कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद, बेंगरूळू ने नुकतीच बालकांसाठी वारली चित्रकला कार्यशाळा आयोजित केली होती. त्या कार्यशाळेचा हा वृत्तांत. बालकांसाठी एक सुंदर कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद, बेंगरूळू चे मनःपूर्वक अभिनंदन.
– संपादक
आदिम काळापासून मानवाने कलांना आपलसं केलं आहे. कलांच्या माध्यमातून तिने स्वत:चे मनोरंजन करून घेतले, जगण्याचा आनंद आणि आधार शोधला आहे. या कलांमधून तो स्वतः अभिव्यक्त ही झाला. या पैकीच एक म्हणजे महाराष्ट्रातील वारली ही कला आहे. वारली जमातीने जपलेली “वारली कला” ही शाश्वत कला आहे.
वारली चित्रांचा कॅनव्हास म्हणजे त्यांच्या झोपडीची, कुडाची भिंत. ही कुडावरची चित्रकला लोकप्रिय करण्यात आणि जागतिक स्तरावर पोहोचविण्यात कलावंत जिवा सोम्या मशे यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले त्यांना भारत सरकारने पद्मश्री ही प्रदान केली आहे.
वारली ही कला स्वतंत्र असून अतिशय संयमाने रेखाटावी लागते. तेव्हा कुठे हा रेखीव व सुंदर आविष्कार जन्म घेतो. असाच सुंदर आविष्कार सात आठ वर्षांच्या मुलांनी काढलेल्या वारली चित्रकलेत मला दिसून आला. निसर्गातील गोष्टींचा, वस्तूंचाच वापर करून काढलेली वारली चित्रकला निसर्गाइतकीच निखळ, मोकळी व भावपूर्ण.
वारली चित्रात त्यातली निखळ, भावपूर्ण निर्मळता आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही अशीच निर्मळता मला या मुलांनी काढलेल्या चित्रात दिसली.सोपे आकार केवळ त्रिकोण, वर्तुळं, चौकोन, बिंदू, रेघा सारख्या बेसिक आकारांमधून अतिशय सहजसुंदर निसर्ग, पशू- पक्षी, असंख्य आकार या चित्रांमध्ये पकडलेली असते. असेच सुरेख आकार सात- आठ वर्षांच्या या मुलांनी वारली चित्रकलेत पकडले. त्यांनी विविध आकारांची चित्रे नुसती चितारली नाही तर आपली कल्पक बुद्धिमता वापरून नाताळ बाब म्हणजे सांताक्लोज, सुपरमॅन ही चित्रेही अतिशय सुरेख रितीने चित्रीत केली. खरचं या मुलांचे कौतुक करावे तितकेच कमी..
त्यांच्या कल्पक बुद्धिमतेला सलाम… !
या लहान मुलांनी काढलेली वारली चित्रे माझ्या मनाला आनंद देऊन गेली. मुलांच्या वारली चित्रकलेचे परीक्षण करण्यासाठी परिक्षक म्हणून निमंत्रित व मुलांचा माझ्या हस्ते सत्कार केल्याबद्दल कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद, बेंगरूळूचे पदाधिकारी व सहकारी यांचे आभार.
— लेखन : संगीता कुलकर्णी.
— निर्मिती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
अत्यंत उत्कृष्ट कल्पना… कार्यशाळा मुलांना नक्कीच आवडली असणार.