Wednesday, March 12, 2025
Homeयशकथाअसे घडले दामाजी

असे घडले दामाजी

नमस्कार वाचक हो 🙏🏻
माणूस ठरवतो एक आणि होतं एक.. पण जे ठरवू त्यावर ठाम राहिले तर यश फार दूर नसते. अशा वेळी एखाद्या गोष्टीचा सातत्याने पाठलाग करताना कितीही अडचणी समोर उभ्या राहिल्या तरी निश्चयाच्या बळावर अवकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य सार्थ ठरते आणि आपण निवडलेला मार्ग योग्यचं होता याचा मनोमन अभिमान वाटतो.

आज आपण ज्यांची ओळख करून घेणार आहोत त्यांच्या उद्योग प्रवासाबद्दल जाणून घेतले तर आपल्याला याची प्रचिती येते. आसबेवाडी (तालुका – मंगळवेढा, जिल्हा – सोलापूर) या छोट्या गावातून आलेले श्री. दामाजी भानुदास आसबे हे आपले आजचे यशकथा नायक आहेत. दहावी, बारावीला उत्तम गुण मिळाल्यानंतर त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. पुढे नोकरीसाठी श्री. दामाजी आणि त्यांचे दोन मित्र पुण्याला आले. अभियंता आहे म्हणजे नोकरी मिळणारच असे वाटत असताना प्रत्यक्षात मात्र त्यांना वेगळेच अनुभव आले. काही ठिकाणी नोकरीसाठी अर्ज घेत नव्हते तर काही ठिकाणी काम व्यवस्थित नव्हते. तीन चार ठिकाणी नोकरी मिळाली पण तिथे त्यांचा जम बसू शकला नाही. त्या नोकऱ्या त्यांनी सोडल्या.

अशा येणाऱ्या अनुभवांमुळे मन निराश होत असतानाच भोसरीतील पिरॅमिड फॅब्रिकेशनमध्ये दामाजी यांना एक संधी चालून आली. त्यांनी सांगितले की, नोकरीसाठी तुम्हाला अपेक्षित पगार देऊ शकत नाही पण तुम्ही तोट्यात चालणारा कारखाना फायद्यात नेवू शकला तर त्याबद्दल 3% मोबदला आम्ही तुम्हाला देऊ.
तिथे ते विक्री अभियंता म्हणून रुजू झाले. तेव्हा पहिल्याच आठवड्यात श्री. दामाजी यांनी कोणाच्याही मदतीविना २५००० रुपयांची मालाची मागणी कंपनीला मिळवून दिली. तो काळ होता १९९४ चा. त्यांना पगार ठरला होता १५०० रुपये. त्यांची पहिलीच कामगिरी पाहून राहण्याचे २५० भाडेही कारखान्याकडून मिळू लागले होते. एका छोट्याशा गावातून आलेल्या होतकरू तरुणाची ही सुरुवात होती. शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे कष्टाची तयारी आणि नवीन शिकायची जिद्द मनात होती.

या संधीचे सोने करत त्यांनी अनेक प्रकारची कामे शिकून घेतली. वेगवेगळ्या ठिकाणी टेंडर भरणे, सरकारी प्रकल्पांची माहिती घेऊन तिथे काम करणे, साहित्याची मालाची गुणवत्ता तपासणे, जिथे संवाद होऊ शकत नसेल त्यावर पर्याय शोधणे. अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या त्यांनी सहज पेलल्या. त्याचा फायदा असा झाला की व्यवसायातील कमजोरी लक्षात येऊ लागली आणि त्यादृष्टीने प्रयत्न सुरु झाले. बारकावे समजू लागले. ग्राहकांची अपेक्षा, बाजारातील मागणी असा विविध प्रकारचा अभ्यास होऊ लागला. सर्व प्रकारचे काम करत राहिल्यामुळे श्री. दामाजी फक्त विक्रेता अभियंता न राहता अष्टपैलू झाले. मनापासून जबाबदारी घेत प्रामाणिकपणे काम केल्यामुळे त्यांचे आणि कंपनीच्या साहेबांचे ऋणानुबंध दृढ झाले.
वर्षांपूर्वी कारखान्याची जी आर्थिक स्थिती होती त्याच्या दुप्पट फायदा झाला होता. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला होता. फॅब्रिकेशन व्यवसायामधील अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या होत्या.

कोणतेही काम छोटे नाही या विचारातून त्यांचे मनोबळ वाढले होते जे श्री. दामाजींना प्रगतीच्या वाटेवर फार पूढे नेणार होते. पण हे त्यावेळी माहित नव्हते. कामासाठी वाहून जाण्याची तयारी, चिकाटी आणि नवीन जाणून घेण्याची उमेद असूनही त्यांना त्यांच्या इतर मित्रांच्या मानाने पगार कमीच होता. दुसऱ्यांसाठी इतके काम करतोय, धडपडतोय तर तेच स्वतःसाठी का करू नये ? हा त्यांना प्रश्न पडायचा.

