माझ्या २८ वर्षांच्या कारकीर्दीत बरेच लोक पाहिले आहेत. ज्यांनी अनेक विषयांवर लिहिण्याचे धाडस केले, तथापि राजाराम जाधव यांनी आपल्या वडिलांवर “अंधार यात्रीचे स्वप्न” हा ग्रंथ संग्रह लिहून, त्यांच्या वडिलांनी कुटुंबासाठी केलेल्या परिश्रमांसाठी आणि त्यांच्या मुलांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी, शिक्षणाद्वारे आपल्या मुलांचे जीवन बदलण्यासाठी केलेल्या संघर्षाचे कथन केले आहे. तथाकथित लेखनाला छेद देत परिसराचा जीवित इतिहास राजारामानी रेखाटलेला आहे. त्यामुळे वडिलांवर लिहिलेले हे लिखाण केवळ तांड्यामधीलच नाही, तर संपूर्ण भारतीय समाजातील अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक आहे.
“वंचितांचे विश्व” हा राजाराम जाधव लिखित ग्रामीण सामाजिक विषयांवरील वैचारिक लेख संग्रह-ग्रंथ असून यात अकरा भागात ग्रामीण भागातील वंचितांच्या समस्यांचे कथन करण्यात आले आहे. राजाराम जाधव यांनी गावा-तांड्यातील कष्टाळू, संस्कारी, सामाजिक- राजकीय, शेजारधर्म पाळणारे व्यक्तिमत्व, स्त्री संघर्ष, विद्यार्थ्यांच्या पंखात बळ भरणारे प्राध्यापक, प्राणी जगत आणि वंचितांचे विश्व आदींचे वास्तविक संदर्भ देऊन लोकनायक छत्रपति शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडरकरांचे विचार ग्रंथात नमूद केलेले आहेत.
वंचितांचे विश्व या विषयवार लिहिताना राजाराम जाधव यांनी गाव-तांड्यावरील सामाजिक जीवनाचा आधार घेत वंचितांच्या संघर्षाचे कथन केले आहे.
या ग्रंथाच्या “थावऱ्या डोकरा” या पहिल्या प्रकरणात त्यांनी थावऱ्या आणि रुपली डोकरी या कष्टाळू जोडप्यांच्या जीवनशैली विषयी लिहिले आहे. यात त्यांनी थावऱ्याच्या स्वभाव गुणांवर प्रकाश टाकला आहे. थावऱ्या हा तिरकसपणे बोलणारा, कुणासोबतही न जुळवून घेणारा असतो. पण त्याची बायको रुपली सर्वांशी जुळवून घेत नवऱ्याच्या बाजूने बोलत असे. पत्नी रुपलीचे निधन झाल्यानंतर थावऱ्याला पत्नीचे अर्थात अर्धांगिनीचे जीवनातील महत्व कळते. पत्नी सोबत नसल्यामुळे त्याचे जीवन एकांगी बनते. या पहिल्या प्रकरणात राजाराम जाधवांनी आई-वडील जिवंत असे पर्यंत त्यांची सेवा करण्याचा संदेश दिला आहे.
दुसरे प्रकरण “मोकाट्या सोमाला” नावाचे असून यात त्यांनी व्यक्तीच्या स्वभाव गुणांवर प्रकाश टाकला असून त्यांनी म्हटले आहे कि, एखाद्या व्यक्तीवर लहानपणापासून जे संस्कार होतात त्यावर त्यांचे भविष्य अवलंबून असते. याच संस्कार आणि स्वभावामुळे व्यक्ती प्रसिद्ध किंवा कुप्रसिद्ध होते. या प्रकरणातील मुख्य व्यक्ती रेखा सोमला हा बिनधास्त स्वभावाचा व कुणालाही कारण नसताना जाऊन भिडणारा असतो. याच स्वभावामुळे तिसरी नंतर शिक्षकांनी त्याला शाळेतून काढून टाकले त्यामुळे तो आणखी मोकाट बनला. सोमाला मोकाट झाल्यामुळे व गावातील त्याच्या भानगडी वाढल्यामुळे वयात आल्यावर त्याचे वडील त्याचे लग्न गरीब घरातील मुलीशी लावून देतात. पण सोमलाचा स्वभाव काही जात नाही तो काही ना काही भानगडी करून नेहमी चर्चेतच रहात असे. नेहमीच्या भानगडी, भावकीतील वितुष्ट, तांड्यातील लोकांचे हेवेदावे, कोर्ट-कचेरी या सर्व प्रकारामुळे सोमला गावकऱ्यांच्या मनातून उतरला होता. कालांतराने सोमला गावठी दारू बनवून विकण्याचा व्यवसाय करतो. सोमला आपल्या एकुलत्या एक मुलीचे व मुलांचे लग्न लावून देतो, पण घरगुती वादातून एकदिवस तो खूप दारू पितो आणि तिथेच गतप्राण होतो. मोकाटया सोमला कसाही असला तरी त्याने कधी सूड बुद्धीने कुणाचेही वाईट कधीच केले नाही. अकाली निधनाने मात्र सारे गाव हळहळ करत होते.
मा. ना. संजय भाऊ राठोड यांच्यावर लिहिलेल्या “सामाजिक जाण असलेला नेता” या तिसऱ्या प्रकरणात त्यांनी संजयभाऊ राठोड यांच्या सामाजिक व राजकीय जीवनावर प्रकाश टाकला आहे. यात त्यांनी नमूद केले आहे कि, कोणत्याही क्षेत्रात आपले स्थान पक्के करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा-दिग्रस-नेर तालुक्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या दुर्भिक्ष संकटांवर मात करण्यासाठी संजयभाऊ राठोड यांनी केलेल्या कार्याचे वर्णन तिसऱ्या प्रकरणात केले आहे. प्रकरणाच्या शेवटी त्यांनी म्हटले आहे की, संजयभाऊ आपल्या समाजाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी नेहमीच विधानसभेत आवाज उठवतात. त्यामुळे संघर्षातून आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारा रुबाबदार नेता म्हणून संजयभाऊंची सामाजिक व राजकीय ओळख झाली आहे.
चौथे प्रकरण “रज्जाक मिया” यांच्यावर असून जीवनात भेटणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वावर या प्रकरणात चर्चा करण्यात आली आहे. शेजारधर्म आणि नातेसंबंध यावर प्रकाश टाकताना राजाराम जाधवांनी रज्जाक मियाँच्या जीवन संघर्षाची कहाणी नमूद केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे कि, रज्जाक भाईंचा जीवन प्रवास हा मोठा संघर्षमय होता. लहानपणीच आई वडिलांचे छत्र हरवल्यामुळे रज्जाक भाई आपल्या काकांकडे लहानाचे मोठे झाले. पुढे रज्जाक भाईंनी सिंधी माणसाच्या पिठाच्या गिरणीवर काम करून कधी हॉटेल मध्ये तर कधी घरी डाळ-भात करून आपली जीवनश्चर्या भागवत असे. यातूनच पुढे रज्जाक भाईनी स्वतःची चक्की चालवून व इतर खटाटोप व कामे करून त्यांच्या वाई या गावाला १०-१२ एक शेतजमीन विकत घेऊन पाच मुले आणि तीन मुलींचा सांभाळ करून मुलांचे लग्न लावून दिले. खूप संघर्षातूनही व्यक्ती कशी पुढे जाते याचे वास्तविक उदाहरण राजाराम जाधव यांनी या प्रकरणात दिले आहे.
चष्मायण नावाच्या पाचव्या प्रकरणात राजाराम जाधव यांनी कुठल्याही व्यक्तीच्या जीवनात डोळ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या चष्मा या साधनावर प्रकाश टाकला आहे. यात नमूद केलेले पति-पत्नी चष्म्या शिवाय कुठलेही कार्य करू शकत नाही. चष्मा हरवल्यामुळे दैनंदिन जीवनात कोणकोणत्या समस्यांचा सामना कारवा लागू शकतो यावर याप्रकरणात प्रकाश टाकला आहे. “आमची कौसलबाई” नावाच्या सहाव्या प्रकरणात राजाराम जाधव यांनी आपले मोठ्या बंधूंच्या कन्या कौसलबाई यांच्या जीवनप्रवासाचे वर्णन केले आहे, या प्रकरणात त्यांनी म्हटले आहे की, कौसलबाई सात वर्षांची झाल्यावर तिला शाळेत टाकण्यात आले. कौसलबाई यांचे आईवडील अर्थात राजाराम जाधव यांचे दादा वाहिनी दुसऱ्याच्या शेतात राबून आपला संसार चालवत असत. दिवसभर आईवडील दुसऱ्याच्या शेतात राबत असल्यामूळे कौसलबाई यांना आपल्या पाठच्या भावंडांचा सांभाळ करावा लागत असे, त्यामुळे त्यांना चौथी नंतर शाळा सोडावी लागली. लहान वयात जबाबदारी पडल्यामूळे कोसलबाई वैचारिक परिपव्क झाल्या होत्या. पण तीन मुले आणि दोन मुली असणाऱ्या राजाराम जाधव यांच्या दादा वहिनींचे घर चालणे कठीण झाल्यामुळे कोसलबाई