मी ऑफिससाठी रोज चर्चगेटला जात असे. चर्चगेट जवळ आलं आणि डबलडेकर बसने डावीकडे कलतं वळण घेतलं की आसमंत निरखत असताना पुन्हा पुन्हा त्रिकोणी तंबूच्या वरती अधांतरी तरंगणारी रंगीबेरंगी दिव्यांची त्रिकोणाकृती माळ नजरेसमोर यायची. अगदी खूप दूरवरून सुद्धा ! भल्या प्रचंड तंबूच्या आसमंतात नुसता दिव्यांचा झगमगाट ! त्या रंगीबेरंगी माळांच्या आणि मर्क्युरी लॅम्पच्या झगमगाटात बँडची क्वचित कानी पडणारी उत्तेजक धून, दूध पाण्यागत मिसळून गेलेली असायची.
मूळ तंबूपासून प्रवेशद्वारापर्यंत लांबच लांब पसरलेल्या रांगा आणि प्रेक्षक समुदायात छोट्या छोट्या जीन्स, फ्रॉक्स, मिडमॅक्सीतल्या बाहुल्यांची ही तोबा गर्दी ! अर्थात आई- बाबांच्या हातांत आपली चिमुकली बोटं अडकवून, भिरभिरत्या नजरेने गेटवरची जबडा उघडलेला वाघ, सोंड वर उचललेला हत्ती, झुबकेदार आयाळीचा सिंह यांची भली मोठी चित्रं पाहणारी वानर सेना !
मुलांचा आरडा ओरडा, विक्रेत्यांचा उच्चरव, पालकांचे हाकारे यावर ताण करणारे वाघ, सिंहाच्या डरकाळ्यांचे किंवा हत्तीच्या चित्कारांचे आवाज त्या भल्या मोठ्या तंबूत चहूबाजूने घुमत असतानाच, बँड च्या तालावर कर्णमधुर संगीत सुरू होतं. त्या स्वरांची तीव्रता वाढते आणि त्या वाढत्या स्वर वर्तुळात हजारो लोकांची मनं खेचली जातात. क्षणोक्षणी उत्तेजित होत असतात. पोरांपासून थोरांपर्यंत साऱ्यांचे श्वास रोखून धरले जातात. कारण ——-
कारण काही क्षणांतच तिथे सर्कस सुरू होणार असते. डोळ्यांचे पारणे फेडणारे चित्तथरारक खेळ हाताच्या अंतरावर प्रत्यक्ष घडणार असतात. एक अननुभूत उर्मी, उत्कंठा अवघ्यांच्या मनांत दाटून येत असताना, चकचकीत आखुड पोशाखातल्या कमनीय युवक युवतींचा जथा शिस्तीने आत येत, सलाम ठोकत भराभर विखुरला जातो. छोट्या शिड्यांवरून सरसर उंच छताला भिडलेल्या झुल्यावर चढतो. हात जोडीदाराच्या हातांत गुंतवून एका छोट्या दांडीवरून दुसऱ्या दांडीवर सफाईदार झोके घेत हवेतल्या हवेत चार-पाच पलट्या वेलांट्या घेत असतो. काही क्षणात तिथे चित्ताकर्षक खेळ रंगात येतो.
वर्षामागून वर्ष उलटली. पण माझं सर्कसच आकर्षण तिळ मात्र कमी झालं नाही. अर्थात वय वाढलं तसं निष्पाप कुतूहल संपलं आणि जाणती उत्सुकता अंकुरली. “अनोळखी पाऊलवाटे”च्या निमित्ताने ती वाढीस लागली. “सर्कस सुंदरी” या व्यवसायाच्या पाऊलवाटेच्या शोध प्रवासाला सुरुवात झाली. मात्र ही शोधयात्रा खूपच अवघड आहे हे लवकरच लक्षांत आलं.
