Wednesday, March 12, 2025
Homeयशकथा"पद्मश्री" सानो वामुजो

“पद्मश्री” सानो वामुजो

नागालँड महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि नागा मदर्स असोसिएशनच्या (NMA) संस्थापक सदस्या सानो वामुजो यांना सामाजिक कार्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय सेवेसाठी पद्मश्री २०२४ ने सन्मानित करण्यात आले आहे. ८४ वर्षीय सानो वामुजो यांना “शांतता मोहिमांचे नेतृत्व करणे आणि महिलांचे प्रतिनिधित्व करणे” यासाठी ओळखले जाते.

२७ मार्च १९४० रोजी फेक, नागालँड येथे जन्मलेली सानो दिवंगत डॉ. सेव्हिल त्रालू आणि दिवंगत विटुनो इरालू यांची कन्या. तिच्या वडिलांच्या वैद्यकीय अधिकारी म्हणून वारंवार बदल्यांमुळे सानोचे प्रारंभिक शिक्षण नागालँडमधील विविध ठिकाणी झाले. तिने किगवेमा, कोहिमा, फेक आणि मोकोकेहुंग सारख्या नागालँडमधील सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेतले. कोहिमा येथील नागा नॅशनल हायस्कूलमधून नववी उत्तीर्ण झाल्यानंतर, १९५६ मध्ये संपूर्ण नागालँडमध्ये मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाया सुरू असल्याने, सॅनोच्या कुटुंबाने भूमिगत आश्रय घेतला. परत आल्यावर, ती १९५८ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाली आणि गुवाहाटी विद्यापीठातून कला शाखेची पदवी (१९६३), बॉम्बे विद्यापीठातून बी.एड. (१९६५) आणि नॉर्थ-ईस्टर्न हिल विद्यापीठातून एम.ए. (शिक्षण) (१९८०) तिने प्राप्त केली.

श्रीमती वामुजो यांनी अनेक शाळांमध्ये शिकवले आणि पूर्वीचे मिशन इंग्लिश स्कूल (आता ईस्टर्न ख्रिश्चन स्कूल, चोझुबा, फेक जिल्हा) सुरू करण्यास मदत केली, आणि तेथील पहिल्या मुख्याध्यापिका (१९६७-७१) तसेच बॅप्टिस्ट इंग्लिश स्कूल, कोहिमा (१९७२) च्या मुख्याध्यापिका म्हणूनही काम केले. १९८२ मध्ये त्या कोहिमा येथील बॅप्टिस्ट कॉलेजमध्ये व्याख्याता होत्या.त्यांनी १९६८-१९७० दरम्यान मध्य प्रदेशातील पचनारी येथून असिस्टंट लीडर्स ट्रेनिंग (एएलटी) आणि हिमालय वुड बॅज (६) मध्ये गर्ल गाईडिंगमध्येही पात्रता मिळवली होती आणि आजही भारत स्काउट्स आणि गाईड्समध्ये त्या सक्रियपणे सहभागी आहेत. त्यांनी नागालँड, कोहिमा (१९७२) येथे भारत स्काउट्स आणि गाईड्समध्ये राज्य आयोजन आयुक्त म्हणून काम केले आणि नंतर अनेक वर्षे त्याचे उपाध्यक्ष म्हणून काम केले.

पदमश्री पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर मिडियाशी बोलतांना त्यांनी सांगितले की, सामाजिक कार्य आणि शिक्षणात करिअर करण्याची त्यांची प्रेरणा शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्याच्या आणि आई म्हणून त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या इच्छेतून आली आहे. सारा समाज कुटुंबाप्रमाणे वाटत असलेल्या त्या म्हणाल्या, “इतकी वाईट परिस्थिती असतांना मी शांत राहू शकत नाही. वाईट प्रभाव माझ्याभोवती असतांना आणि माझ्या कुटुंबावर परिणाम करत असतांना मी मौन प्रेक्षक राहू शकत नाही,” आणि म्हणूनच आईच्या भूमिकेतून निर्माण झालेल्या या दृढनिश्चयामुळे त्यांच्या मुलांसाठी आणि समुदायासाठी सुरक्षित आणि शांत वातावरण निर्माण करण्याची त्यांची इच्छा बळावली.

