ‘दैनंदिनी’ म्हणावे.
डायरी की डियरी ?
एखाद्या कुमुदिनी (समोरची) शरदिनी (पेंडश्यांची) किंवा तसं पाहिल तर ईव्हन प्रमोदिनी (साहेबांची पी. ए.) यांच्यासारखेच ह्या दैनंदिनीला मानून तिच्याशी हळुवारपणे बोलावे. प्रेयसी ही काय विकत घ्यायची वस्तू आहे ? इंग्लिश लोक देखील असल्या भेट आलेल्या डायरीला ‘डियरी’ म्हणायला कसे विसरले कोण जाणे. अशी सुंदर दैनंदिनी हाती आल्यावर रोज डायरी लिहीण्याच्या संकल्पाला जोर येतो. पण नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी खोट बोलवत नाही म्हणून सांगतो, हा हुरूपसुद्धा कृष्णेन्दुवत मावळला जातो. पहिल्या भेटीत प्रेयसीशी काय बोलू नि काय नको होऊन तोंडाला खीळ बसावी आणि पुढे चार-पाच दिवस तिचेच बोलणे ऐकत राहावे लागल्यावर ‘हाच का तो आपल्याला आजन्म ऐकावा लागणारा प्रतिभाविलास ?’ ह्या भीतीने बोबडी वळावी तशीच काहीशी ह्या नित्यनेमाने दैनंदिनीला भेटण्याच्या बाबतीतली अवस्था होते.
रोज लिहिण्यासारखे आपल्या आयुष्यात काही घडत नाही आणि जे घडते ते लिहिण्यासारखे नसते याची खेदजनक जाणीव जानेवारीच्या दिनांक ४ किंवा ५ पासूनच व्हायला लागते. पहिल्या तारखेला मात्र दैनंदिनीतले पान अपुरे वाटते. मजकूर चांगला ४ जानेवारीपर्यंत कागदावर पडलेल्या तेलाच्या थेंबासारखा पसरत जातो. (उपमा पटत नसल्यास सोडून द्यावी.) पण प्रेयसीची भेट हे देखील नित्यकर्म झाले की प्रथमदर्शनी चवळीच्या शेंगेसारखे वाटलेली तिची बोटे बरीचशी तोंडल्याच्या वळणावरची आहेत हे उमजते. तसेच प्रथम सडसडीत वाटणारी दैनंदिनीची पाने नको तितकी एेसपैस वाटायला लागतात. दैनंदिनीची प्रेयस्यावस्था संपते आणि नवलाई संपल्यावर प्रेमाराधनात तरी काय उरते ?
प्रेयसीची भेट म्हणजे काही नित्यनेमाने संघाच्या शाखेवर नमस्ते सदा मातृभूमी करायला जाणे नव्हे. तसं पाहिल तर एकेकाळच्या माझ्या दैनंदिनीतली पहिली ७/८ पाने टेरिफिक काव्यमय आहेत. एका प्राचीन डायरीतला माझा २ तारखेचा मजकूर तर चांगला ५ तारखेपर्यंत, केळीच्या पानावर वाढलेले आळवाचे फतफते मिठापर्यंत ओघळत जावे तसा वाहत गेला आहे. ‘तू माझी अन् तुझा मीच’ पासून ते ‘काढ सखे गळयातले तुझे चांदण्याचे हात’ पर्यंत मराठी काव्यातल्या ओळीच्या ओळी त्या पानापानांतून धावताहेत.
८ जानेवारीला ‘डायरीचे हे एवढेसे पान… माझ्या कोसळणाऱ्या भावनांचा धबधबा…ह्या चिमुकल्या डायरीच्या पानाच्या द्रोणात कसा साठवणार ?’ अशीही टिंबओळ आहे आणि ९ तारखेपासूनची पुढली पाने कोरी आहेत. त्यानंतरच्या डायऱ्यात काव्य आटत गेले आहे. ‘चांदण्याच्या हातांचे’ कणीक तिंबलेल्या पिठाच्या हातात पर्यवसान झाल्यावर काव्यबिंव्य कुठल परवडायला ? नंतरच्या एका वर्षातल्या डायरीतल्या २ जानेवारीच्या पानावर ‘त्रिफळाचूर्णाचे भाव का वाढावेत कळत नाही. महायुद्धाचा आणि त्रिफळाचूर्णाचा काय संबंध ?’ असाही मजकूर आलेला आहे. थोडक्यात दैनंदिनीची हळूहळू दैन्वंदिनी व्हायला लागली आहे.
ते काही का असेना, १ जानेवारी आली की नवे संकल्प मनात गर्दी करायला लागतात आणि भेटीदाखल येणाऱ्या डायरीची प्रतीक्षा सुरू होते. ह्या नव्या संकल्पात कालमानाप्रमाणे, जुनी पत्रे एकदा नीट पाहून, नको असलेली फाडून टाकून व्यवस्थित लावून ठेवावी, ठिकठिकाणी निर्वासितांसारख्या तळ ठोकून पडलेल्या पुस्तकांच्या आणि मासिकांच्या गठ्ठयावरची धूळ झटकून त्यांची विषयवार विभागणी करून, वहीत नोंद करावी असे काही संसारपयोगी संकल्पही असतात. ते पार पडतात की नाही याला महत्त्व नाही.
खरी मजा वेळोवेळी आपल्याला कुठले संकल्प सोडावेसे वाटले ते पाहण्यात आहे. ते नाही पाळता आले म्हणून हताश होऊ नये. आपण अमुक अमुक करण्याचा किंवा न करण्याचा संकल्प सोडलाय हे सांगण्यातच तो जणु काय पार पाडलाय असा ध्वनी असतो. ‘मन मुद्द तुझं गोष्ट हाये प्रिथिवी मोलाची’ हे आपलं सर्वात आवडतं गाणं हे सांगण्यामागे आपण जणु काय आयुष्यातला साऱ्या भानगडी शुद्ध मनानेच केल्या असा सूर असतो. तसच हे संकल्प सोडण्याचं आहे. शिवाय सार्वजनिक रीतीने हे जाहीर केलेले संकल्प पार पडले की नाही हे पाहायला जिथे कोणी जात नाही तिथे खाजगी संकल्पाची कोणाला आठवण असणार ?
— लेखन : पु.ल.देशपांडे.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800