सर्कस सुंदरीचा शोध घेत मी सर्कशीच्या मॅनेजरच्या पुढ्यांत उभी राहिले. त्या पंजाबी माणसाला मी माझ्या येण्याचा हेतू थोडक्यात सांगितला. त्याच्या चाणाक्ष नजरेने ही पत्रकार मुलगी आहे याचा अचूक अंदाज घेतला आणि ही ब्याद लवकर टळावी यासाठी तो उठून उभाच राहिला. पटकन म्हणाला, “सॉरी मॅडम हम सर्कसके कंपनी गर्ल्स को किसी से मिलनेकी इजाजत नही देते. हमारे मालिक का हुक्म है !”
“तो हमे मालिक से मिलवा दीजिए”!
“मालिक किसी से मिलते नही. सॉरी”. आणि तो पाठ वळवून चक्क आंत निघूनच गेला.
निराश मनाने मी तिथून निघाले. पण आता मनाने निश्चयच केला होता. सर्कस सुंदरी मला “अनोळखी पाऊलवाटा” या माहेर मधल्या सदरासाठी हवीच होती. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा मी त्याच मॅनेजर समोर ! आता मात्र कांहीसा चिडून तो उद्गारला, “मैने आपको कल कहा था ना हमारी कंपनी गर्ल्स आपको नही मिल सकती !” मी अजिजीने त्याला विनवत राहिले. सोबत नेलेले माहेरचे जुने अंक त्याच्या समोर ठेवले. पण तो बधला नाही.
कट् टू. तिसरा दिवस. मी पुन्हा एकदा अजिजीने त्याला विनवत होते. आंतून बँडची धून ऐकू आली. “अब सर्कस शूरू होने का वक्त आया है ! आप चलिये !” त्याने मला जवळपास हाकलूनच लावलं.
आता मात्र माझा संयम संपला. सर्कशीच्या तंबू बाहेर पडले. रस्त्यावर आले. तिरमिरीत टॅक्सी पकडली आणि थेट त्या बीटच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन थडकले. पोलीस स्टेशनमध्ये नेहमीचच वातावरण ! पोलिसांची लगबग. धमकावणीचे आवाज. गुन्हेगारांचे असे केविलवाणे चेहरे जणू ते अगदी निष्पाप आहेत आणि कुणीतरी चुकीने त्यांना इथे डांबून ठेवलय.
मला तिथे रेंगाळलेलं बघून एक हवालदार पुढे आला. जरा वेगळीच गोरी गोमटी मुलगी दिसते. हीचं काय काम असावं बरं इथे ? असं नजरेत कुतूहल ! मी थोडक्यात त्याला सगळा प्रकार सांगितला. येण्याचा हेतू सांगितला. त्यानी मला बाकड्यावर बसवलं आणि तो आत अंतर्धान पावला. थोड्या वेळाने उगवला आणि मला म्हणाला, “मॅडम चला. साहेब बोलवतायत.”
मी आंत गेले. पोलीस वर्दीतले मध्यमवयीन इन्स्पेक्टर समोर बसले होते. माझं कथन त्यांनी शांतपणे ऐकलं आणि खाडकन काठी टेबलावर आपटली.
“अरे गाडी काढ रे ! माज आलाय का ×××”
मला कमालीच आश्चर्य वाटलं. साहेब स्वतः गाडीतून निघाले. मला सोबत घेऊन! सर्कशीच्या तंबू बाहेर गाडी लावली. खाडकन गाडीतून उडी मारली. तरातरा मॅनेजरच्या केबिनकडे गेले. मी त्यांच्या पाठोपाठ पळत पळत मॅनेजरच्या केबिनमध्ये ! समोर इन्स्पेक्टरला पाहून, गेले चार दिवस सिंहासारखी गर्जना करणाऱ्या सर्कस मॅनेजरची पार शेळी झाली. साहेबांनी आदेश दिला, “दो चार कंपनी गर्ल्स से मिलवाओ इन्हे ! मॅडम इंटरव्यू लेना चाहती है !”
दुसऱ्या क्षणाला मॅनेजरने एकाला हाक मारून बोलावलं. तो मला घेऊन आंत गेला. लाल चुटूक रंगाच्या रेशमी रूजाम्याची बिछायत संपली आणि आंतल चित्र एकदम बदललं. धुळीने भरलेल्या भल्या मोठ्या मैदानात, पत्र्याचे आडोसे लावलेल्या अनेक छोट्या छोट्या खोल्या होत्या. सर्कशीतल्या चमकदार रंगीबेरंगी कपड्यातल्या अनावृत्त तगड्या तरुणींच्या ऐवजी त्या खोल्यांमध्ये, त्याच मुली अंगभर कपड्यात रोट्या भाजत होत्या. डाळ बनवत होत्या. कपडे धुत होत्या. भांडी घासत होत्या. सर्कशीतले चमकदार उत्तान कपडे घातलेले गोरे गोमटे चेहेरे जणू गायब झाले होते. एका क्षणात झालेला हा कायापालट बघून मी अवाक झाले. बरोबरच्या माणसाने एका पत्राच्या खोलीवर ठक ठक केलं आणि दुपट्टा सावरत आतून “ती” बाहेर आली. ती—— स्वीटी थॉमस ! नावाप्रमाणेच स्वीट !
मी तिच्याशी बोलायला सुरुवात केली. पण तिला बोलत करणं खूप कठीण जात होतं. चौकटीतल्या मैत्रीची नाती सांभाळणारी स्वीटी ! सर्कशीतल्या त्या अक्षरशः टिचभर जगातच केवळ वावरणारी स्वीटी ! मोकळ्या मैत्रीला चटकन दाद देत नव्हती. तिला तिच्या कोषातून बाहेर काढून, तिच्या मनांत विश्वास, आपुलकी निर्माण होईपर्यंत गप्पांची रांगोळी अनेकदा पार विस्कटली. स्वतंत्र जीवनाचा वाराच कधी चाखायला न मिळालेली स्वीटी! ह्या अनोळखी झुळकेने बावरून गेली. पण एकदा त्या झुळकेची ऋजुता कळली आणि तिचा बुजरेपणा संपला. आता स्वीटी बोलायला लागली. नव्हे, चक्क बडबड करायला लागली आणि मग माझ्याकडे फक्त श्रोत्याची भूमिका उरली.
सर्कशीच जग हे सामान्यांना खरोखर दूरवरचं आणि अपरिचित ! त्यामुळे माझं पहिलं कुतूहल होतं की इथे प्रवेश तरी कसा मिळत असेल ? माझ्या प्रश्नावर स्वीटी खळखळून हसली आणि म्हणाली, “मी सर्कशीतच जन्म घेतलाय असं म्हणायला हरकत नाही. माझे आई-वडील सर्कशीत होते. बालपणापासून मी सुद्धा त्यांच्यासोबत फिरते आहे. सर्कशीतल्या कसरती करते आहे. आम्ही मूळचे दिल्लीचे रहिवासी. सर्कशीत सुद्धा आम्ही कुटुंबात राहतो. मात्र बऱ्याच वेळा सर्कशीमध्ये केरळ मधल्या काही विशिष्ट गावांतून मुली येत असतात. एखादा ओळखीचा माणूस त्यांची इथे वर्णी लावतो. या समोरच्या डबल कंपाऊंड मधल्या मुली, ज्यांना कंपनी गर्ल्स म्हणून ओळखलं जातं त्यांचा हा काही परंपरागत व्यवसाय नसतो आमच्यासारखा !