हे एकट्याने साध्य होणार नाही हे ओळखून, वामुजो यांनी एक व्यासपीठ सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या मैत्रिणींशी संपर्क साधला आणि १९८४ मध्ये कोहिमा येथे नागा मदर्स असोसिएशन, (NMA)ची स्थापना केली.
नागालँडमधील वांशिक संघर्ष, मोठ्या प्रमाणात मद्यपान आणि अंमली पदार्थांच्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर, नागालँडमधील महिलांसाठी, NMA एक छत्री संघटना बनली, ज्याने अंगामी, आओस इत्यादी विविध नागा वांशिक गटांच्या महिला शाखा एकत्र आणल्या. १९८० च्या दशकात नागालँडमध्ये अंमली पदार्थांचे व्यसन ही एक व्यापक समस्या होती. यामुळे या धोक्याशी लढण्यासाठी विविध क्षेत्रातील महिला एकत्र आल्या. घराघरांतून माता एकत्र आणण्यात त्यांना यश मिळाले कारण ही समस्या प्रत्येक घरी होती.

१९९० च्या दशकात, एनएमएने एचआयव्ही आणि एड्सशी लढण्यातही अग्रणी भूमिका बजावली. तसेच भ्रातृहत्या, NSCN (I-M) आणि NSCN (K) सारख्या विविध नागा संघटनांमधील हिंसाचार आणि भारतीय सुरक्षा दलांविरुद्ध आपले योगदान दिले.नागा समाजातील गंभीर सामाजिक समस्यांना तोंड देण्यासाठी, शांतता, एकता आणि महिलांच्या उन्नतीसाठी वामुजो यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. थोडक्यात नागालँडमध्ये शांतता आणि एकतेची तीव्र इच्छा असलेल्या त्यांच्या जीवन प्रवासात त्यांनी सामाजिक दुष्कृत्यांशी लढा दिला, राजकीय संघर्षांमध्ये मध्यस्थी केली आणि महिलांच्या हिताचे समर्थन केले. नागालँड राज्य महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षदेखिल होत्या, ज्याचे नेतृत्व त्यांनी सलग दोन वेळा केले. अध्यक्ष म्हणून आपल्या भूमिकेबद्दल बोलताना वामुजो म्हणाल्या की, “या अग्रगण्य संघाचे सुरुवातीचे लक्ष महिलांच्या हक्कांसाठी वकिली करणे आणि लिंग समानतेसाठी लढणे हे होते. याचा अर्थ असा नाही की महिलांनी पुरुषांशी लढावे पण महिला पुरुषांपेक्षा कनिष्ठ नसून आपण सर्व समान आहोत.” वामुजो यांनी परस्पर आदराची गरज अधोरेखित केली. जंगलांचा नाश हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे असेही त्या म्हणाल्या.

सानो वामुजो यांचे पति वामुझो फेसाओ हे नागा राजकारणात सक्रिय होते. पत्नीच्या कार्यास पाठींबा आणि योगदान होते. १९९० ते १९९२ या कालावधिमध्ये ते नागालँडचे मुख्यमंत्री होते. २००० मध्ये त्यांचे निधन झाले आणि त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सानो वामुजो यांना दिल्ली पोलिसांकडून नवज्योती पुरस्कार मिळाला आहे. तसेच युवकांसाठी केलेल्या कामासाठी, सामाजिक सेवांमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना विविध संस्थांतर्फे पुरस्कार दिले गेले आणि भारतीय सरकारने सामाजिक कार्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय सेवेसाठी २०२४ मध्ये प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार प्रदान करून गौरविले.

यावेळी ‘द मोरुंग एक्सप्रेस”ला दिलेल्या मुलाखतीत वामुजो यांनी सन्मानित वाटल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, “हा पुरस्कार संयुक्त प्रयत्नांचा परिणाम आहे. देवाने प्रत्येकाची निर्मिती वेगवेगळ्या प्रकारे केली आहे जेणेकरून आपण एकमेकांकडून शिकू शकू आणि समाजाच्या कल्याणासाठी योगदान देऊ शकू. आमच्या भूतकाळातील आणि वर्तमानातील महिला गेल्या चार दशकांपासून समाजविरोधी घटकांशी लढण्यासाठी एकत्र प्रयत्न करीत आहेत. हा पुरस्कार त्या सर्वांचा आहे आणि या पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली आहे कारण अजूनही बरेच काही करायचे आहे, समस्या खूप आहेत नागा समाजात.”

प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार विजेत्या, अतिशय नम्र, ८४ वर्षीय, सानो वामुजो सामाजिक कार्य आणि शिक्षणासाठी समर्पित जीवनाचे प्रतिक आहेत.

नीला बर्वे

— लेखन : नीला बर्वे. सिंगापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिल्पा कुलकर्णी on स्नेहाची रेसिपी ५
शितल अहेर on कविता
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित