“कोहिलू”
१९६०/६१ साल असेल ते. एक दिवस भाईंनी (आजोबा -आईचे वडील) पप्पांना त्यांच्या ग्रँट रोडच्या ईश्वरदास मॅन्शन मध्ये बोलावून घेतले. अनेक वेळा अनेक कामांसाठी भाई पप्पांना असे बोलवायचे आणि पप्पा कितीही व्यस्त असले तरी त्यांच्या फिरोजशहा मेहता रोडवर असलेल्या ऑफिस मधून ते बीईएसटी च्या बसेस बदलून ग्रँट रोडला पोहोचत. या वेळच्या त्यांच्या भेटीत भाईंचं नक्कीच काहीतरी विशेष काम असावं.
भाई पपांची वाटच पहात होते. त्यांनी थेट मुद्द्यालाच हात घातला.
“जना ! मी एक प्रस्ताव मांडतोय तुमच्यापुढे.”
“ मांडा.”
“मला असं सुचवावसं वाटतंय की आता किती दिवस तुम्ही त्या धोबी गल्लीत राहणार ? मला मालूला भेटायला यावसं वाटलं तर त्या लहानशा गल्लीत माझी गाडी पार्क करायलाही जागा नसते.”
“मग तुमचं काय म्हणणं आहे ?” पप्पा थेट पण शांतपणे म्हणाले.
“हे बघा जना, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. ठाण्यातच तुम्ही एखादा चांगल्या भागात प्लॉट बघावा आणि बंगला बांधावा असे मला वाटते.”
“सुंदर कल्पना !”
पांढरे स्वच्छ धोतर आणि सदर्यातलं, सहा फुटी उंच, गोरंपान, करारी डोळे असलेलं एक आदरणीय ताठ व्यक्तिमत्व! त्यांनी त्यांच्या लेकीसाठी ठेवलेला एक प्रस्ताव आणि होकार किंवा नकाराला टाळून दिलेलं पप्पांचं उत्स्फूर्त उत्तर.
पण फार घोळ न घालता भाई पुढे म्हणाले, ”जना ! तुम्हाला फक्त प्लॉट खरेदी, जागा निवडणे, कायदे, नंतरच्या बांधकामविषयक बाबी आणि यातायात सांभाळायची आहे. एकही पैसा तुम्ही खर्च करू नका. हा बंगला मला माझ्या लेकीला गिफ्ट म्हणून द्यायचा आहे.”
“तुमचा निरोप मी मालूला देतो.” इतकं म्हणून काही अवांतर गप्पा मारून, चहा नाश्ता घेऊन पप्पांनी भाईंचा निरोप घेतला.
या भेटीनंतर पप्पांची मनस्थिती नेमकी काय झाली असेल याचा आता माझ्या मनात विचार येतो.
आमचं रहातं घर जिजीचं होतं. जिजीच्या अपार कष्टातून ते उभं राहिलं होतं. पपांची जडणघडण त्याच घरात झाली होती. अनेक भावनिक आठवणींशी जोडलेलं होतं. शिवाय तसेही पप्पा पक्के थीअॉसॉफीस्ट होते. भौतिकतेपासून कित्येक योजने ते कायम दूर होते. कुणीतरी आपल्याला काहीतरी देतोय म्हणून आनंदात वाहून जाणारे ते नव्हतेच पण देणारा आणि घेणारा यांच्या नात्यातला भावबंध जपण्याइतका संवेदनशीलपणा त्यांच्यात होताच आणि तितकाच अलिप्तपणाही ते सांभाळू शकत होते. शिवाय भाईंनी त्यांच्या मनातला हा विचार परस्पर स्वतःच्या लेकीला न सांगता जावयापुढे मांडला होता यातही कुठेतरी त्यांचा समंजसपणा, अदब, नम्रता, कोणाच्याही जीवनात ढवळाढवळ न करण्याची वृत्ती स्पष्टपणे जाणवत होती. त्यामुळे कुणाचाच अभिमान दुखावण्याचा प्रश्न नव्हता. आपापल्या जागेवर दोघांचे श्रेष्ठत्व टिकूनच राहिले.
परिणामी आमचं कुटुंब बंगल्याचं स्वप्न रंगवण्यात गुंग झालं.
