असं म्हणतात की, चांगल्या क्षणांना योग्य वेळी एन्जॉय केलं पाहिजे कारण निसटलेले क्षण पुन्हा येणार नाहीत, असं म्हणायचं कारण म्हणजे १९६८ सालात रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील एल. पी. इंग्लिश स्कूल च्या एस.एस.सी. बॅचचे आम्ही काही विद्यार्थी – विद्यार्थीनीं बोलता बोलता एस.एस.सी होऊन छप्पन्न वर्षे झाल्याची आठवण आली आणि नकळत तोंडातून उद्गार निघाले, अब तक छप्पन्न ! मग आम्ही नियमितपणे संपर्कात असलेल्या काही मित्रांनी एकत्र येऊन हे ऐतिहासिक छप्पन्नावे वर्ष संपर्कात न राहिलेल्या वर्ग मित्र, मैत्रिणींशी संपर्क साधून त्यांच्या सह, साजरे करण्याचे ठरविले.
आणि विशेष म्हणजे ते त्याप्रमाणे खेड येथे नुकतेच संपन्न झाले.
खरं तर संपर्काची साधने वाढली पण संवाद मात्र हरवत चालला आहे, मग तो मैत्रितला असो वा नात्यातला. परंतु २८ जानेवारी २५ रोजी आम्ही माजी विद्यार्थी जेंव्हा सकाळी एकत्र जमलो तेंव्हा प्रत्येकाचा चेहऱ्यावर कुतुहल मिश्रित आचंबा होता. मी कोण, अन तू कोण ? याचा शोध घेणारी जणू वेगवेगळ्या रंगांची गुलाब फुले एकमेकांसमोर उभी होती अन रंगबिरंगी फुलपाखरे उद्यानात मुक्त विहरत रहावी असा माहोल होता, इथुनच नव्याने संवादाचे अनेक दरवाजे खुले झाले त्यात काही म्हातारे अर्क केसांना कलप लावून तरुण तुर्कही झाले होते. सर मज्जाच मज्जा होती. त्याचाच हा वृत्तांत !
सकाळी आम्ही सर्व माजी विद्यार्थी वाणी पेठ येथे वास्तव्याला असणाऱ्या शिरिष पाटणे याच्या घराच्या भव्य हॉलमधे एकत्र जमलो. टप्पोरे गुलाब पुष्प व तिळगूळ देऊन प्रत्येकाचे स्वागत होऊन संक्रांतोत्सव साजरा झाला.
मग ओळखसत्र सुरू झाले. त्या ओळखीमधूनच विनोद निर्मिती होत होती. आम्ही गप्पा टप्पांमधे इतके रमलो की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद जणू ऐन माघ महिन्यात श्रावणसरींचा आनंदघनच रिमझिम बरसत होता असं वाटलं. आनंदाने भारावलेल्या या क्षणांनीच स्नेहमिलनाचा शुभारंभ झाला. हो तब्बल ५६ वर्षानंतर हा स्नेहाचा, भेटीचा मणिकांचन योग आला होता ना !
सकाळच्या सत्रात शाळेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय शशीभाई पाटणे व मुख्याध्यापक श्री बाळासाहेब भगत आले. त्यांचे पुष्पगुच्छ – शाल श्रीफळ देऊन स्वागत केले अन स्मृतिचिन्ह प्रदान केले. शशीभाईनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना, “या नवं पिढीतील मुले आपले जुने संस्कार विसरत चालले आहेत माझ्या समोर तुम्ही सर्व आजचे आजी आजोबा बसलेले आहात, तुम्ही ते संस्कार त्यांना शिकवा. हरवत चाललेली संस्कृती जतन करा, जिवंत ठेवा” असे प्रेमळ आवाहन केले. मुख्याध्यापक श्री बाळासाहेब भगत सरांनी उपस्थित सर्व आम्हा माजी विद्यार्थ्यांना तुमच्या भावी आयुष्याची वाटचाल सुखद, सुंदर व्हावी अशा मनोमन शुभेच्छा दिल्या. शाळेच्या वाचनालयासाठी आम्ही, देवेंद्र भुजबळ लिखित, “करिअरच्या नव्या दिशा”, “आम्ही अधिकारी झालो”, “गगनभरारी” या आणि निवृत पोलीस उप अधीक्षक सुनीता नाशिककर लिखित “मी पोलिस अधिकारी”, या प्रेरणादायी पुस्तकांच्या प्रत्येकी तीन तीन प्रती तसेच माजी विद्यार्थी कवी – लेखक सुनिल शरद चिटणीस यांची “पिंपळपान”, “सप्तरंग” “पापणपंखी” , “वाचकांच्या भेटीला” व डॉ विजय शिरिषकर यांचे “वाया गेलेले पोर” अशी एकूण सतरा पुस्तके व काही क्रिडा साहित्य मुख्याध्यापकांकडे सुपूर्द केले.
