छत्रपती शिवाजी महाराजांची आज, १९ फेब्रुवारी रोजी जयंती आहे. त्यानिमित्ताने महाराजांच्या एका वेगळ्या पैलूवर प्रकाश टाकण्याचा हा एक प्रयत्न………..
रयतेचा राजा म्हणून गौरविलेले, मराठी साम्राज्याचे संस्थापक, हे कुशल प्रशासक, लष्करी डावपेचांमध्ये पारंगत, वाढते मुघल साम्राज्य यशस्वीपणे रोखणारे असे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म ज्युलियन दिनदर्शिकेनुसार १९ फेब्रुवारी १६३० रोजी, हिंदू दिनदर्शिकेनुसार फालगुन कृष्ण तृतीयेला, पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी गडावर झाला.
शिवाजी महाराजांच्या अंगी जन्मतःच नेतृत्व क्षमता होती. आई जिजाऊची शिकवण त्यांनी कायम अंगीकारली. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी त्यांनी काही विश्वासु मावळे जमवून “स्वराज्य” स्थापन करण्याची शपथ घेतली. शिवाजी महाराजांनी १६४५ पर्यंत आदिलशाहच्या पुणे प्रदेशाच्या आजूबाजूच्या चाकण, कोंढाणा, तोरणा, सिंहगड, पुरंदर या किल्याचा ताबा घेतला होता. शिवाजी महाराजांकडून मुघल साम्राज्याला धोका आहे, याची जाणीव आदिलशाहला झाली. पुढे गनिमी कावा वापरून महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या.
मराठा साम्राज्य उभारल्यानंतर,६ जून १६७४ रोजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. त्यांनी अल्पावधीतच एक कुशल राज्यकर्ता म्हणून ख्याती मिळविली. त्यांची प्रशासकीय धोरणे अतिशय उपयुक्त आणि मानवी होती. त्यांनी सतत प्रजेच्या हिताचा विचार केला. त्यानुसार सर्व आदेश दिले. विविध पत्रे दिली, या पत्रांमधून त्यांनी लोकहितवादी असे अनेक संदेश दिले.

शिवाजी महाराजांनी आपल्या ३५ वर्षांच्या कालखंडात हजारो पत्रे लिहिली असावीत. पण काल प्रवाहात जेमतेम २०० पत्रे उपलब्ध आहेत. त्यापैकी अस्सल पत्रे १७७ असावीत. ज्या पत्रांवर छत्रपतींचे शिक्कामोर्तब म्हणजे मथळ्यावर “प्रतिपतचंद्र” ही राजमुद्रा व शेवटी “मर्यादेयं विराजते” ही मर्यादा मुद्रा असेल ती पत्रे अस्सल होत. १७७ पैकी १३२ हुन अधिक पत्रे वतनबाब यासंबंधीची आहेत. राजकारणाविषयी २१ पत्रे आहेत तर सामाजिक व्यवस्थेविषयी १५ पेक्षा अधिक पत्रे आहेत.
इतिहास काळातील राजांचे पत्रलेखन म्हणजे प्रत्यक्ष लेखन लेखनिक करीत असे. त्यानुसार महाराज पत्राचा मसुदा तोंडी सांगत. त्यानंतर लेखनिकाने लिहिलेल्या पत्रात दुरुस्ती करून मोर्तब करीत.
पत्र म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला उद्देशुन लिहिलेला मजकूर होय. पण मराठीत पत्र ही संज्ञा वर्तमानपत्र या अर्थानेही वापरतात.पत्र म्हणजे नवी माहिती, नव्या ज्ञानाचे साधन असते. म्हणून व्यक्तीप्रमाणे सार्वजनिक जीवनातही पत्राचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यामुळे सामाजिक अभिसरण शक्य होते. सामाजिक घडामोडींची नोंद होते. म्हणूनच शिवाजी महाराजांची पत्रे अनन्य साधारण ठरतात. महाराजांच्या पत्रात अर्थपूर्ण शब्द योजना दिसते. या शब्दांना तत्कालीन जीवनाचा संदर्भ असल्याने अशा शब्दांचा वापर वैशिष्ट्यपूर्ण वाटतो. काही पत्रात फारशी भाषेचा प्रभाव दिसतो तर काही पत्रात देशी शब्दांचा वापर दिसतो. उदा. –
“अवलाद अफलाद” ऐवजी “लेकराचे लेकरी” किंवा “आणा शपथ” ऐवजी “बोल भाक”, “कौल बोलू” या सारखे शब्द आहेत.
एकंदरीतच, स्वराज्य काळात “स्वाभिमान जागृती” ही मुख्य प्रेरणा होती, ती भाषिक व्यवहारातही दिसून येते. महाराजांच्या पत्रांमधून त्यांच्या व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू दिसून येतात. त्यांचा रयतेविषयीचा जिव्हाळा, शिस्तप्रियता, प्रशासनातला करडा अंमल, प्रसंगी अधिकाऱ्यांची केलेली कान उघडणी, पराक्रमी वतनदार यांच्या विषयी वाटणारा आत्मभाव अशा विविध भावभावना, विचार दिसतात. समक्ष सूचना करावीं, मार्गदर्शन करावे, अशी त्यांची धाटणी वाटते. थोर पुरुषांनी प्रसंगोपात काढलेले उद्गार, व्यक्त केलेले विचार, स्फूर्तीप्रद संदेश यांना सुभाषिताचे सरूप प्राप्त होते. महाराजांच्या पत्रात अशी अनेक वाक्ये दिसतात. उदा.- “एक भाजीच्या देठास तेही मन न दाखविणे”, “गृहकलक बरा नव्हे”, “कथलियात फाईदा नाही”, “यात्रेमध्ये कोण्ही उपद्रव सहसा देऊ नये”, “महाराष्ट्र धर्म रक्षावा हा संकल्प” इत्यादी.
महाराज मजुरास रास मजुरी मिळण्याबाबत दक्ष असत. रसद पोचविण्याच्या बाबतीत मधल्यामध्ये गफलत करणाऱ्याना त्यांनी खडसावले आहे. आपल्या सैनिकांनी कसे वर्तन करावे, याबाबत त्यांच्या स्पष्ट आज्ञा आहेत. शत्रू आपल्यापेक्षा भारी असेल तर “गनिम दुरून नजरेस पडताच त्याचे धावणीची वाट चूकोन पलोन जाणे” अशी सूचना त्यांनी केली आहे. यावरून महाराजांचा गनिमी कावा दिसतो.
महाराजांच्या पत्रांमधून समाजहित दक्ष, न्यायी, शिस्तप्रिय, कुशल प्रशासक इत्यादी गुणांनी युक्त अशा आदर्श राजाचे चित्र उभे राहते. त्यांच्या पत्रांचा अभ्यास केल्यास शब्द, वाक्य, सुभाषिते, वाक्प्रोयोग, शैलीदार निवेदन, सामाजिक जीवनाचा अनूबन्ध दिसून येतो.
महाराजांनी कर्तृत्व गाजवून स्वराज्य स्थापन केले. स्वराज्य, स्वधर्म संगोपन या बरोबरच स्वभाषवृद्धीही त्यांच्याहातून झाली. त्यांच्या कर्तव्य क्षेत्राचा परीघ जेव्हढा मोठा झाला, त्या प्रमाणात भाषाभिवृद्धी घडून आली. राज्य कारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.
अशा या थोर, अलौकिक युगधुरंधर, रयतेच्या राजाचा वयाच्या अवघ्या ५२व्या वर्षी विषमज्वराचे निमित्त होऊन ३ एप्रिल १६८० रोजी हनुमान जयंती, चैत्रशुध्द पौर्णिमेच्या दिवशी रायगडावर मृत्यू झाला.
महाराजांच्या अष्ट प्रधानांपैकी एक, रामचंद्र नीळकंठ बावडेकर उर्फ रामचंद्र अमात्य यांनी “आज्ञापत्र” हा मराठेशाहीतील, विशेषतः शिव छत्रपती यांच्या राजणीतीवर चिकित्सात्मक ग्रंथ लिहिला आहे. शिवजयंतीनिमित्त, शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. संदर्भ : –
(१) मराठयांच्या इतिहासाची साधने, संपादक – वि. का. राजवाडे, प्रकाशक – राजवाडे संशोधन मंडळ, धुळे
(२) शिवचरित्र साहित्य खंड, भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे (३) यादवकालीन मराठी भाषा – डाँ. शं. गो. तूळपुळे – व्हीनस प्रकाशन, पुणे
(४) वृत्तपत्रांचा इतिहास – वि. कृ. जोशी, रा. के. लेले, युगवाणी प्रकाशन, मुंबई
(५) मराठेशाहीतील पत्ररूप गद्य – डाँ. सुधाकर पवार, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
शिवरायांची पत्रे हा आदर्श राज्याचा नमुना आहे.