जुन्या मुंबई आग्रा रस्त्यावर, क्रिकेटर खंडू रांगणेकर यांच्या घराजवळचा एक प्लॉट खरेदी करण्याचं नक्की ठरलं. हा प्लॉट पॅट्रीक कोहिलू नावाच्या कॅथलिक माणसाचा होता. वास्तविक तो जरी त्याच्या नावावर असला तरी तीन-चार भावांचा वडिलोपार्जित इस्टेट म्हणून कायद्याने त्यावर हक्क होता. दलाला तर्फे अनेक बैठकी, व्यवहारासंबंधीच्या, भाव निश्चित करण्याबाबतच्या पार पडल्या. प्लॉट घ्यायचा, की नाही घ्यायचा यावर कधी बाजूने कधी विरोधात चर्चाही झाल्या. प्लॉटची ही कॅथलिक मालक माणसं अतिशय चांगली आणि धार्मिक वृत्तीची होती. व्यवहारात कोणती फसवणूक होणार नाही याची खात्री झाल्यावर आणि पूर्व -पश्चिम, व्याघ्रमुखी, रस्त्याला लागून वगैरे भौगोलिक आणि पुराणोक्त बाबींचा, संकेतांचा नीट अभ्यास करून या जमीन खरेदीवर एकदाचे शिक्कामोर्तब झाले आणि प्रारंभीचे साठेखत करून पपांनी संपूर्ण किमतीवरची पाच टक्के रक्कमही कोहिलू कुटुंबास कायदेशीर दस्तऐवज करून देऊन टाकली. साधारणपणे वर्षाच्या आत जमीन खरेदी करण्याबाबत नियोजन करण्यात आले. मामला व्यवस्थित, निर्वीघ्नपणे पार पडला. आता पुढील एक दीड वर्षात बंगल्यात रहायला जाण्याची स्वप्नं आम्ही रंगवू लागलो.
पण हकीकत हवीच. पप्पांचेच हे वाक्य. साधं कुठे प्रवासाला जायचं असलं वा एखादा कार्यक्रम ठरला असेल, कुणाला भेटायचं असेल तरी ठरलेला प्लॅन रुळावरून व्यवस्थित मार्गक्रमण करेलच याची कधीच हमी नसायची. काहीतरी प्रासंगिक छोटं मोठं विघ्न हे यायचंच आणि त्यालाच पप्पा विनोदाने “आपली हकीकत हवी” असे म्हणायचे.
जमीन खरेदी बाबतची हकीकत मात्र एक अत्यंत कडवट घाव देऊन गेली. अचानक एका रात्री साऱ्या धोबी गल्लीत निजानिज झाल्यानंतर, आमच्या घराच्या खाली, दारू पिऊन पार नशेत असलेला, झिंगलेला एक माणूस जोरजोरात पप्पांच्या नावाने चक्क अत्यंत घाणेरड्या इंग्लिश शिव्या देऊन बोलत होता.
“यु रास्कल, बास्टर्ड, सन अॉफ ए विच..मिस्टर ढगे..आय विल किल यु..”
माझ्या पप्पांसारख्या संत वृत्तीच्या माणसाला अशा कोणी शिव्या देऊ शकतो यावर कुणाचा विश्वासही बसणार नाही आणि हे केवळ त्याच दिवसापुरतं नव्हतं. नंतरचे एक दोन महिने तरी याच स्वरूपात ते कायम चाललं. ते दिवस फार वाईट गेले आमचे. रात्र झाली की आमच्या मनात एक भय दाटायचं. पपांना काही झालं तर ? या भयाने आम्ही सारेच थरकापून जायचो.
कोण होता तो माणूस ?
