१. शंभो शंकरा
शंभो शंकरा शिव भोले नाथा विश्वेश्वरा
नमितो आम्ही करुणा सिंधु भव दुःख हरा।।धृ।।
भगीरथी गंगा जटेत सामावणारा
नृत्य कला संगीत दाता नटेश्वरा
विश्वशांती दाता कल्याण करणारा ।।1।।
सागर विष प्राशुनी अमृत देणारा
असुरा वध कर्ती भाऱ्या शोभे गौरीहरा
श्रीगणेश कार्तिकेय सुकुमार शोभणारा ।।2।।
निळकंठ भस्म विलेप गळा सर्प धरा
गळा रुद्र माळ त्रिशूल करा डमरु धरा
सकळ रक्षिता इच्छा पूर्ण करणारा ।।3।।
बारा ज्योतिर्लिंग दाविती ऊर्जा साक्षात्कार
नवनाथांचे गुरु शोभती श्री ज्ञानेश्वर
शंकराचार्य वसले हिंदुधर्म प्रचारा ।।4।।
— रचना : अरुण गांगल. कर्जत, रायगड
२. नमिते तुला महादेवा
तांडव नृत्य धारी
अर्धनारी नटेश्वरा
ओम नमो नमः
ओम नमो नमः !!
हाती त्रिशूल जटेत गंगा
गळ्यात सर्प सदा शिवा
जय शंभो भोलेनाथा
नमिते तुला महादेवा !!
सती उमा तुजवरी भाळली
लंकेची पार्वती होऊन जगली
संचार करती सृष्टीत साऱ्या
जीवन बघण्या भल्या बुऱ्या !!
धारण करशी रुद्राक्ष व्याघ्रांबर
दुष्टांचा करशी समूळ संहार
महाशिवरात्रीला होई तुझा जागर
नमिते तुला शंकरा नमो नमः नमो नमः !!
— रचना : प्रभा वाडकर. लातूर
३. तो शिव शंभू
तो शांत निवांत आहे, पार्वतीचा पती,
महादेव, शिवशंभू आहे, ओंकार ही गती,
तो आदिदेव, तो स्वयंभू, तो लिलाधर शिव,
सत्वर पावे भक्ताला, पाहून मनोभाव,
तो नटराज रूपाने, करतो सृजन खरा,
तो तांडव, ते ही करतो, जगताच्या उद्धारा,
तो भोळा, भुलतो पाही, भक्तीतील भाव,
तो सर्वेश्वर प्रसन्न होता, दर्शन देतो शिव,
स्मरून त्याला वंदन करा, भजन पूजन करा,
सारी विघ्ने पळून जाती, भयभीत होई पीडा,
शांती नांदते सदैव, जेथे त्याची हो पूजा,
दृढ भक्तीने, भजता त्याला, सदैव साथीला…!!!
— रचना : हेमंत भिडे. जळगाव
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800