आज, १३ फेब्रुवारी म्हणजे जागतिक रेडिओ दिन आहे.
आता, आजच हा दिन का आहे ? रेडिओचा शोध कुणी लावला, केव्हा लावला, भारतात रेडिओचे आगमन कधी झाले, त्याचा विकास कसकसा होत गेला, हे जर मी सांगत बसलो तर त्याचाच लेख लिहावा लागेल. म्हणून ते सर्व काही न लिहिता, आज रेडिओ दिनाच्या निमित्ताने मी लिहिणार आहे रेडिओ, म्हणजे भारत सरकारच्या ज्या सर्व यंत्रणेला आपण आकाशवाणी म्हणतो, त्या आकाशवाणीचा कल्पक, लोकप्रिय निर्माता राहिलेला, माझा मित्र डॉ महेश केळुसकर याच्या विषयी.
महेश ची आणि माझी पहिल्यांदा ओळख झाली ती १९९१ साली, जेव्हा आम्हा दोघांचीही यूपीएससी तर्फे प्रोग्राम एकझिक्युटिव्ह (ज्या पदाचे लोकप्रिय नाव “निर्माता” असे आहे !) पदासाठी निवड झाली तेव्हा. महेश ची नेमणूक मुंबई आकाशवाणी केंद्रात तर माझी नेमणूक मुंबई दूरदर्शन केंद्रात झाली. पण थोड्याच दिवसात मी दूरदर्शन सोडून महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात जिल्हा माहिती अधिकारी म्हणून अलिबाग येथे रुजू झालो. नंतर दीड वर्षातच माझी बदली मंत्रालयात झाली आणि शासकीय कामकाजाच्या निमित्ताने आमच्या नियमित भेटीगाठी होत राहिल्या. कधी कधी अवचितपणे अनेकदा आम्ही संध्याकाळी “प्रेस क्लब” मध्ये सुध्दा भेटत असू.
महेशचं खूप गोष्टींसाठी मला कौतुक वाटत आलं आहे. त्याकाळच्या अनेक मुलांप्रमाणे महेशनेही अतिशय कष्टाच्या परिस्थितीतून शिक्षण घेतलं. त्याचे आई -वडील थोडी शेती करायचे आणि कुटीर उद्योगही होते. शाळेत असताना महेशने फोंड्याच्या एसटी स्टँडवर केळी विकली. बाजारपेठेत तंबाखू विकलाय. आणि आईने वळलेल्या विड्यांची बंडलं वेगवेगळ्या पानटपऱ्यांवर नेऊन पोचवलीत. सावंतवाडीला कॉलेजला असताना तो अर्ध वेळ कॉलेजच्या लायब्ररीत काम करायचा. सकाळी कॉलेज सुटल्यावर, बाळकृष्ण कोल्ड्रिंक हाऊसच्या काऊंटरवर दोन तास काम केल्यावर त्याला मालकाकडून नाष्टा मिळायचा. शारीरिक अथवा बौद्धिक कष्टाच्या कुठल्याही कामाला कधीही नाही म्हणायचं नाही, हे त्यानं लहानपणीच ठरवून टाकलं आणि तो पुढे पुढे जात राहिला.
एम ए झाल्यावर महेश रत्नागिरी आकाशवाणी केंद्रात लागला. तिथे काही वर्षे काम केल्यानंतर, मी वर म्हणालो तसा १९९१ मध्ये निर्माता झाला. आकाशवाणी साठीच आयुष्यभर झटला. दूरदर्शन मुळे आणि नंतर आलेल्या शेकडी टिव्ही वाहिन्यांमुळे आता आकाशवाणी कोण ऐकते ? असा जराही विचार न करता, आकाशवाणी मधून दूरदर्शन मध्ये जाण्यासाठी खटपटी लटपटी न करता त्याने अतिशय कल्पकतेने, आपली प्रतिभा केवळ स्वतःसाठी न वापरता ती इमाने इतबारे आकाशवाणी साठी हातचे काही राखून न ठेवता वापरत आला आहे. कित्येक कल्पक आकाशवाणी मालिकांची, कार्यक्रमांची निर्मिती तो सातत्याने करीत आला. सरकारी नोकरी आहे, म्हणून कशा तरी पाट्या टाकल्या, दिलेले कार्यक्रम कसे तरी केले, कशी तरी वेळ भरली, कधी एकदा निघायची वेळ होते आणि मी बाहेर पडतो, अशा वृत्तीने त्याने कधी काम केले नाही.

