Wednesday, February 5, 2025
Homeकलाचित्रकला समीक्षा

चित्रकला समीक्षा

कलेला कुंपण नसते !

मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत नुकतीच तीन चित्रकारांचीविविध चित्र प्रदर्शने भरली होती… तीनही चित्रकारांच्या चित्रांचा चेहरा वेगवेगळा होता.. ही पाहून काढलेली चित्रे नव्हती तर काढून बघितलेली, प्रयोगशील अशी वेगळी चित्रे होती…

दिसते तसे चित्र काढणारे चित्रकार खूप आहेत.. हुबेहूब फोटोसारखे चितारणारे चित्रकार हे नकलाकार असतात.. त्या चित्रात त्यांचे स्वतःचे योगदान शून्य असते. पण तेच दृश्य वेगळ्या पद्धतीने जर चितारले असेल तर आपण त्यांना चित्र म्हणून स्वीकारू शकू… पण अदृश्य असा काही तरी प्रयोग एकदा डोळ्यांना जाणवत असेल तर तो चित्रकार प्रयोगशील चित्रकार नक्कीच असू शकेल.

रमेश चव्हाण

बिजापूर कर्नाटकचे रमेश चव्हाण, बेंगलोर चे नंदाबसप्पा वाडे आणि कोकणातील सावर्डे येथील प्रकाश राजेशिर्के यांच्या चित्रांचे प्रदर्शन जहांगीर मध्ये पाहण्याचा मला नुकताच योग आला.

कर्नाटकातील बिजापूर चे रहिवाशी रमेश चव्हाण यांची चित्रं शैली ही पूर्णपणे अमूर्त असून नवीन शैलीतला चित्र शोध रसिक घेत होता. त्यामुळे रसिक चित्राचे आकर्षण मनात घेवुन गॅलरीतून बाहेर पडत होता.. अमूर्त चित्र शैली रसिकांच्या मनात घर करते कारण अमूर्त हे शोधाच्या तर पलीकडे जाण्यास भाग पाडते.. रंगांचे नवे विश्व रसिकांना भुरळ पाडतात… त्या अगोदर त्या चित्रकाराने भरपूर वास्तववादी चित्रे काढलेली असते.. ती काढता काढताच हळूहळू आकारापासून मुक्ती घेवून एका वेगळ्याच विश्वात चित्रकार रसिकांना घेवून जावू शकतो..

नंदाबसप्पा वाडे..

दुसरे चित्रकार आहेत ते नंदाबसप्पा वाडे.. हे मूळचे कर्नाटकातील चित्रकार आहेत.. यांच्या चित्रात कल्पनेचा वेगळाच बहर आहे… गव्हाच्या पोत्यावर चिमण्या बसल्या असून निवांत दाणे खाण्यात रमल्या आहे. टरबुजाच्या फोडी, मिरची भजी, मक्याचे कणीस या सर्वांचा आस्वाद पक्षी घेत आहे.

अशी २० चित्रे विविध भावार्थ घेवून जन्माला आली होती… कलावंत या खुल्या दुनियेत सतत नवीन नवीन बघत असतो. त्याचे निरीक्षण हेच त्यांच्या कामातून उतरत असते.. फक्त इथे त्याने कल्पकतेचा वापर करून घेतो.. आजूबाजूचा परिसर आपल्याला सतत काही तरी घडामोडी दाखवत असतो.. ज्याला त्यातले नावीन्य दिसते तेच तो आपल्या कलेच्या माध्यमातून साकार करतो आणि रसिकांना मंत्रमुग्ध करतो..

प्रकाश राजेशिर्के

तिसरे चित्रकार होते ज्येष्ठ चित्रकार, प्राध्यापक, कवी, स्तंभ लेखक प्रकाश राजेशिर्के ते मूळचे कोकणातील असून सावर्डे येथे त्यांचे सह्याद्री आर्ट स्कूल आहे. त्यांच्या चित्र प्रदर्शनात त्यांनी विविध माध्यमे वापरली आहे. लोखंडी पत्र्यावर इनामल पेंट वापरून चित्रे साकारली आहे. काही चित्रे टीशू पेपर वापरून कोलाज या प्रकारातील चित्रे आहे. कापडावर टेक्सटाइल पद्धतीने उत्तम भारतीय शैलीतील चित्र बघायला मिळतात… तांब्याच्या पत्र्यावर मीना काम केलेले पेंटिंग वेगळ्या विश्वात रसिकांना घेवून जातात..

राजेशिर्के हे प्रयोगशील चित्रकार आणि शिल्पकार आहेत. सतत नाविन्याचा ध्यास त्यांच्या कामातून दिसतो.. नॉर्मल चित्रकार कॅनव्हास वापरतो पण प्रकाश राजेशिर्के यांनी लोखंडी, तांब्याचा पत्रा वापरून मोठी चित्रे काढली आहे.. त्यात त्यांनी स्क्रू चा सुध्दा कलात्मक वापर करून चकवून सोडले आहे. कुठल्याही माध्यमातून सौंदर्य निर्माण व्हायला हवे.. त्या साठी कलावंत सतत निरीक्षण आणि चिंतन करीत नव्याचा शोध घेतो.. तेच नवे म्हणजे कलात्मक कलाकृती ठरतात.. राजेशिर्के यांना खूप मानाचा समजला दिल्लीचा ललित कला अकादमीचा नॅशनल अवॉर्ड २००१ साली मिळाला आहे.. ते चित्र मिनाकरी करून तयार केले होते.. नव्याची ओढ साऱ्या जगाला असतेच.. जे कधी घडले नाही ते घडले जाते. तीच खरी कला असते.. नकल करून जसे च्या तसे काढणारे ढीग भर असतात पण त्या ही ढिगाऱ्यात असे नावीन्य सापडून जाते.

कलेच्या क्षिताजाला मर्यादा नाही.. त्याला लांबी, रुंदी नसते म्हणून कला अमर्याद आणि चिरंजीव असते… कलेला कुंपण नसते.

बोधनकर

— समीक्षण : चित्रकार विजयराज बोधनकर. ठाणे
— निर्मिती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी