मुंबईच्या चेंबूर भागातील म्हाडा ची जुनी वसाहत असलेले टिळकनगर गेल्या काही वर्षांपासून पुनर्विकासामुळे गगनचुंबी इमारतींनी भरत चालले आहे.
या नव्या इमारतींमुळे आज या वसाहतीची लोकसंख्या जवळपास ७५ हजार इतकी झाली असून नवनवीन समस्या निर्माण होत आहेत, हे लक्षात घेऊन तसेच वसाहतीतील रहिवासी यांच्यासाठी कल्याणकारी उपक्रम राबविण्यात यावेत यासाठी १० वर्षांपूर्वी टिळकनगर रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशन ची स्थापना करण्यात आली. या संस्थेचे आज ८०० च्या वर सभासद आहेत. संस्थेची दशकपूर्ती नुकतीच अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना असोसिएशन चे अध्यक्ष ॲड नितीन निकम यांनी आतापर्यंत केलेल्या कामगिरीचा आढावा घेऊन वसाहतीची गरज म्हणून समाजमंदिर उपलब्ध व्हावे अशी मागणी केली.

तर या आणि इतर गरजांच्या पूर्ततेसाठी आपण कटिबद्ध आहोत असे वचन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आमदार श्री मंगेश कुडाळकर यांनी दिले.

या वसाहतीशी आपला १९७८ सालापासून संबंध असून वसाहतीने आदर्श वसाहत म्हणून केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रातच नाही, तर देश पातळीवर नाव मिळवावे, असे मनोगत निवृत माहिती संचालक श्री देवेंद्र भुजबळ यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमात स्थानिक रहिवासी तथा निवृत्त पोलिस सहायक आयुक्त यांचा, ‘वर्दीतील किस्से’ हा रंगतदार एकपात्री प्रयोग उपस्थितांची दाद घेऊन गेला. मानसी कदम ग्रुप आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, नाटिका, नृत्ये देखील उत्तम झाली.

असोसिएशन च्या वाटचालीत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला.
दशकपूर्तीच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषके देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रवीण साळवी यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव श्री मधु कदम यांनी केले.
या कार्यक्रमास परिसरातील सर्व राजकीय पक्षांचे, धार्मिक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री गिरीश कांबळे, अशोक जवकर, विन्सेंट सर सुनील कुडाळ, नामदेव राऊळ, केशव पवार, मिलिंद खत्री, बी. वि.धुमाळी, डी एम राणे, सौ संगीता निकम, सौ मीनल कदम, सौ स्नेहा पाठारे, सौ. शिंगरूट मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800