यानंतर सुनिल शिर्के यानी उद्योजक घडविणेसाठी तो करित असलेले प्रयत्न तसेच विजय शिरिषकर याने “वाया गेलेले पोर” “डॉक्टर कसे झाले” यावर छान मनोगत व्यक्त केले.
शिरिष पाटणे यानी त्या काळचं शिक्षण अन परिस्थिती यावर मनोगत मांडलं. सकाळच्या सत्राचा अध्यक्ष ग्रुप ॲडमिन विश्वास दामले यांनी तर सुत्रसंचालन ग्रुप ॲडमिन सुनिल चिटणीस यांनी केले. छान स्वादिष्ट रूचकर अल्योपहार झात्यावर पहिले सत्र संपले.
शाळा सोडल्यानंतर अर्ध शतक उलटून गेल्यानंतर आम्ही प्रथमच खेडला एकत्र जमलो होतो अन आम्हाला आमच्या शाळेला भेट द्यायची आतुरता – उत्सुकता लागून राहिली होती. आम्ही सर्व विद्यार्थी चालत चालत शाळेत गेलो. मुख्याध्यापक सरांनी आमचे स्वागत केले. शाळेभोवती एक प्रदक्षिणा मारली अन आम्ही एका वर्गातील बेंचवर येऊन स्थानापन्न झालो. मागील जुन्या स्मृति उजागर होत गेल्या. किती सांगू, किती नको असं प्रत्येकाचं झालं. मित्र मैत्रिणींमधे कितीतरी विनोद होत होते. आपापली टोपण नांवे काय होती हा ही एक विनोदाचा विषय होताच. शिक्षकांच्या आठवणी, त्यांच्या नकला करण्यात वेळ अगदी मजेत चालला होता. हास्यकल्लोळ थांबता थांबत नव्हता.
विजया मुकादम (भडसावळे) हिने शाळेच्या खूप आठवणी शेअर केल्या, वर्गाच्या फळ्यावर लिहिलेला सुंदर सुविचार विलास बुटाला याने वाचून दाखवला. इतक्यात श्री भगतसर आमच्या वर्गात आले अन आम्हाला एक विनंतीवजा आवाहन केले की ” मुला – मुलींकरीता वॉटर कूलरची नितांत आवश्यकता आहे” आपल्या बॅचकडून पुर्तता झाली तर आनंदच वाटेल. या आवाहनाला प्रतिसाद देऊन आम्ही लगेच सर्वानुमते वॉटर कूलर भेट देण्याचे ठरवले. “बेंच तिथेच राहतो आपण वर्ग सोडून जातो” पुन्हा असेच आम्ही पुढील सत्र व भोजन करण्यासाठी जड अंतःकरणानी वर्ग सोडून बाहेर पडलो.
पाटणे रेस्टॉरंट (पाटणे लॉन्स) येथे भोजनाची व एकत्रित गप्पांची मैफिल करण्याची व्यवस्था अगोदरच केली होती. तिथे आम्ही सर्व जमलो. आम्हा सर्वांना त्या वेळी शिकवणारे आमचे माजी सर सन्माननीय श्री प्रकाश काळे सर यांना आम्ही निमंत्रित केले होते, त्यांचे आगमन झाले. ते खास गोवा येथून आले होते याचं आम्हा सर्वांना कौतुक वाटलं. त्यांचं शाल – श्रीफळ – स्मृतिचिन्ह व सुबक श्रीकृष्णाची मुर्ती देऊन यथोचित स्वागत केले. विशेष म्हणजे इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतरही त्यांनी काही मुलांना नावासह ओळखलं याचं आम्हाला आश्चर्य वाटलं. त्यांच्या येण्यानी आम्हा सर्वांना आनंद झाला, उत्कटतेनी भारावलेल्या या क्षणांनी पुन्हा जुन्या आठवणीत आम्हांला नेले. आज आम्ही जरी आजी आजोबा झालो असलो तरी काळे सरांच्या मनांत आम्ही त्यावेळचे विद्यार्थीच तर होतो ना ? त्यांनी आम्हा सर्वांना लहान मुलांना देतात तशी कॅटबरी दिली, हा ही एख सुखद क्षण आम्ही अनुभवला, ‘अवघचि आनंद’ ……………
त्यानंतर आम्ही सर्व भव्य अशा लॉनवर एकत्र जमलो. पुन्हा गप्पा टप्पा, राहिलेल्या आठवणी सुरू झाल्या.
विश्वास दामले याने डिजिटल ॲरेस्ट या नांवाखाली जेष्ठ नागरिकांना व इतरेजनांना कसे फसवले जाते, रजिस्टर विल कसे करावे, बँकिंग व्यवहार कसे जपून करावे यावर मोलाचे मार्गदर्शन केले.
सुनंदा पुरोहितने हे पहिले संमेलन अत्यंत उत्तम संपन्न झाले अन दरवर्षी अशा संमेलनाचे आयोजन केले जावे असे मनोगत व्यक्त केल.
मसाल्यांशिवाय रोजचा स्वयंपाक तयार होत नाही हे निर्विवाद सत्यच. निरनिराळे मसाले उत्पादित करण्याचा ॥ लक्ष्मी इंडस्ट्रीज ॥ हा कारखाना आमचा मित्र विलास बुटाला याचा आहे. या कारखान्याला आम्ही भेट देऊन कामकाज पाहिले.
मी उद्योजक कसा झालो ? हे त्याने त्याच्या मनोगतात सांगितले व भेटीदाखल आम्हाला लक्ष्मी मसाल्यांची पाकिटे भेट दिली.
तब्बल ५६ वर्षानंतर भेटलेले आम्ही सर्व १९६८ च्या काळात प्रवेश करून त्यावेळच्या असंख्य आठवणी जागवीत सारेच सोळा – सतरा वर्षांचे झालो होतो, खूप खूप आनंद होत होता.
सांगता समारंभात या स्नेहमिलनाची सुखद आठवण म्हणून प्रत्येकाला स्मृतिचिन्ह भेट देण्यात आले. आनंदाने काठोकाठ भरलेले हे क्षण, व्यतित केलेले सुवर्ण क्षण कायमच स्मरणात राहतील यात काही शंकाच नाही.
या स्नेहमिलनाला सुनिल चिटणीस, विश्वास दामले, विलास बुटाला, विजय शिरिषकर, विजय दांडेकर, सुमती खेडेकर, सुनंदा पुरोहित, मधू पाटणे, शिरिष पाटणे (सपत्निक), किरण गायतोंडे (सपत्निक), अनिल घोडे, उल्हास कापडी, कृष्णा पिंपळकर, सुनिल शिर्के, विजया मुकादम, सतिश शेठ व मधू गाडगीळ सहभागी झाले होते.
‘कभी अलविदा ना कहेना’ हे गीत ओठांवर रेंगाळतच, पुन्हा भेटूया – संपर्कत राहूया – हरवलेला संवाद साधूया असे भावपूर्ण आवाहन करीत आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. प्रत्येकाच्या हातात स्नेहमिलनाचे स्मृतिचिन्ह दिमाखात डौलत होते आणि मनात सर्व क्षण डोळ्यापुढेयेत होते.. जड पावलांनीचआम्ही पुन्हा वास्तव जीवनात परतू लागलो…
— लेखन : सुनिल चिटणीस. पनवेल
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
*बीते हुए लम्हों की कसक साथ तो होगी
ख्वाबों ही में हो चाहे, मुलाकात तो होगी
सुनील जी तुमचं स्नेह संमेलन बघून ह्या ओळी आपसूकच आठवल्या. छप्पन वर्षांनंतर पुन्हा आपल्या सहपाठींची भेट होणं! खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे.
शाळेत असतानाचे ते अल्लड दिवस,ती दंगा मस्ती आपण कधीच विसरू शकत नाही.
आपल्या आयुष्यातील सोनेरी क्षण असतात ते.
ते सोनेरी क्षण तुम्हाला व तुमच्या मित्र/ मैत्रीणींना पुन्हा एकदा जगायला मिळाले, अनुभवायला मिळाले. हे बघून खूप आनंद झाला.
पुढे ही असेच स्नेह संमेलनं होतील. हीच शुभेच्छा देत आहे.