महेश चे अनेक कार्यक्रम, मालिका खूप लोकप्रिय ठरल्या. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील विश्वास पाटील यांच्या “महानायक” कादंबरीचे महेश ने केलेले आकाशवाणी रूपांतर तर आजही श्रोत्यांच्या मनात कायमचे घर करून आहे.
मला आठवते, २००६ साली आकाशवाणी वर महाराष्ट्र शासनाने कार्यक्रम सुरू करण्याचे ठरविले होते, ज्याचे नामकरण “दिलखुलास” असे करण्यात आले. या कार्यक्रमाच्या शीर्षकासाठी अनेक गीते मागविण्यात आली होती. पण आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतेच गीत पसंत पडत नव्हते. एकेक दिवस निघत चालला होता. ते पाहून महेश ने स्वतःहून शीर्षक गीत लिहून दिले. वरिष्ठांनी त्यात थोडे फार बदल केले. रोज सकाळच्या आकाशवाणी च्या बातम्या झाल्यानंतर सुरू होणाऱ्या “दिलखुलास” कार्यक्रमात आजही तेच शीर्षक गीत वाजत असते ! त्यावेळीं खरं तर महेश बघ्याची भूमिका घेऊ शकला असता. कारण निर्मात्याने शीर्षक गीत लिहावे असे अपेक्षितच नसते. दुसरी गोष्ट, हे गीत लिहिले म्हणून ना त्याला आकाशवाणीकडून काही मानधन मिळणार होते ना आम्ही काही मानधन देणार होतो. म्हणून मग मी कशाला हे गीत लिहीत बसू ? असा कोता विचार त्याने केला नाही.

एका गोष्टीसाठी तर मी महेश चा कायमचा ऋणी राहील, ती गोष्ट म्हणजे तो जेव्हा “ग्रंथांच्या गावा जावे” या पुस्तक परीक्षण कार्यक्रमाचा निर्माता होता, तेव्हा त्याने मला विल अल्बम या अमेरिकन लेखकाने लिहिलेल्या आणि सुनंदा अमरापूरकर यांनी मराठीत अनुवादित केलेल्या “ट्युस डे वुईथ मॉरिस” या पुस्तकाचे परीक्षण लिहिण्यास सांगितले. त्या प्रमाणे मी आधी सराईताप्रमाणे पुस्तक परीक्षण लिहून द्यायचे ठरविले. पण जसजसे हे पुस्तक मी वाचत गेलो, तसतसा गंभीर, अंतर्मुख होत गेलो. माझा स्वतःचा जीवन विषयक दृष्टिकोनच या पुस्तकाने बदलला. तेव्हापासून मी स्वतः संयमित, संतुलित जीवन जगण्याचा प्रयत्न करू लागलो. अर्थात आपल्या कार्यक्रमासाठी तो किती चोखंदळपणे पुस्तके निवडीत असे, हे यावरून दिसून येते. कार्यक्रमांची गुणवत्ता राखण्याचा महेश चा नेहमी ध्यास असे. म्हणूनच रेडिओ कार्यक्रम निर्मितीसाठी त्याला तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.

आकाशवाणीत विविध अधिकारी पदांवर ३६ वर्षे सेवा करून महेश आता निवृत्त झाला आहे. एकंदरीत पाहू जाता आकाशवाणी ने महेश ला समृध्द केले तर महेशनेही आकाशवाणीला समृध्द केले असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही.
बहुमुखी सर्जनशील प्रतिभा लाभलेल्या महेशची आतापर्यंत कविता, कथा, कादंबरी, ललित गद्य, समीक्षा, बालसाहित्य आणि संशोधन लेखन प्रकारात ४४ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यातील अनेक पुस्तकांना राज्य पुरस्कारासहित अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. हिंदी, कन्नड, मल्याळम्, कोंकणी, गुजराती, इंग्रजी आदी भाषांमधून त्याच्या कवितांचे अनुवाद प्रसिद्ध झाले झालेत.

महेश गेल्या ४० वर्षांपासून देश- विदेशात काव्यवाचन करीत आला आहे. महाराष्ट्रातील कुठले ही साहित्य संमेलन असो, काव्य वाचनाचे कार्यक्रम असो, महेश तिथे नाही, असे होतच नाही !
वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन ही अतिशय धबडग्याची कामे करावी लागणारी ठिकाणे आहेत. त्यात परत शनिवार, रविवार, दसरा, दिवाळी असे सणवार असोत की हक्काची आठवड्याची सुट्टी असो की इतर सुट्ट्या असो किंवा आधी मंजूर करून घेतलेल्या रजा असो, त्या आपल्याला उपभोगता येतीलच याची शेवटच्या क्षणापर्यंत शाश्वती नसते. कधी कधी तर दिवसरात्र तहानभूक विसरून काम करावे लागते. अर्थात कधी कधी पंचतारांकित हॉटेल मधील आतिथ्य ही अनुभवयाला मिळते म्हणा. पण तीच एक नाण्याची बाजू पाहून बऱ्याच लोकांना ‘मीडिया’त काम करणाऱ्यांची मजा असते, अशी गैर समजूत होते. असो.
तर अशा या अनिश्चित काळवेळ असलेल्या नोकरीत राहून अफाट साहित्य निर्मिती करून महेशने त्याची पी एचडी ही पूर्ण केली आणि नुसतीच पूर्ण केली नाही तर त्याच्या ‘मालवणी मुलुखातील प्रयोगात्म लोककला’ या पी एच डी पर संशोधनाला मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा अ.का. प्रियोळकर तसेच पद्मश्री भाऊसाहेब वर्तक आणि रावबहादूर बांबर्डेकर असे तीन मोठे पुरस्कार मिळाले आहेत, ही मोठी अभिमानाची बाब आहे
महेश ला ‘नागरिक’ या मराठी चित्रपटाच्या कथा-पटकथा-संवाद लेखनासाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार आणि सह्याद्री दूरदर्शन पुरस्कार, मुंबई मराठी साहित्य संघाचा मराठी भाषा अभ्यासक व कार्यकर्ता म्हणून माधव ज्युलियन पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
इतके सर्व असून आकाशात विहार करीत असल्यासारखे न वागता बोलता महेश आधी जसा होता तसाच आजही आहे, हे विशेष. अशा या महेश ला रेडिओ दिनाच्या निमित्ताने पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
व्हॅलेंटाईन डेच्या पूर्व संध्येवर मित्रावर लिहिलेला लेख भावला. सरकारी अधिकाऱ्यांचे व्यक्तिमत्त्व त्यानी ठरवले तर लाल फीतीची रुक्ष बंधने झुगारून मुक्तपणे कशी कल्पक भरारी घेऊ शकतात याची दोन उदाहरणे वाचायला मिळाली.👏🏻👏🏻
भुजबळ सर आपण एकाच लेखात अन् लेखणीत दोन शब्दचित्र रेखटलीत – महेश आणि आकाशवाणीचे ते दिवस.
आपण म्हटल्याप्रमाणे महेश खरोखरच कायम जमिनीवर पाय रोवलेला सुहृद आहे.
एवढं सगळं करत असतानाही रंगात रंगुनी रंग माझा वेगळा, असा आहे महेश
मालवणी कवितेला त्यानेच मनाच स्थान मिळवून दिलंय.
त्याच्या जीवनातील अज्ञात घटनांची माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद.
अरे व्वा मॅडम. आपण खूपच छान आठवण लिहिलीय.
बघा,आपल्यातील प्रतिभा महेश ने किती आधी ओळखली होती ! आपण ती आठवण सांगून आपली कृतज्ञतेची भावना व्यक्त केलीत,यावरून आपल्या मनाचा मोठेपणा दिसून येतो.
भुजबळ सर, आपण डाॅ. महेश केळुसकर यांच्याविषयी ‘जागतिक रेडिओदिना’च्या निमित्ताने अत्यंत उत्तम लेख लिहिला आहे.
केळुसकर यांनी अनेक नवीन उपक्रम आकाशवाणीत सुरू केलेत, त्यातले काही अजूनही चालू आहेत. ते स्वतः उत्तम साहित्यिक आहेत. त्यांचे आकाशवाणीतील योगदान महत्त्वाचे आहेच!
मला आकाशवाणीवर पहिली संधी डॉ. केळुसकर यांनीच दिली, त्याची आठवण ताजी झाली.
प्रतिभा सराफ