Wednesday, March 12, 2025
Homeलेखजर्मन विश्व - ९

जर्मन विश्व – ९

“अल्बर्ट आइनस्टाइन”

अल्बर्ट आइनस्टाइन हे नाव माहित नाही अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. जिज्ञासू वृत्ती प्रतिबिंबित करणारे त्यांचे मोठे डोळे, जवळजवळ खांद्यापर्यंत वाढलेले, विस्कटलेले, अस्ताव्यस्त पांढरे केस, चेहऱ्यावरील अगदी लहान मुलासारखे निरागस भाव आणि अत्यंत गबाळे कपडे हे वर्णन ऐकल्यावर ज्या व्यक्तीचे चित्र मनात उमटते ती व्यक्ति म्हणजे अल्बर्ट आइनस्टाइन.

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना माहीत असलेले हे नाव. जे मराठी भाषेत तर “तू काय स्वतःला आईन्स्टाईन समजतो काय…?” अशा अविर्भावात देखील वापरले जाते. याचे एकमेव कारण म्हणजे त्यांची अलौकिक बुद्धि. गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांमध्ये त्यांना देवाची देणगी मिळाल्याप्रमाणे चलाख बुद्धी होती, अफाट वेगाने त्यांची बुद्धी काम करी. गणितीय आणि भौतिक शास्त्रीय क्षेत्रात त्यांनी “न भूतो न भविष्यति” या उक्तीला सार्थ ठरवणारी कामगिरी करून ठेवली आहे.

अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या इतके विद्वान शास्त्रज्ञ जगतात नाहीत. विसाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक तसेच सापेक्षता सिद्धांताचे जनक म्हणून संपूर्ण जग अल्बर्ट आईन्स्टाईन यांना ओळखते. E=mc2 या समीकरणाचा अर्थ माहित नसला तरी हे समीकरण अल्बर्ट आईन्स्टाईनशी सर्वजण खात्रीने जोडतात. त्यांनी लावलेले शोध जसे की प्रकाश विद्युत परिणाम सिद्धांत (Theory of Photoelectric effect) आणि सापेक्षता सिद्धांत (Theory of Relativity) हे वैज्ञानिक जगतात अत्यंत मूलभूत सिद्धांत समजले जातात. यातील प्रकाश विद्युत परिणामाच्या सिद्धांतासाठी १९२१ सालचे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक त्यांना देण्यात आले. कोणत्याही क्षेत्रात अत्युच्च कामगिरी करणाऱ्यांना जागतिक स्तरावरील हे मानाचे पारितोषिक प्राप्त होते.

अल्बर्ट आइनस्टाइन यांचा जन्म १४ मार्च १८७९ रोजी जर्मनीतील उल्म नावाच्या गावात एका साध्या कुटुंबात झाला. हर्मन आईनस्टाइन हे त्यांचे वडील, त्यांचा विद्युत रासायनिक पदार्थांशी निगडित एक छोटासा कारखाना होता. त्यांची आई पावलीन गृहिणी होती. त्यांना माया नावाची २ वर्ष लहान असलेली बहिण होती. हे एक ज्यु धर्मीय कुटुंब होते. यांचे शालेय शिक्षण जर्मनी आणि स्वित्झलँड अशा दोन देशांमध्ये झाले. गणित व भौतिकशास्त्र हे लहानपणापासूनच त्यांच्या आवडीचे विषय. वडिलांनी खेळ म्हणून दिलेल्या होकायंत्रापासून त्यांची उत्सुकता जागृत झाली आणि कालांतराने त्यांनी अनेक नवनवीन रचना करून यांत्रिक उपकरणे बनवली व गणितातील गोडी आणि कसब सिद्ध केले.

लहानग्या अल्बर्टला आणि त्यांच्या बहिणीला अनेक विज्ञानविषयक पुस्तके, गणिती कोडी आणि तत्त्वज्ञान विषयक लिखाण त्यांच्या कुटुंबीयांनी उपलब्ध करून दिले होते. इमॅन्युअल कान्ट या जर्मन तत्वज्ञानी चे “सुयोग्य तर्कसंगतीचे समालोचन” हे पुस्तक अल्बर्ट आइनस्टाइन यांना ‘पवित्र भूमिती पुस्तक’ वाटे.

१९०३ मध्ये झुरिक विद्यापीठात शिकत असताना भेटलेली मिलेव मेरिक ही अल्बर्ट यांची मैत्रीण नंतर पहिली पत्नी झाली. त्यांनी तिला नंतर लिहिलेल्या पत्रांमध्ये ते अगदी मोकळेपणे सांगतात की त्यांनी एकत्र केलेला अभ्यास आणि संशोधनात खूप आनंद होता. ह्या जोडप्याला एकूण ३ मुले झाली. पहिली मुलगी काही आजाराने गेली असे म्हणतात. जेव्हा कळले की आईन्स्टाईन चे दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे तेव्हा बाकी २ मुलांना घेऊन मेरिक जर्मनीवरून स्वित्झर्लंड ला कायमची परतली. १९१९ मध्ये ते कायदेशीर रीत्या विभक्त झाले.

स्वित्झर्लंड मधील झुरिक विद्यापीठाने आईन्स्टाईन यांना १९०५ मध्ये त्यांच्या एका प्रबंधासाठी पीएचडी ही उच्च पदवी प्रदान केली. याच वर्षी त्यांनी आपले प्रकाश विद्युत परिणाम, ब्राऊनीय गती, सापेक्षतावाद सिद्धांत, वस्तूमान व ऊर्जा यातील समतुल्यता असे चार क्रांतिकारी शोधनिबंध प्रसिद्ध केले. त्यांचे हे संशोधन भौतिकशास्त्रीय सिद्धांतांना नवीन आयाम देणारे होते. यथावकाश ते त्याच विद्यापीठात भौतिकशास्त्राचे अध्यापन करू लागले. १९१४ मध्ये ते पुन्हा एकदा जर्मनीत आले. नंतर १९१७ मध्ये बर्लिनच्या भौतिकशास्त्रासाठी असलेल्या कायझर विल्हेल्म इन्स्टिट्यूटचे संचालक म्हणून काम पाहू लागले.

१९१९ साली पहिल्या पत्नी बरोबरचे संबंध तुटल्यानंतर त्यांनी एल्सा लिओवेंथल हिच्याशी दुसरा प्रेम विवाह केला. १९३२ मध्ये काही कामानिमित्त ते अमेरिकेला गेलेले असताना जर्मनीत ॲडॉल्फ हिटलरचे नाझी सरकार प्रस्थापित झाले. जू धर्मीयांच्या विरुद्ध असलेले हे सरकार व त्यांचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन त्यांनी अमेरिकेतच वास्तव्य करण्याचे ठरविले. ह्यापुढील सर्व जीवनकाळ त्यांनी अमेरिकेतच घालवला. एल्साला मात्र हृदय आणि यकृत संबंधी दुर्धर आजार झाल्याने तिचा डिसेंबर १९३६ मध्ये मृत्यु झाला. हिटलरच्या कचाट्यात अडकलेल्या अनेक हुशार शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिकांना त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. काहींना अमेरिकेत नोकरी मिळवून दिली तर काहीना काहीची दुसऱ्या देशांमध्ये सोय केली. त्यांनी स्वतः देखील अमेरिकेतील न्यू जर्सी येथील इन्स्टिट्यूट फॉर अँडव्हान्सेड स्टडी (Institute for Advanced study) येथे कायमची नोकरी घेतली व स्थित झाले. इथेच १८ एप्रिल १९५५ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

एक अजरामर व्यक्तित्व भूतल सोडून गेले पण वारसा म्हणून बरेच काही ठेऊन देखील गेले. त्यांच्या जीवनपटावरून प्रेरणा घेऊन अनेक चित्रपट बनवले गेले, असंख्य लेख लिहिले गेले व संगीतरचना देखील रचल्या गेल्या. त्यांच्या संशोधनाविषयी वाचायला आणि पहायला अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यातील एक इथे देत आहे.

अल्बर्ट आइनस्टाइन ह्यांचा बुद्ध्यांक संपूर्ण मानवजातीत सर्वात जास्त होता असे म्हणले जाते पण त्याचा वैद्यकीय पुरावा काही उपलब्ध नाही. ह्या निमित्ताने थोडा विचार आपण ही करूया असे वाटते. जर गणित, भौतिकशास्त्र ह्या विषयांमध्ये गती असेल तरच ती व्यक्ती हुशार, विद्वान असे असते का हो ? एकीकडे गणितात गती आणि दुसरीकडे कला, भाषा, इतिहास अशा विषयांमध्ये काहीच रस आणि गती नाही, ही एकांगी बुद्धी आत्ताच्या काळात उपयुक्त आहे का? प्रेझेंटेशन च्या जमान्यात अशी गबाळी व्यक्ती स्वीकारली जाईल का? अफाट बुद्धिमत्ता पण चंचल मन असलेली व्यक्ती नातेसंबंध कसे टिकवू, फुलवू शकेल, माझ्या आयुष्यात मला खरंच अशी व्यक्ती हवी आहे का ? मी स्वतः अशा व्यक्तीला सांभाळून घेऊ शकते का ? माझा मुलगा अल्बर्ट आइनस्टाइन सारखा हुशार हवा असे काही मनात असेल तर वरील प्रश्नांचं नक्की विचार करावा आणि आपली मते आम्हाला देखील कळवायला विसरू नका. धन्यवाद.

— लेखन : प्रा आशी नाईक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित
सौ.मिनल शशिकांत शिंदे, on चित्र भाषा संमेलन : अभिनव उपक्रम