बऱ्याचदा सासू सुनेचे नाते म्हणजे “विळ्या भोपळ्याचे सख्य” असल्याचेच दिसून येते. पण काही वेळा, काही ठिकाणी अपवाद दिसून येतात. अशाच एका छान अपवादाविषयी लिहीत आहेत, विद्या मंत्री.
अल्प परिचय : –
विद्या मंत्री या महानगर टेलिफोन निगम मध्ये कार्यरत होत्या. त्यांनी निसर्गोपचार आणि योग विद्या पदविका संपादन केली आहे. थोर मसाजिस्ट डॉ राम भोसले यांच्या त्या अनुयायी आहेत. न्यूज स्टोरी टुडे परिवारात त्यांचे हार्दिक स्वागत आहे.
– संपादक
माझ्या सासुबाईंच्या आठवणी आल्या की मनाच्या एका नाजुक कप्प्याला अलगद स्पर्श होवून त्यांच्या सहवासातील आठवणींचा हिंदोळा डोलायला लागतो.
लग्नानंतर सुरवातीला सासू – सून यांचा एकमेकांना जाणून घेण्यात काही काळ जातो. थोडासा धाक, वडीलधारेपणाचा मान ठेवून, चाचपडत, शिकत, पारंगत होवून कधी आपण सासूचे स्थान घेतो हे लक्षात येत नाही आणि प्रवाह पुढे चालू राहतो…
कराचीत पेढीचा व्यापार करणाऱ्या धाडसी पित्याच्या व प्रेमळ मातेच्या पोटी जन्माला आलेली ही ‘वत्सला‘. भावंडांची माई, वत्सी. त्याकाळी 8-10 मुलं असायची. भरपूर भावंडे, ताई, माई, भाऊ, भाई, भालू अशी सुटसुटीत टोपण नाव प्रचलित. शिक्षण घेता घेता लग्न बंधनात अडकली. संसाराला प्राधान्य देत पोष्टातली नोकरी सोडून सरस्वतीच्या सानिध्यात मधुकरांच्या साथीने शोभा आणत संसाराचे रेशिम धागे अखंड विणत गेली…

आमचं समृद्धीतलं घरं म्हटलं की डोळ्यांसमोर प्रशस्त असा हॅाल, दरवाजा जवळच्या खुर्चीत मालू मावशीच्या फोनची वाट पहाणाऱ्या आई, पायाजवळ बसून केस कुरवाळत घेणारा दिपू, समोर वर्तमानपत्रात डोकं घातलेले बापु, डायनिंग टेबलच्या एका टोकाला दमदार आवाजात ‘विठ्ठल तो आला आला, मला भेटण्याला’ म्हणणारे दादा, दुसऱ्या टोकाला नाजुक गव्हल्या वळत असलेल्या आजी, स्वयंपाक घरातून दरवळत असलेला सुगंध आणि मस्ती करत बागडत असलेली नातवंडं असं देखणं चित्र उभं रहातं.
त्यावेळी 5 मुलांचं कुटुंब. मुलांच संगोपन करताना त्यांच्या गरजा पुरवताना स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला सारायला लागायचं. येणाऱ्या मिळकतीतून जमाखर्चाचं नियोजन, भविष्याची तरतुद. ‘थेंबे थेंबे तळे साचे‘ म्हणत बचतीची सवय सर्वांच्या अंगवळणी पाडली.
आईंच व्यक्तीमत्व भारदस्त, कामाचा खटपट उरक. दिरंगाई नाही. सणासुदीच्या दिवसात घरगुती श्रीखंड, रवा, बेसन लाडू, चकल्या यांत त्यांचे प्रेम उतरायचे. त्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे. जाड व पातळ रसाची दुरदुरीत आमटी, पंचामृत, बटाट्याची काप जाडसर कापली तरच बरी लागते. गॅसची फ्लेम पातेल्याच्या बाहेर येवू न देणे, बेडशीटवर सुरकुती नसली पाहिजे ‘रात गई बात गई’ अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी मला लक्षात येत गेल्या. मनातील गोष्टी न सांगता ओळखून कृतीतून करत राहिल्या. सगळ्यांना देतच गेल्या. नशिबात असेल तसं होतं पण त्याला सामना करायचं पाठबळ दिलं. नाण्याची दुसरी बाजू हळूहळू स्पष्ट होत गेली.
भावंडांची माई. शारदाश्रमातील आईला वृध्दापकाळात एकटं वाटू नये म्हणून नेहमीची संध्याकाळी न चुकता मारलेली फेरी. नंतरच्या काळात समवयीन मैत्रीणीबरोबरचा कट्टा. नानामामावर विशेष प्रेम. संकटकाळी पुढचा मागचा विचार न करता मदत करण्यासाठी काहीही करण्याची झोकून देण्याची वृत्ती. ही त्यांच्या मुलांमध्येही आली. शिक्षणाचं महत्त्व जाणून त्यासाठी प्रसंगी स्वतः चे दागिने गहाण ठेवून मदत करण्याची वृत्तीला तोड नाही. मुलगा अचानक गेल्यावर सुनेला आहे तशीच रहा म्हणून लगेच बजावणारी पुरोगामी विचारांची सासू. यात मी तुझ्या साथीला आहे हा भक्कम पाठिंबा. नातवांवर प्रेम केलं पण नातींना दुधावरच्या साईप्रमाणे जपलं. ‘ये रे मामा शेतातून, कुर्ल्यो हाड रे पिशवीतून, माका दिरे पेंदोसो तु खारे डेंगोसो’ म्हटल्यावर बाळाचं खुदकन हसू आलंच पाहिजे. मामाची आठवण आणि नात्यांची ओळख. असंच दुसर ‘बाय माझी बरी आणि सांबारं करी आपण खाई फोडी आणि घोवाकं घाली कढी’ संसाराच्या गंमतीजमतीची सुरवात इथूनच होई.
वय जसजसं वाढत गेले, वृद्धापकाळात गोतावळ्यात रहायला खुप आवडायचे. सासु हा कुळाचाराचा, परंपरेचा दुवा असतो. सासुबाई – अहो आई ते आईचं स्थान नकळत कधी घेतं ते कळतं नाही.
आज जरी त्या नसल्या तरी त्यांनी लावलेल्या वात्सल्य रूपी रोपाचं फुलाफळांनी बहरलेल्या वृक्षात रूपांतर झालं आहे आणि त्यांची स्पंदन वहात आहेत…

— लेखिका – विद्या मंत्री. मुंबई
— निर्माती – सौ. अलका भुजबळ. ☎️ 9869484800