Friday, February 7, 2025
Homeयशकथाउच्च शिक्षित लावणी कलाकार : रेश्मा मुसळे परितेकर

उच्च शिक्षित लावणी कलाकार : रेश्मा मुसळे परितेकर

केवळ बी ए,एम ए करूनच न थांबता आता पी एच डी करीत असलेल्या लावणी कलाकार रेश्मा मुसळे परितेकर यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने जाणून घेऊ या, त्यांची सुखदुःख.. रेश्माताईंना आपल्या पोर्टल तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

रेश्माताईंचा जन्म ६ फेब्रुवारी १९८८ रोजी प्रसिद्ध लावणी नृत्यांगना छायाबाई यांच्या पोटी झाला. त्या लहान म्हणजे अगदीच तीन चार वर्षांच्या असल्यापासून त्यांची आई नाटकामध्ये, कलापथकामध्ये काम करून कुटुंबाची उपजिवीका करायची. तेव्हा आई त्यानाही सोबत नेत असे. तिथे त्या नाटकाच्या ,कलापथकाच्या तालमी पहायच्या. संगीत, नृत्य, कलावंतांचे संवाद, शब्दफेक हे सर्व त्या कुतुहलाने पाहून शिकत गेल्या. पुढे पुढे त्यानाही ते करावेसे वाटे. भाषांतरासाठी मराठी भाषा निटनेटकी समजुन घेणे फार गरजेचे आहे. भाषेचा अर्थ नाही कळला तर आपण अभिनय, संवाद ,शब्दफेक व्यवस्थित करुच शकत नाही. अभिनयामध्ये शब्द महत्वाचा असतो. शाळेत पाचवीला वर्गशिक्षिका खुप छान लाभल्या. त्या मराठीच शिकवत असत. शहा मॅडम प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित समजावून सांगत असत. त्यामुळे शिक्षण अपुरे राहीले याची खंत त्यांना वाटत नव्हती.

वयाच्या १० व्या वर्षापासून त्यांनी श्रीमती यमुनाबाई वाईकर, सत्यभामाबाई पंढरपूरकर, मधुताई कांबीकर आणि ढोलकी सम्राट पांडुरंग घोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली लावणी नृत्याचा सखोल अभ्यास हनुमान थिएटर, लालबाग येथे सुरू केला.

खेड्यापाड्यातील यात्राजत्रांमध्ये डोलक्याच्या सुपाऱ्याला आजी, आई सोबत रेश्माताई जात असत.रात्रभर जागुन वस्तीवस्तीत, चौका चौकात दोन्ही पायात ५ ते ७ किलो घुंगरु बांधून त्या नाचायच्या. त्या वेळी खेड्यापाड्यात लाईट नव्हते. रॉकेलचे टेंबे असायचे. काळजीपोटी आई त्यांना सोबत न्यायला नको म्हणायची. तर त्या उषामावशी बरोबर जायच्या. रात्रभर नाच नाच फक्त नाचायचे. यातुनच त्यांना नाचायचा, संगीताचा, तालाचा छंद लागला.

लावणी नर्तिकेच्या घराण्यात जन्मलेल्या रेश्माताई बी.ए. झालेल्या आहेत.त्यांनी भारतातील प्रसिद्ध अकलूज लावणी महोत्सवात सलग तीन वर्षे प्रथम पारितोषिक मिळवून ‘हॅट्रीक’ केली आहे. नंतरही प्रथम पारितोषिक सतत पटकाविले आहे. महाराष्ट्र शासनाच्या अनेक लावणी महोत्सवात त्यांनी भाग घेतला आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह गोवा, दिल्ली, राजस्थान मध्येही त्यांनी लावणी रसिकांना मंत्रमुग्ध केले. या शिवाय त्यांनी दुबई, चीन या व अन्य चार पाच देशात लावणीचे कार्यक्रम केले आहेत. आजपर्यंत त्यांचे २५०० पेक्षा जास्त कार्यक्रम झाले आहेत. हजारो रसिकांची मने तर त्यांनी जिंकलीच आहे, शिवाय त्या संगीत नाटक अकादमी पारितोषिक विजेत्या कलाकार आहेत.

“लावणी ही शब्दांचा अर्थ लक्षात घेऊन सादर केली पाहिजे”, त्या म्हणतात. पारंपरिक लावणीच्या प्रसारासाठी रेश्माताईंनी टीव्हीचे विविध कार्यक्रम, “सप्तरंगी लावणी” या सारखे कार्यक्रम, काही चित्रपट तसेच “लावणी भूलली अभंगाला” या नाटकात भूमिका साकारली आहे. एकीकडे पारंपरिक लावणीसाठी त्यांच्या सारख्या नृत्यांगना झटत असताना युट्यूब, स्टेज शो, विविध वाहिन्या आणि थिएटरमध्ये लावणीचे बीभत्स सादरीकरण करून लावणीची व्याख्याच बदलत असल्याचे
पाहून त्यांना संताप येतो. बीभत्स गाण्यांवर नृत्य होत असून त्यालाच लावणी संबोधले जाऊ लागल्याने आपली जबाबदारी वाढली आहे, असे त्यांना वाटते. त्या स्वतः मुंबई विद्यापीठात याबाबत विशेष प्रयत्न करीत असून, त्यांनी रेश्मा परितेकर ‘लोककला डान्स अकादमी’ स्थापन करून ऑनलाइन लावणी पोर्टलही त्या सुरू करणार आहेत.

रेश्माताईना वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना असे जाणवले की लोक कलावंताना सर्वच स्तरातील लोक कमी दर्जाचे समजतात. त्यामागे एक कारण असे आहे की, पोट भरण्यासाठी ते शिक्षण अर्धवट सोडून काम करायला लागतात. कमी शिकल्यामुळे त्यांच्या मनात न्यूनगंड राहतो. त्यामुळे त्या आता इतर नृत्यांगना, येऊ घातलेल्या नृत्यांगना जास्तीतजास्त शिकाव्यात म्हणून प्रयत्नशील आहेत. त्या स्वतः मुंबई विद्यापीठातील लोककला विभागात लावणी शिकविण्यासाठी जात असतात.

सध्या लावणीला जे चित्रपट, रिअॅलीटी शोज चे वळण प्राप्त झाले आहे, त्यामुळे खरी लावणी लोप पावत चालली असून लावणी जीवंत ठेवण्यासाठी आपली वैचारिकता वाढवण्याची आवश्यकता आहे, असे त्यांना वाटते. हे करीत असताना ज्या भाषेतून आपण व्यक्त होतो ती आपली मायमराठी नीट समजून घेण्याची गरज वाटल्याने त्यांनी मुक्त विद्यापीठातून एम.ए. मराठी केले. सध्या त्या “मराठी लावणी” या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पी.एचडी. करीत आहेत.

साहित्य किंवा कला आपल्याला प्रकट होण्याचे एक माध्यम असते आणि कलावंताला शब्दातुन व्यक्त होण्याचे एक छान माध्यम आहे. भावना व्यक्त झाल्या की मन मोकळे होते. शब्दाच्या माध्यमातून भावनांचे विरेचन होते. मराठी भाषेचे खाद्य म्हणजे शब्द अलंकार. साहित्य नसेल तर व्यक्त होण्याचे माध्यम नसेल. भारतातील साहित्याने गद्य पद्य वाङ्‌मयाला प्रबळ केले आहे. समृध्द केले आहे. नवीन पिढीपर्यंत ही पारंपारिक लावणी पोचली पाहिजे असे त्यांना वाटते. म्हणून एक युटुब चॅनल त्या चालवतात. या बरोबरच “रेश्मा वर्षा प्रतिष्ठान अॅकॅडिमी” च्या माध्यमातून त्या प्रयत्न करीत आहेत.

अशा या लावणीसाठी आयुष्य समर्पित केलेल्या रेश्माताईंना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती:सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. नूतन आणि नंदा यांचा हिंदी चित्रपट सृष्टीचा काळ आठवला की लक्षात येतं त्याकाळी चित्रपटांमध्ये काम करणे म्हणजे समाजात किती मोठी जोखीम होती समाज त्यांच्याकडे कसा पाहत होता आणि आज उर्मिला मातोंडकर माधुरी दीक्षित नेने यांच्यासारख्याकडे पाहिल्यानंतर अधिकारी मराठी कलावंत चित्रपटाकडे वळले आहेत काही कलांना समाज वाकड्या नजरेने पाहत असतो अशावेळी त्या कलर त्या कलाक्षेत्राला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याकरता कलावंताला स्वतःला शिकून सवरून नावलौकिक मिळवून प्रतिष्ठित व्हावं लागतं नेमकं हेच रेश्माताई करत आहेत. त्यांची ही जाण अधिक महत्वाची. म्हणून त्यांनी कुर्निसात!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी