भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, स्त्री जाती उद्धारक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कायमस्वरूपी स्त्रियांनी गुलामगिरीतच राहावे अशा नकारात्मक मानसिकतेतील समाजाविरुद्ध जाऊन स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी ज्यांनी आयुष्यभर लढा दिला त्या म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन…
– संपादक
१. स्वप्न सावित्रीचे
किती ऐकले बोलणे
त्याग सुखाचा करून
पाया विद्येचा रचिला
हाती पुस्तक घेऊन
शिक्षणाचा अधिकार
कसे मिळाले असते
जर भीतीने पाऊल
तिचे थांबले असते
ज्योती होऊन पेटली
दिले ज्ञानाचे प्रकाश
मुक्त करून आम्हास
दिला मोकळा आकाश
दरवाजे बंधनांचे
आता तरी उघडूया
नाव घेत सावित्रीचे
झेप आकाशी घेऊया
हाती घेऊन मशाल
दूर करूया अंधार
तिने पाहिले जे स्वप्न
चला करूया साकार
ओझे हे कर्मकांडाचे
थोडे ठेवून बाजूला
नव्या युगाच्या साक्षीने
चला पाहूया जगाला
— रचना : पूनम सुलाने-सिंगल. जालना
२. सावित्री
होती एक सावित्री
स्त्री शिक्षणाची उद्गाती
प्रथम स्वतः शिकूनी
द्वार खुले केले मुलींसाठी…
शिक्षणासाठी लढतांना
शेण गोटे झेलताना
संयम तिने सोडला नाही
वसा शिक्षणाचा ठेविला अखंड …
कुप्रथा विरुद्ध बंड करतांना
जोतिबाची साथ सोडली नाही
अनाथांची माय होऊनी
आश्रय दिला विधवांना…
कष्टमय जीवन जगताना
अपार संकटांना गेली सामोरी
प्लेग पीडितांची सेवा करतांना
झुंज दिली प्राणपणाने…
ज्ञानाची एक पणती लावूनी
अनक्षराला देऊ अक्षर ज्ञान
शिक्षणाची गंगा वहाती ठेवू
नित्य करु तिचे स्मरण …
— रचना : डॉ. प्रभा वाडकर.
३. कळी ऊमलु द्या
कळी उमलली, खुद्कन हसली,
आणि उमललेल्या स्वतःला
पाहुन मनोमन लाजली !
स्वतःच्याच गंधाने खुपंच सुखावली,
आणि अलगदशी आपल्याच पानावर विसावली !
लागता तिच्या गंधाची चाहुल,
सुरु झाली भुंग्यांची गुंजारव,
कळीला मात्र वाटले तेव्हा,
हेच आहे माझे खरे वैभव !
बेसावध असतात हे क्षण,
अशावेळी आणि कधीतरी मग कळी चुरगळते,
एकाकी संध्याकाळी, स्वप्न तिचे चुर होते
एका क्षणात, कळी मग कुस्करली जाते तनामनात !
एखादी कळी मात्र ऊमलुन बहरते,
देवापुढे नतमस्तक होते नि
स्वतःला खुप भाग्यवान समजते,
आणि त्या विधात्याचेच गुणगान गाते
ठरवायचे असते आपण,
आयुष्याच्या अशा फसव्या क्षणी,
व्हावे त्या भुंग्यांचे बळी,
की व्हावे एखादी चमकदार हिरकणी !
कन्या जन्माला आली,
तर म्हणतात जन्मले कन्यारत्न,
योग्य कोंदण मिळताच
त्याचे होते नवरत्न !
आपल्या प्रखर तेजाने
ती दुर सारी अंधाराला,
प्रसन्न सर्वांना राखण्या,
ती साद घाली प्रकाशाला
दोन कुटुंबांना जोडणारा
असतो तो दुवा,
क्षणाची पत्नी व अनंत काळची माता
होण्याचाच अट्टाहास हवा
आणखीही असतात नाती कित्येक,
जपावीत ती प्रत्येक!
शिक्षण, कर्तबगारी, कर्तृत्व
यांची जेव्हा होईल एकी, तेव्हाच गर्वाने म्हणुयात,
आम्ही आहोत…..
सावित्रीच्या लेकी
सावित्रीच्या लेकी
— रचना : अमिता पै.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
सर्व कविता अप्रतिम आहेत 👌👌👌👌👌