रोहित व रिमा यांच्या लग्नाचा आज दहावा वाढदिवस होता त्यामुळे ते दोघेही खूप खुश होते. त्यांची मुलगी राणी अवघी सात वर्षांची पण आईला घरातील सजावटीत मदत करीत होती.
सासूबाईनी देखील दोघांच्या आवडीचे जेवण स्वतः बनविले होते व सूनबाईंला स्वयंपाक घरात न येण्याची सक्त ताकीत दिली होती.
असे ही चौकोनी आनंदी कुटुंब जिथे प्रेम, जिव्हाळा होता.सर्व जण एकमेकांची काळजी घेत होते. सासू सुनेचे नाते तर अगदी आई व मुलीसारखे होते. जणू दोघींना मनातले सांगायची एक हक्काची जागा…..
रोहित नोकरी करत होता. अतिशय हुशार, प्रामाणिक, हळवा, सर्वांच्या मदतीला धावून जाणारा. प्रचंड उत्साही, मनमिळाऊ व हसतमुख स्वभाव असल्याने सर्वांचा प्रिय असा.. असे हे समाधानी व संतुष्ट मध्यमवर्गीय कुटुंब.
तिघीही रोहितची येण्याची आतुरतेने वाट पाहत होते. त्याला नेहमी पेक्षा थोडा उशीर झाला होता. त्यामुळे काळजी वाटत होती. फोन लावला पण तो लागत नव्हता. त्यामुळे अजून चिंता वाटू लागली. आजपर्यंत असे कधीही झाले नव्हते.
रोहितला काही कारणाने उशीर होणार असेल अथवा अचानक कोणते काम आले किवां कोणाला भेटायला जायचे असेल तर तो घरी आवर्जून फोन करून सांगत असे. असा तो खूप जबाबदार होता.
बघता बघता चार तास उलटून गेले तरी रोहितचा काहीही पत्ता नव्हता. त्याच्या सर्व मित्रांना व ऑफिस मध्ये ही फोन लावून झाला. तो वेळेतच ऑफिस मधून निघाला असे ही कळले होते. मग रोहित कुठे असेल ? काय करावे काहीच सुचत नव्हते. आता मात्र रोहितच्या आई व बायकोचा धीर खचू लागला. दोघीही खूप घाबरल्या. राणी पण बाबा बाबा म्हणत रडू लागली.
त्याचे मित्र व शेजारी देखील त्याला शोधण्याचा प्रयत्न करत होते. पण….
सर्व मंडळी हताश झाली. शेवटी पोलीस स्टेशनला जाऊन कम्प्लेट करावे असा निर्णय घेतला. या तिघींची अवस्था तर फारच वाईट झाली होती.
रोहितची आई देवापुढे जाऊन जप करत बसली होती. तर रिमा…… दाराकडे एकटक त्याची वाट पाहत होती. मुलगी राणी आईच्या मांडीवर रडून रडून झोपून गेली.
रिमा फक्त एकच गोष्ट सारखी सारखी म्हणत होती, “रोहितने कधीच कोणाचे काही वाईट केले नाही वाईट चिंतले नाही त्यामुळे तो नक्की येणार माझे मन म्हणते तो नक्की येणार.”
थोडी वाट पहावी अशी काही मंडळी म्हणाली. दरम्यान शोध मोहीम ही चालू होती. असे करता करता रात्रीचे दहा वाजले.
राणीला शेजाऱ्यांनी गोड बोलून थोडे खाऊ घातले मात्र आई व बायको उपाशी होत्या. साधा पाण्याचा घोट ही घेतला नव्हता.
आईना डायबेटीस असल्याने चक्कर येत होती म्हणून शेजाऱ्यांनी खूप समजूत घालून थोडे दूध दिले. मात्र रिमा तशीच शांत बसली होती निशब्द….
आज तिला केवढा उत्साह वाटत होता. ती छान नटून थटून आवरून बसली होती. त्याच्यासाठी छान भेटवस्तू आणली होती. रडून रडून डोळे लाल झाले होते. तिची अवस्था खूपच वाईट झाली होती.
तेवढ्यात…… शेजारील छोटू पळत पळत आला व रोहित दादा आला, रोहित दादा आला, असे म्हणत नाचु लागला.
रोहितने दारात पाऊल टाकताच मुलीने त्याला घट्ट मिठी मारली. रोहित बरोबर एक लहान मुलगा व त्याचे आजोबा होते. त्या लहान मुलाच्या हातावर व पायावर पट्टी बांधलेली दिसत होती व रोहितच्या डोक्यावर देखील पट्टी होती.
हे पाहताच सर्व घाबरले, पण रोहितने सर्वांना शांत केले.