त्या मुलींना सर्कसचे मालक एखाद्या खेडेगांवातून आणतात. तिचा करार सरळ तिच्या आई- वडिलांशी केला जातो. त्यांचे आई-वडील लांब खेड्यात असतात. पण या मुली मात्र संपूर्णपणे मालकाच्या ताब्यात असतात. अगदी बालपणातच त्यांना इथे आणलं जातं. त्यांचं खाणं-पिणं, कपडा लता, छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मालकाकडूनच पुरवल्या जातात. त्यांच्या करमणुकीसाठी इथे टीव्ही आहे. पुस्तकं सुद्धा आहेत. कधी कधी त्यांना फिरायलाही नेलं जातं. त्यांची प्रॅक्टिस, विश्रांती, वैद्यकीय सोयी सगळ्याची व्यवस्थित काळजी घेतली जाते. पण इथे त्यांना काटेकोर बंदोबस्तात ठेवलं जातं. त्या स्वतंत्रपणे बाहेर हिंडू फिरू शकत नाहीत. बाहेरच्या लोकांशी मोकळेपणाने बोलू शकत नाहीत. अगदी त्या त्यांच्या कंपाउंड बाहेरही येऊ शकत नाहीत. त्या मुलींकडे इथल्या कोणीही पुरुषांनी वाकड्या नजरेने पाहिलं तर किंवा त्यांची छेड काढली तर २४ तासात त्या माणसाला सर्कस बाहेर फेकण्यात येतं. आम्ही मात्र आमच्या कुटुंबासोबतच सर्कस मधून वेगवेगळ्या गावांत फिरत असतो. ट्रेनर आम्हा मुलींना काही कसरती शिकवतात. मात्र काही वेळा सुरुवातीला अजिबात इंटरेस्ट नसलेल्या मुली, पुढे इथल्या माहौलमध्ये इतक्या रमतात ! कारण हजारो लोक आपला शो पाहतात. कौतुक करतात. ते त्यांना आवडायला लागत आणि मग आपोआप इंटरेस्ट वाटायला लागतो”.
दररोज तीन-चार शो करून, इतकी शारीरिक मेहनत करून, रात्री अपरात्री पर्यंत जागरण करून तू थकत नाहीस का या प्रश्नावर तिची आई म्हणते की हो. तिची रोज पाठ दुखते. थकवाही वाटतो. पण काय करणार ? आम्ही मजबूर आहोत.
मी स्वीटीला विचारते की तुमचा बाहेरच्या जगाशी काही संपर्क नसतो. अशा एकांगी जगण्याचा तुम्हाला कंटाळा येत नाही का ? त्यावर स्वीटी सफाईदार उत्तर देते. “आम्ही हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सगळ्या जाती धर्माचे लोक इथे एकत्रित राहतो. आपापले सण साजरे करतो. घर सजवतो. खेलकुद करतो. अर्थात आमचे रोजचे शो सांभाळून !
स्वीटी आपल्या जगण्याचं समर्थन करत असते. धाडसी खेळ प्रकारांमध्ये जीवावर बेतणाऱ्या प्रसंगांमधून जात असताना सुद्धा आयुष्य रेटत असते. ती सांगते, “एकदा माझ्या सहकाऱ्याचा तोल जाऊन तो ट्रॅपिज वरून खाली कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. पण सर्कशीचा खेळ मात्र चालूच राहिला. कारण शो मस्ट गो ऑन !”
स्वीटीच्या कथनाचा समारोप या एका वाक्यात होतो. दुरून ग्लॅमरस वाटणाऱ्या संपूर्ण सर्कस व्यवसायावर, प्रकाश झोत टाकणाऱ्या मर्क्युरी लॅम्प सारखं असतं तिचं हे वाक्य ! प्रयोग करतानाचा सावधपणा म्हणून तर तिच्या बोलण्यात डोकावत नसावा ? शारीरिक कसरती इतक्या सफाईने शाब्दिक कसरती करणाऱ्या धोरणी स्वीटीच्या या ही कलेला आपल्याला कौतुकाने टाळी द्यावीशी वाटते ! सर्कशीचं अज्ञात जग स्वीटीच्या शब्दांतून आपल्यासमोर साकार होतं.
माहेर मधील “अनोळखी पाऊलवाटा” या सदरासाठी सर्कस सुंदरी महाप्रयत्नांती मिळवली खरी ! पण एक सत्य कधीच मनांतून पुसलं गेलं नाही. त्या तिळभर ओळख नसलेल्या पोलीस इन्स्पेक्टरने स्वतः येऊन, सर्कस मॅनेजरला भेटून सर्कस सुंदरी मला मिळवून दिली. कसे आभार मानावे त्यांचे ? आज अनेकदा मनांत विचार येतो. खरंच ! अशा कितीतरी ज्ञात अज्ञात हातांनी वेळोवेळी आपल्याला आधाराचा हात दिला. निरपेक्ष साथ दिली. म्हणूनच आपली ही वाटचाल निर्वेधपणे होऊ शकली. आजही होत आहे.
क्रमशः
— लेखन : माधुरी ताम्हणे. ठाणे
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800