Wednesday, February 5, 2025
Homeसाहित्य"माध्यम पन्नाशी" : २०

“माध्यम पन्नाशी” : २०

“स्टंटगर्ल रेशमा”

“कौन बनेगा करोडपती” चा शो टीव्हीवर सुरू आहे. हॉट सीटवर ड्रीमगर्ल हेमा मालिनी ! अजूनही तशाच टवटवीत! फ्रेश ! पाठीमागून हळूच हांक येते. “अरी ओ बसंती !” हेमामालिनी चमकून त्या दिशेने पाहतात. तेवढ्यात दुसऱ्या बाजूने पुन्हा हळूच हांक येते. “अरी ओ बसंती !” हेमामालिनी हैराण ! कोण बोलवतय असं आपल्याला ?
तेवढ्यात डायसवर अवतीर्ण झालेल्या रेशमाकडे हेमामालिनीची नजर जाते. आश्चर्याने थक्क होत त्या हॉट सीटवरून उठतात आणि झेपावून थेट तिला कवेंत घेतात.

ती—- रेशमा भारावून म्हणते, “हेमाजी आपने हमे हमेशा बहुत इज्जत दी ! बहोत प्यार दिया ! हम भुले नही !”
हेमा मालिनी अमिताभ बच्चन यांना सांगतात, “पहचाना इसे ? ये है रेशमा—– पहिली स्टंट गर्ल रेशमा !”
हा सीन पाहता पाहता मी ४० वर्ष मागे जाते.

जुलै महिन्यातील एक ढगाळ दुपार ! पर्स सावरत मी मस्जिद स्टेशनवर उतरते. थोड्याच वेळांत मुख्य रस्ता सोडून उजवीकडच्या गल्लीत वळते. आता हमरस्त्यावरील चित्र क्षणांत बदलत.अरुंद गल्ल्यांच्या दुतर्फा मुस्लिम मोहल्ले ! मोहल्ल्याच्या बाहेर जागोजागी खाटा टाकलेल्या! त्यावर पानाने रंगवलेल्या तोंडाने बाजूलाच पिंक टाकीत गप्पा मारणारे अर्धे उघडे, लुंग्या लावलेले, तलवार कट दाढीवाले पुरुष, घागरा, चोळणा आणि त्यावर काळा बुरखा डोक्यावरून तोंडापर्यंत ओढून घेत, तारस्वरात कलकलणाऱ्या बायका. गुलाम अलीच्या गझला गिऱ्हाईकांना ऐकवता ऐकवता दोन गुलाबी चायचा कडक पुकारा करणारी मुसलमानी हॉटेल्स, पानाचे ठेले, आणि पत्र्याच्या शेड्स मध्ये भंगाराचा किंवा तत्सम इतर अनेक प्रकारचा उद्योग करणारे त्यांचे स्वजातीय ! सर्वच घरांची तोंडं आंतल्या बाजूला वळवलेली ! पण खिडकीचा एक किलकिलता डोळा मात्र गल्लीच्या तोंडावर रोखलेला.

वाटेतल्या पानाने तोंडं रंगवलेल्या पुरुषांच्या ओशट नजरा चुकवत, मी एका एकमजली मोहल्ल्याच्या मोडक्या लाकडी जिन्याने वर जाते. वरच्या मजल्यावरील चौकोनी चौकात बरोब्बर मध्यभागी नळावर युद्ध पेटलेलं ! बायकांच तारस्वरातलं ओरडणं ! पोरांचं आकांताने किंचाळणं आणि पुरुषांचं अर्वाच्य शिव्या देत भांडण सोडवणं आणि पुन्हा भांडणावर येणं ! आत्ता या क्षणी यातलं कोणीही भस्सकन खिशातून चाकू बाहेर काढेल आणि समोरच्यावर वार करेल इतकं वातावरण तापलेलं ! मार खाणारणीला घेराव घालून वाचवू पाहणाऱ्या पुरुषांच्या गराड्यात, वस्त्रांचं भान सुटलेली एक मुलगी मुसंडी मारून आंत शिरते आणि त्या बाईचा गळाच पकडते.
“बोल साली हरामजादी ! क्यूं मेरे बहन को मारा ? मेरे बहन पे हाथ उठाती है ? तेरे दोनो हाथ कलम करके रख दूंगी !”
त्या चवताळलेल्या वाघिणीचे हात फटाफट तिच्या तोंडावर, अंगावर पडत असतात. डोळ्यांत रक्त उतरलेलं! तिचं ते उग्र रूप पाहून आजूबाजूच्या बायकाच काय पुरुष सुद्धा पाऊलभर मागे सरकतात.

मी क्षणभर खिळून भयभीत नजरेने हे दृश्य पहात उभी राहते. हळूच शेजारच्या बाईला विचारते, “रेशमा— रेशमा कहा रहती है ?” माझा आवाज ती धट्टी कट्टी चवताळलेली वाघीण नेमका टिपते. मारामारी थांबवून दोन्ही हात झटकते आणि माझ्यासमोर उभी राहते.
‌”मै हू रेशमा ! चलो उपर दीदी !” भीतीने माझे पाय लटपटायला लागतात. अवघा धीर एकवटून मी तिच्या सोबत चालू लागते. ती मला घेऊन तिच्या खोलीत येते. १० बाय १२ ची चाळीतली टिचभर खोली! त्यांत वय वर्षे पाच ते अठरा मधली भावंड ! तिथेच एका कोपऱ्यात मला ती खुर्ची देते. “ठंडा” मागवते.
फॅन्टाचे घुटके घेत मी “अनोळखी पाऊलवाटा” सदरासाठी रेशमा या स्टंटगर्लच्या मुलाखतीला सुरुवात करते.

आमच्या गप्पा रंगात येतात आणि मग लक्षात येतं, ही काहीशी रासवट गावरान रेशमा h! तलम रेशीमपण फक्त नावातच वागवणारी धट्टीकट्टी मजबूत बांध्याची रेशमा! बोलण्यात वागण्यात कुठेही रेशमी मुलायम पण नाही. पण तरीही तिच्या असल्या गावरान स्वरूपाला विश्वासात घेतलं, त्यावर स्नेहाचे चार गुलाब पाण्याचे थेंब शिंपडले, तर ते गावरान रूपही फुलून येतं ! फिल्मी दुनियेचं बाजारू बेगडी स्वरूप वास्तव जीवनात मिसळून तयार झालेल्या रसायनानुसार ती स्वतःला माझ्यासमोर पेश करत असते कृत्रिमपणे ! ते करत असतानाच ती स्पष्टपणे बोलून जाते, “फिल्म इंडस्ट्रीत येऊन जी धाडसाची कामं मी अंगावर घेतली, त्यामागे निव्वळ मजबुरी होती. या मजबुरीमुळे जी ताकद, जोश येतो तो वेगळाच असतो ! मजबुरी पोटी जी रिस्क मी घेत होते, वो हकीकत थी ! जिंदगीकी वो सच्चाई थी ! नाहीतर कोणाला असल्या कामाची हौस असते ?”

“राखी और हथकडी” या पहिल्या चित्रपटात चौदाव्या वर्षी स्टंट करण्यासाठी सर्वात प्रथम ती उभी राहिली. पहिल्या कामाचे १७५ रुपये मिळाले आणि तिच्या लक्षात आलं, रिस्क घेतलं तर भरपूर कामही मिळेल आणि पैसाही ! भावंडांची आणि आईची कायमची ददात मिटेल ! ते सुखाने चार घास खाऊ शकतील. आणि मग ती म्हणते तसं “हमने अपनी जिंदगी दाव पे लगा दी !” शोले मध्ये हेमामालिनीचे बग्गी चालवतानाचे स्टंट करताना पहिल्यावेळी बग्गीचे घोडे उधळले आणि ती जमिनीवर फेकली गेली. तिच्या जीवावर बेतले. पण ती हिंमत हरली नाही. घोडेवाल्याला तिने इतकच सांगितलं की मी न पडण्यासाठी काय करू तेवढच फक्त तू सांग. त्यांनी सांगितलेलं तिने सगळं नीट लक्षात ठेवलं आणि अल्लाकडे दुवा मागितला. “हे अल्ला रहम कर. बडी मजबूर लडकी हू. मेरी बेसहारा मा और भाई बहन इन सब की जिंदगी बसानी है ! तो भले मेरी अकेली की जिंदगी बरबाद क्यूं ना हो ?” तिची आई तर कोपऱ्यात जपाची माळ घेऊन बसली होती. अजिबात रायडिंग न येणारी रेशमा ! त्यादिवशी रेशमाने बेफाम रायडिंग केलं. शॉट ओके झाला आणि तिने अल्लाकडे दुवा मागितला.
त्यादिवशी रायडिंग करताना ती वाचली. पण ‘उपरवाला जाने’ या चित्रपटासाठी रेहानाचे स्टंट करताना मात्र तिच्या वाट्याला आला रेसचा घोडा ! वर्माजींचा देवदास ! त्याने तिला फेकूनच दिले आणि ती रक्तबंबाळ होऊन रस्त्यात पडली.