ज्याच्याकडून आम्ही जमीन खरेदीचा वायदा केला होता त्या पॅट्रीकचा हा वाळीत टाकलेला, व्यसनी भाऊ होता. वास्तविक जमिनीच्या या पैशात त्याचा कायदेशीर वाटा होता आणि तो त्याला दिला गेला नसावा म्हणून त्यांनी हा गलिच्छ, हिंसक, त्रास देणारा, धमकावणीचा मार्ग पत्करला होता आणि त्यात कुठेतरी आम्ही आणि आमचं बंगला बांधायचं स्वप्न विनाकारण भरडत होतं. वास्तविक हा त्यांचा कौटुंबिक मामला होता. त्यात आमचा दोष काय होता पण नाही म्हटले तरी एक माणूस रोज रात्री आमच्या घराखाली उभा राहून नशेत बरळतो, शिव्या देतो, नाही नाही ते बोलतो त्यामुळे आमच्या मध्यमवर्गीय, अब्रू सांभाळून, नीतीने जगणाऱ्या कुटुंबाला नक्कीच धक्का पोहोचत होता. गल्लीतले लोक पप्पांना म्हणायचे, “तुम्ही फौजदारी करा त्याच्यावर.”
हो.. खरं म्हणजे करायलाच हवी होती पण त्यातही एक गंमत होती. या कोहिलूला चार-पाच मुलं होती. त्याची बायको कुठेतरी घरकाम करून या दारुड्याचा संसार ओढत होती. रात्री हा माणूस शिव्या देऊन जायचा आणि एखाद्या सकाळी त्याची फाटकी तुटकी, बापुडवाणी दिसणारी बायको घरी येऊन पप्पांचे पाय धरायची, पोलिसात तक्रार करू नका सांगायची, त्याच्या भावांनी त्याला फसवलंय म्हणायची.. म्हणूनच तो असा बेवडा झालाय. त्याच्या मनात तुमच्याविषयी काही नाही म्हणायची. तो हार्ट मध्ये चांगला आहे असे बजावायची.
कथा कोणाची आणि व्यथा कोणाला असे झाले होते.
दारू पिऊन शिव्या देणाऱ्या झिंगलेल्या कोहिलूसमोर, खाली उतरून जिजी उभी राहायची.
“खबरदार ! माझ्या बाबाला काही बोलशील तर ? तुझ्या त्या क्रूसावरचा गॉड तुला कधी माफ करणार नाही.”
पप्पा मात्र शांतच असायचे. खरं म्हणजे त्यांनी त्याचा नुसता हात जरी पकडला असता तरी तो कळवळला असता. कदाचित बेशुद्धही झाला असता पण कुठलाही हिंसक मार्ग त्यांना हाताळायचाच नसावा. ते शांत राहिले. आमच्या भयभीत बालमनांवर मायेचं, धैर्याचं पांघरूण घालत राहिले.
llचित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्रही न खाती सर्प तया॥
जणू काही या संस्कारांचाच प्रयोग आमच्यावर होत असावा.
अखेर एक दिवस पॅट्रीक कोहिलूला दलालातर्फे निरोप धाडून त्याला सारी हकीकत सांगितली गेली आणि हा तुमचा कौटुंबिक मामला असल्यामुळे झालेला जमिनीचा सौदा सामंजस्याने रद्द करावा असा निर्णय त्याला कळवण्यात आला.
पॅट्रिक आणि त्याचे इतर भाऊ पप्पांना भेटायला आले. त्यात हाही होता. पॅट्रीकने पप्पांची पाय धरून क्षमा मागितली.
“हा जॉर्ज दारूत पैसे उडवतो. त्याला त्याच्या कुटुंबाची काळजी नाही म्हणून आम्ही त्याच्या हाती पैसे देत नाही पण त्याच्या हक्काची रक्कम बँकेत सुरक्षित ठेवली आहे जी त्याच्या मुलांच्या भविष्यासाठी उपयोगी यावी. तुम्ही सौदा रद्द करू नका. त्याला सांभाळून घेण्याची जबाबदारी आमची.”
अशा रीतीने ते प्रकरण निस्तरलं. आमच्या माथ्यावरच्या आभाळातला तो काळा ढग दूर झाला. वातावरणात विरघळूनही गेला. सारं काही शांत झालं. एक वादळ आलं आणि ओसरलं. मन थोडं ढळलं, पडलं.
आता मागे वळून पाहताना मनात विचार येतो कुठला धडा शिकवण्यासाठी हे घडलं असेल ? एखादे कडू औषध प्यायल्यानंतर बराच काळ घशात कडवटपणा टिकून राहतो ना तसं मात्र झालं …
क्रमश:
— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800
याला जीवन ऐसे नाव.