आजच्या पत्रकार दिनानिमित्त जेष्ठ पत्रकार, छायाचित्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांनी जागवलेल्या पहिल्या ‘वृतपत्र स्वातंत्र्य ज्योत’ या विषयीच्या आठवणी….पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बंधू भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा.
– संपादक
महाराष्ट्रात दिनांक ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण हे पहिले वृत्तपत्र सुरू झाले. त्या दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने इ.स. १९९५ साली ‘पुणे ते पोंभुर्ले’ पहिली ‘वृत्तपत्र स्वातंत्र्य ज्योत’ नेण्याचा मान मला दिला होता.
पुणे-सातारा-कोल्हापूर-रत्नागिरी यामार्गे ६ जानेवारी रोजी ही ज्योत घेऊन मी पोंभुर्ल्याला पोहोचलो होतो. त्या सगळया स्मृती आज आठवल्या.
पहिली ‘वृत्तपत्र स्वातंत्र्य ज्योत’ घेऊन जाण्यासाठी ज्येष्ठ संपादक वसंतराव काणे आणि रविंद्र बेडकिहाळ यांनी माझी निवड केली होती. तेव्हा मी नागपूरहून प्रकाशित होणार्या दैनिक जनवादचा पुणे प्रतिनिधी म्हणून कार्यरत होतो. या वृत्तपत्र स्वातंत्र्य ज्योतीच्या प्रवासाचे संपूर्ण सुनियोजन झुंजार पत्रकार संतोष उर्फ आप्पा डिंगणकर यांनी केले होते. या संपूर्ण प्रवासात ते माझ्याबरोबर होते. पुण्यातील मंडई भागातील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याजवळ डाॅ. दीपक टिळक यांनी या पहिल्या ‘वृत्तपत्र स्वातंत्र्य ज्योती’स निरोप दिला होता. साताऱ्यात दैनिक ऐक्यच्या कार्यालयात मा. अभयसिंहराजे भोसले यांनी तर कोल्हापूरला दैनिक पुढारीच्या कार्यालयात मा. बाळासाहेब जाधव यांनी या ज्योतीचे स्वागत केले होते.
पोंभुर्ल्याला त्यादिवशी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे सन्माननीय पदाधिकारी हजर होते. विद्याधर गोखले, लक्ष्मण माने आदि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. दि. ६ तारखेला सकाळी रत्नागिरीहून पोंभुर्ल्याला पोहोचल्यावर गावकऱ्यांनी ढोल-ताशे आणि लेझिमीच्या तालावर या पहिल्या ‘वृत्तपत्र स्वातंत्र्य ज्योती’ची जंगी मिरवणूक काढली होती. दि. ७ जानेवारी १९९५च्या पुण्याच्या दै.केसरी, साताऱ्याच्या दै. ऐक्य, कोल्हापूरच्या दै. पुढारी आणि रत्नागिरीच्या सर्वच वृत्तपत्रांनी या पहिल्या ‘वृत्तपत्र स्वातंत्र्य ज्योतीची छायाचित्रे व बातम्या छापल्या होत्या.
आता गेली १७ वर्षे सुरू असलेले ‘स्पर्शज्ञान’ मराठी ब्रेल पाक्षिक, गेली ११ वर्षे सुरू असलेले ‘रिलायंस दृष्टि’ हिंदी ब्रेल पाक्षिक आणि मार्च २०२३ पासून सुरू झालेले ‘रिलायन्स दृष्टी’ मराठी ब्रेल पाक्षिक अशा तीन ब्रेल पाक्षिकांच्या माध्यमातून आम्ही हजारो अंध व्यक्तींना वृत्तपत्र सृष्टीची दारं उघडी करून दिली आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
— लेखन : स्वागत थोरात.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800