यांना देखील शेतात जाऊन काम करणे भाग पडले. कमी वयात कोसल यांचे लग्न तांड्यातीलच सोमला राठोड यांचा मुलगा रामराव यांच्याशी लावण्यात आले. नववधूंना काही दिवस घरात एकत्र राहू दिल्यानंतर कोसल यांच्या सासू सासऱ्यांनी त्यांना वेगळे काढून दिले. मोलमजुरी करत कौसलबाई यांचे पति रामराव यांनी घरच्या घरी किराणा दुकान टाकले, दुकान देखील बऱ्यापैकी चालयाला लागले. पण कौसलबाई यांचे पती रामराव यांना पत्ते खेळण्याचे व दारू पिण्याचे व्यसन असल्यामुळे किराणा दुकान कर्जात बुडाले. यातच रामराव यांनी रॉकेल स्वतःच्या अंगावर ओतून पेटवून घेत जीव गमावला. कम वयात वैधव्य आल्यामुळे लहान बाळाच्या पालनपोषणाची जबाबदारी कोसलबाई यांच्यावर आली. रामराव यांच्यासोबत तीन वर्षांचा संसार केल्यानंतर एक आई म्हणून तिने मुलासाठी संपूर्ण जीवन समर्पित करून त्याला लहानाचे मोठे केले. पण पुढे मुलगा मोठा झाल्यानंतर आपल्या संसार रमल्यामुळे कोसलबाई यांच्याकडे त्याचे दुर्लक्ष होत गेले. सुनेसोबत देखील वैचारिक मतभेद वाढल्यामुळे कौसलबाई मुलगा व सून यांच्या पासून वेगळी राहू लागली. जन्मापासून मृत्यूपर्यंत संघर्ष करणाऱ्या कोसलबाई विषयी प्रकरण संपवत असताना राजाराम जाधव यांनी “ठेविले अनंते तैसेचि राहावे” म्हणत या प्रकरणाचा समारोप केला आहे. सातव्या प्रकरणात राजाराम जाधव यांनी अनेक विचारांचे आगार असलेले त्यांचे प्राध्यापक डॉ. ग. वा. करंदिकर सरांच्या जीवनशैलीचे वर्णन केले आहे. यात त्यांनी एखाद्या व्यक्तीचा जन्म हा दुसऱ्याच्या जीवनात आनंद देण्यासाठी झालेला असतो म्हणत महाविद्यालयीन व शैक्षणिक जीवनात करंदिकर सरांनी केलेल्या मोलाच्या मार्गदर्शनाचे या प्रकरणात दर्शन घडवले आहे. माणुसकी आणि तत्व प्रणालीची शिकवण मिळाल्याचे श्रेय राजाराम जाधव यांनी डॉ. ग. वा. करंदिकर सरांना देत या प्रकरणाचा शेवट केला आहे. “लोकनायक छत्रपति शाहू महाराजांसमवेत : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अनोखी भेट: एक प्रसंग” नामक आठव्या प्रकरणात राजाराम जाधव यांनी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांवर प्रकाश टाकला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या आर्थिक मदतीचा दाखला दिला आहे. छत्रपति शाहू महाराजांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होऊ शकले. त्यामुळे वंचित, दीनदुबळ्या-दलित समाजाला यथायोग्य न्याय देणाऱ्या छत्रपति शाहू महाराज व दलितांचा उद्धार करणाऱ्या दोन्ही महानायकांना नमन करून राजाराम जाधव यांनी हे प्रकरण संपवले आहे.
दहाव्या प्रकरणात राजाराम जाधव यांनी मुक्या प्राण्यांच्या भावना बोलक्या करून दाखवत मोत्या कुत्रा या प्राणी जगतातील प्रेम कहाणीवर प्रकाश टाकला आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, मुके प्राणी आपले प्रेम, भावना, राग, लोभ आणि वात्सल्य आपल्या मालकाकडे किंवा ओळखीच्या माणसांकडे व्यक्त करतात. राजाराम जाधव यांनी आपल्या लहानपणी तांड्यातील एक मोत्या कुत्र्याचा दाखल देत कुत्रा व कुत्री यांच्या लैला मजुनीच्या प्रेमकहाणीचे वास्तविक जीवनातील सत्य घडलेले किस्से त्यांनी याप्रकरणात नमूद केले आहे.