तिला ड्रायव्हिंग येत नाही. पण तरीही तिने ‘गरम मसाला’ चित्रपटात लेफ्टहॅन्ड ड्रायव्हिंगवाली ओपन इम्पाला चालवली. एकदा सुताराने चुकून एका बॉक्सची मागची बाजू सैल ठेवायची सोडून तिथे आठ दहा भले मोठे खिळे ठोकले. रेशमा त्या बॉक्समध्ये अडकली. आगीचा सिन होता. आगीच्या ज्वाळांनी तिला लपेटून टाकलं. सुदैवाने तिचे मास्टरजी मन्सूरभाई तिच्यापर्यंत पोहोचले आणि आगीच्या लोळातून तिला बाहेर काढलं. एकदा तर शॉट देताना ती दरीतच कोसळली. एकदा शर्मिला टागोरचा स्टंट करताना जयपूरच्या भयानक गर्मीत उंट पागल झाल्यामुळे ती उंटाच्या पाठीवरून फेकली गेली आणि रेतीत गडगडत गेली. त्या गरम रेतींत पडल्यावर जणू आगीच्या प्रचंड लोळात फेकलं गेल्यासारखं तिला वाटलं. तिला भयंकर वेदना झाल्या. या शॉटचा पुन्हा रिटेक झाला. त्यात या बहाद्दर मुलीचे रमजानचे रोजे चालले होते.

एकदा तिने हत्ती बरोबर स्टंट केले. तर एकदा तोंड शिवलेल्या आणि त्यामुळे चवताळलेल्या वाघाशी तिने कडवी झुंज दिली. त्याच्या पंजाने तिच्या शरीरभर कितीतरी जखमा झाल्या. लाल ड्रेस पाहून पिसाळलेल्या आडदांड बैलाबरोबर रेशमाने खरोखर लाल ड्रेसमध्ये झुंज दिली. एकदा चित्रनगरीत शे दीडशे उधळलेले घोडे तिच्या अंगावरून गेले. त्यांच्या टाचांखाली ती होलपटत होती. शोले चित्रपटातली गोष्ट ! सुताराच्या चुकीमुळे टांग्याचं चाक ठरल्याप्रमाणे निखळलं नाही आणि डावीकडे बॅलन्स जाऊन रेशमा जमिनीवर पडली आणि तिच्या अंगावर टांग्याचं धूड पडलं. ती साफ चिरडून गेली. तीन तास त्या जंगलात ती बेशुद्ध होती. गंमत म्हणजे शुद्धीवर येताच ती पुन्हा शॉट द्यायला तयार झाली. अंगभर जखमा होणं, हातपाय मोडणं हे तिच्यासाठी नित्याचच ! असं असूनही बहिणीचं लग्न चालू असताना ती मात्र दुपारपर्यंत “गरम मसाला” चित्रपटाचे स्टंट सीन्स करत होती. कारण तिला संध्याकाळी बहिणीच्या लग्नाची बिलं चुकती करायची होती.

तर अशी ही रेशमा ! करारी मुद्रेने तडफदारपणे हे किस्से सांगते. चित्रपट सृष्टीतल्या हिरो हिरोईन्सचे एकेरी उल्लेख करत त्यांच्या अनेक हकीकती रंगवून सांगते. आजवर चित्रपटातल्या हिरो हिरोइन्सना मुलाखती देताना तिने पाहिलेलं होतं. ऐकलेलं होतं. आज तिला ते स्थान आणि तो मान मिळालेला होता. कोणीतरी पहिल्यांदा तिची, तिच्या कामाची दखल घेतलेली होती. त्यामुळे ती खुश होऊन भरभरून ‌बोलत होती. अगदी त्या हिरो हिरोइन्सच्या सारखंच अक्कडबाजपणे !
हळूहळू माझ्या लक्षांत येऊ लागलं की ही अक्कड, ही मोठेपणा मिरवण्याची स्टाईल, हे रेशमाचं खरं रूप नाही. हा वरवरचा दिखावा आहे. तिचे डोळे काही वेगळंच बोलतायत. आंत खोलवर काहीतरी सलतंय. दुखतंय. डाचतय. जे शब्दांतून या क्षणी ‌व्यक्त होत नाही. ही मुलाखत खूप वरवरची होतेय. उथळ होतेय.
‌तिला तसं थेट सांगणं माझ्या जीवावर येतं. मी हळूच म्हणते, “रेशमा आता खूप उशीर झालाय. तुझ्या आईला स्वयंपाक करायचा आहे. भावाला अभ्यास करायचा आहे. त्यांची कामं अडलेत. तेव्हा आपण पुन्हा भेटू !” ती होकार देते.

रेशमाबरोबर दुसरी मुलाखत रंगते ती माझ्या ऑफिसच्या गच्चीत ! समोर अथांग पसरलेला समुद्र ! पाण्यावर हेलकावे खाणाऱ्या छोट्या छोट्या बोटी ! पावसाळी कुंद हवा आणि नीरव शांतता——
रेशमा पुन्हा एकदा जीवावर बेतलेले प्रसंग सांगू लागते. बोलता बोलता ती कातर होते. माझा हात धरते आणि तिच्या डोळ्यांना पाण्याच्या धारा लागतात. भान हरपलेल्या अवस्थेत ती बोलू लागते, “दीदी वाघाशी मी झुंज दिली. रेड्याशी मी झुंज दिली. या बघ माझ्या अंगावरच्या जखमा ! त्या बुजल्यात आणि‌ त्यांच्या फक्त खुणा उरलेल्या आहेत शरीरावर ! पण चित्रपटसृष्टीतले नामचीन निर्माते दिग्दर्शक यांनी लचके तोडलेल्या शरीर- मनावरच्या त्या जखमा मात्र आजही बुजलेल्या नाहीत. आई-वडिलांचं आणि त्यांनी जन्माला घातलेल्या मुलांचं पोट भरण्यासाठी, त्यासाठी कामं मिळवण्यासाठी ज्या तडजोडी कराव्या लागल्या, ते घाव माझ्या मनावर खोल जखमा करून गेलेत. त्यांचं काय करू ?”
त्या बहाद्दर मुलीचा हा हळवा प्रश्न ऐकून माझ्या काळजात कढ दाटून येतात. लग्नाची, जोडीदाराची, संसाराची स्वप्न रंगवण्याच्या वयात किती यातना भोगते ही मुलगी ! लग्नाचा विषय निघतो तेव्हा ती अबोल होते. हळवी होते आणि तो विषयच टाळते.

मुलाखतकाराचं नातं संपून मैत्रीचा गोफ विणला गेला, तेव्हा बंद शिंपल्यातील हे मनोगत अत्यंत हळुवारपणे तिने उलगडून दाखवलं. मी ही ते तितक्याच कसोशीने जपलं.
‌मात्र त्या रात्री माहेर मधला स्टंटगर्ल रेशमाच्या बहादुरीची कहाणी सांगणारा लेख बाजूला पडला आणि ‘महाराष्ट्र टाईम्स’ साठी मी वेगळा लेख लिहिला. “स्टंट गर्ल रेशमाच्या काही झुंजी काही जखमा !”
त्या रात्री लेखन प्रक्रियेची एक वेगळीच ओळख मला झाली.
आपल्या अंतर्मनातल्या भावनांच्या प्रकट अविष्कारासाठी “व्यक्त होणे” ही प्रत्येक कलाकाराची गरज असते. मात्र त्यासाठी प्रत्येक कलाकार आपापले माध्यम निवडत असतो. गायक सुरांचं, लेखक शब्दांचं, चित्रकार रंगरेषांचं, तर शिल्पकार
मृत्तिकेच्या माध्यमातून आपले अंतरीचे भाव व्यक्त करतात. ते भाव व्यक्त करण्याचं आणि ते श्रोते अथवा वाचक यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं माझं माध्यम होतं शब्द ! लिखित वा मौखिक !

रेशमाच्या पहिल्या मुलाखतीतून हे भाव नेमकेपणाने व्यक्त होत आहेत असं मला जाणवत नव्हतं. त्यामुळे ही मुलाखत माझ्या स्वतःच्याच आत्म्याला स्पर्श करत नव्हती. जर तीचं कथन माझ्या आत्म्याला स्पर्श करत नसेल, तर माझ्या वाचकांच्या हृदयाला ते कसं हात ‌घालणार ?
‘अनोळखी पाऊलवाटा’ या सदरातली स्टंट गर्ल रेशमाची मुलाखत वाचकांना भावली. त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने महाराष्ट्र टाइम्सचा ‘स्टंट गर्ल रेशमाच्या काही झुंजी काही जखमा’ हा लेख वाचकांच्या हृदयाला स्पर्शून गेला. मला वाटतं, प्रत्येक लेखकाचं वाचकांशी, त्यांच्या काळजाशी हे असं अलवार नातं असतं. त्या नात्यातला प्रामाणिकपणा जपणं हेच लेखकाचं खरं संचित ! खरं कौशल्य !
क्रमशः

लेखन : माधुरी ताम्हणे. ठाणे
निर्मिती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. स्टंट गर्लचे विलक्षण स्टंट वाचून भितीचं वाटली.ह्या मुलाखतीमुळे ह्या स्टंट करणार्‍या व्यक्तींचे चित्तधरारक अनुभव विश्व जवळून दिसले.

  2. Madhuri , ” Stunt girl Reshma ” is just superb. Your writing is very lively. You and Reshma together have no limits. Your ornamental language and Reshma’s bold , daring ,life threatening stunts are hair raising. God bless.

  3. वाचूनच अंगावर काटा येतो. त्यांच्या भावना समजू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी