‘विश्वपटावरील काव्यरंग’
‘विश्वपटावरील काव्यरंग’ हा निवृत्त न्यायमूर्ती श्री जीवन आनंदगांवकर यांचा अत्यंत प्रभावी व आशयसंपन्न अनुवादित काव्यसंग्रह नुकताच अभिजात मराठी भाषा- साहित्य पटावर अवतरला आहे.
अलौकिक प्रतिभावंत, बंडखोर तत्त्वज्ञ, साहित्यिक, चित्रकार व जीवनाचा भाष्यकार खलिल जिब्रान, विश्वाचे आध्यात्मिक शिक्षक जे. कृष्णमूर्ती, सर्वश्रेष्ठ गूढवादी कवयित्री एमिली डिकीन्सन, डब्ल्यू.बी यीट्स, राल्फ वाल्डो इमर्सन तसेच पाब्लो नेरुदा, डेव्हिड एल वेदरफोर्ड, राबर्ट फ्रॉस्ट, रॉबर्ट ब्राऊनिंग, लॉर्ड बायरन, चार्ल्स बुकोव्हस्की अशा एक ना अनेक विश्वविख्यात पश्चिमी महाकवींच्या जवळ जवळ १२४ कविता काव्यानुवादासाठी घेणं, हे शिवधनुष्य पेलण्यासारखंच आहे. पण ते जीवन आनंदगांवकर यांनी यशस्वीपणे पेलले आहे. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करायलाच हवे !
काव्याशय व जीवनदृष्टी जितकी अनंतमयी, समृद्ध व उदार असेल, तितका रसिकाला मनोमन नव्या जाणिवेचा प्रकाश मिळतो, एवढे मात्र निश्चित! विश्वंभर चेतनेशी नाळेचे नाते असणार्या या सार्या विश्वकवींची नित्यनूतन महान जीवनदृष्टी तसेच त्यांची तेजोमय जगण्याची व चिंतनाची प्रक्रिया ही विलक्षण काव्यमय व साक्षात्कारी आहे. एकूणच, मानवी अस्तित्त्वाची गहन सत्ये सारेच थोर कवी आपल्या तळहातावर ठेवतात. त्यातील महान तत्वविचार, सद्गतीच्या व परिवर्तनाच्या त्यांनी दर्शवलेल्या दिशा, काव्यातील सौंदर्य व महात्म्य पाहून आपले मन विस्मयचकित होते.
जे कृष्णमूर्ती, खलिल जिब्रान तसेच एमिली डिकन्सन या तिघांच्या कविता संग्रहात अधिकतर आहे. प्रत्येक कविता जीवनाचा एक नवा सखोल साक्षात्कार देत वाचकाला समृद्ध करते.
एकूणच अयांश प्रकाशन, पुणे, यांनी प्रकाशित केलेला हा अनुवादित काव्यसंग्रह आपण संग्रही ठेवण्यासारखाच आहे. कारण त्यातच वाचकाच्या जीवनाची समृद्धी आहे, असे म्हटल्यास ते अतिशयोक्त ठरू नये !
— परिक्षण : दिलीप कुलकर्णी. पुणे
— निर्मिती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800