शेवटचे प्रकरण अर्थात “वंचितांचे विश्व” या प्रकरणात त्यांनी भारत पहात असलेल्या जागतिक महासत्तेच्या स्वप्नाचे वास्तव नमूद केले आहे. जगात आंनदी राहणाऱ्या देशांचा दाखला देत त्यांनी म्हटले आहे की, भारत आनंदी देशांच्या क्रमवारीत १२६ व्या स्थानावर आहे, यावर ते म्हणतात की, झुग्गी- झोपड्यात राहणाऱ्या सर्व जाती-धर्मातील वंचित, दलित, भटके-विमुक्त, बहुजन समाज आदी वर्गांच्या लोकांचे जनजीवन सुधारल्याशिवाय भारत जागतिक महासत्ता होऊ शकत नाही. त्यामुळे या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी भारताला वंचित समुदायाचे राहणीमान, आयुर्मान सुधारण्यावर भर दिला आहे. यामुळे भारताचा जीडीपी वाढून देश सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक पातळीवर संपन्न होऊन आर्थिक महासता बनेल. असे तर्कसंगत विश्लेषण केले आहे.
राजाराम जाधव सर ३१ ऑगस्ट २०१६ रोजी महाराष्ट्र शासनाच्या सहसचिव यापदावरून निवृत्त झाले. निरक्षर याडी-बापूंनी त्यांच्या आंधारमय जीवनाची साखळी तोडून त्यांच्या मुलाच्या जीवनात तेजोमय प्रकाशाची ज्योत पेटऊन दिली त्यामुळे राजाराम जाधवजी उच्चपदापर्यंत पोहोचू शकले. संपूर्ण कारकीर्दीत त्यांनी केवळ महाराष्ट्र राज्याच्या अनेक मान्यवर मंत्र्यांसोबतच नव्हे तर माननीय मुख्यमंत्र्यांसमवेतही काम केले. माझ्या माहितीनुसार महाराष्ट्र विद्यापीठ कायदा, महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यापीठ कायदा इत्यादी अनेक कायदे तयार करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आदरणीय वसंतराव नाईक यांनी स्थापन केलेल्या संस्थांमध्ये त्यांनी विविध पदे भूषविली. अखिल भारतीय बंजारा सेवा संघटनेत त्यांनी सरचिटणीस म्हणून काम पाहिले. ज्याची स्थापना आदरणीय वसंतराव नाईकजी यांच्या शुभहस्ते झाली.
मी एक गोष्ट आवर्जून नमूद करू इच्छितो की, त्यांच्या संपर्कात आलेल्या कोणाचीही साथ ते कधीही सोडत नसत, म्हणजेच त्यांच्या जवळ जे लोक आले त्यांच्याशी त्यांनी चांगले संबंध निर्माण केले. स्वभावाने ते खूप दिलदार आहेत. पदोन्नतीच्या बाबतीत ते माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत न्यायासाठी लढा देणाऱ्या पीडितांसोबत उभे आहेत. आदरणीय वसंतरावजी नाईक यांनी ठरविलेल्या मूल्यांवर ते अजूनही कार्यरत आहेत आणि संत सेवालाल महाराजांच्या मतांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे ते मानवतेच्या मार्गावर चाललात.राजाराम जाधवजींनी चांगली मूल्ये आणि परिश्रम करून कधीही निराशा मनात आणली नाही. बऱ्याच वेळा त्यांना त्यांच्या आर्थिक स्थितीमुळे अडचणींना सामोरे जावे लागले परंतु प्रत्येक वेळी त्या अडचणींवर त्यांनी मात केली.
त्यांच्यासमवेत याडी (आई) आणि बापू (वडील) आणि संत सेवललाल महाराज, माजी मुख्यमंत्री आदरणीय वसंतरावजी नाईक आदींचे आशीर्वाद होते.
श्री राजाराम जाधव यांच्या दोन पुस्तकांचे १. वंचितांचे विश्व चरित्रात्मक, सामाजिक व वैचारिक लेख आणि २. झामाई काव्य संग्रहाचे श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय पुसद येथे दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी मा विजयराव पाटील चोंढीकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली प्राचार्य डॉ उत्तमरावजी रूद्रावार सर, कृषी भूषण दीपक भाऊ आसेगावकर, याडीकार पंजाबराव चव्हाण, प्रा डॉ अशोक पवार छ. संभाजी नगर, श्री तोताराम राठोड, श्री प्रकाश रोडबाजी जाधव, श्री रामदास घुंगटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिशय दिमाखदार सोहळा झाला. याप्रसंगी मी त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.
सदर दोन्ही सामाजिक विषयांवरील पुस्तकांचे सुजाण वाचक प्रेमी, त्यांचे सहकारी मित्र परिवार आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मंडळी स्वागत करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
वंचितांचे विश्वची उत्तम ओळख.