काही काही मोठ्या व्यक्तींविषयी आपण खुप ऐकूण असतो. त्यांच्याविषयी बरेच काही वाचलेले असते. त्यामुळे अशा व्यक्तींविषयी आपल्याला आदरयुक्त भिती वाटते.
श्री प्रदीप दीक्षित सर यांच्या विषयी सुरुवातीला माझ्या अशाच भावना होत्या. पण दूरदर्शनचे निवृत्त संचालक, अभिनेते श्री याकूब सईद यांच्या पुणे येथे झालेल्या ९० व्या वाढदिवसानिमित्त रामायण फेम कॅमेरामन अजित नाईक, गप्पागोष्टी फेम जयंत ओक यांच्या समवेत मला त्यांच्या सोबत २ दिवस राहण्याची संधी मिळाली आणि त्यांचे सखोल विचार, लेखन, दिग्दर्शन यातील अनुभव आणि विशेष म्हणजे अतिशय निगर्वी स्वभाव पाहून मी भारावून गेलो.

पुढे काही दिवसांनी केमन आयलांडस येथील लेखिका शिल्पा तगलपल्लेवार गंपावार यांनी लिहिलेल्या आणि न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स ने प्रकाशित केलेल्या “मी शिल्पा, चंद्रपूर ते केमन आयलांडस” या पुस्तकाच्या नागपूर येथे होणाऱ्या प्रकाशनासाठी आम्ही त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने रेल्वे ने जाताना, येताना आणि प्रत्यक्ष नागपूर येथील चार दिवसांचा अविस्मरणीय सहवास यामुळे त्यांच्या विषयीचा आदर शतपटीने वाढला. जाणून घेऊया या दीक्षित सरांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व….

मुंबई दूरदर्शन केंद्राच्या सुरुवातीची तीन वर्षे, म्हणजेच १९७२ ते १९७५ असे पूर्णवेळचे पहिले आणि एकमेव संहिता लेखक (Script Writer) म्हणून श्री प्रदीप दीक्षित ओळखले जातात. पण स्वतंत्रपणे काही करण्याच्या ओढीने त्यांनी सुरक्षित आणि अतिशय ग्लॅमर असलेली अशी दूरदर्शनची सरकारी नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि तेव्हापासून ते स्वतंत्रपणे संहिता लेखन, चित्रपटांचे, माहितिपटांचे दिग्दर्शन करू लागले, ते आजतागायत.

श्री प्रदिप दिक्षित हे मूळ नागपुरचे. त्यांचे बीकॉम पर्यंत शिक्षण तिथेच झाले. कॉलेज मध्ये असताना त्यांना नाटकाची आवड असल्यामुळे त्यांनी नाटकातील सुरुवातीचे धडे थोर लेखक, दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्याकडे गिरवले. बी कॉम झाल्यावर बँकेतील सुरक्षित नोकरीचा पर्याय त्यांच्यासाठी सहज उपलब्ध होता परंतु सुरक्षित नोकरीच्या मागे न लागता त्यांनी त्यांची आवड ओळखून फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट मधून १९७२ साली पटकथा संवाद लेखनाचा डिप्लोमा प्राप्त केला. त्यानंतर दुरदर्शन मध्ये ते संहिता लेखक म्हणून रुजू झाले.पण वर म्हटल्या प्रमाणे सरकारी नोकरीत त्यांचे मन काही रमले नाही. त्यामुळे ती नोकरी सोडून त्यांनी स्वतंत्र लेखक, दिग्दर्शक, निर्माता म्हणून आपली कारकिद सुरू केली.

श्री दिक्षित यांनी आता पर्यंत अडीचशे हून अधिक मराठी, हिंदी, इंग्रजी मध्ये कथा, पटकथा, संवाद लिहलेले आहेत. त्यांनी पन्नास हुन अधिक लघूपट, माहिती पट, चित्रपट यासाठी लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे त्यांनी प्रकाश मेहरा यांच्या “सगळे सारखेच” या चित्रपटासाठी दिग्दर्शन, सहलेखक व सहगितकार म्हणून भूमिका बजावली आहे. टिव्हीवर लोकप्रिय झालेल्या “आभाळ माया” या मालिकेचे ते सहलेखक होते.
या सर्व व्यवसायिक बाबी करीत असतानाच दिक्षित सरांनी “कम्युनिकेशन सपोर्ट फाउंडेशन” हि सामाजिक संवाद संस्था स्थापन केली. या संस्थेद्वारे ते ध्वनी प्रदूषणावर नाटक आणि ‘कॅलिग्राफी हॅपनिंग शो’ सादर करित असतात. प्रत्येक व्यक्तीने आपली सामाजिक बांधिलकी ओळखून समाजाच्या कल्याणासाठी आपले योगदान दिले पाहिजे, या साठी ते व्यक्तिगत सामाजिक दायित्व हि संकल्पना समाजात रुजविण्यासाठी सतत प्रयत्न करीत असतात.
दिक्षित दाम्पत्याला पोटचा मुलगा असतानाही त्यांनी एक मुलगी दत्तक घेतली. त्यांनी सख्या मुलीसारखेच तिचे पालनपोषण केले. पुढे तिच्या विवाहाच्या वेळेस मुलगी दत्तक असल्याचे सांगताच तिचा विवाह जुळण्यात अडचणी येऊ लागल्या. पण सत्य न लपवता, हे सत्य स्वीकारणाऱ्या मुलाशीच मुलीचा विवाह करायचा, असा त्यांचा निर्धार होता आणि त्यांना खरोखरच तसा जावई मिळाला. पण दत्तक मुलामुलीचे लग्न जुळवण्यासाठी किती अनंत अडचणी येतात हे स्वानुभवाने कळाल्यामुळे त्यांनी दत्तक उपवर वधू वरांचे विवाह जुळवण्यासाठी एक वेबसाइट सुरू केली आहे.
गेल्या पन्नास वर्षात २० नोकऱ्या आणि व्यवसायानिमित्त देशविदेशात भ्रमण केल्यानंतर दीक्षित सर पुण्यात स्थायिक झाले आहेत.त्यांना आतापर्यंत अनेक पुरुस्कारांनी गौरवण्यात आले आहे. हे पुरुस्कार पुढील प्रमाणे आहेत .
१) १९६४ – “नाव नाही नाटकाला” या अनुवादित नाटकात उत्कृष्ठ अभिनयाचे पारितोषिक.
२) १९८० – ” दलदल ” या लघुपटासाठी एक राष्ट्रीय आणि पाच आंतरराष्ट्रीय पारितोषिके
३) १९८६ – ग.दी .माळगुळकर यांच्या वरील माहिती पटासाठी ‘ इंडियन डॉक्युमेंटरी प्रोड्यूसर्स असोसिएशन ‘ तर्फे लेखन दिग्दर्शनासाठी उत्कृष्ठ पारितोषिक
४) १९९३ – ‘ पहला बागी महात्मा ‘ या महात्मा ज्योतीबा फुले यांच्या वरील दुरदर्शन लघुपटासाठी उत्कृष्ठ दिग्दर्शनाचे पारितोषिक.
५) २००९ – ‘ आय लव्हबी बी . एस . एस . या मराठी दोन अंकी संगीत नाटकासाठी नाट्य संपदातर्फ उत्कृष्ठ नाट्य लेखनाचे द्वितीय पारितोषिक
६) २०१० – फिल्म इन्स्टिट्यूट च्या सुवर्ण वर्षा निमित्त ‘टेलिव्हिजन व्ह्यूअरशीप’ या शोधनिबंधासाठी फेलोशिप .
असे हे दिक्षित सर पंचाहत्तरी उलटूनही तरुणांना लाजवतील अशा तडफेने अजूनही काम करीत आहेत आणि करीत राहतील, असा मला विश्वास आहे.त्यांच्या पुढिल विविध उपक्रमांसाठी मनःपुर्वक शुभेच्छा.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800