लेखक श्री नितिन सप्रे हे भारतीय माहिती सेवेतील वरिष्ठ अधिकारी असून सध्या भारत सरकारच्या डी.डी.न्युज (दूरदर्शन) नवी दिल्ली येथे उपसंचालक या पदावर कार्यरत आहेत. लेखातील मते त्यांची व्यक्तीगत आहेत. त्यांचे लेख https://saprenitin.blogspot.com या ब्लॉगवर उपलब्ध आहे. संत कबीर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा हा विशेष लेख…….. संपादक.
आपल्याकडे अनेक थोरामोठ्यांचे जन्मदिन, जन्मस्थान आणि जन्मकथा या बाबतीत इतिहासकारांमध्ये एकमत नाही. संत कबीर ही, या प्रभुतींच्या यादीत समाविष्ट आहेत.
काही जणांच्या मते कबीर हे हिंदू विधवेनं त्यागलेल मूल होतं आणि तत्पश्यात नीरू आणि निमा या मुस्लिम विणकर जोडप्यानं त्याच पालकत्व स्वीकारून त्यांना लहानाचं मोठ केलं.
तर दुसर्या एका कथेनुसार, लहानगा कबीर वाराणसीच्या लहरतारा पुष्करणीत कमलदलात अवतीर्ण झाल्याची वदंता आहे. सहाशे वर्षांपूर्वीच्या या घटनेची वास्तविकता ऐतिहासिक दस्तावेजाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची आहे, परंतु या संदर्भात व्यर्थ माथेफोड करण्या पेक्षा कबीर तत्त्वज्ञान समजून घेणे आणि ते आपल्या जीवनात प्रत्यक्ष उतरवण्याचा प्रयत्न करणं अधिक गरजेचं आहे. खुद्द कबीर जी म्हणाले आहेत, “हम काशी मे प्रकट भये हैं, रामानंद चेताये”
वाराणसी शहरात आज कबीर चौरा म्हणून ओळखला जाणारा एक भाग आहे. कबिराचे लालनपालन करणाऱ्या नीरू आणि निमा यांची छोटेखानी झोपडी याच परिसरात होती. बालपणापासून मुस्लिम परिवेशात वाढलेले कबीर, तरुणपणी वैष्णवपंथी स्वामी रामानंद यांच्या संपर्कात आले आणि त्यांच्या कडून कबीर यांना हिंदू धर्माविषयी जाणण्याची संधी प्राप्त झाली.
मध्ययुगीन भारतीय साहित्य आणि समाजावर संत कबीर यांची मुद्रा ठळकपणे उठलेली दिसते. लहानपणापासूनच सामान्य जीवन जगणारे कबीर भविष्यात मात्र एक असामान्य, लोकविलक्षण व्यक्तित्त्वाचे धनी असल्याचं सिद्ध झाल.
संत कबीर नेहमीच धर्म, वर्ण, जाती आणि क्षेत्रवादाच्या जंजाळापासून विरक्त राहिले. ते अधार्मिक नव्हते मात्र पाखंडी धर्म मार्तंडांच्या कर्मकांडावर प्रखर टीका करण्यास ते अजिबात कचरले नाहीत. त्यांनी अत्यंत धैर्यशीलपणे त्यांचा मुकाबला केला.
संत कबीर हे मार्मिक कवी असण्या बरोबरच उदारमतवादी समाजसुधारकही होते. एक प्रकारे, सार्थक धर्मनिरपेक्षतेची संकल्पना त्यांनी बजावली असं म्हणता येईल.
कबीर हे कायमच शांती प्रियतेचे सच्चे पुरस्कर्ते होते. अहिंसा, सदाचार आणि सत्याप्रती ते सदैव सचेत असत. संत कबीर यांची प्रतिमा जरी बंडखोर संत अशी झाली असली तरी प्रत्यक्षात ते करुणा सिंधू होते. व्यक्तिमत्त्वातील प्रतिकार आणि करुणा अश्या अनोख्या गुणांच्या संगमा मुळेच ते कबीर म्हणजेच महान, श्रेष्ठ ठरले.
कबीर यांची महती निव्वळ साहित्या पुरती मर्यादित नाही तर ती एक जीवनशैली आहे. त्यांच साहित्य आणि विचार यांचा प्रामाणिकपणे साकल्याने अभ्यास केला तर कबीर हे व्यक्ती नसून संस्थाच असल्याचं लक्षात येतं. प्रेम, सलोखा आणि बंधुभावानं ओतप्रोत अशी एक विलक्षण विचारधारा म्हणजे कबीर, असा साक्षात्कार होतो. त्यांच्या अनन्य साधारण अश्या आचरणामुळेच सहा शतकं उलटल्या नंतरही कबीरवाणी आजही तितकीच प्रासंगिक, सार्थक ठरते.
पंधराव्या शतकातल्या या रहस्यवादी कवीवर भक्ती आंदोलनाचा मोठा प्रभाव दिसून येतो. कबीर यांच्या अनेक काव्य रचना गुरू ग्रंथ साहेब यात ही विराजमान आहेत. कबीर यांचा असा ठाम विश्वास होता की धार्मिकतेच्या मार्गावरील एखादीं व्यक्ती, सजीव आणि निर्जीव वस्तूंना पवित्र मानत, लौकिक जगाशी निर्विकार भावानेनं अंतर राखत असेल तर त्याला सत्याची प्राप्ती होतेच होते. सत्य प्राप्तीसाठी आत्मत्याग करणं आवश्यक आहे.
कबीरजींनी लिहिले आहे, “जब मैं था तब हरि नहीं अब हरि है मैं नहीं, प्रेम गली अति सांकरी जामें दो न समाहीं” अर्थात जोपर्यंत मनामध्ये अहंकार असेल तोपर्यंत परमेशाची प्राप्ती अशक्य आहे. जेव्हा अहंकार नष्ट होतो, तेव्हाच परमेशाची प्राप्ती सुलभ होते. ईश्वरी सत्तेचा बोधही तेव्हाच शक्य आहे. प्रेमात द्वैत भावाला थारा नसतो. प्रेमाची वाट ही अतिशय अरुंद असते. या वाटेवरून अहम किंवा परम यापैकी कुणीतरी एकच वाटचाल करू शकतं. जर परम प्राप्ती करून घ्यायची असेल तर अहम चा त्याग, विसर्जन अनिवार्य आहे. “बुरा जो देखन मैं चला, बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय। जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय” दुसऱ्यात खोट शोधणं हा सर्वसाधारण मानवी स्वभाव आहे.
कबीर म्हणतात दुसऱ्यात जेव्हा खोट शोधायचा प्रयत्न केला तर ती नजरेस पडली नाही कारण जेव्हा मी अंतर्मुख झालो तेव्हा लक्षात आलं की माझ्या इतकं वाईट तर कोणीच नाही.
“तूने रात गँवायी सोय के,
दिवस गँवाया खाय के ।
हीरा जनम अमोल था,
कौड़ी बदले जाय ॥
तूने रात गँवायी सोय के
सुमिरन लगन लगाय के,
मुख से कछु ना बोल रे ।
बाहर का पट बंद कर ले,
अंतर का पट खोल रे ।
माला फेरत जुग हुआ,
गया ना मन का फेर रे ।
गया ना मन का फेर रे ।
हाथ का मनका छाँड़ि (छोड़) दे,
मन का मनका फेर ॥
तूने रात गँवायी सोय के,
दिवस गँवाया खाय के l
हीरा जनम अमोल था,
कौड़ी बदले जाय ॥
तूने रात गँवायी सोय के
दुख में सुमिरन सब करें,
सुख में करे न कोय रे ।
जो सुख में सुमिरन करे,
तो दुख काहे को होय रे ।
सुख में सुमिरन ना किया,
दुख में करता याद रे ।
दुख में करता याद रे ।
कहे कबीर उस दास की
कौन सुने फ़रियाद ॥”
ह्या भजनात कबीर यांनी मानवी प्रवृत्ती वर नेमकी टीपणी केली आहे. मनुष्य सजग पणे जगला नाही तर हिऱ्या सारखा मानवी जन्म कौडीमोल होऊन जातो. सुख समयी त्या सर्वेश्वराला न आळवता केवळ दुःखाच्या प्रसंगीच त्याची आठवण काढली तर अश्या जनांची फिर्याद त्याने का बरं ऐकावी ?
कबीरजींनी भक्ती, गूढवाद आणि अनुशासन यासारख्या विषयांची मांडणी आपल्या दोह्यांद्वारे, भजनांच्या माध्यमातून समाजासमोर अत्यंत प्रभावीपणे सादर केली. प्रामुख्याने त्यांनी आपल्या रचना हिंदी भाषेतून केल्या असल्या तरी अनेकवेळा ब्रज, अवधी यासारख्या बोलीभाषेतूनही ते अभिव्यक्त झालेले आढळतात.
कबीर यांच्या साहित्यिक कृतींमध्ये कबीर बिजक, कबीर पराचाई, सखी ग्रंथ, आदि ग्रंथ (शीख) आणि कबीर ग्रंथवाली (राजस्थान) या विशेष उल्लेखनीय आहेत.
कबीरवाणी आणि त्यांची शिकवण उदधी (समुद्र) प्रमाणे अमर्याद आहे. कबीर यांच्या रचना वाचून, ऐकून मनोसागरात उठणाऱ्या असंख्य लाटांपैकी केवळ काही लहरी प्रस्तुत लेखात शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.
संत कबीरांच्या साहित्याने कबीरपंथी, अन्य भक्तिमार्गी, साधक, कलाकार, सर्वसामान्यांना अभिव्यक्त होण्यासाठी सातत्यानं प्रवृत्त, प्रेरित केलं आहे. भविष्यातही ही प्रक्रिया सुरू राहील, याबद्दल यकश्चित शंका नाही. शब्द मर्यादेच्या अधीन राहून कबीर साहित्यगंगेत संपूर्ण सुस्नात होण्याची मनीषा अप्राप्य आहे.
“देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी” हे सत्य आणि त्याबरोबरच, मग त्याला शोधायचं तरी कुठे हे विषद करणाऱ्या भजनानं लेखनसीमा आखतो. कबीर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा.
“मोको कहाँ ढूंढें बन्दे,
मैं तो तेरे पास में ।
ना तीरथ में ना मूरत में, ना एकांत निवास में ।
ना मंदिर में, ना मस्जिद में, ना काबे कैलाश में॥
ना मैं जप में, ना मैं तप में, ना मैं व्रत उपास में।
ना मैं क्रिया क्रम में रहता, ना ही योग संन्यास में॥
नहीं प्राण में नहीं पिंड में, ना ब्रह्माण्ड आकाश में ।
ना मैं त्रिकुटी भवर में, सब स्वांसो के स्वास में॥
खोजी होए तुरत मिल जाऊं एक पल की ही तलाश में ।
कहे कबीर सुनो भाई साधो, मैं तो हूँ विशवास में॥”
– लेखन : नितीन सप्रे.
– संपादन: देवेंद्र भुजबळ. 9869484800.