रोहित आई जवळ येताच आईने प्रेमाने त्याच्या चेहऱ्यावरून हाथ फिरवला व देवाला नमस्कार करायला गेली. रिमा आता ढसा ढसा रडू लागली. तिला आनंदाश्रू आता लपवता येत नव्हते.
रोहितला सर्वांच्या मनःस्थितीचा अंदाज आला होता. उशिरा येण्याचे कारण तो सांगू लागला. सर्व स्तब्ध होऊन ऐकत होते……
रोहित सांगू लागला…
मी बरोबर वेळेत ऑफिस मधून निघालो. आज लग्नाचा दहावा वाढदिवस म्हणून रिमाला एक छान साडी घेतली. तिला आवडतो म्हणून मोगऱ्याचा गजरा देखील घेतला. राणीला खेळणी घेतली व आईचा आवडता वडा देखील घेतला. गाडीत बसणार तेवढ्यात समोर पाहिले एक सात ते आठ वर्षाचा मुलगा आजोबांचा हाथ सोडून भर रस्त्यात बॉल मागे पळत होता. ते आजोबा जोरजोरात ओरडत होते माझ्या नातवाला धरा माझ्या नातवाला वाचवा. कारण……
समोरून मोठा ट्रक येत होता. कोणताही विचार न करता मी पळत पळत त्या मुलाच्या मागे धावलो. त्याला लगेच उचलले व पळालो. पुढे एका झाडाला जाऊन आदळलो. ट्रक ड्रायव्हर पळून गेला होता. मुलाच्या पायाला व हाताला लागले होते. रक्त येत होते व माझ्या डोक्याला मार बसला.
त्या मुलाचे आजोबा खूप घाबरले होते रडतच ते सांगू लागले माझा मुलागा व सून बाहेरगावी गेले आहेत. नातवाने हट्ट केला म्हणून मी बाहेर पडलो होते आता घरी काय सांगणार …… त्यांना काय करावे सुचत नव्हते. त्यामुळे त्यांना धीर देत आपल्या गाडीतून त्या दोघांना घेऊन दवाखान्यात गेलो.
डोक्याला रुमाल बांधला, मला त्या मुलामध्ये राणीच दिसत होती. मी ज्या ठिकाणी होतो तिथे फारशी वर्दळ नव्हती माझे पूर्ण लक्ष त्या मुलाकडे लागले होते. त्याला मलमपट्टी केली. डॉक्टरांनी जेव्हा सांगितले की काळजी करण्याचे काही कारण नाही तेव्हा कुठे जीवात जीव आला. या धावपळीत वेळ कसा गेला ते कळलेच नाही व तेथे मोबाईल ला रेंज नव्हती. संपर्क करण्याचे कोणतेही साधन नव्हते. माझ्याही डोक्याला दोन चार टाके पडले म्हणून आजोबांनी हट्ट केला की ते पण येणार सोबतीला….. म्हणून त्यांना आपल्या घरी घेऊन आलो.
आजोबा आता बोलू लागले की, त्यांचा हा नातू त्यांच्या सुनेला अनेक औषध उपचार करून पंधरा वर्षाने झाला होता…… त्यांनी हात जोडून नम्रपणे सर्वांना नमस्कार केला व रोहितचे आभार मानले. तुमच्यामुळे आज माझा नातू वाचला… त्यांना ही आनंद अश्रू लपवता येत नव्हते.
आज त्या मुलाचा पुनर्जन्म झाला होता. आज रोहितने एका मुलाचा जीव वाचवला होता. सर्व जण खूप खुश झाले व रोहितचे कौतुक करू लागले.
रोहित होताच तसा सामाजिक कार्य करणारा संकटात साथ देणारा प्रेमळ माणुसकीचे नाते जपणारा.
मात्र हा मोठेपणा अथवा कौतुक केलेले त्याला कधी आवडत नव्हते म्हणूनच… हे माझे कर्तव्य होते असे म्हणून त्याने हुशारीने विषय बदलला.
जमलेली सर्व मंडळी शुभेच्छा देऊन घरी गेली.
आजोबांना सर्वांनी आजच्या दिवस येथे राहण्याचा आग्रह केला.
रोहितच्या आईने मुलाचे व सुनेचे औक्षण केले व तुम्हाला दीर्घायुश लाभो असा आशिर्वाद दिला.
नंतर हसत खेळत जेवण झाले. सर्व कुटुंब मस्त गप्पा गोष्टीत रमून गेले.
आज रिमाचा विश्वास खरा ठरला. रोहित सुखरूप घरी आला. लग्नाचा दहावा वाढदिवस अविस्मरणीय असा होता.
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2021/07/IMG-20210705-WA0008-150x150.jpg)
— लेखन : रश्मी हेडे.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
खूप छान सकारात्मक कथा आहे.