“रसकदम”
रसकदम ही बंगाली मिठाई असून ती नावाप्रमाणेच खरोखर रसभरलेली .. स्वीट आणि एकदम सॉफ्ट असते. तशी खूप कीचकट दिसते करायला .. पण थोडीशी ट्रिक वापरून आपण घरात एकदम शॉर्टकटने सोपी बनवू शकतो. बघूया मग करून ?
साहित्य :
अर्धा किलो खवा, 300 ग्रॅम गायीचे पनीर, अडीच वाट्या साखर, 2..3 वेलदोडे, 3..4 थेम्ब खाण्याचा केशरी किंवा पिवळा रंग, सजावटी साठी केशर काड्या, पिस्ते.
कृती :
प्रथम मिक्सर मधून खवा छान फिरवून घ्यावा म्हणजे तो सॉफ्ट होतो. मग पुन्हा मिक्सरच्या भांड्यात वेलदोडे साले काढून व पाव वाटी साखर एकदम बारीक करून ती खव्यात मिक्स करावी. छान मळून एकजीव करून गोळा बनवून झाकून ठेवावा. मिक्सर मधून फिरवल्यामुळे खवा मऊसूत तर होतोच पण थोडासा कोमट सुद्धा होतो आणि त्याचवेळी त्यात लगेंच पिठीसाखर घातली की अजून थोडासा सैलसर होतो व गोळे बनवायला एकदम सोपे जातात. शिवाय वेलदोड्याचा मंद स्वाद सुद्धा खूपच सुरेख येतो.
त्या नंतर पनीर सुद्धा मिक्सरच्या भांड्यातून मस्त फिरवून घ्यावे म्हणजे खूप हलके होते व जास्त मळण्याचे कष्ट होत नाहीत. मग ते ताटात काढून थोडे मळावे म्हणजे एकदम सॉफ्ट होऊन गोळे सहज व झटपट बनतात. मग त्याचे एकदम गोळी प्रमाणे लहान लहान बॉल्स बनवावेत. थोडे लहानच बनवावेत कारण नंतर त्याचा आकार दुप्पट होतो हे लक्षात घ्यावे.
आता गॅसवर कढईमधे साखर घालून त्यात 1 वाटी पाणी घालून विरघळायला ठेवावे. ती विरघळली की उकळी आल्यावर त्यात सावकाश पनीरचे बॉल्स सोडावेत व साधारण 20 मिनिटे मध्यम आचेवर व्यवस्थित छान उकळावेत. दर 5 मिनिटांनी अर्धी वाटी पाणी घालावे. कारण साखरेचा पाक घट्ट होत असतो. तो घट्ट झाला तर पनीर सॉफ्ट न राहता थोडेसे वातड.. चिवट होते म्हणून थोडी काळजी घ्यावी. बॉल्स 20 मिनिटे छान उकळले की एकदम स्पन्जी बनून ते मस्त जाळीदार् बनल्यामुळे त्यात पाक शिरून जड होतात व बुडाशी जातात. तेंव्हा ते छान रसगुल्ले बनल्याचे समाजावे. मग ते सगळे पाकातून काढून एका भांड्यात ठेवावेत व त्यात जिलेबीचा रंग घालावा. मग तारेच्या चाळणीत काढून पाणी पूर्ण नीटाळू द्यावे व थंड करण्यास ठेवावेत.
आता खवा पुन्हा थोडासा मळून घेऊन त्याचे एकसारखे पनीर बॉल्स पेक्षा थोडेसे मोट्ठे गोळे बनवून त्याच्या वाट्या बनवाव्यात व प्रत्येक खव्याच्या वाटीत एकेक थंड रसगुल्ला घालून ती व्यवस्थित बंद करून छान बॉल्स बनवून ठेवावेत.
शेवटी प्रत्येक बॉलवर पिस्ते व केशर काड्या लावून मस्त सजवावे व सेट होण्यासाठी फ्रीझ मध्ये ठेवावेत. थंड झाले की छान डिश मध्ये काढून सर्व्ह करावेत. मधेच एखादा सुरीने मधून कट करून त्यावर केशर घालून ठेवावा. म्हणजे आकर्षक दिसेल.
वैशिष्ट्य :
खवा व पनीर घरात करण्यासाठी वेळ व कष्ट दोन्ही लागतात ते आपण वाचवल्यामुळे कमी कष्टात व कमी वेळात ही सुरेख आकर्षक डिश बनवू शकतो. बाहेरून पांढरीशुभ्र व आतून रंगीत असल्यामुळे व रसगुल्ल्यातील पाकामुळे एकदम सुरेख, रसरशीत, सॉफ्ट व तोंडात घालताक्षणी विरघळणारी अशी डिश बनल्यामुळे सर्व जण पुन्हा पुन्हा हमखास मागून खाणारच..
— लेखन : सौ. स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800