१. महाराष्ट्राची शान
छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची शान
आनंदात रहात होते सर्व हिंदू मुसलमान ॥धृ॥
सिद्धी इब्राहिम अंगरक्षक कोंढाण्याचा किल्लेदार
सिद्धी हिलालचा पुत्र घोडदळाचा सरदार
राज्यकारभारात सर्व धर्मियांना मानाचे स्थान
आनंदात रहात होते सर्व हिंदू मुसलमान ॥१॥
काझी हैदरने सचिव म्हणून पाहिले काम
शमाखान ने मोगलांच्या किल्ल्यांना दिले सरअंजाम
राज्यात बांधली मज्जिद अन् दिली वतने दान
आनंदात रहात होते सर्व हिंदू मुसलमान ॥२॥

सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर
गनिमी काव्याने शत्रुवर मात करणारा धुरंदर
मानवतावादी निर्भिड रयतेचा राजा शीलवान
आनंदात रहात होते सर्व हिंदू मुसलमान ॥३॥
ज्योतिबांनी कुलवाडीभूषण पदवी दिली सहर्ष
बाबांनी राज्यघटनेत शिवरायांचा घेतला आदर्श
राजे समानतेने वागणारे माणुसकीची खाण
आनंदात रहात होते सर्व हिंदू मुसलमान ॥४॥
— रचना : अनिसा सिकंदर शेख. दौंड
२. स्वप्न स्वराज्याचे
साथीने मावळ्यांच्या घेतली शपथ
रायरेश्वरा साकडे स्वरक्त अर्पून
हिंदवी स्वराज्य हेच एकमेव स्वप्न
सांगती हर-हर महादेव गर्जून ….
बालक जन्मला वाढला गडावर
जयाची माता जिजाऊ पिता शहाजी
गावले सवंगडी जिवाभावाचे दिलदार
शोभला पराक्रमी नेता वीरशिवाजी ….

जागविले क्षात्रतेजा स्वस्वभावे
आगळा-वेगळा बहु सामर्थ्यशाली
प्रयत्ने सावधे साधण्या स्वराज्य
वीर मावळे मेळविले धैर्यशाली ….
भय घालवूनी तयार स्वतः लढाया
इतराही देतसे से मंत्र जागृतीचा
हाथ जोडून दक्ष उभे भवताली
लढवय्या अभिमानी मायभूमीचा ….
— रचना : विजया केळकर. नागपूर
३. जाणता राजा
माझ्या राजाचे वय होते
अवघे सोळा
रायरेश्वराच्या मंदिरी केले
शूर मावळे त्याने गोळा
महादेवाच्या पिंडीवर
रक्ताचा अभिषेक केला
शपथ घेत हिंदवी स्वराज्याचा
द्रुढ संकल्प केला
बाल शिवबाच्या निर्धाराने
माॅंसाहेबांचा चेहरा उजळला
राम कृष्णाच्या कथेतून केलेला
संस्कार प्रत्यक्षात साकारला
गुरु दादोजी कोंडदेव अन्
समर्थांची शिकवण आली फळाला
हर हर महादेवचा गजर
सह्याद्रीच्या कडेकपारीतून घुमला
भवानी तलवारीचे तेज
भिडले गगनाला
स्वराज्याचे तोरण बांधत
तोरणासह एकेक किल्ला ताब्यात घेतला
जाणत्या राजाचा गनिमी कावा
स्वराज्याच्या कामी आला
बलाढ्य शाहिस्त्याची तोडली बोटे
अफजलखानाचा काढला कोथळा
शिवरायांच्या शौर्याने साहसाने
केली भलतीच कमाल
राजांच्या पराक्रमाची साक्ष देतायत
प्रतापगड अन् पुण्यातला लाल महाल
आधी लगिन कोंढाण्याचे,
मग रायबाचे
शूर वीर तानाजी वदला
गड आला पण सिंह गेला म्हणत
राजांचा कंठ दाटून आला
तानाजी प्रमाणेच बाजीप्रभुंनीही
लाखांच्या पोशिंद्यासाठी बलिदान केले
बाजी प्रभूंच्या रक्ताने
घोडखिंडीला पावन केले
माझा अपमान तो महाराष्ट्राचा अपमान
सांगत औरंगजेबाला खडे बोल सुनावले
अंधार कोठडीतल्या नजरकैदेतही
जीवाला जीव देणारे मावळे भेटले
मिठाईच्या पेटा-यातून शिताफीने
शंभुबाळासह राजांनी पोबारा केला
डोक्याला हात लावत औरंग्या बोंबलला
या अल्ला या अल्ला
भागो पकडो हलकल्लोळ माजला
राजे महाराष्ट्रात सुखरूप पोहचले
अखेर अस्मानी सुल्तानी बुडाली
हिंदवी स्वराज्याचा भगवा फडकला
जय भवानी जय शिवाजी
जयघोष विश्वभर घुमला
न भूतो न भविष्यती असा रंगला
भव्य दिव्य राज्याभिषेक सोहळा

राजांनी भाळी लावला
मराठी मातीचा टिळा
रंजल्या गाजल्या रयतेला युगायुगातून
आभाळमायेचा वाली मिळाला
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार
राजांनी मोडून काढला
न्याय दिला गोरगरीब जनतेला
मातेसमान मानले परस्त्रीला
असा प्रजाहितदक्ष राजा
जगी न कुणी जाहला
मानाचा मुजरा करतो अभिमानाने
महाराष्ट्राच्या जाणत्या राजाला
— रचना : राजेंद्र वाणी. दहिसर, मुंबई
४. जन्म एका थोर पुरुषोत्तमाचा 🙏
माय भवानी प्रसन्न झाली
जिजाऊची कुस उजवली
महाराष्ट्राचे भाग्य उजळले
बाळ राजे जन्मासी आले
स्वप्न पडले स्वराज्याचे
ढाबे दणाणले मुघलांचे
विजय पताका फडकली
स्वारी सिंहासनारूढ झाली
पराक्रम होऊन अद्वितीय
जिजाऊचा शिवबा झाला जग प्रिय
शिकवण विचारांची
सद्वर्तनी आचारांची
सदाचारी कारभाराची
पुण्याई रयतेची
धन्य तो पिता
धन्य ती माऊली
शिवबाची सावली
शत शत प्रणाम
त्या महान सुपुत्राला
श्रीमंत योगी शिवाजीला
जय भवानी जय शिवाजी 🙏
— रचना : मीरा जोशी. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800