: नारळाच्या दुधाचा मठ्ठा :
उन्हाळा आता तीव्रतेने जाणवत आहे. दिवसभर अन्न नकोसे वाटते पण नुसते थंड पदार्थ, शीतपेय प्यावीशी वाटतात. डायबेटिस असलेल्याना तर फळांचा रस पण पिणे शक्य नसते कारण त्यात साखर असते. अशावेळी ताक, मसाला ताक, मठ्ठा यांचे जास्त प्रमाणात आवडीने सेवन केले जाते.
मठ्ठा हा तर सर्वांचाच लाडका ! उन्हाळ्यातील कोणत्याही कार्यप्रसंगात हमखास मठ्ठा बनतोच आणि थंडगार मठ्ठा पिऊनच सर्व पाहुणेमंडळी तृप्त होतात. म्हणूनच आज आपण त्यातही खास असा मठ्ठा बनवला तर कायम आठवणीत राहील आणि पुन्हा पुन्हा बनवून प्याल असा हा खास नारळाचा मठ्ठा एकदा बनवून तर पहा !
साहित्य :
1 नारळ, अर्धी वाटी दही, अर्धा इंच आल्याचा किस, एका मिरचीचे तुकडे, थोडीशी एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर, एक कढीपत्त्याची काडी, पाव चमचा हिंग पावडर, पाव चमचा मेथ्या, 3..4 काळे मिरे, किंचित भाजलेल्या जिऱ्याची पूड, 2 चमचे खडीसाखर, 1 चमचा सैंधव, पाव चमचा साजूक तूप.
कृती :
नारळाचे काही पदार्थ करायचे म्हटले की आधी अगदी जिवावर यायचे. नारळ फोडून, तो खवून मग त्याचे दूध काढायचे म्हणजे मोठे संकटच वाटायचे. पण आता नारळाचे दूध काढण्याची एक अतिशय सोपी युक्ती सांगते. नारळ फोडला की तो कुकरमध्ये भरपूर पाणी घालून खाली रिंग ठेवून एका डिश मध्ये किंवा डब्यात ठेवून मध्यम गॅसवर 5..6 शिट्ट्या काढून मग झाकण उघडल्यावर थंड झाले की एखाद्या चमच्याने किंवा सुरीने अगदी झटकन अलगद नारळ करवंटीपासुन सुटून येतो. मग साल काढणीने त्याची साल काढून तुकडे करावेत आणि मग 1 ग्लास पाणी थोडे थोडे घालत मिक्सर मधुन एकदम बारीक फिरवून तो बारीक गाळणीतून किंवा पातळ सूती स्वच्छ कापडातून गाळून दूध काढावे.
मठ्ठा करताना दूध काढतो, त्यावेळी नारळाच्या तुकड्यांबरोबर खडीसाखसुद्धा मिक्सर मधून काढावी. म्हणजे बारीक होऊन लगेंच विरघळेल. आता एका भांड्यात दही घेऊन त्यात हे नारळाचे दूध घालून सैंधव व आले बारीक किसणीने किसून त्यात पाणी घालून ते गाळून मिक्स करावे व ब्लेंडरने किंवा रवीने भरपूर घुसळावे. आता गॅसवर छोटी कढई ठेवून त्यात अगदी पाव चमचाच तूप घालावे. ते गरम झाले की त्यात मेथ्या गुलाबी रंग येईपर्यंत परतून काढून घ्याव्यात व थन्ड झाल्यावर बारिक ठेचून मठ्ठ्यात घालावा. त्यानंतर कढिपत्ता अगदी बारीक कट करून घालून परतावा व त्यावर हिंग पावडर, मिरे ठेचून घालावेत. शेवटी मिरच्याचे तुकडे घालून जिरपुड घालावी व थोडेसे परतून हे सर्व मठ्ठयात घालावे. कोथिम्बिर घालून लागेल तसे पातळ सर होण्यासाठी पाणी घालावे. आता पुन्हा एकदा ब्लेंडरने किंवा रवीने सर्व व्यवस्थित घुसळावे. शेवटी सर्व्ह करताना चालत असेल तर आईसक्यूब घालुन थंडगार नारळाचा स्वादिष्ट मठ्ठा सर्व्ह करावा.
वैशिष्टय :
आपल्या नेहमीच्या ताकाच्या मठ्ठ्यासारखीच हा मठ्ठा बनवण्याचीही पद्धत आहे. पण नारळ हा किती गुणकारी आहे, हे अगदी केसांपासून ते पायांच्या नखापर्यंत आंतरबाह्य शरीरासाठी हे सर्वांना ठाऊक आहेच. विशेषतः उन्हाळ्यात तर याचे दूध म्हणजे शरीरासाठी अत्यंत शीतल असते. शिवाय त्याचा, साजूक तुपाचा सौम्य स्वाद तर या मठ्ठ्याचे खास वैशिष्टय आहे. जास्त तूप घातले तर थंड झाले की गोठते मग त्याची मजा येत नाही. पण किंचीत तुपामध्ये मेथ्या, हिंग, कढीपत्ता सर्व तुपात परतले की त्यांचा मस्त स्वाद, सुगंध घरभर दरवळतो आणि तुपसुद्धा त्यात शोषले गेल्यामुळे तवंग न येता फक्त त्याचा छान स्वाद येतो. मिरपूड, ताक वजन कमी करण्यासाठी खूपच उपयुक्त असते. सैंधव, खडीसाखरे ऐवजी मीठ, साधी साखर घातली तरी चालते, पण खडिसाखर थंड असते आणि सैंधव घातल्यामुळे जास्त स्वादिष्ट आणि पाचक बनते. हे शरीराला थंडावा तर देतेच पण अपचन, बद्धकोष्ठता, त्वचेच्या समस्या, डिहायड्रेशन, पोटाचे विकार दूर करून आरोग्य उत्तम ठेवते. आवडत असेल तर काकडी बारीक खिसून त्यात घातली तर अजून त्याची टेस्ट आणि पौष्टिकता सुद्धा वाढते. म्हणून नियमितपणे मस्त टेस्टी नारळाचा खास मठ्ठा बनवा, प्या आणि सर्वांना पाजा.

— लेखन : सौ.स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800