टाटाचा ४०७ टेम्पोसाठी गियर बॉक्सच्या इथे लागणारे काळ्या रंगाचे इंजिन हूड त्यांनी एका दिवसात तयार केले होते. तेव्हा श्री. दामाजींचे फार कौतुक झाले होते. स्वतःकडे इतके गुण असतानाही त्यांनी पहिल्या नोकरीत त्यांच्या कारखान्याच्या प्रगतीसाठी मनापासून प्रयत्न केलेले .. पण आता वेळ आलेली होती.. स्वतःसाठी काहीतरी करायची.. नवीन पथावर चालायची.

१९९६ मध्ये मित्र परिवारातील ३ /४ जणांसोबत भाड्याची जागा घेऊन नवीन कारखाना उघडला. इथेही त्यांच्या कार्याची, बुद्धिमतेची चुणूक दिसली. पहिल्याच वर्षी त्यांनी अठरा लाखाचा व्यवसाय केला. बाकीचे सहभागी नोकरी करत या व्यवसायात आले होते आणि श्री. दामाजी फक्त व्यवसाय. एखादी गोष्ट करायची असेल तर मनाचा कल तसा असावा लागतो. मी हेच करणार म्हणून काही होत नाही. श्री. दामाजींचा पिंड व्यवसायाचा होता पण त्यांच्या भागीदारांना व्यवसायात इतका रस नव्हता. त्यामुळे मतभेद होऊन पूढे हा कारखाना चालू शकला नाही.
आता काय करायचे ? हा मोठा प्रश्न. हे साल होते १९९९. संसार सुरु झाला होता. आता नोकरीच करावी असे हताश झालेले मन बजावत होते.

अशा वेळी त्यांच्यासाठी आशेचा किरण घेऊन आले ते त्यांचे मित्र. पिंपरी चिंचवडचे सहायक आयुक्त तानाजी शिंदे. त्यांनी बजावून सांगितले.. तुम्ही नोकरी करायची नाही.. व्यवसायच करायचा. पण व्यवसाय करायचा तर भांडवल हवेचं.. त्याचे काय करायचे ? ही पुढील अडचण..
श्री. दामाजी यांच्या पत्नी सौ. नंदिनी यांनी घर खर्चातून बचत केलेले ५००० रुपये त्यांना भांडवल म्हणून दिले. योग्य सल्ला देणारा मित्र नि सुखदुःखात साथ देणारी पत्नी असल्यावर जगण्याला सुंदर अर्थ मिळतो याची प्रचिती येते.
याच मित्राच्या मदतीने चिखली येथे भाड्याने जागा घेऊन १९९९ मध्ये दसऱ्याला एनडीए प्लास्टेक नावाचा कारखाना सुरु केला. दहा हजार रुपये क्रेडिटवर त्यांनी आवश्यक त्या दोन मशीन घेतल्या. तिसऱ्याच दिवशी त्यांना फायबरचे डोम बनविण्याचे ९०००० रुपयांचे काम मिळाले. त्यापैकी ८०००० रुपये अगोदरच दिले गेल्याने काम व्यवस्थित पार पडले.

इथून जी सुरुवात झाली ती पुढे चालूच राहिली. नंतर श्री. दामाजी यांनी मागे वळून पहिलेच नाही. २०१४ मध्ये त्यांनी चिखलीतील शेलारवस्ती मध्ये स्वतःची जागा घेऊन स्वतःची कंपनी सुरू केली आणि एनडीए प्लास्टेकच्या यशाचा प्रवास शिखराकडे उत्तम रित्या चालू झाला .श्री. दामाजींच्या एनडीए प्लास्टेक या कंपनी मधून तयार केलेले साहित्य ग्राहकांना आवडू लागले. निर्मितीमध्ये विविधता असल्यामुळे अनेक ठिकाणी एनडीए प्लास्टेकची साधने वापरली जाऊ लागली. पिंपरी-चिंचवड परिसरात फायबरचे ऑफिस, सिक्युरिटी केबिन, ट्री गार्ड, टेलिफोन बूथ, रोड डिव्हायडर, ट्रॅफिक सिग्नल, शोभेच्या वस्तू, कॉम्प्युटर रॅक, मोल्डेड फर्निचर, पाण्यातील नाव, स्वच्छता गृह, रासायनिक टाक्या आणि इतर अनेक प्रकारच्या बऱ्याच वस्तू एनडीए प्लास्टेक मध्ये तयार केल्या जातात. या पैकी उदाहरण सांगायचे म्हणले तर ट्री गार्ड. या ट्री गार्डमुळे झाडाचे रक्षण तर होतेच शिवाय फायबरचे असल्याने ते टिकाऊही आहे नि चोरीला जाण्याची भीतीही नाही. याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ट्री गार्डमध्ये पाणी साठविण्याची व्यवस्था केलेली आहे.

ठिबक सिंचनाद्वारे एकदा पाणी भरल्यावर साधारण आठ दिवस तरी झाडाला पाणी मिळत राहते. त्यामुळे अगदी आठवणीने रोज रोज पाणी घालण्याचे श्रमही इथे कमी होतात. याच्यातून श्री. दामाजी यांची दूरदृष्टी दिसून येते. नवीन कल्पनांना प्रत्यक्ष प्रयोग करून त्या यशस्वीही करत असतात. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात उभारलेले फायबरचे डोम, भोसरीतील लांडेवाडीतील रायगड दरवाजाची फायबरमधील प्रतिकृती तर पिंपळे गुरवमधील ऐतिहासिक दरवाजा इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या निर्मित्या आपणास पाहवयास मिळतात.

इतकेच नाही तर दामाजी सामाजिक कार्यातही अग्रेसर असतात. लायन्स क्लब ऑफ पुणे टाऊनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात श्री. दामाजींचा नेहमी पुढाकार असतो. त्यांनी आपला व्यवसाय यशस्वी करताना काही तत्वे बाळगली. कुणालाही फसवले नाही, कधीही इतरांची गिऱ्हाईके मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. अगदी प्रामाणिकपणे कष्ट करत सातत्य बाळगत त्यांनी ही यशाची वाटचाल सुरु ठेवली आहे. ते म्हणतात ‘जीवनात यशस्वी होण्यासाठी तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून चिकाटीने काम करत राहावे. तरचं कोणालाही आपल्या कार्याची यशोगाथा नक्कीच लिहिता येईल. कितीही यशाच्या शिखरावर पोहचला तरी आई वडील, त्यांचे कष्ट त्यांचे प्रेम अजिबात विसरू नका. आईवडिलांच्या आशीर्वादात खूप मोठी ताकद असते.

या यशाच्या पथावर चालताना सगळेच काही अपेक्षित घडले नाही. सुरुवातीला जे बरे वाईट अनुभव आले त्यात त्यांच्या अर्धांगिनीची साथ खूप मोलाची आणि महत्वाची होती. त्यांनी संसाराची बाजू समर्थपणे पेलली ज्यामुळे श्री. दामाजी हे त्यांच्या व्यवसायाकडे पुरेपूर लक्ष देऊ शकले. घरदार सांभाळत त्यांच्या दोन्ही मुलांचे शिक्षण उत्तमरित्या पार पाडून त्यांना जागरूक नागरिक बनवले, याचा त्यांना फार अभिमान वाटतो. दोघेही पती पत्नी एकमेकांविषयी भरभरून बोलतात. या पती पत्नीच्या बोलण्यात एकमेकांविषयी स्नेह, आदर, कौतुक ओसंडून वाहत असते. पतीचा हा व्यवसाय आपल्या मुलाने परदेशात नावालौकिकास आणावा ही सौ. नंदिनी ताईंची इच्छा आहे आणि त्यांची मुले कष्टाळू वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत नक्कीच प्रगती करतील हा विश्वास आहे.

घर परिवारासोबत मित्र परिवारही फार महत्वाचा असतो. जीवन यात्रेतील सुखातच न्हवे तर दुःखातही हातात हात धरून चालणारा, योग्य मार्ग दाखवणारे मित्र असले तर जीवनास बहार येते. असा मित्र परिवार म्हणजे देवाने दिलेली अनोखी भेट असते. जी श्री. दामाजी यांना लाभली आहे. त्यांच्या दृष्टीने कुटुंबीय, मित्र परिवार फार मौल्यवान आहेत. असे प्रेमळ साथीदार सर्वांनाच लाभावेत.
कष्ट, जिद्द, चिकाटी, सातत्य, निष्ठा, प्रामाणिकपणा अशा अनेक सकारात्म बाबी श्री. दामाजी भानुदास आसबे यांचेकडे आहेत. येणाऱ्या परिस्थितीला तोंड देत लढण्याची हिंमत ठेवली तर सफलता मिळतेच मिळते. केलेले परिश्रम सार्थ होतात.
इथून पूढेही अशाच नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी श्री. दामाजी यांना खूप शुभेच्छा.

मनिषा पाटील

— लेखन : सौ. मनिषा पाटील. पालकाड, केरळ.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिल्पा कुलकर्णी on स्नेहाची रेसिपी ५
शितल अहेर on कविता
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित