Wednesday, March 12, 2025
Homeकलाद मॅजिक कार्पेट राईड

द मॅजिक कार्पेट राईड

नमस्कार मंडळी,
आज आपल्या न्यूज स्टोरी टुडे परिवारात स्वागत करू या श्री अक्षय शहा यांचे. ते मूळ इचलकरंजी जवळच्या कोरोची गावचे असून त्यांचे शिक्षण B.E (Electronics) इतके झाले असून ते एका बँकेत उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. बागकाम ही त्यांची खरी आवड असून त्यांनी 2016 पासून जवळपास 1800 तुळशीची रोपे भेट दिली आहेत. जास्वंदी, ह्युर्निया, ऑर्बिया, स्टॅपेलीया, कॅरालुमा आणि सक्युलंट्स या प्रकारांमध्ये त्यांना खास रूची आहे. 
– संपादक

लहानपणापासून अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा या गोष्टीची मला भुरळ पडलेली आहे. अल्लाउद्दीन जेव्हा पहिल्यांदा राजकुमारी जास्मीनला त्याच्या जादुई गालिचा वरून फिरायला नेतो आणि  The Magic Carpet Ride – A whole new world गाणे सुरू होते, ते गाणे फार आवडायचे. लहानपणी गाणे इंग्लिश मध्ये असल्यामुळे शब्द समजत नव्हते पण काहीतरी गुणगुणत आपणही त्या गालिचावर बसून मस्त आकाशात उडावे अशी नेहमी वाटायचे.

पुढे कामानिमित्त 2002 मध्ये अमेरिकेत जाणे झाले, विशेष म्हणजे लाॅस एंजल्स लाच पोस्टींग होते. तिथे डिस्ने पार्क मध्ये हीच गोष्ट कलाकार रंगमंचावर सादर करतात. त्या संगित नाटिके बद्दल मित्राने सांगितले होते की ही नाटिका चुकवायची नाही. या नाटकात जेव्हा  खरोखरचे शेकडो जीनी एकाचवेळी रंगमंचावर येतात तेव्हा डोळे जीनीसारखेच बाहेर यायला होतात. प्रचंड आश्चर्य वाटते. नाटिका पुढे पुढे सरकत रहाते आणि अल्लाउद्दीन  राजकुमारी जास्मीनला कार्पेट वरून फिरवण्याचा क्षण येतो आणि संपुर्ण प्रेक्षागृहातून ती कार्पेट आपल्या डोक्यावरून फिरत जाते आणि अक्षरशः सगळे जग फिरवून आणते. ताजमहल वरून देखील सैर घडवून आणलेली आहे तो क्षण भारतीयांना फारच रोमांचित करून जातो… रंगमंचावर  नाट्यगृहात प्रत्यक्ष कलाकार अशा जादुई कलाकारी प्रदर्शित  करतात तेव्हा थक्क व्हायला होते. नंतर मी वार्षिक पास काढून ती नाटिका जवळपास 10 वेळा पुन्हा पुन्हा अनुभवली.

त्या  Magic Carpet वरून आपण फिरावे, सगळे जग अनुभवावे हे लहानपणापासून वाटणारे स्वप्न या नाटिकेतून थोडेफार जगायचा प्रयत्न करत होतो. हे कार्पेट आपल्याकडे असावे असे मोठे झालो तरी वाटतच होते. पण हे The Magic Carpet  पर्शियन कार्पेट  खरेच मला मिळेल असे वाटले नव्हते.
२०२२ मध्ये सहवर्धन कुटंबात सामिल झालो. मी सामील झाल्यानंतर काही दिवसातच दिलीप ठकार सरांनी अमेरिकेतून पर्शियन कार्पेट या फुलांचे फोटो पोस्ट केले होते. मला अर्थातच अल्लाउद्दीनच्या जादुई गालिचाची आठवण झाली.

मला लहानपणापासूनच Huernia, Orbea या फुलांचा रोपांची फार आवड होती. याच प्रकारातील Persian Carpet – Edithcolea Grandis हे रोप आपल्याकडे असावे अशी प्रबळ इच्छा जागृत झाली. त्या निमित्त अल्लाउद्दीन चा गालिचाचे स्वप्न पुर्ण होईल असे माझ्या आतील लहान मुल म्हणत असावे. झाले, शोध सुरू झाला पण मिळेल असे वाटत नव्हते. पुण्यातील एक जणांचा नंबर मिळाला, त्यांना विचारले तर ₹१५०० मध्ये ५-६ इंचाचे कटिंग देईन म्हणाले. ऑनलाईन दोन-तीन ठिकाणाहून ३००-४०० मध्ये मागवले होते आणि नेहमीप्रमाणे फसवणूक झाली.

Euphoria सक्युलंट्स पाठवून दिले, जे मला आवडत नाही (ज्यांना आवडते त्यांना भेट दिले त्यामुळे पैसे वाया नाही गेले). शेवटी हो नाही हो नाही करत मी पुण्यातूनच ₹१५०० चे कटिंग घेतले. मला आमची सौ.म्हणाली “घरातला खरा गालिचा पण यापेक्षा स्वस्त आहे !” पण लहानपणापासूनचे स्वप्न बाळगलेले बालमन आणि वेगळ्या रोपांचे वेड यापुढे काही चालतं का ? मला त्या रोपाचे कटिंग मिळाले. बरीच काळजी घेत रोप वाढवले. आता मस्त वाढले आहे. पण मला whole new world मध्ये घेवून जाणारी  The Magic Carpet मात्र फार वाट बघायला लावते.

कालच समजले होते आज Magic Carpet Ride करायला मिळणार. पहाटे 2, 4, 5:30, 6 फुल उमलले का चेक करण्याकरता गच्चीवर जावून आलो. 6 नंतर मात्र झोपून गेलो आणि साडे सात वाजता पुन्हा जाग आली. गच्चीवर गेलो तर एक अर्धोन्मीलित आणि एक पुर्ण उमललेले.  Hyperlase व्हिडीओ काढता न आल्याची हलकीशी निराशा पण कार्पेट दारी आल्याचा आतील बालमनाला झालेला प्रचंड आनंद, मनातील सगळ्या भावना उचंबळून आल्या. भावना ~लेखणीतून कागदावर~ अंगठ्यामार्फत मोबाईल मध्ये उतरवल्याशिवाय चैनच पडली नाही.

या पर्शियन कार्पेट मुळे मी सक्युलंट्स आणि फुलांचे एक वेगळे विश्वच (A whole new world) माझ्याकडे निर्माण केले आहे. लहानपणापासून मनात कोरलेली Magic Carpet आणि A while new world ची सफर आता माझ्या गच्चीवरच अनुभवतो.

अक्षय शहा.

— लेखन : अक्षय शहा. चिंचवड, पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिल्पा कुलकर्णी on स्नेहाची रेसिपी ५
शितल अहेर on कविता
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित