संगीतकार रवी यांचा आज स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने जाणून घेऊ या, त्यांच्या संगीतमय जीवनाची कथा. संगीतकार रवी यांना विनम्र अभिवादन.
— संपादक
काही काही कलावंत नशीब घेऊनच जन्माला येतात. तर काहीजण आपल्या अंगभूत गुणांनी, प्रचंड मेहनतीने आणि कष्टाने आपले नशीब स्वतः घडवतात.
रविशंकर शर्मा हा दिल्ली चा तरुण असाच नशीब आजमावण्यासाठी मुंबईच्या मायानगरीत दाखल झाला तो गायक बनण्याचे स्वप्न घेऊनच. पण नशीबात काही वेगळेच लिहिले होते. त्याने सुरवातीचे काही दिवस मालाड स्टेशन च्या प्लॅटफॉर्म वर, तर कधी फुटपाथ वर काढले. दर महिन्याला वडिलांची येणारी ४० रुपयाची मनी ऑर्डर हा एकमेव आधार होता पण संघर्ष सुरु होता.
तशातच एक दिवस हुस्नलाल भगतराम आणि हेमंत कुमार यांची रवीशी ओळख झाली. हेमंत कुमार यांनी आपल्या आनंदमठ या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या मागे या तरुणाला कोरस मध्ये गायची संधी दिली. गाणे होते वंदे ..मातरम. ही गोष्ट १९५० मधली. त्यानंतर १९५५ पर्यंत रवी, हेमंत कुमार यांचा सहाय्यक म्हणून काम करत होता.
१९५५ साली देवेंद्र गोएल यांनी राजेंद्रकुमार ला ‘वचन’ या चित्रपट द्वारे अभिनेता म्हणून संगीतकार म्हणून रवी ला ब्रेक दिला. ‘आनंदमठ’ मधील कोरस गायक आता स्वतंत्र संगीतकार झाला होता.
पुढे लता पुढील तीस वर्षे त्याच्या संगीत दिग्दर्शनाखाली एकसे एक गाणी गात होती.
‘ऐ मेरे दिल ए नादान तू गमसे न घबराना (टॉवर हाउस ), ‘वोह दिल कहासे लाऊ तेरे याद जो भुला दे’ (भरोसा), ‘लो आ गायी उनकी याद वोह नाही आये'(दो बदन), ‘तुही मेरी मंदिर तो हि मेरी पूजा’ (खानदान), ‘लागे ना मोर जिया’ (घुंघट), ‘मिलती ही जिंदगी मे मोहब्बत कभी कभी’, ‘गैरो पे करम अपनो पे सितम ‘(आंखे ), मोहम्मद रफी बरोबर ‘आज कि मुलाकात बस इतनी’ (भरोसा), ‘तुम्हारी नजर क्यो खफा हो गई (दो कलिया), मुकेश बरोबर ‘ये मोसम रंगीन समा’ (माडर्न गर्ल) अशी निवडक पण सुरेल गाणी लता -रवी यांनी दिली.

पण रवीने लता पेक्षा आशा ला झुकते माप दिले. आशाने देखील त्यांचा विश्वास सार्थ ठरवत प्रत्येक गाण्याचे सोने केले. तुम्ही फक्त आशा-रवी यांची गाणी आठवा.
‘ये रास्ते ही प्यारके’ (टायटल सॉंग), ‘तोरा मन दर्पण कहलाये’, ‘मेरे भैया मेरे चांद मेरे अनमोल रतन’ (काजल), ‘जब चाली थंडी हवा’ (दो बदन),’ कौन आय कि निगाहोमे पलक’ , ‘आगे भी जाने ना तू’, ‘दिन है बहार के ‘(वक्त), ‘जिंदगी इत्तेफाक है’ (आदमी और इन्सान), ‘किशोर कुमार बरोबर ये राते ये मोसम नदी का किनारा, ‘सी ए टी कॅट कॅट माने बिल्ली’ (दिल्ली का ठग), रफी बरोबर ‘मुझे प्यार कि जिंदगी देनेवाले’ (प्यार का सागर), ‘इन हवाओमे तुझको मेरा प्यार पुकारे’ (गुमराह),’ नील गगन पे उडते बदल आ आ आ’ (खानदान), ‘ये परदा हटा दो’,’सजना सजना ओह सजना’ (एक फुल दो माली) आणि किती सांगू ?. मला वाटते त्याकाळात आशा च्या आवाजाचा वापर ओ .पी नय्यर नंतर रवी यांनीच प्रभावी पणे केला.
रवी यांचा सर्वात आवडता गायक हा निर्विवाद पणे महेंद्र कपूर होता. तरीपण रफी-किशोर च्या वाटेला देखील काही लाजवाब गाणी आलीच. रफी चेच उदाहरण घ्या. ‘चौदहवी का चांद’ चे टायटल सॉंग,’ छू लेने दो नाजूक होठोंको ‘(काजल), ‘रहा गर्दीशोमे हरदम’, ‘इस भरी दुनिया मे’ (दो बदन), ‘हुस्नवाले तेरा जवाब नही’, ‘जबसे तुम्हे देखा है’ (घरांना), ‘तुझको पुकारे मेरा प्यार’ (नीलकमल),’बार बार देखो'(चायना टाऊन),’ना ये जमि थी ना आसमा था’ (सगाई),’मतलब निकाल गया है तो पहचानते नही (अमानत), ‘ये झुके झुके नैना’, ‘कभी दुष्मनी कभी दोस्ती’ (भरोसा), ‘सौ बार जनम लेंगे’ (उस्तादोके उस्ताद). तर किशोर चे ‘धडकन’ मधील ‘मै तो चला जिधर चाले रस्ता. ‘आजही सदाबहार सदरात मोडतात.
मन्नाडे यांची गाण्याची मैफिल ज्या गाण्याशिवाय पूर्ण होत नाहीं ते ‘ऐ मेरी जोहराजबी’ (वक्त) हे गाणे रविचेच आणि ‘तुझे सुरज कहू या चंदा’ हे ‘एक फुल दो माली’मधील गाणे हि त्यांचेच,मजा म्हणजे हि दोन्ही गाणी बलराज सहानी यांच्यावर चित्रित झाली आहेत.तरी पण आवडता गायक महेंद्र कपूरच .किंबहुना महेंद्र कपूर यांची कारकीर्द घडवण्यात रवी यांचा मोठा वाटा आहे.’तुम अगर साथ देने का वाद करो’,’निले गगन के तले’,’किसी पत्थर कि मूरत से ‘ (हमराज), ‘इन हवाओमे तुझको मेरा प्यार पुकारे’,’ये हवा ये फिझा है उदास जैसे मेरा दिल’,’चलो एक बार फिरसे’ (गुमराह),’एक धुंद से आना है’ (धुंद),’दिल के ये आरझू थी कोई दिल रुबा मिले’ (निकाह).’गुमराह’ पासून बी आर चोप्रा यांच्या जवळपास प्रत्येक चित्रपटात गीतकार साहीर,संगीत रवी आणि गायक महेंद्र कपूर हे ठरलेले असायचे. अशीच त्यांची जोडी जमली ती देवेंद्र गोएल बरोबर. ‘वचन’ पासून सुरु झालेले हे संबंध पुढे ‘एक फुल दो माली’,’दस लाख’, ‘धडकन’,ते ‘आदमी सडक का’ पर्यंत कायम राहिले.
सुनील दत्त ने आपल्या अजंठा पिक्चर्स साठी मराठीतल्या नानावटी खून खटल्या वर आधारित ‘अपराध मीच केला’ या नाटकावर ‘ये रास्ते है प्यार के’ करायचा निर्णय घेतला आणि गुमराह स्टाइल गाणी देण्यासाठी रवी ना पाचारण केले .त्यांनी पण आशा कडून ‘ये रास्ते है प्यार के हे’ गाणे आणि रफी कडून ‘तुम जिसपर नजर डालो’ ही मधुर गाणी गाऊन घेतली.
पु.ल.देशपांडे यांच्या ‘सुंदर मी होणार’ या नाटकावर वसंतराव जोगळेकर यांनी ‘आज और कल ‘ हा चित्रपट निर्माण केला. त्यातही रवीने रफी कडून ‘ये वादिया ये फिझाये बुला रही है तुम्हे ‘सारखे अप्रतिम गाणे गाऊन घेतले..
‘वचन’ या चित्रपटा मध्ये आशा चे ‘चंदा मामा दूर के’ हे गाणे गाजले मग ‘दादी अम्मा मान जा'(घरांना) ,’बच्चे मन के सच्चे'(दो कलिया), टीम टीम करते तारे, चल मेरे घोडे टिक टिक टिक,ह्या गाण्यांची परंपराच निर्माण झाली.
पण खरी परंपरा निर्माण झाली ती भिकाऱ्यांच्या गाण्याची ,जेव्हा त्यांनी’ दस लाख’ मध्ये आशा रफी कडून ‘गरीबो कि सुनो वोह तुम्हारी सुनेगा’ आणि ‘एक फुल दो माली’ मध्ये ‘औलाद वालो फुलो फलो’ ही गाणी गाऊन घेतली तेव्हा .ही दोन्ही गाणी गाजली रस्त्यावर ,बस मध्ये,रेल्वे गाडीत भिकाऱ्यांना भिक मागायला एक साधन मिळाले.ही गाणी आपल्या भसाड्या आवाजात गाऊन भिकाऱ्यांनी लोकांच्या हृदयात योग्य ती सहानभूती निर्माण करून आपली पोटें भरली आणि रवी च्या माथी मात्र आली ,”भिकाऱ्यांचा संगीतकार” म्हणून फक्त अवहेलना !! पण रवी या सर्व टीकेला आपल्या संगीतातून चोख उत्तर देत राहिला.१९५५ च्या ‘वचन’ पासून संगीतकार म्हणून सुरु झालेली संगीत कारकीर्द १९७० पर्यंत जोमात सुरु होती.मग आर डी.बर्मन , कल्याणजी आनंदजी , लक्ष्मीकांत प्यारेलाल या त्रयी च्या झंझावातात ती मागे पडली.पुढच्या दशकात धुंद,समाज को बदल डालो, धडकन, एक महल हो सपनो का आदमी सडक का वगैरे आपल्या मित्रांचे चित्रपट केले. आणि विझता विझता ज्योत मोठी व्हावी तसे १९८२ साली सलमा आगा ला घेऊन ‘निकाह’ ची सर्व गाणी गाजवली .पण नंतर ‘दहलीझ’, ‘तवायफ ‘आज कि आवाज ‘त्यांची कारकीर्द तारू शकले नाही. जवळ पास ७५ हिंदी चित्रपटाना संगीत देऊनहि रवीना हवी ती लोकप्रियता, मानसन्मान मिळालेच नाहीत.

शेवटच्या १० -१५ वर्षात मल्याळी सिनेमाना रवीने ‘बॉम्बे रवी’ या नावाने संगीत दिले.१९८८ साली पत्नीच्या निधनानंतर एकाकी वाटणाऱ्या रविला कौटुंबिक वादातूनही जावे लागले. (आपली वर्षा उसगावकर ही त्याचा मुलगा अजय शर्मा ची बायको !) एक काळ असा होता कि ‘बाबुल कि दुवाये लेती जा’ (नीलकमल), ‘डोली सजके दुल्हन ससुराल चली’ (डोली) या गाण्याशिवाय लग्नाची एकही वरात निघत नसे. प्रत्येक वरातीत हे गाणे वाजलेच पाहिजे असा अलिखित नियम होता. आजही मित्रा च्या लग्नात ‘चौदहवी का चांद’ मधले “मेरा यार बना है दुल्हा” आणि नंतर ‘आदमी सडक का’ मधील “आज मेरे यार कि शादी है” ही गाणी आवर्जून गायली जातात. जिवंतपणी प्रसिद्धी पासून चार हात दूर राहिलेल्या रवी या गुणी संगीतकाराची ही गाणी त्यांच्या मृत्यू नंतरही प्रत्येक लग्नात वाजवली जातील, गायली जातील, पण या गाण्याचा करता- करविता रवी नावाचा कोणी संगीतकार होता हे मात्र कोणाच्या ध्यानीमनी ही नसेल…
आयुष्याच्या अखेरीस त्यांच्या मनात मात्र हेच विचार येत असतील “संसार कि हर शय का इतना हि फसाना है एक धुंद से आना है एक धुंद मे जाना है”

— लेखन : प्रशांत कुलकर्णी. अबुधाबी/पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800