४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कॅन्सर जनजागृती दिवस असतो. या निमित्ताने पुणे येथील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातर्फे कॅन्सर जनजागृती केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या विषयी मुक्तांगण च्या प्रमुख मुक्ता पुणतांबेकर यांनी त्यांच्या फेसबुक वर माहिती व छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. या अनुषंगाने प्रतिक्रिया लिहिता लिहिता मी नकळतपणे लिहिलेला मजकूर लेखात रुपांतरीत होऊ शकतो हे लक्षात आल्याने तो मजकूर जशाच्या तसा पुढे देत आहे.
मुक्ताताई,
काळ किती भराभर पुढे जात असतो !
आपल्या आई वयाच्या अवघ्या ५४ वर्षी गेल्या आणि आता आपण ही ५४ वर्षांच्या होत आहे. असे वाटते की एक चक्र पूर्ण झाले आहे.असो. आपण कॅन्सर जागृतीचे काम हाती घेतले याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
माझ्या पत्नीला, अलका ला ७ वर्षांपूर्वी गर्भाशयाचा कॅन्सर झाला होता. दोन आठवड्यात गाठ २ए इतकी मोठी झाली होती. विशेष म्हणजे पोट खूप दुखते म्हणून आधी एमबीबीएस डॉक्टर ना दाखवले तर त्यांनी पोटदुखी वरच्या गोळ्या दिल्या. तरी फरक पडला नाही म्हणून एम डी डॉक्टरना दाखवले तर त्यांनी आणखी स्ट्राँग औषधे दिली. या सर्वांमुळे अगदी गळुन गेल्या सारखे झाल्याने तिने ७ ऑक्टोबर २०१७ रोजी सकाळीच देवश्री ला (मुलगी) फोन केला असता नुसते आईच्या आवाजावरून तिची तब्येत गंभीर असल्याचे ओळखून तिचे फॅमिली डॉक्टर, डॉ डेलीवाला, जे होमिओॅपेथीचे डॉक्टर आहेत, त्यांना दाखवायला बोलावले. कशी बशी धडपडत अलका देवश्रीकडे पोहोचली आणि दोघी डॉ डेलीवाला यांच्या कडे गेल्या.
डॉ डेलीवाला यांनी पोट दुखते म्हणून जुन्यापद्धती प्रमाणे पोट दाबून बघितले असता त्यांना पोटात गाठ असल्याचे लक्षात आले. लगेच त्यांनी सोनोग्राफी करायला सांगितले. तर त्यात गाठ आढळलीच. मग खात्री करण्यासाठी त्यानी सी टी स्कॅन करण्यास सांगितले. रिपोर्ट बघुन डॉक्टर डेलीवाला यांनी देवश्री ला सगळी कल्पना दिली आणि स्री रोगतज्ञ यांना लागलीच भेटायला सांगितले.
मग आमच्या स्नेही डॉ रेखा डावर स्री रोगतज्ञ, ज्या जे जे हॉस्पिटल मध्ये स्त्री विभाग प्रमुख होत्या, यांना ते रिपोर्ट्स व्हॉट्स ॲपवर पाठविले. ते पाहून त्यांनी दुसऱ्या दिवशी, ९ ऑक्टोबर २०१७ रोजी सकाळी आठ वाजताच अलकाला घेऊन रिलायन्स हॉस्पिटल गिरगांव येथे यायला सांगितले. सर्व तपासण्या करून दुसऱ्या दिवशीच ऑपरेशन करायचे ठरले. गाठ कॅन्सर ची असल्याची शक्यता लक्षात घेऊन कॅन्सर सर्जन डॉ परेश जैन यांना ही ऑपरेशन थिएटर मध्ये तयार राहण्यास सांगण्यात आले होते. त्या प्रमाणे १० ऑक्टोबर २०१७ सकाळी ८ वाजता अलका हॉस्पिटल मध्ये दाखल झाली. जे ऑपरेशन अर्धा तास चालेल, असे सांगितले होते, ते ऑपरेशन तब्बल सहा तास चालले. नंतर तिला आय सी यू मध्ये हलविण्यात आले. तिला तिथे दोन दिवस ठेऊन साध्या खोलीत हलविण्यात आले. आठवडाभर तिथे ठेऊन, काय काळजी घ्यायची, काय करायचे, काय करायचे नाही, आहार विहार, औषधे असे सर्व सांगून एका आठवड्याने घरी सोडण्यात आले.
तपासण्यांअंती ती गाठ कॅन्सर ची असल्याचे निदान पक्के झाल्यावर केमोथेरपी सुरू झाल्या. अलकाने आणि आम्ही सर्वांनीच ही बाब दीड महिना कुणाला कळू दिली नाही. आमचे आम्हीच धीराने या परिस्थितीला तोंड देत राहिलो. अलकाचा धीरोदात्तपणा, सकारात्मकता पाहून आधी तिची मुलाखत हॉस्पिटल च्या वेब चॅनल वर घेण्यात आली. नंतर आकाशवाणी, दूरदर्शन वर ही तिच्या मुलाखती घेतल्या गेल्या.
पुढे अलकाने या सर्व अनुभवांवर आधारित “कॉमा” हे पुस्तक लिहिले. तसेच याच नावाने दहा मिनिटे कालावधीचा माहितीपट तयार करण्यात आला.
माहिती पटाचे विमोचन तत्कालीन राज्यपाल श्री भगतसिंग कोष्यारी यांच्या हस्ते ४ फेब्रुवारी २०२० रोजी मुंबईतील राजभवन येथे झाले. त्यावेळीं ते रागावून बोलले, ‘भुजबल ये कॅन्सर क्या सिर्फ मराठी लोगोको होता है क्या ?’ त्यावर मी म्हणालो, ‘सर कोई भी बिमारी, तकलीफ धर्म, भाषा, देश, प्रांत, जातपात देख कर थोडी होती है. वो तो कभिभी, किसिको हो सकती है.’ हे ऐकून ते म्हणाले, ‘आधा भारत हिंदी भाषिक है. इसलिये ये किताब, माहितीपट हिंदीमें करो.. ‘ तर मी सांगितले, हमारी क्षमता के अनुसार हम काम कर रहे है. तर ते म्हणाले, अब मैं महाराष्ट्र सरकारको ये सब हिंदीमें करने का आदेश देता हू !
पुढे महिनाभरानी मी परदेशात गेलो. १५ दिवसांनी आलो तर कोरोना ने थैमान घालायला सुरुवात केली होती. पुस्तक, माहितीपट हिंदीत, इंग्रजीत करायचे होते, ते अजूनही राहूनच गेले.
काही जणांना हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेत अनुवादित करण्यासाठी मूळ पुस्तक दिले आहे. अजून प्रयत्न सुरू आहेत. कधी यश येईल तेव्हा येवो.
दरम्यान, आम्ही “कॉमा संवाद उपक्रम” करायला सुरुवात केली. या उपक्रमात आम्ही १० मिनिटांचा “कॉमा” माहितीपट दाखवतो. मग अलका, तिने कॅन्सर ला कसे तोंड दिले, या विषयी बोलते. त्यानंतर संबंधित आयोजक संस्थेने बोलाविलेले डॉक्टर १० मिनिटे बोलतात. अशी ३० मिनिटे झाल्यावर पुढील तास दीड तास शंका समाधान, प्रश्नोत्तरे चालतात.
आज पर्यंत “कॉमा संवाद उपक्रम प्रेस क्लब, मुंबई; नवी मुंबई महानगरपालिका; मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे; रानडे इन्स्टिट्युट, पुणे; उरळी कांचन येथील निसर्गोपचर आश्रम असे अनेक ठिकाणी झाले आहेत. हे कार्य सेवा म्हणून आम्ही करतो. त्यामुळे यासाठी आम्ही काही मानधन घेत नाही.
तसेच अलका शक्य असल्यास तिथे समक्ष, तसे शक्य नसल्यास मोबाईल वरून रुग्ण, त्याचे/तिचे कुटुंबीय यांना धीर, दिलासा देण्याचे काम करीत असते.
आता तर दिवसेंदिवस कॅन्सर चे प्रमाण खूपच वाढत चालले आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांची गरज वाढतच चालली आहे. कारण आजही आपल्या कडे आजारी पडल्या शिवाय, त्यात ही विशेषत: स्त्रिया डॉक्टरकडे जात नाही. वेदना, दुखणे फारच असह्य झाल्यावर डॉक्टर कडे धाव घेतात. म्हणून डॉ रेखा डावर म्हणतात की, डॉक्टर म्हणजे काही देव नाही. या आजाराचे जितक्या लवकर निदान होईल, जितक्या लवकर योग्य उपचार सुरू होतील तितकी रुग्ण वाचण्याची शक्यता अधिक असते. म्हणून स्त्रियांनी पस्तिशीनंतर काही तपासण्या दरवर्षी करून घ्यायला हव्यात आणि मी तर म्हणेन, नुसत्या स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनी देखील पस्तीशीनंतर, आपल्या फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्यानुसार दरवर्षी काही तपासण्या करून घ्यायला हव्यात.
यात एक मोठीच अडचण म्हणजे काही डॉक्टर्स नी काही तपासण्या करून घ्यायला सांगितलेच तर डॉक्टर विषयीचा विश्वासही इतका कमी झाला आहे की, रुग्ण आणि त्याचे नातेवाईक यांना वेगळाच संशय येतो. त्यात तपासण्या करून काहीच आढळले नाही तर आनंद वाटायच्या एवजी, पैसे खाण्यासाठीच तपासण्या करायला लावल्यात म्हणून डॉक्टरला दोष देण्यात येतो.
कॅन्सरसाठी आता बदलती जीवनशैली, सकस आहार न घेणे, नियमित व्यायामाचा अभाव, योग साधना न करणे, वाढते प्रदूषण, मद्यपान, तंबाखू, स्ट्रेस असे अनेक घटक कारणीभूत ठरू लागले आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आदर्श जीवनशैली, योग्य आहार, विहार याचा अवलंब केलाच पाहिजे. इतके करूनही कॅन्सर होणारच नाही, याची काही शाश्वती नाही. तरी पण आपण अशी आरोग्यदायी जीवनशैली, सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर त्या आजाराशी झुंज देताना आपली शारीरिक, मानसिक क्षमता चांगली राहिली असल्याने त्याचा या भयंकर आजाराच्या उपचारात फार चांगला उपयोग होतो, हे आम्ही स्वानुभवावरून सांगू शकतो.
लिहिता लिहिता खूप लिहून गेलो. आता थांबतो आपल्या सर्वांना आनंददायी, आरोग्यदायी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा.
आपला स्नेहांकित.
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
(निवृत माहिती संचालक, माजी दूरदर्शन निर्माता, पत्रकार
तथा संपादक, www.newsstorytoday.com.) 9869484800
— ईमेल : alka.bhujbal1964@gmail.com
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800i